मोडी लिपीचा इतिहास


          भाषा ही मौखिक असते तोपर्यंत काहीच अडचण येत नाही, परंतू ती जेव्हा लिखित स्वरूपात वाचावयाची गरज भासते तेव्हा मात्र ती कोणत्यातरी माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते. वाङ‍मय संचय करण्यासाठीचे हे महत्वाचे माध्यम म्हणजे लिपी ! आपण दैनंदिन व्यवहारात बाळबोध अथवा देवनागरी लिपीचा वापर करतो, जी विशेषतः आर्यांच्या आगमनापासूनच अस्तित्वात असल्याचे मानले जाते.
संस्कृत ही मूळ आर्यभाषा असल्याने, आणि त्यातील श्लोकांचे उच्चार हे अत्यंत स्पष्ट होणे गरजेचे असल्याने ती व्यक्त करण्यासाठी तितक्याच संवेदन क्षमतेची लिपी असणे स्वाभाविक होते. आपल्याकडे वैदिक कालखंडात कागदावर अथवा भूर्जपत्रावर एखादे लंबवर्तुळ अथवा चौरस काढून लिहीण्याची पद्धत होती. या आकृत्या म्हणजेच “देवानाम्‍ नगरम्‍” अथवा देवनगरे आणि या देवनागरात लिहीण्यात येणारी ती “देवनागरी”. हिंदुस्थानी भाषा लिहीण्यासाठी अशा अनेक लिप्या उपलब्ध आहेत, त्यातील काही अगदी प्राचिन आहेत. अशीच एक प्राचिन लिपी म्हणजे मोडी लिपी’.
          सामान्यतः इतिहासकारांचे असे मत आहे, की मोडी लिपी ही सुमारे बाराव्या शतकात हेमाडपंतांनी श्रीलंकेहून महाराष्ट्रात आणली. हे हेमाडपंत उर्फ हेमाद्री पंडीत म्हणजे देवगिरीच्या यादव साम्राजातील सम्राट महादेवराय यादव आणि सम्राट रामदेवराय यादव यांच्या काळातील (इ.स. १२६०-१३०९) महाराष्ट्राचे महामंत्री अथवा पंतप्रधान’. यांना श्री करणाधीप अशी पदवी होती. यादवकाळ हा सुलतानी पूर्वीच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील कळसाध्याय होता. यादवांचे साम्राज्य तीनही समुद्रांना जाऊन भिडले असल्याने कारभारही मोठा होता. अशा वेळेस, राज्यकारभाराच्या दैनंदीन कामात, देवनागरी लिपीत काना, मात्रा, उकार इत्यादी देताना प्रत्येक वेळेस हात उचलावा लागे. यात बराचसा वेळ वाया जात असल्याने जलदगतीने लिखाण होण्याच्या हेतूने हेमाडपंतांनीच मोडीची उत्पत्ती केली असावी असे काहींचे मत आहे. ओळ न मोडता लिहीता येणारी ती मोडी ! परंतू, आज यादवकाळातील साधने तपासता, यादव कालखंडातही राज्यात मोडीचा वापर सर्रास सुरू असल्याचे दिसते. जर हेमाडपंतांनी मोडी आणली अथवा निर्माण केली तर मग राज्याच्या काना-कोपर्‍यात असणार्‍या अधिकार्‍यांना मोडी शिकण्यास आणि तिचा इतक्या सफाईदारपणे वापर करण्यास वेळ केव्हा मिळालाहा मोठा प्रश्न आहे. यामूळेच, लिपीशास्त्रकारांचे असे मत आहे की, मोडी ही हेमाडपंतांच्याही पूर्वीपासून अस्तित्वात आहे.
          लिपीशास्त्रकार अथवा लिपीचे जाणकार असे मानतात की हिंदुस्थानातील देवनागरी व्यतिरीक्तच्या सर्व लिप्यांचे मूळ हे ब्राह्मी आणि खरोष्टी या प्राचिन लिप्यांमध्ये दडलेले आहे. यांच्यापासूनच पुढे वेगवेगळ्या लिप्या तयार झाल्या. आर्यांचा जसजसा विस्तार होऊ लागला तसतसा संस्कृत भाषेतही बदल घडू लागला. ज्या अनार्य लोकांना आर्यांचे वर्चस्व स्विकारणे भाग पडले त्यांना आर्यांची लिपीही स्विकारणे गरजेचे होतेच. परंतू उच्चसंस्कृत असणारी संस्कृत भाषा अनार्यांसारख्या असंस्कृत लोकांना व्यवस्थित उच्चारता येत नव्हती. यातूनच प्राकृताचा आणि पैशाच्चीचा उगम झाला. उच्चशिक्षित आर्य समाज हा शुद्ध संस्कृतात भाष्य करत असे आणि मागाहून वैदिक धर्मात आलेला अनार्य अथवा बहुजन समाज हा पैशाच्चीत बोलत असे. अनार्यांना कदाचीत पिशाच्च अथवा रानटी समजत असल्याने त्यांच्या भाषेचे पैशाच्ची हे नाव बहुदा आर्यांनी ठेवले असावे ! अशीच एक पिशाच्च अथवा पैशाच लिपी म्हणजे बौद्धांची पाली भाषा व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारी ब्राह्मी लिपी. बौद्धांच्या धर्मग्रंथात एकूण १८ लिप्यांचाउल्लेख आहे, परंतू या ब्राह्मीला सम्राट अशोकाच्या काळात मात्र राजलिपीचा मान मिळाला यामूळे हीला अशोकलिपी असेही म्हणतात. लिपीशास्त्रकारांच्या मते मोडी लिपी हे सम्राट अशोकाच्या ब्राह्मी अथवा पैशाची चे अर्वाचिन रूप आहे. कसे ? हे पहा, मोडी आणि अशोकलिपी (ब्राह्मी-खरोष्टी) मधील साम्य:
१) मूळ मोडी लिपीत (म्हणजे साधारणतः यादवकाल असे आपण मानू) अपूर्ण वर्ण काढण्याची सोय नाही. स्वर आणि व्यंजन यांना एकत्रीतपणे वर्ण म्हणून संबोधले जाते. म्हणजे त्रस्त हा शब्द लिहीण्यासाठी तरसत असेच लिहावे लागत असे. हीच गोष्ट अशोकलिपीतही सारखीच आहे. फक्त मोडी लिहीताना जो स्वर आधी उच्चारला जातो तो लिहीतानाही आधीच लिहीला जातो.
२) मूळ मोडी लिपीत आणि अशोकलिपीत र्‍हस्व-दीर्घ असे स्वरांचे प्रकार अस्तित्वात आहेत, मात्र हे र्‍हस्व-दीर्घ प्रकार वर्णाच्या डाव्या-उजव्या बाजूस वेलांटी देऊन ठरत नसत. उदा- र्‍हस्व कार दाखवायचा असेल तर काना ना देता अर्धी वेलांटी तर दीर्घ कार दर्शवण्यासाठी पूर्ण वेलांटी दिली जात असे. वस्तुतः नंतरच्या मोडीत हे भेद गणले गेले नाहीत यामूळे मोडीत र्‍हस्व-दीर्घ नसल्याचा समज आहे.
३) मूळ मोडी लिपीत कारी शब्द हे, काना प्रत्यक्ष कारी वर्णाला जोडूनच लिहीले जातात, तीच गत अशोकलिपीचीही आहे.
४) मोडीत कार हा एकाच स्वरूपाचा आहे. त्याचप्रमाणे अशोकलिपीतही तो एकाच चिन्हाने (दोन उभ्या अथवा आडव्या रेघा) दर्शवला जातो.
५) ’, ’, या स्वरांना बाळबोध अथवा देवनागरीत स्वतंत्र चिन्हे आहेत,परंतू मोडीत मात्र यांना स्वतंत्र चिन्ह न देता मूळ अकारी वर्णालाच उकार अथवा मात्रा जोडल्या जातात, अन्‍ अशोकलिपीतही हे स्वर असेच लिहीण्याची पद्धत आहे.
          या सार्‍या गोष्टींवरून आपण (सध्यातरी!) एवढा निष्कर्ष नक्की काढू शकतो, की मोडी ही मूळची ब्राह्मी अथवा पैशाच्च लिपी आहे. परंतू नंतरच्या काळात, कालानुरूप होणार्‍या स्थित्यंतरांमधून, विशेषतः शिवकाळ आणि पेशवेकाळात मोडी मध्ये देवनागरी अथवा बाळबोध लिपीचा मोठ्या प्रमाणावर प्रवेश होऊन ती बहुतांशी संस्कृतप्रचूर मोडी बनली. आता सम्राट अशोकाने सिंहलद्विप अथवा श्रीलंकेतही बौद्ध धर्माचा प्रसार केल्याने तेथे पाली-ब्राह्मी (याच पालीला सिंहलद्विपातील भाषा म्हणून सिंहली असेही म्हटले जाते) स्थिरावणे आणि नंतर महाराष्ट्रातील या मोडी लिपीचे ब्राह्मीशी असलेले साम्य पाहून आमच्या इतिहासकारांनी मोडी ही हेमाडपंतांनी लंकेतून आणली असे म्हणणेहे स्वाभाविक आहे. परंतू मोडी हे नाव कसे पडले याबाबत वर सुरुवातीला दिलेल्या अंदाजाबरोबरच आणखी एक तर्क आहे तो असा-
          बौद्धांच्या ललितविस्तार या ग्रंथात ६४ लिप्यांचा उल्लेख आहे. यापैकीच एक मुख्य लिपी म्हणजे ब्राह्मी किंवा ज्याप्रमाणे प्राकृत भाषेत आपापल्या प्रदेशावरून लिप्यांची नावे पडली पडली जसे शूरसेनांची शौरसैनी’, मगधांची मागधी तसेच मौर्य साम्राज्यात ब्राह्मीला मौर्यी असेही म्हणत. कारण सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्याचा नातू, मौर्यसम्राट ! यामूळेच, कालानुरुप मौर्यीचा मौरी-मोरी-मोडी असा अपभ्रंश होऊन आजची मोडी बनली असावी. एकूण काय, मोडी ही आपलीच लिपी असून आज आपण तीला पारखे झालो आहोत. सरकारच्या उदासिनतेमूळे मोडीत निघालेल्या या मोडी चे शिक्षण आणि प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे. इती अर्पणमस्तु !       राजते लेखकावधी ।