पेशवाई ! पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या
इतिहासातील एक सुवर्णपान. हिंदुस्थानच्या दैदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णाध्याय.
पण याच पेशव्यांबद्दल आणि पेशवाईबद्दल महाराष्ट्रात काही वर्षांपासून, किंबहूना पेशवाई बुडाल्यापासूनच अनेक
गैरसमज पसरलेले आहेत. काही गैरसमज हे अजाणतेपणी तर काही गैरसमज हे मुद्दाम
पसरवण्यात आले आहेत. पेशव्यांना ‘श्रीमंत’ म्हणायचे !
यावरून काही महाभागांनी असा अर्थ काढला की पेशवे हे गर्भश्रीमंत होते, जवळपास लोकांना लुबाडणार्या
सावकारांसारखे ! काही म्हणतात, पेशव्यांनी इंग्रजांना मराठी राज्य ’विकले’, किंवा याचा दुसरा अर्थ असा की पेशव्यांनी लाच
खाऊन मराठ्यांचे राज्य (मराठींचे नव्हे बरं का !) इंग्रजांच्या घशात घातले. अर्थात
या सार्या ‘महान’ संशोधकांच्या संशोधनाची कीव करावीशी
वाटते.
पूर्वी, पेशवाईच्या काळातही, श्रीमंत बाजीरावसाहेबांनी मन
वळवण्याचे प्रयत्ना करूनही छत्रपती शाहूमहाराजांनी पूर्वीचीच वतनदारी आणि नुतन
इनाम देणे सुरू ठेवले. यानुसार, स्वराज्याच्या अधिकार्यांना निरनिराळे प्रांत ईनाम मिळाले. मिळाले.
श्रीमंत पेशव्यांच्या अखत्यारीत उत्तरेकडचा गुजरातचा काही भाग आणि माळवा आला.
याशिवाय, पुढे
बाजीरावसाहेबांनी जिंकून घेतलेले बुंदेलखंड आणि राजपुतान्याचा काही भाग हासुद्धा
महाराजांनी पेशव्यांनाच बहाल केला. आता, एवढ्या मोठ्या प्रांताची जबाबदारी एकट्या
पेशव्यांना सांभाळता येणे अवघड होते हे कोणीही सांगू शकेल. अन् म्हणूनच, बाजीरावांनी आपल्या जहागिरीच्या
निरनिराळ्या भागांवर आपल्या हाताखालचे निरनिराळे सरदार नेमून दिले. यांच्यात
गायकवाड, पवार, नेवाळकर, खेर (बुंदेले) यांच्यासोबतच शिंदे
आणि होळकर हे मुख्य बिनीचे सरदार होते. या सार्या मंडळींनी उत्तरेतच आपले बिर्हाड
थाटले. बाजीरावसाहेब जिवंत असे तोवर ही सारी मंडळी अतिशय ईमाने ईतबारे काम करत
होती. परंतू राऊ गेले आणि आपली पेशव्यांशी असलेली बांधिलकी सुटली अशा तोर्यात ही
सारी मंडळी वागू लागली. यात गोविंदपंत बुंदेले आणि रघुनाथ हरी नेवाळकर हे अपवाद
होते, परंतू शिंदे
आणि होळकर मात्र आपल्यालापेशव्यांनी दिलेली जहागिर म्हणजे आपले ‘स्वतंत्र राज्य’ आहे अशा तोर्यात वागू लागले होते.
नानासाहेब पेशवे आपले एक सहकारी महादजीपंत पुरंदरे यांना लिहीलेल्या पत्रात
म्हणतात, “ भगिरथसमान
कैलासवासी (म्हणजे पहिले दोन पेशवे) यांनी उत्तरेतून सुवर्णनदीचा प्रवाह (म्हणजे
चौथ आणि सरदेशमुखी) दक्षिणेकडे चोवीस वर्षे चालविला. परंतू, आताच काय झाले ना कळे, पुण्याकडे जाता रुक्ष देश फार आहे.
तेव्हा सुवर्णनदीचा प्रवाह मध्ये ना जिरता पुन्हा वाहता होय ते करणे. ” याचाच अर्थ असा, की, शिंदे आणि होळकर हे बाजीरावांच्या मृत्यूनंतर
उत्तरेतून मिळणारी चौथाई आणि सरदेशमुखी ही पुण्याला पेशव्यांकडे ना पाठवता आपल्याच
पोटात ढकलू लागले. पेशव्यांच्या नावावर शिंदे-होळकरांच्या तिजोर्या तुडूंब भरू
लागल्या. माझ्या या विधानाला बरीच ‘सुज्ञ’मंडळी आक्षेप घेतील याचा मला अंदाज आहे. पण आजही
आपण पहा, जर पेशव्यांनी
आपला स्वार्थ साधून घेतला आणि जनतेला लुबाडले तर मग आज पेशव्यांच्या वंशजांपाशी
तितकेच ‘श्रीमंती’ थाट हवे होते, किंबहूना आज शिंदे-होळकरांच्या
वारसांकडे आहेत त्याहूनही जास्तच असायला हवे होते. परंतू आज परिस्थिती मात्र तशी
दिसत नाही. पेशव्यांचे सगळे वाडे आज जमिनदोस्त झाले आहेत, मग त्यात मूळ श्रीवर्धनचा वाडा असेल, सासवडचा वाडा असेल, पुण्यातले शनीवार, शुक्रवार, बुधवार, पर्वती, कोथरुड आणि पाबळ चे वाडे असतीला अथवा
दुसर्या बाजीरावसाहेबांचा ब्रह्मावर्त उर्फ बिठूरचा वाडा असेल ! या सार्या
वाड्यांचे ओटेही आज शिल्लक नाहीत, अपवाद फक्त शनीवारवाड्याचा. अर्थात, शनीवारवाड्याचाही फक्त ओटा आणि बाहेरील नानासाहेबांनी
बांधलेली चिलखती तटबंदीच शिल्लक आहे. आतील सार्या इमारतींची केव्हाच पडझड झाली
आहे. हे पहा, पेशव्यांच्या
काही अवशेषात्मक वाड्यांची छायाचित्रे पहायची आहेत का ?? ही पहा-
दुसर्या बाजीरावांचा विश्रामबागवाडा, पुणे
शनिवारवाडा
आता
शिंदे - होळकरांचे वाडे बघायचेत ? हे पहा-
शिंद्यांच्या ग्वाल्हेरच्या जयविलास पॅलेसचा दरबार महाल
होळकरांच्या इंदूरच्या लालबाग पॅलेस चा दरबार महाल
बघितले ? हा फरक आहे पेशवाई आणि सरदारांच्या
सरंजामशाहीतला... आज शिंदे-होळकरांच्या या अलिशान आणि अतिभव्य राजवाड्यांकडे
पाहताच सारा प्रकारसहज ध्यानात येण्याजोगा आहे. बरं, मी असं म्हणतोय, यावर काही जण असा आक्षेप घेतील, की शिंदे-होळकरांच्या वारसांच्या
स्वतःच्या कमाईची संपत्ती आहे, त्यांच्याबद्दल मला बोलण्याचा हक्क नाही ! हो, मला मान्य आहे ते, आणि शिंदे-होळकरांच्या आजच्या
वारसांविषयी, अथवा त्यांच्या
वैयक्तिक मिळकतीविषयी बोलून त्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा,किंवा अब्रूचेनुकसान करण्याचा माझा
खरंच कोणताही हेतू नाही, त्यात माझा
काही फायदाही नाही. पण खरंच असं आहे का ? आज शिंदे-होळकरांच्या राजवाड्यांकडे बघितलं तर
सहज लक्षात येतं, हे राजवाडे
आत्ता बांधलेले नाहीत, ते पूर्वीचेच
आहेत (यामूळेच त्यांच्या आत्ताच्या वंशजांची बदनामी होण्याचा काहीच प्रश्न उद्भवत
नाही), पण जहाँगीर आणि
शाहजहाँ बादशाहाच्या श्रीमंती थाटाहूनही काहीचे सरस थाटाचे आहेत. आणि, इंग्रजी सत्तेच्या काळातही
शिंदे-होळकरांच्या गादीवर ‘राजा’ बसत असेल तर मग, जनरल वॉरेन हेस्टिंग्ज्ने श्रीमंत
दुसर्या बाजीरावसाहेबांनाच दत्तकविधान का नाकारले ? शिंदे-होळकरादी सरदारांच्या वारसांमध्येही
दत्तकविधाने पुष्कळ झालेली आहेतच की... त्यामूळे हा प्रश्नही तितकाच गंभीर
स्वरूपाचा आहे ! याचं वेगळं उत्तर मी द्यावं असं अजिबात नाही. तिसर्या
इंग्रज-मराठा युद्धात दुसर्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांना मराठी राज्य विकलं
आणि शिंदे-होळकर-गायकवाड-भोसले ही चौकडी मात्र कडोनिकरीने झूंजत राहिली असं
म्हणणार्या महापंडितांनी याचं उत्तर द्यावं याचसोबत, वर्षाला आठ लाख रुपये तनखा देऊन अन्
नंतर ‘पेशवा’हे पदच खालसा करण्यात आलेल्या
पेशव्यांची आणि शिंदे-होळकरादी ‘श्रीमंत’ सरदारांची
बरोबरी कोणत्या आधारावर केली जाते हा प्रश्नसुद्धा अनुत्तरितच आहे !
महाराष्ट्राच्या इतिहासाचा, विशेषतः मराठी राज्याच्या इतिहासाचा
अभ्यास करणार्या अभ्यासकांनी आणि सुज्ञ अशा इतिहास संशोधकांनी या गोष्टीचा विचार
केला पाहीजे ! पेशवाईचा अभ्यास करताना मला हा प्रश्न सतत त्रास देत होता आणि
म्हणूनच आज मी तो आपणा सर्वांपूढे मांडला... बाकी, आपण थोर सुज्ञ आहातच ! आमचे अगत्य असू द्यावे ही
नम्र विनंती ! राजते लेखकावधी ।
- © कौस्तुभ कस्तुरे