श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी इ.स. १७५६
मध्ये तुळाजी आंग्र्यांवर स्वारी करून स्वराज्याचे आरमारबुडवले असा निरर्थक आरोप
आजपर्यंत अव्याहतपणे केला जात आहे. परंतू, अस्सल ऐतिहासिक साधनांची चिकित्सा
केली असता हा आरोप किती बिनबुडाचा आहे हे लक्षात येते.
सर्वात्त प्रथम शाहूराजांच्या
मृत्यूपत्राबाबत पाहू ! शाहू महाराजांना पुत्ररत्न नव्हते. या सुमारास कोल्हापूर
आणि सातारा अशी दोन राज्ये अस्तित्वात असल्याने शाहू महाराजांनी साहजीकच
कोल्हापूरच्या राजसबाईपूत्र संभाजीराजांना याबाबत विचारले. परंतू भोसले घराण्याची
एकी होण्यास संभाजी राजे अनुकूल नव्हते. यामूळे नागपुरकर मुधोजी भोसले आणि
सगुणाबाई राणीसाहेबांच्या बहिणीचा पुत्र दत्तक घ्यावा असं शाहू महाराजांनी ठरवलं.
अर्थात, नागपूरकर भोसले हे भोसले कुलोत्पन्न असले तरीही त्यांचे कूळ मूळ
शाखेपासून विलग होऊन कित्येक वर्षे लोटली होती. अशात रक्तसंबंध कायम राहणे अशक्य
होते. गोविंद खंडेराव चिटणीसांच्या सल्ल्याने शाहू महाराजांनी असा बेत ठरवताच
ताराबाईंस ही कूणकूण लागून त्या सातार्यास शाहूमहाराजांना भेटावयास आल्या. ‘आपला वंश अजून शिल्लक असता बाहेरचा मुलगा गादीवर का बसवता?’ अशी ताराबाईंनी शाहूराजांकडे विचारणा केली. पण शाहूंनी सगळी परिस्थिती
वर्णन करताच ताराबाईंनी त्यांना आपला नातू ‘रामराजा’ याला दत्तक घेण्यासंबंधी सुचवले. ताराबाईंच्या सल्ल्यानूसार शाहू
महाराजांनी रामराजाला दत्तक घेण्याचे ठरवले खरे, पण
दत्तकविधान होण्याआधीच शाहूराजांचा मृत्यू झाला. रामराजा हा जन्मापासून
अज्ञातवासात वाढला असल्याने त्यालाबाहेरच्या जगाचे फारसे ज्ञान नव्हते, परंतू चोवीस वर्षांच्या आसपास असताना गादीवर बसल्यानंतर ताराबाईपेक्षा
नानासाहेबच उत्तमप्रकारे राज्यकारभार करू शकतात हे ध्यानात आल्याने रामराजाचे मन
नानासाहेबांकडे झुकू लागले. वास्तविक, शाहू महाराज हे
नागपूरकर भोसल्यांचा मुलगा दत्तक घेण्यास विचार करत होते तेव्हा ताराबाईने
स्वतःच्या नातवाला पुढे करणे यात तीचा स्वार्थच होता. पण पुढे रामराजा सज्ञान
झाल्यानंतर नानासाहेबांकडे आकृष्ट होऊ लागल्यावर ताराबाईंना आपल्या मनाप्रमाणे
सत्ता गाजवण्याचे इमले कोसळलेले बघून दुःख झाले. आणि यानंतर पुढे मरेपर्यंत
पेशव्याने आपणास फसवले अशा आशयाचे आरोप करू लागली. आणि या सगळ्या घटना घडण्यापूर्वीच
शाहू महाराजांनी रामराजास धनी करून पेशव्याने कारभार सांभाळावा असे ठरवले होते.
आता आंग्र्यांच्या प्रकरणाकडे वळू. याला
सुरुवात करण्यापूर्वी एक सांगितले पाहीजे की, आंग्र्यांच्या संपूर्ण प्रकरणात
नानासाहेब पेशव्यांनी प्रत्यक्षात सहभाग कुठेही घेतलेला नव्हता. इ.स. १७५५ मध्ये
चूलत बंधू सदाशिवरावभाऊ, आणि धाकटी आत्या, इचलकरंजीकर व्यंकटराव घोरपड्यांची पत्नी अनुबाई घोरपडे (जोशी) यांच्यासह
कर्नाटकातील सावनूरच्या नबाबावर स्वारी केली. मुरारराव घोरपडे आणि मुझफ्फरखान हे
पेशव्यांचेच कर्नाटकातले सरदार नवाबाला जाऊन मिळाले होते,
त्यामूळे कर्नाटकचा प्रश्न अतिशयगंभीर होऊन बसला होता. नानासाहेबांनी या
स्वारीसाठीआपल्याउत्तरेतल्या सरदारांनाही कर्नाटकात बोलावून घेतले. अखेरीस
सावनुरकर नवाबाने पेशव्यांसमोर गुडघे टेकले.
नानासाहेब पेशवे कर्नाटकात सावनुरकर
नवाबाशीलढत असताना इकडे कोकणात आग्र्यांचे प्रकरण उद्भवले. शाहूंच्या निधनानंतर
स्वराज्याचा सांभाळ करणे हे पेशव्यांचे कर्तव्य होते. राजधानी रायगड कोकणात
असल्याने, कोकणाचे महत्व जास्तच ! परंतू, शाहूंच्या
आगमनापूर्वीपासूनच कोकणात आंग्र्यांचे वर्चस्व होते. कान्होजीराजे आंग्रे या
जबरदस्त माणसाला थोरल्या राजाराम महाराजांनी सरखेल बनवले. पण पुढे कान्होजींच्या
मनात राज्यपिपासू वृत्ती रुजत गेल्याने ते स्वतःला कोकणचे राजे मानू लागले. थोरले
पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्तीमूळे कान्होजी हे शाहूराजांना येऊन मिळाले.
पुढे बाजीराव पेशव्यांनीदेखील सेखोजी आग्र्यांना आपल्याकार्यात सामावून घेतले खरे, पण पुढे संभाजी-मानाजी-तुळाजी या आंग्रेबंधूत भाऊबंदकी माजली. गादीसाठी
ते वाट्टेल ते करायला तयार होते. त्यातल्या त्यात मानाजी हे पेशव्यांना अनुकूल
होते. तुळाजी मात्र पेशव्यांना मानायला तयार नव्हता. पेशव्यांचे अधिकार त्याला
मान्य नव्हते. कोकण आपलेच आहे अशा थाटात तो वावरत असे. सागरी किल्ला असल्याने
(सागरी म्हणजे जलदूर्ग नव्हे ! सागर किनार्यावर वसलेला किल्ला, ज्याच्या एका बाजूस जमीन आणि दुसर्या बाजूस समुद असतो) विजयदूर्गावर
तुळाजीचे मुख्य ठाणे होते. आरमारही याच किल्ल्यावर असे. या गोष्टीचा भडका पूर्वीच
उडाला होता. सरदेसाईंनी मराठी रियासतीत याचे कारण नमुद केले आहे ते असे- ‘तुळाजीबद्दल पेशव्याचे मनातजबरदस्त तेढ निर्माण होण्यास तशीच कारणे
उत्पन्न होत गेली. पोर्तुगिझांचा वसईकडील प्रदेश पेशव्यांनी काबिज केला तो हरउपाय
करून परत मिळवावा अशी खटपट पोर्तुगिझांनी सारखी चालू ठेवली. हा त्यांचा प्रयत्न
विफल करण्यासाठी पेशव्याने वाडीकर सावंतास हाताशी घेवून त्याजकडून गोव्यावर आक्रमण
चालविले.पेशव्याशी तुळाजीचे फाटत चाललेले पाहून पोर्तुगिझांनी तुळाजीशी सख्य
जोडले. सावंताने गोव्यावर स्वार्या करून पोर्तुगिझांचा बराच प्रदेश काबिज केला, त्याचे बदल्यात तुळाजीने सावंतांचा उच्छेद चालविला. हे प्रकार चालू असता
शाहू मरण पावला आणि ताराबाईने पेशव्याविरुद्ध कारस्थान उभारले. पेशव्याला शह
देण्यासाठी तीने पोर्तुगिझांस कळवलेकळवले, ‘’तुम्ही पेशव्याचा पाडाव कराल तर आम्ही तुमचा वसईकडचा प्रदेश परत देऊ’’. सलाबतजंग (मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा थोरला मुलगा),
बुसी यांजकडेही ताराबाईने पेशव्याविरुद्ध कारस्थाने चालवली. बुसीला (फ्रेंचांचा
गव्हर्नर) सलाबत्जंगाची सत्ता टिकवणे जितके अगत्याचे तितकेच सलाबतजंगास काढून
गाजीउद्दीनास (मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा धाकटा मुलगा) निजामीवर आणणे पेशव्यास
अगत्याचे वाटले. अशी यावेळच्या राजकारणाची गुंतागुंत आहे.’
यावेळच्या युरोपातल्या राजकीय
परिस्थितीचाही आढावा घेणे यादरम्यान महत्वाचे आहे. पोर्तुगिज आणि इंग्रज हे दोघेही
हिंदुस्थानात निव्वळ व्यापाराच्या दृष्टीने आले असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. परंतू
दोघांचे मुख्य हेतू वेगळे होते. पोर्तुगिज हे कट्टर सनातनी होते, तर इंग्रज
हे त्यामानाने पुढारलेले होते. इंग्रज हे व्यापाराच्या नावाखाली वखारी थाटून
हिंदुस्थानात राज्यविस्तार करायला बघत होते तर पोर्तुगिज हे राज्यविस्तारापेक्षाही
धर्मविस्तारासाठी झटत होते. यामूळेच, ज्याप्रमाणे इंग्रज आणि
फ्रेंच या दोन साम्राज्यवादी गटात हाडवैर होते तसे पोर्तुगिज आणि इंग्रजांत
नव्हते. वस्तुतः, पोर्तुगिज आणि इंग्लंडच्याराज घराण्याचे
कौटूंबिक संबंध निर्माण झाल्यानेच इंग्रजांना ’मुंबई बेट’ पोर्तुगिजांकडून मिळाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे. या सगळ्या
गोष्टीमूळे, पोर्तुगिज आणि मराठे यांच्या भांडणात इंग्रजांनी
पडणे नानासाहेबांना नको होते. यासाठी नानासाहेबांनी नामी युक्ती केली. तुळाजी
आंग्रे हा कोकणपट्ट्यात दंडेली माजवत असल्याने कोकणातील प्रजाही त्याच्यावर
असंतुष्ट होती. शिवाय, तुळाजी आणि इंग्रजांचेहीपक्के हाडवैर
असल्याने इंग्रजांनाही तुळाजीचा बंदोबस्त झालेला हवा होता. या सार्या गोष्टीचा
नानासाहेबांनी असा उपयोग करून घेतला की, इंग्रजांनी
मराठ्यांच्या विरोधात पोर्तुगिजांना मदत करू नये,
त्याबदल्यात मराठे तुळाजीचा बंदोबस्त करतील. मराठे फ्रेंचांना मदत करतील अशी
इंग्रजांना कायम धास्ती वाटतअसे, शिवाय आता तुळाजीचेही
पारिपत्य होणार हे पाहून इंग्रजांनाही आनंदच झाला. नानासाहेब आणि इंग्रजांची युती
ही फक्त तुळाजीला नामोहरम करण्याबाबत आणि पोर्तुगिजांबाबत होती, त्यात मराठी आरमाराचा नाश व्हावा असे कधीही पेशव्यांच्या मनातही आले
नव्हते.
तुळाजी हा फार बळजोर झाला होता.
पेशव्यांच्या पक्षातील लोकांना तर तो पाण्यातच पाहत असे. इ.स. १७५३ मध्ये तुळाजी
आंग्रे काहीएक कारण नसताना विशाळगडावर चालून गेला. केवळ प्रतिनिधी हे पेशव्यांच्या
पक्षातले म्हणून.. विशाळगडचा किल्लेदार लिहीतो, ‘...आंगर्याने
मर्यादा सोडून मुलकाचा उच्छेद केला. प्रभावळी, साखरपे दोनही
तोंडास शह देऊन बसला आहे. प्रतिनिधीच्या मुलकाची खराबी केली. कोणी खावंद त्यास
विचारता नाही (इतका तो माजला आहे!)...’ पेशवे दफ्तर खंड
२४ मधील पत्रांवरून या गोष्टींची कल्पना येते. ताराबाईंनीही तुळाजीला याबद्दल जाब
विचारला असता ताराबाईंनाही त्याने किम्मत दिली नाही. अखेरीस प्रतिनिधींनी आपले
मोठे सैन्य पाठवल्यानंतर तुळाजी पुन्हा वेढा उठवून माघारी गेला.
तुळाजी आंग्रे आणि मानाजी आंग्रे या
बंधूंमधले वैरही पेशवे-तुळाजी इतकेच प्रचंड होते. तुळाजीने मानाजीच्या कुलाबा
किल्ल्यावर हल्ला करून मानाजी आंग्र्यांचा कुटूंबकबीला पकडून कैदेत ठेवला होता. आंग्रे
आणि पेशव्यांचे, दोघांचेही गुरु ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनीही याबाबतीत तोड
काढण्याचा प्रयत्न केला होता. ब्रह्मेंद्रस्वामींचा तुळाजीवर फार जीव होता. या
बाबतीत एका पत्रात ते तुळाजीला म्हणतात, “चवदालक्षांचा धणी तो आहे देवळी (श्री परशुराम),
त्याचा भक्तराज शिरोमणी तुळाजी सरखेल... सरखेल...तुम्हांस शाहुजीने सरखेल दिल्ही.
तुम्हांवरी दया फार आहे हे आज्ञा..” परंतू हेच
ब्रह्मेंद्रस्वामी तुळाजीची वाढती पुंडगिरी पाहून तुळाजीस फर्मावतात काय फर्मावतात
ते पहा, ते संपूर्ण पत्रच लहान असल्यामूळे पुढे देत आहे-
“श्री. सहस्त्रायु चिरंजीव विजयीभव
तुळाजीस आज्ञा ऐसी जे- तुझे सहस्र अस्न्याय झाले. तुजलापत्र न लिहीतो. परंतू
मानसिंग(मानाजी) तुमची गोडी व्हावी, महत्कार्य सिधीस जावे याजकरीतापत्र
लिहीले आहे. तर, कबीला व बायका जे तुम्हांकडे मानाजीची आहेत
ती लावून (मानाजीकडे) रवाना करावी. येविसी राजपत्रे व आमचे पत्र गेलेच आहे. बहुत
काय लिहीणे हे आज्ञा. मानसिंगास दोन गोष्टी सांगितल्या. त्यात अंतर काडीइतके
सहस्त्र वाट्याने पडणार नाही. आम्ही चित्त शोधून पाहीले. तुम्ही आता लेकूरबुद्धी न
करणे हे आज्ञा. दोघे भाऊ एक होऊन एखादे आभाळास हात घालणे”.
या पत्रातून स्पष्ट समजून येते,
ब्रह्मेंद्रस्वामी म्हणतात की ‘वास्तविक तुझे अपराध इतके
झाले की माझी तुझ्याशी बोलण्याची इच्छा नव्हती पण मानाजी आणि तुझे, भावाभावांचे सख्य व्हावे यासाठी पत्र लिहीले. मानाजीच्या मनात काहीही
वाईट नाही तेव्हा तु ही लहान मुलासारखे न वागता, दोघे भाऊ एक
होऊन एका महत्वाच्या कामगिरीस हात घालणे’. मानाजी आंग्रे हे
मात्र पेशव्यांशी कायम निष्ठा ठेवून होते. पूर्वी १० ऑक्टोबर १७५२ च्या एका पत्रात
मानाजी नानासाहेबांना म्हणतात, “आमचा एक निश्चय की आपले
म्हणून आहो. आपला अवलंब करून मानाने आहो..”
या सुमारास निजामाची कटकट, नागपूरकर
जानोजी भोसल्यांची बंडाळी, १७५३पासून सतत सावनूर, अर्काट, बिदनूर, म्हैसूर अशा
सलग मोहीमा यामूळे नानासाहेबांना तुळाजीकडे लक्ष केंद्रीत करण्यास सवड नव्हती, पण तुळाजीकडे दुर्लक्ष करूनही चालत नव्हते. अखेरीस नानासाहेबांनी
कोकणातला पेशव्यांचा सरसुभेदार रामाजी महादेव बिवलकर याच्याकडे तुळाजीच्या
मोहीमेची मुखत्यारी दिली. पेशव्यांचे आरमार अजिबातच नव्हते,
मुळात सुरुवातीपासूनच, पेशवे किंवा मराठे असं वेगळं काही
प्रकरण नव्हतं. आंग्र्यांचं आरमार हेच स्वराज्याचं आरमार असल्याने वेगळं आरमार
असण्याची शक्यताही नव्हती. मानाजी आंग्र्यांचं असं वेगळं एक लहानसं आरमार होतं, पण तुळाजीच्या आरमारापुढे मानाजींचं आरमार तोकडं पडत होतं. पण आता मात्र
तुळाजीला आरमाराच्या शिवाय हरवणं शक्य नाही हे पेशव्यांना ठावूक होतंच. याकरताच
रामाजी महादेवानी आंग्र्यांना समुद्री युद्धात बंध घालण्यासाठी इंग्रजी आरमाराची
मदत घेण्याचं ठरवलं. जमिनीवरच्या युद्धात पेशव्यांच्या फौजेसमोर तुळाजीची धडगत लागणार
नाहीहे उघडच होतं. रामाजी महादेव हा मूळ्चा कल्याणचा गृहस्थ थोरल्या बाजीराव
पेशव्यांपासून जवळपास तीस वर्षे उत्तर कोकणाचा सरसुभेदार होता. इतिहासकार असा आरोप
ठेवतात की, पेशव्याने रामाजी महादेवासारख्या नोकरावर आरमारी
मोहीमेची जबाबदारीसोपवून सत्यानाश केला. पण सत्य हे आहे, की
तीस वर्षाहून अधीक काळ सुभेदारी पाहील्यामूळे रामाजीमहादेव यांना कोकणातल्या, तेथील माणसांच्या खाचाखोचा अगदी डोळे झाकूनही सांगता येऊ शकत होत्या. पण
एक गोष्ट थोडी विचित्र घडली, की रामाजी महादेवांनी मानाजी
आग्र्यांचा पेब उर्फ बिकटगड हा किल्ला अचानक कब्जात घेतला. कदाचीत तुळाजीच्या काही
कटाची कूणकूण रामाजींना लागलीकी काय कोण जाणे, पण या
गोष्टीने मानाजीआंग्रे मात्र रामाजीपंतांवत भयंकर संतापले. पेबच्या खालचा मुलुखही
रामाजीपंतांच्या कब्जात गेल्याने मानाजींना खर्चाची अडचण भासू लागली. याच वेळेस
जंजिरेकर सिद्दीने कुलाब्यावर हल्ला चढवला. मानाजींनी भाऊ तुळाजीला मदतीची पत्रे
पाठवली असता त्याने मानाजींचा पत्रातून भयंकर अपमान केला. अखेरीस मानाजी आणि
रामाजी महादेव यांच्यातील गैरसमज दूर होऊन दोघेही पुन्हा एक झाले. रेवदंड्याच्या
रामेश्वर मंदिरात सख्य झाले. रामाजीने आखलेल्या या मोहीमेला १७५४ च्या अखेरीस
नानासाहेबांनी कर्नाटकातून मंजूरी कळवली आणि कृष्णाजी महादेव जोशी, मस्तानीपुत्र समशेरबहाद्दर, दिनकर महादेव जोशी, खंडोजी माणकर, शंकराजी केशव अशा सरदारांना कोकणात
रवाना केले. शिवाय मदतीला वाडीकर सावंत, पंत अमात्य, प्रतिनिधी इत्यादी लोक होतेच ! विजयदूर्गाआधी सुवर्णदूर्ग काबीज
करण्यासंबंधी रामाजी महादेव आणि इंग्रजांचा मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड बर्शियर
यांच्यात दि. १९ मार्च १७५५ रोजी एक करारनामा झाला तो असा-
·
सर्व आरमार इंग्रजांच्या ताब्यात असावे; परंतू
कारभार मात्र उभयतांच्या संमतीने व्हावा.
·
तुळाजी आंग्र्याकडून जी जहाजे काबिज करण्यात येतील
ती इंग्रज-मराठ्यांनी निम्मी निम्मी वाटून घ्यावी.
·
बाणकोट व हिम्मतगड (नंतरचा फोर्ट व्हिक्टोरीया) आणि
नदीच्या दक्षिण काठावरील पाच गावे मराठ्यांनी इंग्रजांस कायमची द्यावीत.
·
पश्चिम
किनार्यावरून आंग्र्यांनी कोणत्याही किल्ल्यास समुद्रातून मदत पोहोचवू नये असा
बंदोबस्त इंग्रजांनी ठेवावा.
·
आंग्र्यांच्या किल्ल्यात जे द्रव्य, सामान, दारुगोळा, तोफा वगैरे सापडेल ते सर्व मराठ्यांस
देण्यात यावे.
·
मानाजीच्या मुलुखावर उभयतांनी हल्ला केल्यास खांदेरी
बेट, बंदर व कित्येक गावे(?) इंग्रज यांस द्यावीत.
·
जरुरीप्रमाणे जास्त कलमे नानासाहेबांच्या संमतीने
ठरवण्यात यावीत.
या करारानुसार विल्यम जेम्स या इंग्रज
सरखेलाच्या हाताखाली इंग्रजी आरमार दि. २२ मार्च १७५५ रोजी सुवर्णदूर्गावर चाल
करून निघाले. जमिनीवरून दिनकर महादेव जोशी आणि समशेरबहाद्दर हे देवरुखला येऊन
थांबले होते. २२ मार्चला संध्याकाळी इंग्रजांचे आरमार मुंबईहून निघाले आणि दुसर्या
दिवशी पहाटे राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर तुळाजीचीअठरा गलबते इंग्रजांना फिरताना
दिसली. इंग्रजांचे बलाढ्य आरमार पाहून तुळाजीची गलबते माघारी वेगाने पसार झाली.
याच वेळेस, एक दोन दिवसात सात तारवे, एक बातेला (?) आणि साठ गलबते असे मानाजींचे आरमार चौलच्या बंदरातून येऊन इंग्रजी
आरमाराला सामिल झाले. यानंतर सुवर्णदूर्गाच्या वाटेत बराच वेळ मराठी आरमाराने काही
ना काही कारणाने मुक्काम करून ‘वेळ काढला’. २९ तारखेला पेशवे आणि इंग्रजांच्या संयुक्त आरमाराचा सुवर्णदूर्गाला
वेढा पडला. या वेढ्याच्यावेळेस आंग्र्यांच्या आरमारात आणि इंग्रजांच्या आरमारात
झटापट झाली. इंग्रजांनी आंग्र्यांचा जयगडच्या खाडीपर्यंत पाठलाग गेला पण आंग्रे
निसटून विजयदूर्गावर गेले. विल्यम जेम्स मुंबईच्या वरिष्ठांना पेशव्यांच्या
आरमाराविषयी अत्यंत चिडून लिहीतो, “...पेशव्यांच्या
जहाजांनी काही एक पराक्रम केला नाही. वास्तविक पाहता आंग्र्यांचेच लोक हरएक कामात
कुशल दिसले. मागे रामाजीपंत एकटा आहे असे पाहून मी आंग्र्यांचा पाठलाग सोडून दुसर्या
दिवशी सुवर्णदूर्गास परत आलो. मी येण्यापूर्वीच रामाजीपंताने काही लोक व एक तोफ
किनार्यावर उतरून लढाईचा पोरखेळ चालवला होता. तारिख ३एप्रिल रोजी मी
सुवर्णदूर्गावर मारा सुरू केला. पेशव्यांची जहाजे निलाजरेपणाने आमची मजा बघत उभी
राहीली. कितीही सांगितले तरी ती पुढें येऊन आम्हांस मदत करीनात. तेव्हा त्यांच्या
मदतीची आशा सोडून मी एकट्यानेच हल्ल्याचे काम सुरू केले. रात्री वादळ सुरू झाले.
म्हणून आम्ही बंदराच्या बाहेर आलो असता रामाजीपंताने मजकडे येऊन अशी बातमी
सांगितली, की किल्ल्याचा किल्लेदार व आठ माणसे ठार
झाली असून आता तीनशेपेक्षा जास्त लोक किल्ल्यात नाहीत... कालचा दिवस बोलाचालीत
गेला. परंतू बोलाचालीत अशी वेळ काढून शत्रूचे लोक बाहेरून मदत येण्याची वाट पाहत
आहेत असा मला संशय आला... (अखेरीस रामाजीपंतांची मदत न मिळाल्यामूळे) मी आपली
जहाजे किल्ल्याच्या अगदी जवळ आणली. किल्ल्यातील लोकांचा माराही काही कमी नव्हता.
सकाळी नऊपासून तीन तास आमचा मारा चालला. बारा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील
दारुखाना आग लागून उडाला... दुसर्या दिवशी संध्याकाळी तहाचा बावटा घेऊन
किल्ल्यातील लोक रामाजीपंताकडे आले, तेव्हा आम्ही तोफा
थांबविल्या. रामाजीपंताने पूर्वी कळवलेली हकीकत खरी नव्हती(!). किल्ल्यात फौज बरीच
होती. ती मारली न जाता बरीचशी पळून गेली होती...” यानंतर
१२ एप्रिल १७५५ रोजी तोफांच्या धडाक्यात विल्यम जेम्स त्याच्या सैन्यासह
सुवर्णदूर्गात शिरला.
वरील सारी हकीकत ही इंग्रजी सरखेलाने
त्याच्या वरिष्ठांना (गव्हर्नर बर्शियरला) कळवली आहे. यात, त्याने
पेशव्यांच्या सुभेदाराला दिलेल्या शिव्या पाहूनच रामाजीपंतांची चतुरी आपल्याला
समजून येते. कशी ते पहा- आंग्र्यांचे आरमार सुरुवातीला इंग्रजांच्या दृष्टीस पडतात
इंग्रजांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. पण उघड समुद्रात आंग्र्यांच्या १८ गलबतांचा
इंग्रजांच्या बलाढ्य आरमारापुढे निभाव लागणार नाही असे पाहू रामाजीपंतांनी आपल्या
आरमारासह मुद्दाम काही ना काही कारण काढून वेळ काढला,
जेणेकरून आंग्र्यांचे आरमार (आंग्रे नव्हे ! पेशव्यांचा निशाणा आंग्र्यांवर होता, आरमारावर नव्हे) इंग्रजांच्या मारगिरीतून निसटून त्यांच्या इलाख्यात
पोहोचेल. एव्हाना इंग्रजांचे आरमार घेऊन विल्यम जेम्स पुढे गेला होता तो मागे
फिरला. पण मधल्या काळात, रामाजीपंतांनी आपले सैन्य व एक तोफ
जमिनीवरउतरवून लढाईचा ‘पोरखेळ’ चालवला
होता. इथे दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहीजेत. रामाजी महादेव हे साधेसुधे सरदार
नसून पेशव्यांचे सरसुभेदार होते, तेही ३० वर्षांहूनही अधिक
काळ! जवळपास तुळाजी आंग्र्याची संपूर्ण कारकीर्द रामाजीपंतांनी पाहीलेली होती.
तेव्हा आंग्रे म्हणजे काय आहेत हे त्यांना ठाऊक नसणे केवळ अशक्यप्राय गोष्ट होती.
अन् असे असुनही ते ‘पोरखेळ’ करत होते? नाही, विल्यम पुढे गेलाय असे पाहून लुटुपुटूच्या
लढाईचे निमित्त करून रामाजीपंतांनी सुवर्णदूर्गाच्या किल्लेदाराशी संधान बांधले
असावे. कारण नंतर रामाजीपंतांनी विल्यमला ‘किल्लेदार ठार
झाला व आत तीनशेहून अधीक माणसे नाहीत’ असे खोटे सांगून, त्याला सैन्यासह किल्ल्याच्या मार्यात पाठवून आपण मात्र आरमारासह
(विल्यम याला निलाजरेपणा म्हणतो!) मागेच राहीले. जेव्हा दारुकोठाराचा भडका उडाला
तेव्हा किल्लेदाराने पंतांकडे तहासाठी माणसे पाठवली. परंतू यात काहीतरी डाव
असल्याचा संशय आल्याने जेम्सने किल्ल्यात सैन्य घुसवले तेव्हा पंतांचा नाईलाज
झाला. याच पत्रात जेम्स म्हणतो, “(किल्ल्यातील) लोक
दीनवाणी झाले. रामाजीपंत हा दयार्द्र अंतःकरणाने सर्वांची विचारपूर करत आहे”. अखेरीस
सुवर्णदूर्ग आणि त्याचे तीन संरक्षक किल्ले- गोवा, फत्तेगड
आणि कनकदूर्ग हे रामाजीपंतांच्या हाती आले.
इकडे सुवर्णदूर्ग हाती आल्यामूळे
समशेरबहाद्दर आणि दिनकर महादेव यांनी रत्नागिरीच्या किल्ल्याला वेढा घातला.
रामाजीपंतांनी या वेढ्यासाठीही विल्यमला विनवले. अर्थात,
रामाजीपंतांच्या ‘पूर्वीच्या’
अनुभवावरून विल्यम मदत करणार नाही हे रामाजीपंतांनी ताडले होतेच. झालेही तसेच. हीच
गत अंजनवेल आणि गोवळकोटच्या किल्ल्याच्या बाबतीतही झाली. अखेरीस हरी दामोदर आणि
महिपतराव कवडे यांनी दि. १४ जानेवारी १७५६ रोजी आंग्र्यांचा किल्लेदार मोत्याजी
विचारे याच्याकडून अंजनवेल जिंकून घेतला. गोवळकोटही याच सुमारास काबिज झाला (नक्की
तारीख उपलब्ध नाही). यापाठोपाठ समशेरबहाद्दरांनी १८ फेब्रुवारी रोजी
रत्नदूर्गावरही निशाण लावले.
या सार्या प्रकरणानंतर आता अखेरच्या
टप्प्याकडे वळू ! या सार्या घडामोडी सुरु असताना स्वतः तुळाजी आंग्रे हा विजयदूर्गावर मुक्काम
ठोकून होता. विजयदूर्ग हे आरमारी केद्रच होते. सिंधुदूर्ग हा बलाढ्य जंजिरा खरा, पण तो केवळ
‘जंजिरा’ होता हीच त्याची दुखरी नस
होती. विजयदूर्गाच्या एका बाजूला जमीन आणि एका बाजूला समुद्र असल्याने खुष्कीचा
मार्गही रसद पुरवठ्यासाठी खुला होता, याच कारणास्तव
आंग्र्यांनी विजयदूर्ग हे आरमारी मुख्यालय बनवले. पेशव्यांनी इंग्रजांशी तह केलेला
पाहून तुळाजीने दि. ५ नोव्हेंबर रोजी गोवेकर पोर्तुगिजांशी संधान बांधले.
पोर्तुगिजांनीही तत्परतेने ५०० सैनिक विजयदूर्गावर पाठवून दिले. दि. ११ डिसेंबर
रोजी सह्याद्रीच्या मुलुखातील खारेपाटणच्या जवळ पेशव्यांचे सैन्य घाट उतरत असता
तुळाजीचा सरदार रुद्राजी धुळप याने अचानक हला चढवला. या हल्ल्यात पेशव्यांच्या
फौजेपुढे रुद्राजीचा टीकाव लागला नाही. स्वतः रुद्राजी आणि एक पोर्तुगिज सरदार
जखमी झाले. काही पोर्तुगिज मारलेही गेले ! कर्नल रॉबर्ट क्लाईव्ह आणि अॅडमिरल वॉटसन
हे दोन इंग्रज अधिकारी हिंदुस्थानातील फ्रेंच सैन्याचा पाडाव करण्यासाठी नुकतेच
इंग्लंडहून मुंबईस नव्या आरमारासह आले होते. दि. ६ फेब्रुवारी रोजी त्यांना
विजयदूर्गावर जाण्यास सांगण्यात आले, त्याप्रमाणे ७ तारखेला
१४ जहाजे, ८०० इंग्रज शिपाई आणि १००० काळे शिपाई असे इंग्रजी
आरमार घेऊन क्लाईव्ह आणि वॉटसन विजयदूर्गाकडे निघाले. पण हे आरमार निघण्यापूर्वीच, किंबहूना इंग्रजांचा विजयदूर्गाकडे मोर्चा वळण्यापूर्वीच १७५५ च्या
पावसाळ्यानंतर लगेच, पेशव्यांचा सरदार खंडोजी माणकर हा
आंग्र्यांचा मुलुख जिंकत दक्षिणेकडे निघाला. जानेवारी १७५६ पर्यंत विजयदूर्ग सोडला
तर आसपासचा आंग्र्यांचा सारा प्रदेश पेशव्यांच्या हाती आला.
दि. ११ फेब्रुवारीला इंग्रजी आरमार
विजयदूर्गाच्या मोर्च्यावर दाखल झाले. इकडे जमिनीवर रामाजीपंतांची आणि खंडोजी
माणकरांची फौज तयार होतीच. इंग्रजांचे आरमार चालून येत आहे हे पाहून आधीच, दि. ८
फेब्रुवारी रोजी तुळाजीने आपल्या मेव्हण्यास विजयदूर्गाचा ताबा देऊन तो
रामाजीपंतांच्या छावणीत भेटायला आला. पण, पेशवे आणि तुळाजी
यांच्यातील इतक्या वर्षांच्या परस्पर वैमनस्यामूळे चटकन निर्णय आणि वाटाघाटी
होईना. तीन दिवस उलटले आणि चौथ्या दिवशी, १२ फेब्रुवारी रोजी
इंग्रजांचा विजयदूर्गावर भडीमार सुरू झाला. वॉटसन ने मुंबईला कळवलेते असे, “.. तुळाजी आंग्र्यांचे व पेशव्यांचे
(रामाजीपंतांचे) तहाचे बोलणे चालत असल्याचे मला कळले. तेव्हा तुळाजीस याबाबतीत
अवकाश द्यायचा नाही असा निश्चय करून एकदम किल्ला स्वाधीन करून देण्याविषयी मी
त्यासनिरोप पाठविला. ठरलेल्या वेळात जबाब न आल्याने आणि पेशवेही जरा का कू करीत
आहेत असे पाहून ता. १२ रोजी आम्ही किल्ल्यावर मारा सुरू केला..” १२ तारखेला संध्याकाळी ४ च्या सुमारास इंग्रजांच्या तोफेचा एक गोळा
आंग्र्यांच्या एका जहाजाच्या दारुखान्यावर पडून त्या जहाजाने पेट घेतला आणि त्या
भडक्यात आसपासची इतरही जहाजे एकदम पेटून उठली. आंग्र्यांच्या आरमारातील ७४ तोफांचे
एक मोठे गुराब, त्याहून थोड्या लहान आकाराच्या ८ गुराबा आणि
६० गलबते जळून खाक झाली.
दि. १३ फेब्रुवारी रोजी कॅप्टन फोर्ड
(फोर्ब्स?) हा ६० माणसांसह जमिनीवर उतरला पण पेशव्यांची फौजही किल्ल्यात शिरायला
तयार आहे असे पाहून इंग्रजी आरमाराने मुद्दाम किल्ल्यावर तोफांचा मारा सुरुच
ठेवला. संध्याकाळी फोर्ड गुपचूप किल्ल्यात शिरला आणि त्याने निशाण लावले, परंतू त्या आधीच तुळाजी आंग्रे हा खंडोजी माणकरांच्या स्वाधीन झाला होता.
तुळाजी हा अतिशय शूर होता यात शंकाच नाही. क्लाईव्ह आणि वॉटसनला ग. बर्शियरने
स्पष्ट बजावले होते, ”तुळाजी आंग्रे सापडल्यास मुंबईस
आणावा. पेशव्याचे हाती त्यास देऊ नये. कारण ते कदाचित त्यास पुनरपी मोकळा सोडतील
आणि तो पुन्हा पहिल्या सारखा आपणास त्रास देऊ लागेल..”.
बर्शियरच्या या उपदेशावरूनच सगळी कल्पना येते. शिवाय विजयदूर्ग घेण्याचाही मनसुबा
होताच. त्यामूळे तुळाजी पेशव्यांच्या स्वाधीन झाला हे पाहताच पेशव्यांचे सैन्य
विजयदूर्गात शिरण्याआधी इंग्रजांनी शिताफीने किल्ल्याचा ताबा घेतला. इंग्रजांचे
सैन्य प्रथम मराठे आणि किल्ल्याच्या मध्ये उतरले आणि बाहेरुन इंग्रजी तोफांचा
भडीमार सुरू असल्याने किल्ल्यातील उरलेल्या माणसांनी किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन केला.
दुसर्या दिवशी रामाजीपंत अॅडमिरल वॉटसनच्या भेटीला गेले असता वॉटसनने
विजयदूर्गाच्या हस्तांतरणासाठी गव्हर्नरच्या परवानगीचीगरज असून त्याबदल्यात
पेशव्यांनी तुळाजीला इंग्रजांच्या हाती सोपवावे अशी अट घातली. तहनाम्यात
ठरल्याप्रमाणे पेशव्यांच्या संमतीने कलमे ठरवण्यात येण्याचे ठरले असल्याने रामाजीपंतांना
अचानक विजयदूर्गाच्या बदल्यात तुळाजीला हस्तांतरीत करता येईना. रामाजीपंत
स्पष्टपणे पेशव्यांना तसे कळवतात, “कजिया करावा तरी
पातशाही सरदार... दरम्यान जनराल व तहनामा आहे म्हणोन उतावळी न करता आहो...”. अखेरीस, विजयदूर्गासाठी वॉटसनने अडवून धरले तसेच
रामाजीपंतांनीही तुळाजीचा ताबा शेवटपर्यंत इंग्रजांना दिला नाही.
आता या सार्या प्रकरणात चूक कोणाची ? हा मूळ
प्रश्न ऐरणीवर येतो. इतिहासकार या सार्या प्रकरणाचा दोष नानासाहेबांना देतात.
त्यांच्यावर तर अक्षरशः ‘नानासाहेबांनी शिवाजी महाराजांनी
मोठ्या कष्टाने उभारलेले मराठ्यांचे आरमार बुडवले’, ‘पेशव्यांना कोकणच्या भूमित ब्राह्मणेतरांचे वर्चस्व सहन होत नव्हते’ असे वाट्टेल ते आरोप लावण्यात येतात. पण या आरोपात काडीमात्रही तथ्य
नाही. नानासाहेबांचा हेतू आरमार बुडवावा असा कधीही नव्हता,
फक्त तुळाजीला जेरबंद करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती. पण तुळाजी पेशव्यांना
इतका सलत का होता? साहित्यसम्राट न. चिं,.केळकरांच्या
‘मराठे व इंग्रज’ या पुस्तकाच्या
प्रस्तावनेत (८ मार्च१९१८) ज्येष्ठ इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे या
गोष्टीमागचे कारण सांगतात, “.. पेशव्यानेचार-पाच वर्षे
उद्योग करून अखेरीस मुंबईकर इंग्रजांच्या मदतीने तुळाजीचे राज्य(!) घेतले व त्यास
सहकुटूंब कारागृहात घातले. पण यात बहुतेक लोकांना माहीत नाही अशी गोष्ट आहे की, तुळाजी आंग्रे हा चित्त्पावनांचा कट्टा द्वेष्टा असून तो त्यांचा फार छळ
करू लागला होता ! तुळाजीची हद्द बाणकोटापासून विजयदूर्गापर्यंत होती व हा टापूतर
चित्त्पावनांचे माहेरघर होय ! पेठे, फडके, परचूरे, रास्ते, भावे देशमुख, घोरपडे जोशी, बारामतीकर जोशी,
सोलापूरकर जोशी, बर्वे, पटवर्धन, मेहेंदळे, भानू, लागू इत्यादी
पेशवाईतील दरबारी व सरदारी लोकांची मूळ घराणी याच टापूतली आहेत...” यावरून तुळाजी या चित्पावनांच्या घराण्याला किती तोशिस लावत असेल आणि या
सार्या सरदार मंडळींचा पेशव्यांवर किती दबाव आला असेल हे विचारात घेण्याजोगे आहे.
तत्कालीन राजकीय आणि युद्धजन्य
परिस्थितीचा अभ्यास करता नानासाहेबांची प्रत्यक्ष या प्रकरणात काहीही चूक दिसून
येत नाही. पण हे मान्य करणे लोकांनाच काय, इतिहासकारांनाही आजही जड जाते. काही
जण नानासाहेबा शिवाजी महारांकडून काय शिकले असा प्रश्न उपस्थित करतात, त्यासाठी आज्ञापत्राचा दाखला देतात. पण शिवाजी महाराजांच्या काळी असणारा
स्वराज्याचा विस्तार, एकछत्री अंमल,
तत्कालीन सामाजिक परिस्थिती, राजकीय उलथापालथी या सार्यागोष्टींचा
विचार करता शिवाजी महाराज आणि नानासाहेबांच्या काळातील पाऊणशे वर्षात अनेक समिकरणे
बदलली होती. नानासाहेबांना एकाच वेळेस कर्नाटकातील स्वारी आणि निजाम-मोंगल अशांशी
दोन हात करावे लागत होते. शिवाय, भोसले घराण्यातीलच दुसरी
शाखा असणार्या कोल्हापूरकरांवरही लक्ष ठेवावे लागत होते. शाहूराजांनी पेशवे
सार्वभौम आहेत असं कितीही म्हटलं तरी आमचे भोसले, गायकवाडादी
सरदार पेशव्यांना सार्वभौम मानायला तयार नव्हते. शिवाजी महाराजांच्या काळातही असे
स्वकीय स्वराज्याचे शत्रू होते. पण ते घोरपडे, भोसले उघडपणे
वैर करत होते ! असे घरातले जळते निखारे पेशवाईत माजल्याने नानासाहेबांच्या
प्रत्येक बाबतीत अडथळा येत असे.. काही जण म्हणतात,
आंग्र्यांना हरवायचे तर ब्रिटीशांचे आरमार कशाला हवे, स्वतः
आरमार उभारून चालून जायचे ना ! पण असे आरमार उभारणे म्हणजे वीडा चघळण्याइतके सोपे
काम नसते. त्या प्रतिचे लाकूड (उदा.सागवान) उपलब्ध होणे,
जहाज बांधणी आणि जहाजाच्या चाचण्या घ्यायच्या, त्यातले दोष
तपासायचे, त्यावर दारुगोळा आणि तोफांची व्यवस्था इत्यादी
अनेक कामांना बराच वेळ लागतो. या आणि अशा इतरही गोष्टी सुज्ञ इतिहासाकारांनी समजून
घ्यायला हव्यात. अखेरीस पेशव्यांची एक चूक इतकीच, की पुढे
त्यांनी अंतर्गत बंडाळी मोडून काढून जंजिरा, बाणकोट, उंदेरी इत्यादी किल्ल्यांच्या बाबतीत इंग्रजांशी कठोरपणे वागायला हवे
होते. पेशव्यांनी दि. २० जुलै रोजी पुण्यात आल्यानंतर मुंबईच्या गव्हर्नर
बर्शियरला अत्यंत कडक शब्दात ’आज्ञापत्र’ पाठवले आणि विजयदूर्ग पुन्हा मागितला. यावर १ ऑगस्ट रोजी बर्शियरने
अत्यंत नरमाईचे धोरण स्विकारून पावसाळा संपताच विजयदूर्ग पुन्हा देण्याचे मान्य
केले आणि आपले दोन वकील (टॉमस वायफिल्ड आणि जॉन स्पेंसर) पुणे दरबारात पाठवले....
एकूणच असे आहे हे तुळाजी पर्व.. आतातरी
महाराष्ट्रातील इतिहासकारांनी आणि जनतेने गैरसमजातून होत असलेल्या निरर्थक
आरोपांना सोडून वास्तविकता तपासली पाहीजे. संशोधनात पुरावा महत्वाचा असतो तसेच
प्रत्येक गोष्ट ही पुराव्यावरच ठरत नसते. कित्येक गोष्टींचे पुरावे नष्ट झालेले
असतात. अशा वेळेस, तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थिती आणि माणसांची
मानसिकता इत्यादींचा अभ्यास करावा लागतो. या गोष्टीचे मूळ कारण असे, की पेशवाई बुडाल्यानंतर लोकांना उघडउघड इंग्रजांना शिव्या देता येत
नव्हत्या किंवा इंग्रजांविरुद्ध उठावही करण्याची ताकद नव्हती. ज्यांनी असा प्रयत्न
केला त्यांना त्यांना एलफिन्स्टनने शनिवारवाड्याच्या समोर तोफेच्या तोंडी दिले.
त्यामूळे लोकांनी आपल्या मनातला राग पेशव्यांवर काढायला सुरुवात केली. सर्वात आधी
बळी पडले ते दुसरे बाजीराव पेशवे. त्यानंतर एकेका पेशव्याला जात्यात ओढले गेले.
पेशवे हे वाईट कसे होते हे रंगवून सांगण्याची महाराष्ट्रात चढाओढ लागली. मी वरील
माहितीसाठी मुद्दाम इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या संदर्भ साधनांचा वापर
केला नाही. कारण सध्या बहुतेक इतिहासकारांच्या मते राजवाडे हे ‘ब्राह्मणी’ इतिहासकार म्हणून ओळखले जातात. वरील
निबंधासाठी रियासतकार सरदेसाई आणि न. चि. केळकर तसेच सरदेसाईकृत पेशवेदफ्तराचा
वापर करण्यात आला आहे.. बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु
द्यावे ही विनंती... राजते लेखनावधी
।