छत्रपती
शिवाजी महाराजांची अस्सल जन्मपत्रिका
संदर्भ : कवींद्र परमानंदकृत शिवभारत
छत्रपती
शिवाजी महाराजांची अस्सल कुंडली. शिवराम
ज्योतिषी या महाराजांच्या समकालीन पंडिताने (इ.स. १६३७ – १७२०) तयार केलेली ही
कुंडली राजस्थानच्या बिआवर येथील मिठालाल व्यास यांच्या संग्रहातील बाडांमध्ये
आहे. शिवराम ज्योतिषी हा महाराजांपेक्षा ६ वर्षांनी लहान असल्याने ही कुंडली
महाराजांच्या जन्माच्या वेळची नाही हे उघडच आहे. परंतू तरीही हा ज्योतिषी
महाराजांच्या अगदी समकालीन असल्याने ही कुंडली अत्यंत विश्वासार्ह आहे, शिवाय शिवभारत, जेधे शकावली अशा अस्सल समकालीन कागदांत केलेल्या वर्णनाबरहूकूम ही कुंडली
तंतोतंत जुळते. अजमेर येथील पुरातत्वखात्याचे माजी मुख्याधिकारी आणि विख्यात
लिपीशास्त्रज्ञ पंडित गौरीशंकर ओझा यांनीही या कुंडलीचा अभ्यास करून ती शोधून
काढली.
या
कुंडलीत असणारे केवळ शिवजन्माचे शाब्दिक टिपण असे- “संवत १६८६ फाल्गुन वदि ३ शुक्रे. उ घटी ३०।९ राजा शिवाजी जन्म : । र
१०।२३ ल ४।२९”
कवींद्र
परमानंद गोविंद नेवासकर कृत शिवभारतातील शिवजन्माचा प्रसंगाचे वर्णन करणारी दोन
पाने ...
(सुधा)लेपोल्लसद्भित्तीनिर्मित
स्वस्तिकाद्भुते । स्फुरद्वितानपयन्त लुलन्मौक्तिक जालके ॥२२॥
प्रत्यग्रपल्लवोपेते विकिर्णश्वेतसर्षपे । सद्य: सलिलसम्पूर्णसुवर्णकलशान्विते
॥२३॥ द्वारदेशोभयप्रान्तलिखितोचितदैवते । परितःस्थापितानेकदीप्तमंगलदीपके ॥२४॥
विहितौपयिकद्रव्यसंग्रहे
सूतिकागृहे । दिव्य तेजोमयी देवी दिव्यरुपा व्यराजत ॥२५॥ भूबाणप्राणचंद्राब्दै:
सम्मिते शालिवाहने । शके संवत्सरे शुक्ले प्रवृत्तेचोत्तरायणे ॥२६॥ शिशिरर्तौ
वर्तमाने प्रशस्ते मासि फाल्गुने । कृष्णपक्षे तृतियायां निशी लग्ने सुशोभने ॥२७॥ अनुकूलतरैस्तुंगसंश्रयैः पभिर्गहै: ।
व्यंजिताशेष जगतीस्थितर साम्रज्यवैभवम् ॥२८॥ अपारलावण्यमयं स्वर्णवर्णमनामयं ।
कमनियतमग्रिवमुन्नतस्कन्धमण्डलम् ॥२९॥ अलिकान्तमिलकान्त कुन्तलाग्रविराजितम् । सरोजसुन्दरदृशं नवकिंशुकनासिकम् ॥३०॥
सहजस्मेरवदनं घनगंभीरनिस्वनम् । महोरस्कं महाबाहूं सुषुवे साद्भुतं सुतम् ॥३१॥
तदा मुदां मानुषाणां सुराणांच सहस्रश: । समं दुन्दुभयस्तस्य नादेन नदतोऽभवन्
॥३२॥ वादित्राण्यप्य....
अर्थ
: चूना लावलेल्या लखलखित भींतिवर स्वस्तिके काढलेली होती. त्याच्या शुभ्र छताच्या
कडेला मोत्यांच्या जाळ्या झुलत होत्या. ताज्या पल्लवांनी ते सुशोभीत करण्यात आले
होते. पांढर्या मोहर्या सर्वत्र फेकण्यात आल्या होत्या. तेथे ताज्या पाण्याने
भरलेले सुवर्णकलश ठेवलेले होते. दाराच्या दोन्ही बाजूंस योग्य त्या देवत्या
काढलेल्या होत्या. सभोवती पुष्कळ लखलखीत मंगल दीप ठेवलेले होते. योग्य अशा सर्व
वस्तुंचासंग्रह करण्यात आलेला होता. शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी
उत्तरायणांत शिशिरऋतूमध्ये, फाल्गुन वद्य तूतियेला रात्री शुभ लग्नावर, अखिल
पृथ्वीचेसाम्राज्यवैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना तीने
(जिजाऊसाहेबांनी) अलौकीक पुत्ररत्नास जन्म दिला. त्याचे (पुत्राचे) लावण्य अपार, वर्ण सुवर्णासारखा, शरीर निरोगी, मान अत्यंत सुंदर व खांदे उंच होते. त्याच्या कपाळावर सुंदर
कुंतलाग्रे पडल्यामुळे ते मोहक दिसत होते.
त्याचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर, नासिका ताज्या पळसाच्या
पुष्पासारखी, मुख स्वभावतःच हसरे, स्वर
मेघासारखा गंभीर, छाती विशाल आणि बाहू मोठे होते. त्याने
टाहो फोडल्याबरोबर देव आणि मानव यांना आनंद होऊन त्यांचे सहस्त्रशः नगारे झडू
लागले...
Copyrights : कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com