महामानवांच्या वेदना          आपल्याकडे हिंदुस्थानात, पूर्वीपासूनच जहाल आणि मवाळ असे दोन गट आहेत. तसे, जगातल्या प्रत्येक देशात हे थोड्याफार प्रमाणात असतंच, परंतू हिंदुस्थानाची लोकसंख्या ही जगाच्या सामन्यतः एक शष्ठांश असल्याने आपल्याकडील लोकांच्या मानसिकतेचा बोलबाला जास्त असतो. या गटांची पार्श्वभूमी शोधायला गेलं तर ती मिळते परकीय आक्रमणांमध्ये !
म्हणजे असं पहा, परकीय आक्रमण झाल्यानंतर, त्यांची संस्कृती, त्यांचा आपल्यावरील प्रभाव, त्यांच्याशी प्रस्थापीत झालेले वा प्रस्थापीत होणारे संबंध, त्यांचं राष्ट्रनिर्मितीतील योगदान इत्यादी गोष्टींवरून साहजिकच जनमानसात विशिष्ट विचारसरणी रुढ होते. या विचारसरणीचेच जहाल आणि मवाळअसे दोन गट पडतात. यालाचकाही लोक कुत्सितपणे शांततावादी आणि उग्रवादी असंही म्हणतात. अगदी, आर्यांच्या हिंदुस्थानातील आगमनापासून आर्य-हिंदू आणि हूण-शक-द्रविडादी शूद्र, त्यानंतर गौतम बुद्धांच्या उदयानंतर मवाळ बौद्ध आणि जहाल आर्य-क्षत्रिय असे दोन पंथ उदयास आले.
          यानंतर अर्वाचीन मध्ययुगीन इतिहासातही ही परंपरा सुरूच होती, परंतू ती बर्‍याचशा प्रमाणात कमी झालेली होती. कारण या काळात, हिंदुस्थानात सुलतानशाही असल्याने, जहालांनाही निधड्या छातीने बंड करावे असे वाटत नव्हते (राणा संग-प्रतापसिंह, शिवछत्रपती महाराज, छत्रसाल, काही अपवाद सोडल्यास) मग तर मवाळांची गोष्ट दूरच ! परंतू इंग्रजांची सत्ता हिंदुस्थानात प्रस्थापीत झाली आणि या गटबाजीला पुन्हा वाचा फुटली. काँग्रेसच्या स्थापनेनंतर मवाळांची बहुतांश प्रमाणात एकजूट झाली, अन्‍ इंग्रज सरकार जे सांगेल ते मालकांची आज्ञा शिरसावंद्य असे मानून, परंतू लोकांच्या मनात सहानुभूतीसाठी वरवर इंग्रजांना विरोध करून मवाळ गट आपली उपजिवीका करू लागला. यांना स्वराज्य, स्वातंत्र्य असे अतिशय मौल्यवान शब्द पेलवतही नव्हते, मग ते मिळवण्याची गोष्टच दूर ! परंतू या मवाळांमध्येही काही अपवाद होतेच. उदाहरणार्थ, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, सुरुवातीला जहाल असणारे पण नंतर मवाळ झालेले सेनापती बापट असे समाजसेवक आणि न्यायमूर्ति माधवराव रानडे, नामदार गोखले, गोपाळराव आगरकर इत्यादी इंग्रजांच्या पदरी राहूनही हिंदूंचा उत्कर्ष करू पाहणारे समाजसुधारक. जहालांचं म्हणाल, तर त्यांच्यात पूर्वीपासून परकीय सत्तांना तोंड देण्याची धमक होती, हिंमत होती .. परंतू आत्मविश्वास नव्हता, एकजूट नव्हती. स्वातंत्र मिळवलं पाहिजे असं म्हणणार्‍या त्यांच्या साथिदारांना ऐनवेळेस गायब होण्याचं तंत्र अवगत होतं असंच म्हटलं पाहिजे. आणि आपल्याकडे इतिहासाने वेळोवेळी हे सिद्ध करून दाखवलं आहे !
          हे झालं त्यावेळचं ! पण आत्ताचं काय ? आजही आम्ही आमच्या महापुरुषांची नाव केवळ राजकारणासाठी वापरतो, बाकी त्यांच्याबद्दलची आपुलकी, आस्था अजिबात नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन, त्यांच्या विचारांचं अनुकरण करावं हे आम्हाला जमत नाही. आजच्या काळात, विशेषतः स्वातंत्र्यानंतर आम्ही या मवाळ पंथाला गांधीवादी आणि जहाल पंथाला सावरकरवादी असं नामकरण केलं आहे. पण गांधीवाद आणि सावरकरवाद या शब्दांचे अर्थतरी आम्हाला माहित असतात का ? आज स्वतःला सावरकरवादी म्हणवणारे काहीजण गांधींना मनसोक्त अर्वाच्य शिव्या देतात. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. हा सावरकरवाद आहे का ? किंवा स्वतःला गांधीवादी म्हणवणारे लोक सावरकरांना जातियवादी म्हणून अक्षरशः दहशतवादी ठरवतात, हा गांधीवाद आहे का ? या महापुरुषांचं नाव घेऊन त्यांच्या विरोधी विचारसरणीच्या महापुरुषांना वाईट ठरवणं हा काही मोठा पराक्रम नाही !
          आज स्वतःला गांधीवादी म्हणवणारे महाभाग गांधींचे कोणते आदर्श डोळ्यांसमोर ठेवतात ? महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य-अहिंसा या गोष्टी प्राणापलीकडे जपल्या (या गोष्टींचा सावरकर आणि आंबेडकरही मनापासून आदरच करत असत !) आज हे गांधीवादी खरंच नेहमी सत्य बोलतात का ? हिंसा करत नाहीत का ? गांधींच्या या विचारसरणीशी बहुतांशी प्रमाणात समानता असणारी दुसरी विचारसरणी म्हणजे बौद्धपंथाची विचारसरणी’. गौतम बुद्धांनी आयुष्यभर अहिंसेचा संदेश जगाला दिला. पण आज स्वतःला गौतमबुद्धांचे अनुयायी म्हणवणारे बौद्ध खरंच असं वागतात का ? मी हिंदुस्थानातल्या बौद्धांबद्दल बोलतोय, जे मूळ हिंदू आहेत पण नंतर बौद्ध पंथ स्विकारला आहे असे. कारण तीबेटमधील बौद्ध हे सनातनी आहेत, जे खरंच गौतम बुद्धांची विचारसरणी अनुसरून जिवन जगतात, अगदी वाघ-सिंहादी हिंस्त्र प्राण्यांनाही प्रेम देऊन त्यांना आपलसं करतात. पण हिंदुस्थानातीला बौद्ध खरंच असं वागतात का ? आम्हाला मुक्याप्राण्यांची हत्या करताना (आणि वेळ आली तर माणसांचीही) काहीही वाटत नाही. हिंदुस्थानातील हे बुद्धांचे आणि गांधींचे अनुयायी कोंबड्या, बकर्‍या-बोकड, कबुतर, मासे अशा जिवांचे मांस आनंदाने मिटक्या मारत खातात, अशा वेळेस भगवान गौतम बुद्धांची आणि महात्मा गांधींची अहिंसेची शिकवण बासनात गुंडाळून ठेवली जाते. सत्य-अस्तेया बाबत न बोललेलेच बरे ! बरं, एकदा आपण बौद्ध पंथ (होय पंथच ! हिंदू-वैदीक धर्मातील बौद्ध हा एक पंथ आहे, वेगळा धर्म नव्हे !) स्विकारला आहे ना, मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध पंथाची दीक्षा घेताना हिंदूंप्रमाणे मूर्तिपूजा करणार नाही अशा आशयाची जी शपथ घेतली ती तरी पाळली जाते का ? एकीकडे गौतम बुद्धांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे गणपतीची स्थापना करायची, हे दांभिकपणाचे वागणे बाबासाहेबांना खचितही आवडणार नाही.
          आता स्वतःला सावरकरवादी म्हणवणार्‍या महाभागांकडे वळूया ! हे लोक तर कायम हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे अशा आरोळ्या ठोकत असतात. जगाचा नियम आहे, नुसत्याच डरकाळ्या फोडणारा वाघ कधिही थेट झेप घेत नाही, आणि ज्याला लक्ष्य गाठायचं आहे तो उगाच डरकाळ्या फोडत नाही ! मग, आपल्याला जे करायचं आहे त्याचा उगाच चारचौघात बोलबाला करण्यापेक्षा ते काम करून दाखवावं ना ! सावरकरवाद हेच सांगतो ! उगाच देव्हार्‍यात बसून,सुगंधी धूप-दिपादींचे लेपन करून देवपूजा करत बसण्यापेक्षा बाहेरचा देव सुरक्षित कसा राहील ते पहा ! आपल्याकडे पूर्वीपासून पंढरपूरच्या वारीची प्रथा रुढ आहे. पण पूर्वीपासून आजपर्यंत कोणालाही असं वाटलं नाही की या लाखोंच्या जनसमुदायाला एकत्र आणून, त्यांना बलोपासनेचे महत्व सांगून दूष्ट शक्तींचा नाश करावा (अपवाद श्री संत एकनाथ महाराज आणि श्री समर्थ रामदासस्वामींचा). पूर्वीही, हे सारे वारकरी एकत्र झाले असते तर कदाचीत शिवाजी महाराजांना जन्म घेण्याची आणि आयुष्यभर झगडण्याची वेळच आली नसती. पारतंत्र्यात असताना इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्यानंतर धर्मांध मुसलमानांच्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी सावरकर नेहमी म्हणत असत, पंढरपूरात जाऊन विठ्ठलाचे वारकरी होण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन देशाचे धारकरी व्हा... लेखण्या मोडा, बंदूका घ्या !”. सावरकरांच्या या वक्तव्याचा अर्थ हा विठ्ठलाला विरोध नसून त्या विठ्ठलाच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठीच आहे ! पण आपल्याकडे स्वतःला हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी म्हणवणार्‍या लोकांना सावरकर आणि हिंदुत्व कधी समजलेच नाही. सावरकरांचा माणसातल्या देवावर विश्वास होता. कर्म हेच देव समजणार्‍या या महामनवाला आयुष्यभर केवळ लोकांच्या हितासाठी झगडावे लागले. आज माणसे अभिमानाने आणि काहिशा गर्वाने सांगतात, आम्ही सावरकरांचे भक्त आहोत’. पण हे केवळ सांगण्यासाठी. घरात केवळ सावरकरांचा फोटो लावला कि झालो आम्ही सावरकर भक्त ! अन्‍ जेव्हा राष्ट्र टिकवण्याची वेळ येते, धर्मावर घाला येतो, (उदा. बाबरी मशिद प्रकरण) तेव्हा या भक्तांच्या घरातील सावरकरांचे फोटो भराभर भिंतीवरून उतरले जातात. का ? तर पोलिसांची धाड पडली तर आपण सनातनी, हिंदुत्ववादी म्हणून पकडले जाऊ ! अशा माणसांनी केवळ धूप-आरत्या कराव्यात सावरकरांच्या नावाने. पण सावरकरांच्या कार्याचा वारसा सांगण्याचा त्यांना काहिही हक्क नाही.
          एकूणच काय, जगात, मुख्यत्वेकरून हिंदुस्थानात आपापल्या, जातिय अस्मितेतून महामानवांना जातिच्या पिंजर्‍यात अडकवले जाते, फक्त स्वार्थासाठी ! पण जेव्हा त्यांच्या विचारांवर चालण्याची वेळ येते तेव्हा.... साराच खेळखंडोबा ! बहुत काय लिहावे ?