श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे उत्तरेतील सरदार मल्हारराव होळकर आणि जयाजी शिंदे यांना उत्तरेतील महसूलाचा निम्मा वाटा आपल्याला राखून निम्मा सरकारांत दाखल करण्याच्या बद्दलची लिहीलेली दोन पत्रे पुढे दिलेली आहेत.
लेखांक १: श्री
राजश्री मल्हारजी होलकर व राजश्री
जयाजी सिंदे गोसावी यांसी
छ अखंडीतलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्नो। बालाजी बाजीराव प्रधान आसिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहीणे. विशेष प्रां। गुजराथपैकी सुरत आठावीसी सरकारांत ठेऊन बाकी प्रांतमजकूर कूल पैकी निमे सरकार व निमे उभयतां तुम्ही याप्रमाणे करार केला असे. सुरत महाल आठावीसी खेरीज करून दरोबस्त प्रां। मजकूर पै॥ समाईक राजेश्री माहादाजी अंबाजी यांसि बेरीज रुपये ८००००० आठ लक्ष पैकी सरकार हिशाचे यैवजी रुपये ४००००० च्यार लक्ष व तुमच्या हिशांपैकी रुपये ४००००० च्यार लक्ष द्यावे. बाकी यैवज निमे तुम्ही घेणे व निमे सरकारांत देणे. सुरत आठावीसी पैकी तुम्हां उभयेतांस माहाल येक लाख रुपयांचा द्यावयाचा करार केला असे जाणिजे छ ४ साबान सु॥ इहिदे खमसैन मया व अलफ बहुत काय लिहीणे ? लेखनसीमा
या पत्रानूसार, गुजराथ प्रांतातील सुरत (सुरत शहर आणि आजूबाजूची अठ्ठावीस गावे. याचे महाराष्ट्रातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवकालीन चाकण चौर्यांशी आणि ठाणे धरून आसपासच्या सहासष्ट गावांना मिळालेले संयुक्त नाव सासष्टी उर्फ साष्टी )हा प्रांत वगळता उरलेल्या प्रांतातील महसूल आणि वसुलीच्या निम्म्या भागावर शिंदे-होळकर आणि निम्म्या भागावर पेशव्यांचा हक्क नानासाहेबांनी मान्य केला.
लेखांक २: श्री
राजश्री मलहारजी होलकर व राजश्री
जयाजी सिंदे गोसावी यांसी
छ अखंडीतलक्ष्मीआलंकृत राजमान्य श्ने॥ बालाजी बाजीराव प्रधान आसिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहीणे विशेष तुम्हांकडे प्रां। बुदी व प॥ नेणवे वगैरे प्रांतमजकूर येथील चौथाईचे अमलाचा मक्ता सालमजकूरां पासून सालदरसाल रु॥ ७५००० पाऊण लक्ष करार केले असेत. सदरहू प्रमाणे साल दरसाल सरकारांत पावते करून पावलियाचे जाब घेणे. तेणेप्रमाणे मजुरां असेत जाणिजे छ ४ साबान सु॥ इहिदे खमसैन मया व अलफ याखेरीज राजश्री माहादाजी अंबाजी यांजबाबत दरसाल रु॥ये १५००० पंधरा हजार करार केले असेत पावते करीत जाणे जाणिजे रा। छ मजकूर बहूत काय लिहीणे ? लेखनसीमा
या पत्रानूसार माळवा-राजपुताना भागातील बुंदी प्रांताच्या आणि नेणवे परगण्याच्या वसूल ७५००० रु मिळत असे. तो महसूल दरसाल सरकारांत पावता करण्याबद्दल नानासाहेबांनी शिंदे-होळकरांना पत्र लिहिले. याशिवाय पेशव्यांच्या मुतालिकांना संस्थानाकडून १५००० रु करार केले होते तेही पाठवण्यास सांगितले आहे.
सदर दोन्ही पत्रे ही चंद्रचूड दफ्तरातून घेतलेली आहेत. दोन्ही पत्रातील शेवटचे नानासाहेब पेशव्यांचे हस्ताक्षर ठळक अक्षरांनी दर्शवले आहे..
संदर्भ : चंद्रचूड दफ्तर, संपादक- द. वि. आपटे, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे