माळव्याच्या
मोकाशाबद्दल उदाजी पवारांनी चिमाजीअप्पांजवळ हट्ट धरला. त्यासंबंधी
चिमाजीअप्पांनी बाजीरावांना या पत्राद्वारे कळवले. या पत्रात शाहूराजांनी
पैशाची मागणी मान्य केली असली तरी पवारांना गर्व होऊ नये यासाठी त्यांच्या
पत्रात त्यांना दाखवण्यासाठी 'रुपया द्यावयास अनुकूल पडत नाही' म्हणजे
'वास्तविक देणे हे रास्त नाही' असं सांगण्याचं अप्पा सुचवतात.
* लेखांक १)
प॥ छ २७ रा॥वल
संध्याकाल
॥ श्री ॥
पु॥ अपत्ये अपत्ये चिमणाजीने कृतानेक नमस्कार उपरी. येथील क्षेम त॥ छ २६ रबिलोवल यथास्थित असे. पहिल्या तहनामियात पवारास मालवा तिजाई मोकासा होता त्याप्रमाणे आम्ही त्यास द्यावयास सिद्ध आहो. यैसे असता हाली त्यानी निमे मालवा मोकास द्यावा यैसा आड घातला आहे. त्यास सुभेदाराचेही विचारे त्यास निमे मालवा मोकासा द्यावा यैसे आहे. परंतू आमचे विचारास हे गोस्ट येत नाही. परंतू सुभेदारादेखता आम्ही स्वामींस पत्र लिहीले आहे त्याचे उतर पस्ट येक स्वामींनी ल्याहावे जे तिजाई मालवा जो पहिला मुकासा आहे त्याप्रमाणे हाली देऊ, जाजती देत नाही. आणि हवाला अगर येक रुपया नख्त द्यावयासी मिलत नाही यैसे ल्याहावे व पोकळ समाधानाच्या थोरपणाच्या गोष्टी ज्या लिहीणे त्या कागदात ल्याहाव्या. परंतू कारभाराचा जाब पष्ट ल्याहावा. तो त्यास दाखऊ व स्वामीचे विचारे निमे मालवा कबूल करावा यैसेच आले तर ते पत्र निरालेच आम्हास ल्याहावे. मग जैसा विचार बनेल तैसा करू. पैकीयाची गोष्ट तो स्वामींनी मान्य केलीच आहे. परंतू त्यास दाखवावयाचे पत्र ल्याहाल त्यात येक रुपया द्यावयास अनुकूल पडत नाही. यैसे ल्याहावे. ये गोस्टीचा विचार तात्यास बोलाऊन करणे. विचार तो करू उतर पाठवावे.
संदर्भ : पेशवे दफ्तर खंड १३, लेखांक ५६
यात पैवस्तीची म्हणजे पत्र पोहोचल्याची तारिख ही १० ऑक्टोबर १७२९ अशी सांगण्यात आली आहे. परंतू ती चूकून छापली गेली असावी कारण यापुढील पत्रातच, दि. २६ मे १७२८ रोजी बाजीरावसाहेबांनी पवार आणि होळकरांना चिमाजीअप्पांतर्फे माळवा निम्मा निम्मा वाटून दिल्याचे म्हटले आहे. वरील पत्रातील तिजाई म्हणजे एक तृतियांश हिस्सा, हवाला म्हणजे मुखत्यारी
चिमाजीअप्पांनी आपल्या माळव्याच्या सुभ्यातील रतलाम परगण्याचा मोकासा उदाजी पवार आणि मल्हारराव होळकर या दोघांना निम्मा वाटून दिला त्याबाबत रतलाम परगण्याच्या देशमुख-देशपांड्यांना श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे दि. २६ मे १७२८ रोजीचे पत्र.
चिमाजीअप्पांनी आपल्या माळव्याच्या सुभ्यातील रतलाम परगण्याचा मोकासा उदाजी पवार आणि मल्हारराव होळकर या दोघांना निम्मा वाटून दिला त्याबाबत रतलाम परगण्याच्या देशमुख-देशपांड्यांना श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे दि. २६ मे १७२८ रोजीचे पत्र.
* लेखांक २)
॥ श्री ॥
म॥ अनाम देशमुख व देशपांडे प॥
रतलाम सुबे मालवा यांसी
बाजीराऊ बलाळ प्रधान सुहूरसन तिसा अशरेन मया व अलफ. प॥ मजकूर पेशजीच्या मुकाशियाकडून दूर करून हल्ली चिमणाजी बलाळ यांजकडे दिला आहे. त्याणी आपल्या तर्फेने मुकासा वाटून दिला. बी॥ -
राजश्री उदाजी पवार राजश्री मल्हारजी होळकर
याजकडे प॥ ∙॥∙ याजकडे प॥ निमे ∙॥∙
येणेप्रमाणे निमे निमे दोघाजणास मुकासा दिला आहे. तरी तुम्ही यांशी रुजू होऊन मुकास बाबेचा वसूल सुरळीत यांजकडे देणे. छ २७ सवाल आज्ञा प्रमाण.
संदर्भ : ले. ८७, साधनपरिचय महाराष्ट्राचा अर्थात महाराष्ट्राचा पत्ररुप इतिहास.
कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com