राज्यव्यवहारकोश आणि लेखनप्रशस्ती !

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस राज्यकारभारात लष्करी बाबतीत, मुलकी बाबतीत, धर्मसभेच्या बाबतीत, न्यायाच्या इत्यादींच्या बाबतीत ज्या नवीन गोष्टींचा अंतर्भाव केला त्यामध्ये ‘लेखनप्रशस्ती’ हासुद्धा एक महत्त्वाचा भाग होता. विविध प्रकारचे लिखाण कसे करावे, त्यासाठी कशा प्रकारची काळजी घ्यावी यासाठी महाराजांनी काही नवीन सुचना अथवा प्रघात सुरू केला. यासाठी महाराजांनी बाळाजी आवजी चित्रे या आपल्या चिटणीसांना आणि अशाच काही भाषापंडितांना एकत्र बोलावून एक सुंदर ग्रंथ लिहीण्याची आज्ञा केली. या ग्रंथाचे नामकरण करण्यात आले ‘लेखनप्रशस्ती’ !

बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रावर सुलतानांचे आक्रमण झाले. त्याआधी, महाराष्ट्राचा पंतप्रधान होता हेमाद्रीपंडित अथवा ज्याला मराठी लोक अशुद्ध भाषेत म्हणत हेमाडपंत ! वास्तविक पंत हा शब्दही मुसलमानी उच्चारातून बनलेला आहे. मूळ शब्द आहे पंडित. त्या शब्दाचा मुसलमानी उच्चार पंडत. मग त्या पंडताचा पंङ्त, नंतर पंत असा उच्चार होऊ लागला. पूर्वीच्या काळी ब्राह्मणाला पंडित म्हणण्याचा प्रघात होता, आणि पुढे कालानुरूप सगळ्याच ब्राह्मणांना पंत असे म्हटले जाऊ लागले. ते असो, सांगायचे असे, की या हेमाडपंताचे जसे महाराष्ट्रात सुंदर नक्षिकाम केलेली मंदिरे बांधण्यात लक्ष असे, तसेच मराठी भाषेकडेही तितकेच लक्ष असे. व्यक्तिच्या श्रेष्ठत्वानुरूप कोणाला किती महत्त्व द्यायचे आणि ते लिखाणातून कसे दर्शवायचे याबाबत हेमाद्रीपंडिताने काही नियम तत्कालीन व्यवस्थेत घालून दिलेले होते. अर्थात त्यातिल काही नियम पुढे सुलतानी अंमलातही तसेच सुरू राहीले परंतू अल्लाउद्दीन खलजीच्या आक्रमणानंतर महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर मात्र अपभ्रंषाचा आणि अशुद्ध, परकीय भाषामिश्रणाचा प्रभाव पडला. आपले कित्येक शब्द भ्रष्ट झाले. दैनंदिन वापरात पूर्वी शुद्ध संस्कृतप्रचूर मराठी भाषेचे जे महत्त्व होते, ते गळून पडू लागले आणि आम्ही फार्सी अथवा उर्दू शब्दांना आपलेसे करू लागलो. क्षमा, पत्नी, दिनांक हे आणि असे अनेक मराठी शब्द जाऊन त्या जागी माफ, बायको, तेरिख असे परकीय शब्द आले ! बाहेरचे शब्द तर बाजूलाच राहीले, परंतू आपली मराठी मंगलमय वाटणारी नावे सुद्धा जाऊन मराठी लोक आपणाला सुलतानजी, पिराजी, शेखोजी, शहाजी, रुस्तुमराव, हैबतराव अशी मुसलमानी नावे स्विकारू लागले.

शिवकाळातही, सुरुवातीच्या काळात, किंबहूना राज्याभिषेकापर्यंत राज्यकारभारात असेच मुसलमानी उच्चारांचे तुर्की अथवा फार्सी शब्द रुढ झाले होते. राज्यकर्त्यांच्या पत्रांमध्ये तेरीख, माहे, मेहेरबान, किताबत इ असे कित्येक शब्द फार्सी होते. पूर्वीच्या, म्हणजे यादवसाम्राज्य बुडाल्यानंतरच्या मराठी सरदारांनी आपल्याच मराठी सरदार मित्राला लिहीलेल्या पत्रांमध्ये मायना कसा होता पहायचं आहे? पहा- “ मशहुरूल अनाम, अजरख्तखाने दामदौलतहू बजाने कारकुनाननी व हाल व इस्तकबाल.... ” आता हा मायना कोणत्या दृष्टीने मराठी भाषेतला वाटतो ? राज्यकारभारातही पेशवा, डबीर, सरलष्कर, फौज, सुरनवीस, मुजुमदार असे कित्येक वापरातले शब्द परकीय होते. महाराजांनी या शब्दांच्या बद्दल त्यांना प्रतिशब्द म्हणून अस्सल मराठी शब्दांचा कोश तयार करवून घेण्याचा संकल्प पूर्वीच सोडला असणार, परंतू १६४८ च्या पुरंदरच्या लढाईनंतर महाराजांना विश्रांती मिळालीच नाही ! पुढे गागाभट्टांनी महाराजांचे मन वळवून राज्याभिषेकासाठी तयार केले असता, त्याच वेळेस महाराजांनी आपल्या मनातील हे सारे संकल्प पूर्ण करण्याचे ठरवले. महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून आणि धुंडीराज व्यासांकडून राज्यव्यवहार कोश आणि बाळाजी आवजी चित्र्यांकडून लेखनप्रशस्ती लिहून घेतली. 

लेखनप्रशस्ती ही जशीच्या तशी आज उपलब्ध नाही. काळाच्या ओघात ती बहुतांशी नष्ट अथवा गहाळ झाली असावी. परंतू इतर साधनांवरून लेखनप्रशस्ती नेमकी कशी होती हे आपल्याला समजू शकते. या लेखनप्रशस्तीचा नेमका उद्देश तरी काय होता ?-

स्वराज्य निर्माण होऊन, राज्याभिषेकाच्या वेळेस निदान पंचवीस वर्षे तरी नक्कीच पूर्ण झाली होती. परंतू वर उल्लेख केल्याप्रमाणेच पत्रांचे मायने मात्र यवनीच होते. स्वराज्यातले मराठी लोक परस्परांस वा राजास लिहीतानाही मनाला येईल त्याप्रकारे मायना लिहीतात, हे महाराजांना पटत नव्हते. यामूळे एकप्रकारची हवी तशी शिस्त राज्यकारभारात राहत नाही. कोणाच्याही नकळत एक प्रकारचा ढिसाळपणा निर्माण होतो. आता स्वराज्यात मुसलमानी मायने घेणे अशक्य आहे. हे राज्य हिंदूंचं असल्याने येथील राज्यकारभार असेल वा खाजगी-सामाजिक व्यवहार, इथे मराठी भाषेला महत्त्व प्राप्त झाले पाहीजे ! त्यामूळे, मुसलमानी अंमलाच्या पूर्वीचा लेखनाचा शिरस्ता काय होता त्यानुसार पुन्हा मराठी मराठी भाषेचे पुनरुज्जिवन करण्याचा महाराजांचा प्रयत्न होता. यासाठी महाराजांनी आधार म्हणून यादवकालिन हेमाद्री पंडितांनी घालून दिलेले नियम वापरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रथम अक्षरांच्या माथ्यावरच्या रेघेपासून सुरुवात करण्यात आली.

पूर्वीच्या काळी लेखन करण्यासाठी लाकडी बोरू हे एकमेव उपयुक्त माध्यम होते, ज्याच्या सहाय्याने वळणदार अक्षरात लिहीणे सोयीचे होई. वास्तविक बोरू हे एका विशिष्ट प्रकारच्या लाकडाचे नाव आहे, या बोरूच्या लाकडापासून तयार केलेल्या लेखण्या सर्वत्र वापरल्या जात असल्याने कालांतराने आपण त्या लेखणीलाही ‘बोरू’ असेच म्हणू लागलो. या लेखण्या शक्य तितक्या कठिण आणि सरळ असाव्यात, नाहीतर मग लिहीताना ऐनवेळेस लेखणीचा उतार डाविकडे अगर उजवीकडे झुकला तर मात्र अक्षरं लिहीताना अतिशय कसरत करावी लागे. शाईची दौत अथवा एक उभट आकाराचे पात्र असे. लिखाणासाठी अत्यंत प्राथमिक घटक म्हणजे शाई. पूर्वीपासून महाराष्ट्रात काजळ घोटून तयार केलेली शाई वापरली जाई. महाराष्ट्रात जुन्नर येथे तयार करण्यात येणारा अत्यंत उत्तम प्रतीचा कागद वापरला जाई. बोरूच्या सहाय्याने जुन्नरी कागदावर लिहील्यानंतर मग त्या ओल्या शाईवर अतिशय बारिक वाळू चिमटीने पेरून ती शाई सुकवली जात असे.

मराठी भाषा ही बाळबोध अथवा देवनागरी आणि मोडी अशा दोन लिप्यां (scripts) मध्ये लिहीता येते. त्यासाठी सर्वप्रथम अक्षराच्या माथ्यावरील रेघ काढणे अनिवार्य असते. ही रेघ पत्र लिहीताना नेमकी कशी काढावी याची माहिती लेखनप्रशस्तीच्या आरंभीच देण्यात आली आहे. सामान्यतः कागदाचे उभे चार भाग पाडून मग त्यात निरनिराळ्या प्रकारच्या रेषा कशा आखाव्यात हे सांगितले आहे. कागदावरच्या एका ओळीत सामान्यतः आठ शब्द असावे असा प्रघात पूर्वी सांगितला आहे. त्यामूळे कागदाच्या उभ्या चार भागांमध्ये आठ शब्द, म्हणजे एका भागात दोन शब्द मावत असत. या शब्दांच्या रेषांचेही मायन्यानुरूप अनेक प्रकार पडतात. चारही भाग पूर्णपणे भरणारी रेघ ओढली असता तीला सबंध रेघ, पहिल्या भागातील एका अक्षराची जागा मोकळी सोडली असता तीला दफे रेघ, दोन अक्षरांची जागा ठेवली असता तीला दफाते रेघ, तीन अक्षरांची जागा मोकळी ठेवली असता कर्ते रेघ आणि चार अक्षरांची जागा मोकळी ठेवली असता तीला महजर रेघ असे म्हणत असत. अशाच प्रकारचे रेघांचे अनेक परक़ार लेखनप्रशस्तीत नमुद केलेले आहेत. काही ठिकाणी रेघेच्या आधी दकार, एक शून्य अथवा दोन दंड काढले जात असत. याविषयी हेमाद्रीपंडित म्हणतात,

खं ब्रह्मं निर्गुणं प्रोक्तं रेषे हरिहरद्वयोः ।
दकारेण स्नेहमाप्नोति; तावल्लक्ष्मी: स्थिरा भवेत् ॥

म्हणजे रेघेच्या पूर्वी शून्य लिहीले असतां ब्रह्माचा निर्देश होतो, दोन दंड अथवा उभ्या रेषा काढल्या असता हरिहरांचा उल्लेख होतो व दकार काढला असता मित्रत्वाचा निर्देश होतो. या रेघांचे नियम केवळ मायन्यापूरते अथवा बहुतांशी सुरुवातीच्या तीन ओळींसाठीच लागू असत.

छत्रपतींची आज्ञापत्रे लिहीताना सबंध रेघेत लिहीली जात असत, म्हणजे मायना लिहीताना सुरुवातीला मोकळी जागा न सोडता पानाचे चारही रकाने भरणारी रेघ असे. त्यावर महाराजांचा शिक्का असे. हा शिक्का म्हणजेच ‘प्रतिपच्चंद्रलेखेव’ ही राजमुद्रा आणि शेवटची ‘मर्यादेयं विराजते’ ही मोर्तब महाराजांचे चिटणीस उमटवत असत. जर हे पत्र महाराजांच्या स्व-दस्तुराचे असेल, म्हणजेच, पत्राच्या शेवटी खुद्द छत्रपतींच्या हातची लेखनसीमा, लेखनालंकार, सुज्ञ असा अशा आशयाची लेखनसमाप्ती असेल तर पत्राच्य अग्रभागी छत्रपतींचा शिक्का उमटवण्याची गरज भासत नसे.


महाराजांची कुलदेवता म्हणजे तुळजाभवानी. कोणत्याही मंगलकार्याच्या वेळेस सर्वात आधी महाराजांचं तुळजाभवानीला आवातन धाडणारं पत्रं रवाना होई. त्यासाठी अशा प्रकारचा मायना महाराजांच्या पत्रांत आढळतो-

“ श्रीमन्मायामहात्रिपूरसुंदरी भगवती, अनेककोटी ब्रह्मांडमंडल जगद्‍उत्पत्ती स्थिती नि लयलिलाविलासीनी अखिलवृंदारक स्तुतीसेवापरायण दिग्विदिक्‍स्वैरक्रिडा मदीयर्‍हृत्कमलस्थिता श्रीमन्‍ तुळजादेवी चरणी तत्पर ”

स्वराज्याचे देशमुख – देशपांडे व इतर मिरासदारांना पत्रे पाठवताना तीन रकानी रेघ काढून त्यापूर्वी दकार काढला जात असे. 

ब्राह्मण, पंडित, गोसावी-बैरागी अशा वंदनिय व्यक्तिंना पत्रं लिहीताना बीत रेघ म्हणजे पहिल्या रकान्याचे पहिले अक्षर आणि चौथ्या रकान्याचे दुसर्‍या अक्षराइतकी जागा मोकळी सोडलेली रेघ काढली जात असे.

स्वराज्याच्या इतर पदाशिकार्‍यांना पत्र लिहीताना प्रथम तीन ओळींत, पहिलीस बीत रेघ, दुसरीस जिल्हे रेघ आणि तिसरीत दफाते रेघा काढून मायना लिहीला जात असे.

स्वराज्याच्या शिलेदार, बारगीर, किल्लेदार, गडकरी वा इतर कारकूनांना ‘अखंडीत लक्ष्मी अलंकृत’ हा मायना एका बीत रेघेत संपवत असत. 

महजरनामा, वतनपत्रे-इनामपत्रे इत्यादी महत्त्वाची पत्रे संपूर्णतः सबंध रेघेत लिहीली जात असत. या सर्व पत्रांमध्ये कित्येक वेळा मोठ्या शब्दांना प्रतिरूप म्हणून संक्षिप्त रुपात लिहीण्याचा प्रघात होता. उदाहरणार्थ पुढील शब्द पहा- सुहूर सन दर्शवण्यासाठी ‘सु॥’ असे लिहीत. राजमान्य राजेश्री हे ‘रा.रा.’ असे लिहीत. साहेब हा शब्द ‘सा।’ असा, मोकादम हा शब्द ‘मो।’ असा तर तालुका हा शब्द ‘ता।’ असा लिहीला जाई. अशाप्रकारेच अनेक शब्दांची संक्षिप्त रुपे होती. अर्थात सर्वच संक्षिप्त रुपांचा तपशिल येथे देता येत नाही, त्यामूळे पत्रांतील इतर ओळींचा संदर्भ पाहून ते संक्षिप्त रूप नेमक्या कोणत्या शब्दाचे आहे ते ओळखावे लागते.

एकूणच, महाराजांनी महाराष्ट्राच्या लेखनपद्धतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. लेखनप्रशस्ती आणि राज्यव्यवहारकोश हा त्याचाच एक भाग होय ! प्रथम भषेचे शुद्धीकरण झाले पाहीजे हा महाराजांचा आग्रह होता. एखाद्या गोष्टीच्या संज्ञा बदलल्या की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात असणार्‍या संवेदनाही बदलतात, त्या गोष्टींकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो. आणि म्हणूनच, ज्ञानेश्वर महाराजांनी “ माझ्या मराठीचे बोलु कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरें रसिकें मेळविन ॥ ” असं म्हटल्याप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच मराठीचे कोडकौतुक करून तीला पुनश्च राजभाषेचे स्थान बहाल करण्याचे महान कार्य केले.


लेखनप्रशस्तीतील अक्षरांच्या माथ्यावरील रेघांचे प्रकार


१. सबंध रेघ 
२. दफे रेघ 
३. दफाते रेघ 
४. कर्ते रेघ  
५. महजर रेघ 
६. बीत रेघ
७. अज रेघ 
८. वासलात रेघ 
९. खं रेघ 
१०. दुरेघी रेघ 
११. दकारी रेघ 
१२. दुरेघी दकारी रेघ
१३. पहिली जिल्हे रेघ 
१४. दुसरी जिल्हे रेघ 


* संदर्भ : सदर लेखासाठी मुख्यत्वेकरून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पहिल्या वार्षिक अहवालातील इतिहासाचार्य राजवाडे यांचा लेखनप्रशस्तीबद्दलचा लेख, शिवाजी महाराजांचा कानुनजाबिता तसेच निरनिराळ्या अस्सल शिवकालीन पत्रांचा वापर केलेला आहे.