शहाजी महाराज चरित्र : जयराम पिंड्येकृत राधामाधवविलासचम्पूमहिच्या महेंद्रा मधे मुख्य राणा । बलीपास त्याचे कुळीं जन्म जाणा ।
तयाचे कुळीं मालभूपाल झाला । जयानें जलें शंभू संपूर्ण केला ॥८५॥
जयाची असे मुख्य राणी उमाई । उमा तीतें उपमा देऊ काईं 
गुणोत्कर्ष गाता जिच्या नंदनाचे । कवीचे जिवीं थोर आनंद नाचे ॥८६॥


जसीं सागरातें मिले ताम्रपर्णी । तयें संगमीं होती मोतें सुवर्णी ।
तसा त्याजपासून राजा शिवाजी । असे जन्मला लोचनीं तो पहा जीं ॥८७॥
महाराज हा कौटिलक्षैकपाली । जया लागी हो तुष्टलासे कपाली ।
जयातें च लिही जयाचें कपाली । म्हणौनी सदा वंदिजे लोकपाली ॥८८॥
समुद्रांत रक्षी धरा एकचापे । परा लागी संतापवी जो प्रतापें ।
शकांची जरी उपमा देऊ याला । शिरी त्याचिये दोष एकैक आला ॥८९॥
रणीं पर्वताचे परी जो चळेना । तथा कीर्ति लोकत्रयी आकळें ना ।
नगारे तुरे वाजती रम्यगाती । ध्वनीने मनीं कंपती ते अराती ॥९०॥
प्रयाणीं रवी धूलिधारी दिसेना । पडे गावा दिढेकसीं रुंद सेना ।
सदा वैरियांची शिरे जो समेटी । सदा भांडवी मत्तमातंग जेठी ॥९१॥
सदा पारधी फौज बांधून खेले । सदा निववी कामिनीचित्त डोले ।
सदा ब्रह्मचर्चा करी पंडितांसी । सदा दे समस्या कवीकोविदांसी ॥९२॥
सदा आईके भाट पार्‍हाट गाणी । सदा शुद्धदेशिय वैकारगाणी ।
कधी बोलवी सारिका रक्तरावें । कधीं नृत्यशालांतरी सौख्य पावें ॥९३॥
कधीं याग आरंभवी विप्र हस्ती । कधी शेविजें कार्यभारी समस्तीं ।
कधीं मानभावांस भेटीस आणी । तयांचे शिरीं बंदी तो पायपाणी ॥९४॥
अशक्तें अनाथें जनीं अंधपंगे । तयांलागी दे अन्नवस्त्रे प्रसंगे ।
सदा सर्वदा जे सदा धर्मा जे जे । करुनी दिल्हे एकएकांस जे जे ॥९५॥
सदा पुजवीं सर्व ही ज्योतिर्लिंगे । त्रिकाली पुजाविप्र गाती षड्‍अंगे ।
जसी चंपकेशी खुले फुल्लजाई । भली शोभली ज्यास जाया जिजाई ॥९६॥
जिचें कीर्तिचा चंबू जंबूद्विपाला । करी साऊली माऊलीसी मुलाला ।
अहो सर्व साम्राज्यलक्ष्मी जयाची । तसीं दुसरी श्री महाराजयाची ॥९७॥
जिणें निर्मिलीसें असे एक पोहे । जिच्या नित्य दानोदकी विश्व पोहे ।
टिकेचा धणीं लेक ज्याचा शिवाजी । करी तो चहूं पातशाहाशी बाजी ॥९८॥
तयाला रणामाजीं हे एक माने । अरी जैं गला घालुनी यें कमाने ।
तया धाकटा कृष्ण जैसा बलाचा । उपेंद्रा परी बंधू आखंडलाचा ॥९९॥
शशी नित्य संपूर्ण सोला कलांचा । तसा एक राजा महिमंडलाचा ।
असा हा शाहराज विश्वेश आहे । गणाधीश हा एकभूपाल पाहे ॥१००॥
प्रभापाणी नारायण श्री तुकाई । असी पुजिल्या ये भवां हेतू काई ।
देव बोलतीजगीं जनमावें । शाहराज मग तुजला नमावें ॥१०१॥
हे तुझीं स्थितीं ना ये जनकासीं । तूचीं यें कलयुगी जन-कासी ।
महादेवदेवीं च शेवा जयाची । सदा होतसें लब्धीं याला जयाचीं ॥१०२॥
सख्या तो पदद्वंद ज्याचे नमा गें । म्हणें कामिनी आणखी मी नं मागे ।
त्वरेने तयांच्या वरा शहरा जा । मनांतून आणा घरा शाहराजा ॥१०३॥
ऐसा राजा शहाजी कनककलानिधी जाण ।
परधनवनिता यें विखीं ज्यास असे हो आण ॥


शहाजीराजांनी जयरामाचे कवीत्व ऐकून त्याची प्रशंसा केल्यानंतर जयराम पुढे लिहीतो :

द्वादशभाषाललित शाह नरेश्वरानें । आकर्णिले मग म्हणें मृदूल स्वराने ।
ऐसे सिकोन जें कवीं मजला पहाती । त्यालागीं देईन धुरंधर मस्त हाती ॥१४३॥
कांताधरामृतसमुद्रतरंग गोडा । उक्तिस या त्रिभूवनात नसेल जोडा ।
हे काव्य जाण नृप त्यांज पुढेच सोडा । घ्या पालखीपदक मंदिल
,वेच घोडा ॥१४४॥
॥ इति श्री जयरामकृत चम्पू: समाप्त: ॥