१) सुमेरसिंग गारदी याची सासुरबाड कजबे चांदवड
येथे आहे. त्यास तेथे त्याची बायको व मूले माणसे आहेत. त्यांस पक्के बंदोबस्ताने अटकेत
ठेवणे. पोटास अडशेरी देणे. वस्तभाव वगैरे जी असेल त्याचा बारकाईने शोध करून मोजदाद
करून बराबर प्यादे देऊन बंदोबस्ताने हुजूर पुण्यास पाठऊन देणे, म्हणून हवालदार व कारकून, किल्ले चांदवड निजबत
तुकोजी होळकर यांचे नावे
–
–
छ २० जिल्काद सनद १
परवानगी
रुबरू
२)
किल्ले शिवनेर येथे खरकसिंगाची मुले माणसे आहेत ती अटकेत ठेविली असेत. तरी
पक्क्या बंदोबस्ताने अटकेत ठेवणे. व घरी चवक्या बसविणे म्हणोन रामराव
नारायण यास-
छ १७ जिल्काद सनद १
३)
सखाराम हरी याची मुले माणसे मौजे उरवडें तर्फ मुठेखोर येथे आहेत. त्याची
जप्ती करून वस्तभावेची वगैरे मोजदाद करून जाबता हुजूर पाठवणें; व मुले
माणसे किल्ले सिंहगड येथे पक्क्या बंदोबस्ताने अटकेत ठेऊन शिधा
मध्यमप्रतिचा देणे. व मशारनिल्हेचे घरी घोडी, उंट वगैरे असतील ते जलद हुजूर
पाठवणे; व रामचंद्र विठ्ठल निजबत चिटणीस याचे घर जे मजकूरी आहे; त्यास
त्याची जप्ती करून व वस्तभाव वगैरे याचा जाबता हुजूर पाठवणे. व मुले माणसे
किले मजकूरी पक्के बंदोबस्ताने अटकेत ठेऊन पोटास शिधा मध्यमप्रतिचा देणे
म्हणोन आनंदराव जिवाजी याचे नावे-
छ २० जिल्काद सनद १
४)
महंमद ईसाफ गारदी याची मुले माणसे रोज्यास अगर शहर औरंगाबाद येथे असतील
त्यांचा बारकाईने शोध करून तेथून धरून आणून किले दौलताबाद येथे पक्क्या
बंदोबस्ताने अटकेत ठेऊन पोटास शिधा मध्यमप्रतिचा देत जाणे. व वस्तभाव वगैरे
याची मोजदाद करून किले मजकूरी ठेऊन जाबता हुजूर पाठवणे; व लोकांकडे
कर्जभाव वगैरे पैका व वस्तभाव असेल त्याचाही बारकाईने शोध करून जाबता हुजूर
पाठवणे म्हणोन धोंडो माहादेव यांचे नावे -
छ २० जिल्काद सनद १
परवानगी रुबरू
५) नूरमहंमद गारदी
याची मुले माणसे रोज्यास अगर शहर औरंगाबाद येथे असतील त्यांचा बारकाईने शोध
करून तेथून धरून आणून किले दौलताबाद येथे पक्क्या बंदोबस्ताने अटकेत ठेऊन
पोटास शिधा मध्यमप्रतिचा देत जाणे. व वस्तभाव वगैरे याची मोजदाद करून किले
मजकूरी ठेऊन जाबता हुजूर पाठवणे; व लोकांकडे कर्जभाव वगैरे पैका व वस्तभाव
असेल त्याचाही बारकाईने शोध करून जाबता हुजूर पाठवणे म्हणोन धोंडो माहादेव
यांचे नावे -
छ २० जिल्काद सनद १
परवानगी रुबरू
वरील पाच पत्रे ही प्रमुख आरोपिंच्या संदर्भातली आहेत. नारायणरावांचे पुत्र माधवराव हे केवळ ४० दिवसांचे असताना नाना फडणवीस, सखारामबापू बोकील इत्यादी बारभाईंनी पुरंदरावरून पुण्यास आणून सातार्याहून त्यांना पेशवेपदाची वस्त्रे आणली. हेच माधवराव नारायण उर्फ सवाई माधवराव पेशवे.
परंतू ते अतिशय लहान असल्याकारणाने बारभाईंचे म्होरके बापू आणि नाना यांनी
नारायणरावांच्या खूनाबद्दल तातडीने शोध सुरु केला. त्याबाबतीतील हे कागद
आहेत. या आरोपिंना पकडण्यासाठी त्या त्या प्रांतातील कमाविसदारांना आणि
महालदारांना अशी सनदापत्रे दिली गेली. येथे सनदापत्रे म्हणजे अधिकारपत्र असा अर्थ घ्यावयाचा आहे, एखाद्या ठिकाणची मालकी मिळवण्याचे पत्र असा नाही.
शनिवारवाड्याच्या सुरक्षाकामावर असणारे गारदी हे प्रमुख आरोपी होते, खुद्द
सुमेरसिंगाने नारायणरावांचा खून केला, तो खून ऐनवेळेस करण्यात आला. रघुनाथरावांनी
केवळ 'नारायणराव यांस धरावे' अशी आज्ञा दिली होती. पण सुमेरसिंगाचा ताबा
सुटला आणि खून झाला असं खूद्द महंमद ईसाफ म्हणतो. म्हणूनच, या खूनाला
प्रत्यक्ष जबाबदार नसले तरी सहआरोपि म्हणून रघुनाथराव आणि त्यांच्या
पक्षकारांचीही धरपकड बारभाईंनी सुरु केली. वरील पत्रांच्या सारखीच इतर
माणसांना पकडण्याची पत्रेही रवाना करण्यात आली. प्रत्येक पत्र येथे देता
येणार नाही, परंतू त्या माणसांची नावे अशी -
केसो
बल्लाळ गोगटे, आबाजी महादेव, तुळाजी पवार, त्र्यंबकजी भालेराव, राजाराम
गोविंद, बाबुराव बलाळ, मल्हारराव कृष्ण सुमंत, सदाशिव रामचंद्र, जिवाजी
कान्हो, अंताजीराम सावकार, हरी रघुनाथ भीडे, अच्युतराव गणेश, विसाजी महादेव
अशा माणसांना पकडण्याचे आणि अटकेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
नारायणरावांच्या
खूनाच्या वेळेस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्यांचाही खून करण्यात
आला. अशा माणसांच्या कुटूंबियांच्या नावे नूतन ईनामे करून देण्यात आली.
नारो गणेश फाटक यांच्या खूनाबद्दल महिपतराव फाटक यास रत्नागिरीतील प्रत्येक
गावात ५ बिघे भातजमिन शिवाय नारो गणेश यांचे भाऊ बाळाजी गणेश यांना सालिना
१५० रु भरपाई देण्यात आली.
नारायणरावांचा
खिदमदगार चापाजी टिळेकर याचाही गारद्यांनी खून केला. त्याचा पुत्र हणमंता
टिळेकर याला मौजे कुंभशेत, तालुका हवेली, प्रांत जुन्नर येथे १ चावर जमिन
दिली.
महंमद
ईसाफ हा गाडदी पळून जात असताना रघुजी भोसले सेनासाहेब सुभा यांचा सरदार
ताजखान यानी त्याला पकडले, त्याबद्दल सवाई माधवरावांकडून (बारभाईंकडून)
ताजखानाला ईनामपत्र दिले गेले ते असे-
ताजखान
वल्लद महमदखान रोहिले दिम्मत रघुजी भोसले सेनासाहेब सुभा याणी महमद ईसाफ
गाडदी सरकारचा हरामखोर पळोन जात होता, तो जातिनिशी मर्दुमी करून धरुन आणून
दिल्हा. सबब मशारनिल्हे याजवर कृपाळू होऊन परगणा जळगावपैकी नूतन ईनाम गाव
कमाल आकार रुपये १००० एक हजार रुपये याचा द्यावयाचा करार करून हे लिहीत
जाणे. आणि गाव द्याल तो हुजूर लेहून पाठवणे. त्याप्रमाणे ईनामपत्रे करून
दिल्ही जातील. सदरहू गाव कसबे जलगावचे लगत नेमून देणे म्हणोन विश्वासराव
रामचंद्र व दामोदर गोविंद कमाविसदार परगणा मजकूर
यास सनद १
रामाजी अण्णाजी दिम्मत नारो कृष्ण यास की हजार रुपयांचा कमाल आकाराचा गाव नेमून देणे म्हणोन पत्र
२
--------
रसानगी यादी
*************
वरील सर्व पत्रे ही १७७३ - १७७४ या काळातील सवाई माधवराव पेशव्यांच्या रोजनिशीतील आहेत.
संदर्भ: सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी, खंड पहिला, संपादक : गणेश चिमणाजी वाड.
कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com