इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी इतिहासाचा;
विशेषतः शिवचरित्राचा अभ्यास करताना, बखर वाड़्मयावर कितपत
विश्वास ठेवावा यासंबंधी त्यांच्या सुप्रसिद्ध ‘मराठ्यांच्या
इतिहासाची साधने’ या अमुल्य ग्रंथात केलेले विवेचन......
“ ...ऐतिहासिक प्रमाण व अप्रमाण यासंबंधी माझी मते काय आहेत ते
स्पष्ट सांगितल्यास पुष्कळ उलगडा होईल असे वाटते.
·
समकालीन व्यक्तिंनी समकालीन
प्रसंगसाक्षात घडत असताना परमार्थाने (शुद्ध हेतूने) लिहीलेले अगर लिहविलेले अस्सल
पत्र किंवा त्याची नक्कल सर्वांशी जातीने प्रमाण होय.
·
समकालीन व्यक्तिंनी आपल्या हयातीतील
गतकालीन प्रसंगांसंबंधी लिहीलेले लेख किंवा उल्लेख पहिल्या वर्गातील प्रमाणांच्या
प्रातिकूल्याच्या अभावी जातीने प्रमाण होत.
·
विषमकालीन व्यक्तिंनी गतकालासंबंधी
लिहीलेले लेख पंचायतीपूढे प्रामाणिक साक्षिच्या रुपाने दिले जात असल्यास,
आणि बखरी म्हणून योग्य आधाराने लिहीले असल्यास; केवळ
स्मृतींवर भरवसा ठेवून लिहीले नसल्यास व आपल्या कामाचे योग्य शिक्षण मिळून लिहीले
असल्यास जातीने प्रमाण समजावे.
या
तीन प्रकारच्या लेखांखेरीज बाकी सर्व लेख कमी जास्त प्रमाणाने अविश्वसनिय होत. प्रस्तुत
ज्यांची परिक्षा चालली आहे त्या बखरी या तीनही वर्गातील कोणत्याही एका वर्गात
अंतर्भूत होत नाहीत. सभासदी बखर केवळ स्मृतींवर हवाला ठेवून लिहीलेली आहे. मल्हार
रामरावाने जुन्या टिपणांचा व अस्सल पत्रांचा उपयोग केलेला आहे;
परंतू त्याला योग्य शिक्षण मिळाले नसल्यामूळे त्याची बखर प्रमाणभूत समजणे योग्य
नाही. शिवदिग्विजयात जुन्या टिपणांचा व पत्रांचा उपयोग केलेला दिसतो व मल्हार
रामरावाच्या बखरीपेक्षा ऐकीव लेखी अशी जुनी माहिती तींत बरीच सापडते; परंतू कर्त्याला योग्य शिक्षण न मिळाल्यामूळे तीचे प्रामाण्य मल्हार
रामरावाच्या बखरीहून जास्त धरता येत नाही. येणे प्रमाणे या तीनही बखरींचे
प्रामाण्य अव्वल प्रतीचे नाही. म्हणजेच या बखरी जातीने प्रमाण नाहीत हे उघड आहे.
मग बखरीतील मजकूराचा खरेखोटेपणा ठरवायचा तरी कसा असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. ह्या
प्रश्नाला उत्तर असे आहे की मराठी, पारशी, कानडी, इंग्रजी व पोर्तुगिज अस्सल पत्रे, त्या काळी लिहीलेली अशी, जर सापडली तरच बखरीतील
मजकूराचा खरेखोटेपणा ठरविता येईल. अन्यथा हे काम मनाजोगते व निश्चयात्मक होणार
नाही... ”
( प्रस्तावना-
मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड ४ : वि. का. राजवाडे )
- कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com