नानासाहेब पेशवे : रियासतकारांच्या नजरेतून
     बाजीरावाचे वैशिष्ट्य धडाडी व युद्धनैपुण्य होय असे सांगता आले, तर नानासाहेबाचे वैशिष्ट्य हिशेबी कारभार असे थोडक्यात सांगता येईल. तो वारंवार स्वार्‍यांत गेला आणि युद्धप्रसंगातही लक्ष देणारा होता; तथापी युद्धाची ही बाब त्याने सर्वथा आपल्या हस्तकांकडून सिद्धीस नेली. द्रव्यार्जनाचे उगम, ते कायम ठेवण्याची दक्षता आणि सर्व ठिकाणी सारखी नजर ठेवून एकंदर राज्याचे हिशोब वेळच्यावेळी पाहून उत्त्पनाची निगा बरोबर ठेवणे या बाबतीत नानासाहेबाचा हात धरणारा दुसरा पेशवा झाला नाही.
पैसा आणणे, कर्ज वारणे, महाराष्ट्राचे दैन्य निवारण करणे, हाच विषय त्याच्या एकंदर पत्रसंभारात व व्यवस्थेत मुख्यतः नजरेस येतो. हल्ली जसे राज्याचे सार्वजनिक कर्ज समाजावर विभागण्याची सोय आहे तशी त्यावेळी नव्हती. कर्जाचा बोजा व्यक्तिशः मुख्य चालकावर असून त्याची एकट्याची मान सावकाराकडे गुंतलेली असे. बाजीरावाने केलेल्या उद्योगात हिशेबी एकसूत्रीपणा व वसुलाची व्यवस्था बनली नव्हती. तीच मुखतः नानासाहेबाने सर्वत्र उत्पन्न केली. मराठे सरदार दक्षिणोत्तर प्रदेशांत संचार करत गेले, त्यांच्या उद्योगास नियमित वळण लावण्यासाठीच नानासाहेबाने पहिल्या स्वार्‍या केल्या. निजामास आळा घालून कर्नाटक जिंकणे हा त्याच्या उत्तरायुष्याचा मुख्य उद्देश पुढे बनला. आरंभी तीन स्वार्‍या त्याने लागोपाठ उत्तरेत केल्या, त्यातच हिंदुपदपातशाहीची निर्मिती स्पष्ट दिसते. राजपुताना, बुंदेलखंड, दुआब व पुढे बंगाल-बिहारपर्यंतचा प्रदेश त्याच्या उद्योगाचे क्षेत्र बनला. एका जागी न बसता सारखे हिंडत राहणे हा एकंदर पेशव्यांचा नित्यक्रम नानासाहेबाने उत्कटत्वाने चालविला असे रोजनिशीतील त्याच्या मुक्कामांवरून सहज दिसते. प्रवासात देखिल कामाच्या जरुरीप्रमाणे चारदोन दिवसांपेक्षा जास्त वास्तव्य एकाच ठिकाणी झालेले दिसत नाही. लग्नकार्यादी प्रसंगांची अडचणही त्यास व्यत्यय आणित नसे. एका पुरुषाने नानाविध व्यवहारांत अहोरात्र लक्ष घालून सारखीघासाघीस सोसल्याची उदाहरणे पेशव्यांच्या इतकी फार थोडी मिळतील. रोज नवीन काम, नवीन स्वारी, नवीन अडचण, नवीन उपाय अशी कर्तव्यपरंपरा कायम चालू असे. याची दगदग चित्तास न वाटता उलट तोच विषय त्यांच्या नेहमीच्या सरावाचा बनला होता....    

रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई, मराठी रियासत, बाळाजी बाजीराव 

कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com