भोसल्यांचा शिसोदिया संबंध- शाहू महाराजांचे पत्र

( राजा शाहूछत्रपती : राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय यांच्या सौजन्याने ) 

मेवाडचा संस्थानिक व्याघ्रजीत शिसोदे (वास्तव्य पिंपळगाव) याच्या रक्षणार्थ जाण्याबद्दल शाहू महाराजांचे माळव्यातील सुभेदारांना, तसेच पेशवे, शिंदे-होळकरांना लिहीलेल्या राजपत्राची नक्कल.. दि. ३१ मे १७२५॥ श्री ॥

     पूर्विल राजपत्र राजमुद्रासहित शाहूमहाराज यांचे व बाजीराव बलाल प्रधान व श्रीनिवास परशुराम प्रतिनिधी यांचे सिक्क्यासुद्धा त्याचा तर्जुमा 
      
      स्वस्तीश्री राज्याभिषेक शके ५२ विश्वावसू संवछरे अधिक आषाढ शु॥ १ इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीमंत स्वामी राजा शाहू छत्रपती राजश्री उतर देशाधिकारी वर्तमान भावी माहासंस्थानी शोभासंपन्नयुक्त राहणारे देवस्थाने मालव देश दक्षणदेशचे राहणार प्रधान सिंदे व होलकर व पंडित माहाराष्ट्र देशचे व देवदैत्य यासी आज्ञा करीतो. सिसोदे आमचे चुलतबंधू हाटसिव्ह याचे अवरसपुत्र व्याघ्रजित सत्तावंत देश मेवाळ येथे पिंपळगावी राहाणार ते रसज्ञविनय गुणेकरून मीमांसादिशास्त्रसंपन्न सत्पुरुष येकान्‍वयउत्पन्न प्रभु यास याजवर सर्व उपद्रव दूर करण्यास सर्वांनी सर्व काल यास अखेर करून रक्षण करावे याकरीता आज्ञापत्र लिहीले व अष्टप्रधान याणी सदैव प्रतिवर्षी बंधुपेक्षा उत्कृष्ट संभाळावे हे आमचे वाक्य रक्षण करावे. प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करावा, हेच पत्र प्रिय मानावे. पिपले संस्थान लक्ष रुपयाचे आहे. तेथे च्यार वर्ण राहतात. याजकरीता आम्ही उपद्रव दूर करीतो. या गावची मर्यादा सीमा खंडण करू नये. जो करील त्याचे पूर्वज नर्काप्रति पावतील. यवन याणी उपद्रव केल्यास डुकर भक्षिल्यासारखे होईल हे आज्ञापत्र आधी पाहून वागावे. मोर्तब असे. 
वरील पत्रात आलेले कठिण अथवा अज्ञात शब्दांच्या संज्ञा -

* माहासंस्थान म्हणजे मोठे संस्थान अथवा राज्य

* शोभासंपन्नयुक्त राहणारे देवस्थाने म्हणजे संस्थानिक, रयत आणि देवस्थानात राहणारे मान्यवर अर्थात पुजारी

* मालव देश म्हणजे माळवा प्रांत

* सिसोदे आमचे चुलतबंधू हाटसिव्ह या शब्दातील चूलतबंधू हा शब्द 'चुलत्याच्या अथवा काकाचा मुलगा' असा नसून पितृकुलातील लांबचे नाते असणार्‍यांनाही तत्काली 'चुलता' हे विशेषण लावण्यात येई. याचाच अर्थ शिसोदे कुळातील व्यक्तींना स्वतः शाहू महाराज (शिवाजी महाराजांचा नातू) आपले नातेवाईक (पितृकुलातील) मानतात.

* मेवाळ  म्हणजे मेवाड

* येकान्वयउत्पन्न  म्हणजे एकाच अन्वयात अथवा कुळात उत्पन्न झालेले.कौस्तुभ कस्तुरे    ।    kasturekaustubhs@gmail.com