स्मरण शिवछत्रपतींचे


          शुक्लनाम श्रीनृप शालिवाहन संवत्‌ १५५१, फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी जुन्नर मावळातील शिवनेरीगडावर शिवछत्रपतींचा जन्म झाला आणि यादव साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात जो जुलुमी अंधःकार मातला होता तो या पराक्रमी महाराष्ट्रपुत्राच्या तेजाने हळूहळू दूर होऊ लागला. वास्तविक पूर्विपासूनच, महाराष्ट्र हा अतिशय संपन्न देश आहे आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्षाने महाराष्ट्राची भूमि आणखिनच पावन झाली. पण महाराजांच्या नंतर, त्यांना हवा असलेला महाराष्ट्र खरंच घडला आहे का ? आज महाराज जिथे कुठे असतील, त्यांना निदान मृत्यूनंतर सव्वातीनशे वर्षे उलटून गेल्यावरही आपले मर्‍हाष्ट्रराज्याचे, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे असे वाटत असेल का ? या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांनाच माहित आहे.. “नाही !” कारण एकंदरीतच, देशात काय, किंवा महाराष्ट्रात काय; जी काही परिस्थिती आहे ती अत्यंत भिषण आहे.
          आज दिवसागणिक जनजिवनातील भयानक सत्य आणखीनच भयाण होत चाललं आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार, सामान्य जनतेची फसवणूक, निरनिराळे घोटाळे आणि त्यातला भ्रष्टाचार, धर्मांध दहशतवाद्यांचे हल्ले, दुष्काळ आणि जातियवाद ! कधीकधी मनात सहज विचार येतो, आज महाराज असते तर त्यांनी या परिस्थितीला कसं तोंड दिलं असतं ? हा प्रश्न मुळात चूकीचा आहे हे मलाही कळतंय.. कारण महाराज असते तर मुळात आजची ही परिस्थिती उद्भवलीच नसती. शिवजन्मापूर्वी आणि महाराजांच्या सुरुवातीच्या काळातही या अशा सार्‍या घटना महाराष्ट्राला भोगाव्या लागत होत्याच ! पण स्वराज्य निर्माण झाले आणि जसजसे विस्तारू लागले तसतसे हे सारे प्रकार बंद पडत गेले. या सार्‍याबाबत आज जे पुरावे उपलब्ध आहेत त्यावरून केलेली ही मिमांसा !
          आजच्या घडीला सर्वात भिषण प्रश्न महाराष्ट्राला भेडसावतोय तो म्हणजे दुष्काळाचा ! पाण्याच्या अभावी मुकी जनावरे तडफडून मरून पडत आहेत. अन्नदाता कृषिवल आकाशाकडे बघत बघत अखेरीस आत्महत्येचा मार्ग स्विकारतोय. अशा वेळेस आमचे मंत्रिमंडळ (सताधारी आणि विरोधीही) मात्र केवळ दुष्काळी दौरे काढण्या शिवाय दुष्काळ पडू नये यासाठी काहीही करत नाहीत. खुद्द महाराजांच्या जन्माच्या सुमारास महाराष्ट्रात सलग दोन वर्षे भिषण दुष्काळ पडला होता. गवताची एक काडी शेतात उरली नव्हती ! आधीच दुष्काळ आणि त्यात सुलतान शेतकर्‍यांचे उरलेसुरले धान्य लुटून नेत होते. श्री समर्थ रामदास स्वामींनी,
पदार्थमात्र तितुका गेला । नुसता देशची उरला ॥
जना बुडाले बुडाले । पोटेवीण गेले ॥
माणसा खावया अन्न नाही । अंथरूण पांघरुण तेही नाही ॥
भिक्षा मागता मिळेना । अवघे भिकारीच जना॥

अशा शब्दात या भयंकर दुष्काळीची स्थिती वर्णन केली आहे. सुभेदार दादाजी कोंडदेव मलठणकर यांनी रायारावाने उजाड केलेल्या पुण्याच्या शेतकर्‍यांच्या कार्यात उत्साह यावा यासाठी सोन्याचानांगर पांढरीवर धरीला, साहावे साली तनखा घेतला (संदर्भ- शिवचरित्रप्रदीप : सहा कलमी शकावली).   यानंतर, महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या-सतराव्या वर्षी स्वराज्याचा उद्योग मांडला तेव्हा या गोष्टीचा निकाल लावला. सिंहगडाच्या दक्षिणेला असणार्‍या शिवापूर आणि पुण्याच्या आग्नेयेला असणार्‍या कोंडवे नावाच्या गावालगत महाराजांनी धरणे बांधली. याचे कारण हेच की, दुष्काळ पडला तरीही शेतीच्या कामात अडथळा येता कामा नये, लोकांना पाण्याची कमतरता भासू नये. प्रत्यक्ष शिवकालीन कागदात ही दोनच धरणे बांधल्याचे उल्लेख असले तरीही महाराजांनी अशी अनेक ठिकाणी धरणे अथवा बंधारे बांधले असतील यात शंकाच नाही ! शेतकरी म्हणजे अन्नदाता. त्याचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये असा महाराजांचा कटाक्ष असे. इ.स. १६७६ रोजीच्या प्रभावळीचे सुभेदार रामाजी अनंत यांना महाराजांनी लिहीलेल्या पत्रातच त्यांचे विचार स्पष्ट होतात.महाराज म्हणतात, “.. येक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास व दुरुस वर्तणे.. रयेतीवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवरराजी नाहीत यैसे बरे समजणे.. ज्या गावात जावे तेथील कुल(ण)बी किती आहेती ते गोला करावे त्यात ज्यालाजे सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफीक त्यापासी बैल दाणे संच आसिला तर बरेत जाले.. (परंतू ज्याला) जोतास बैल नांगर पोटास दाणे नाही त्याविण तो आडोन निकामीजाला असेल तरी त्यालारोख पैके हाती घेऊन दो-चौ बैलाचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खंडी दोन खंडी दाणे द्यावे..” पाहिलं ? महाराज म्हणतात, भाजीच्या एका देठावरही नजर पडू देऊ नका. रयतेचे पीक जळाले तर साहेब (महाराज) नाराज होतील. ज्या गावात जाल तेथील असतील तेवढे कुणबी गोळा करून, त्यात ज्याच्याकडे साहित्य असेल त्यांचे चांगलेच आहे पण ज्याच्याकडे नसेल त्याला शेतासाठी, दोन-चार बैलांसाठी रोख पैसे आणि पोटासाठी खंडी-दोन खंडी धान्य द्यावे ! असा राजा असताना शेतकरी आत्महत्येचा विचार तरी कसा करेल !
          दुष्काळ आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या या सोबतच आज भेडसावणारा गंभीर प्रश्न म्हणजे स्त्रीयांची असुरक्षितता ! आज स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना पाहील्या असता महाराजांच्या त्या कठोर शासनाची प्रखरतेने उणिव भासते. स्वराज्यात अशा दोन घटना घडल्या होत्या त्या येथे नमुद करतो. खेड-शिवापूर जवळच्या रांझे गावच्या बाबाजी भिकाजी गुजर नावाच्या पाटलाने गावातल्याच एका स्त्रिवर बदअंमल केला.. बदअंमल म्हणजे बलात्कार ! महाराजांहना हे समजलं. महाराजांनी लगेच माणसं पाठवून त्या पाटलाला मुसक्या आवळून आणलं. (दि. २८ जानेवारी १६४६, संदर्भ- शिवचरित्र साहित्य खंड २, ले. २३९) गावातील प्रतिष्ठीत आणि योग्य मंडळींच्या साक्षी झाल्या आणि गुन्हा सिद्ध झाला. महाराजांनी या गुन्ह्याबद्दल जी शिक्षा दिलीय नं, ती नुसती ऐकून अंगावर काटा येतो. बाबाजी पाटलाचे कोपरापासून दोन्ही हात तोडण्यात आले आणि गुडघ्यापासून दोन्ही पायही ! पाटलाचा “चौरंगा” केला आणि त्याची पाटीलकी रद्द करण्यात आली. महाराजांच्या पत्रात तसा स्पष्ट उल्लेख आहे, “..बाबाजी बिन भिकाजी गुजर, मोकदम (पाटील),मौजे रांजे त॥ मजकूर याजपासून बदअंमल झाला. म्हणून त्याची मोकदमी अमानत (पाटीलकी) रद्द करून त्याला हातपाय तोडून दूर केले..” पाटलाला झालेल्या या कठोर शासनामूळे महाराजांच्या राज्यात आता सुलतानी सारखी बळजबरी खपवून घेतली जाणार नाही हे बाबाजी गुजरासारख्यांना समजून चूकले. यानंतर केवळ चार-पाच वर्षात अशीच अजुन एक घटना घडली. मोसेखोर्‍यातला दहा गावांचा कुलकर्णी रंगो त्रिमल वाकडे याने हसाई ब्राह्मणी रांडकी (हंसाबाई नावाची विधवा स्त्री) हिच्यावर बदअंमल केला. पण पूर्वी महाराजांनी बाबाजी गुजराला दिलेली शिक्षा आठवून तो भितीने चंद्रराव मोर्‍यांच्या आश्रयाला जाऊन दडून बसला. महाराजांना ही गोष्ट समजताच ते त्याला माणसे पाठवणार इतक्यात समजले की रंगोबा भितीनेच हाय खाऊन मेला. महाराजांच्या ११ डिसेंबर १६५२ च्या मोसेखोर्‍याच्या देशमुख-देशपांड्यांना लिहीलेल्या पत्रात याचे उल्लेख आहेत. महाराज म्हणतात, “..रंगोबा मजकूर देहाये मजकुरीची गाव कुलकर्ण्य चालवित होता यावरी हसाई ब्राह्मणी रांडकी त॥ मजकुरी होती तीसी त्याणे सिंदलकीचा अंमल केला. ते खबर जाहिराना होऊन दिवाणात खबर जाली यावरी त्याची दिवाणे दस्त करावे तो इतकीयावरी रंगोवा मजकूर अगोधरच पलाला तो जाऊन चंदररायाच्या आश्रियाने तेथेच राहीला. यावर तो तेथेच देवकरणीने मयेत जाला..” (संदर्भ- शिवचरित्र साहित्य खंड ७, ले. ३७) यानंतर मात्र महाराजांच्या राज्यात बलात्काराच्या घटनांची विश्वासार्ह अशी एकही नोंद सापडत नाही.
          भ्रष्टाचार तर महाराजांच्या राज्यात खपतच नसे. २२ सप्टेंबर १६७८ रोजीच्या पत्रातील एका साध्या नोंदीचे उदाहरण पहा. सांगली जिल्ह्यातील खटाव प्रांताचा सुभेदार व्यंकाजी रुद्र याने गोंदवले प्रांतातील काही देवस्थानांच्या वेलापूर इनामातील ५ होन घेतले. या प्रकाराबद्दल महाराजांनी त्याला कशा प्रकारे ताकीद दिली पहा- “..सांप्रत वेलापूरच्या इनामापैकी कारकुनानी होन ५ घेतले आहेत म्हणून कलो आले. तरी हे कोणे शहाणपण ?  देवाच्या इनामास उपद्रव देऊन  पैके घ्यावया गरज काये होती. याउपरी ताकीद जाणून वेलापूरचे इनामापैकी पाच होन घेतले आहेत ते परतोन देणे व पुढे अवघियाही इनामास काडीची तसवीस न देणे..” महाराजांची आपल्या अधिकार्‍यांना दिलेली अशी अनेक ताकीदपत्रे आज उपलब्ध आहेत. जंजिर्‍याच्या कामावर असलेल्या दौलतखान आणि मायनाक भंडारीयांना वेळेवर रसद पोहोचती केली नाही या कारणास्तव महाराजांनी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला “ब्राह्मण म्हणौन मुलाहिजा कोण धरू पाहतो” अशा ताकदीचे दि. १९ जानेवारी १६७५ रोजीचे पत्र तर प्रसिद्धच आहे. यानंतर महाराजांनी जिवाजी विनायकाला कामातील कुचराई बद्दल बडतर्फच केले.
          सध्यासारखे धर्मांध दहशतवादी सुलतानांच्या रुपात त्याकाळीही होतेच की ! पण महाराजांनी अशा शुंभ-निशुंभांचा वेळोवेळी कसा निकाल लावला ते अफजलखान, खवासखान, शायिस्ताखान इत्यादी प्रकरणावरून आपल्याला माहित आहेच. या सार्‍या गोष्टींचा विचार केला असता, आज महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं ते आपल्याला सहज समजू शकतं. दुर्दैवाने, उठता-बसता सतत शिवाजी महाराजांचं नाव घेणारे राजकारणी आणि त्यांना छुपा पाठींबा देणार्‍या तथाकथीत शिवप्रेमी जातियवादी संघटना यांना शिवाजी या तीन अक्षरातलं देवपण.. नव्हे नव्हे, या तीन अक्षरातलं माणूसपण कधीच समजलं नाही. म्हणूनच, आजही आमचं स्वतंत्र राज्य, स्वराज्य असतानाही आमच्याकडे शेतकर्‍याला आत्महत्या करावी लागते. आमच्या आया-बहिणींना भितीच्या छायेत वावरावं लागतं. आमच्या जनतेला कराच्या नावाखाली जणू छुपी खंडणीच भरावी लागते. बाकीची साधनं कमी पडली की काय म्हणून आज पाण्याच्या बाबतीतही भ्रष्टाचार केला जातो... आज अरबी समुद्रात अब्जावधी रुपये खर्चून महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. पण खरंच, आज विचार केला तर काय वाटतं ? आपले गडकिल्ले असे दुर्लक्षित असताना, गावागावात मुलभूत गोष्टींचा अभाव असताना, प्रजा दुष्काळाला आणि महागाईला कंटाळली असताना या सार्‍याकडे दुर्लक्ष करून निव्वळ आपला पुतळा बसवणं महाराजांना खरंच आवडेल ? आयुष्यात, आपलं नाव एखाद्या किल्ल्यावर एखाद्याही शिलालेखात लिहू न देणार्‍या, किंबहूना कालगणनेलाही आपलं नाव न देता राज्याभिषेक शक करणार्‍या या जाणत्या राजाला हे अब्जावधी रुपये असे निर्लज्जपणे पाण्यात घातलेले खरंच आवडतील का ? या सगळ्या गोष्टींचा आपणच विचार करावा... याबाबतीत समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं केलेलं सार्थ वर्णन आठवल्याशिवाय राहवत नाही-
यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा ॥ 
आचारशीळ, विचारशीळ । दानशीळ, धर्मशीळ
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळांठायी ॥

          अधिक काय लिहावे ? अखेरीस या युगपुरुषाचा प्रतिहारींप्रमाणे एकच जयघोष करतो.. “प्रौढप्रतापपुरंदर, सेनाधुरंधर, क्षत्रियकुलावतंस, गो-ब्राह्मणप्रतिपालक महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की ऽऽऽ जय ! जय !! जय !!! ”