सुवर्णनदीचा प्रवाह आटत चालला

मांडलिक राजे आणि संस्थानिकांकडून मिळणार्‍या चौथ तसेच इतर द्रव्यपुरवठा नियमीतपणे होत नाही म्हणून नानासाहेब पेशव्यांनी नाना पुरंदरे यांना लिहीलेले सांकेतिक पत्र. सारांश असा की सुवर्णनदीचा प्रवास उत्तम आहे पण मधल्या सरंजामदारांच्या खिशात तो पैसा गडप होत असल्याने तो सरकारी खजिन्यात दाखल होत नाही.

चि॥ रा॥ नाना प्रती बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक अशिर्वाद उपरी-


राज्यकार्यप्रसंग विचार करीता भगीरथसमान कैलासवासी यांनी उत्तरेहून दक्षणपावेतो सुवर्णनदीचा प्रवाह चोवीस वर्षे वाहविला. त्यांचे आशिर्वादे अलिकडेही निरंतर वर्धमान वाहत असता देशाधिकारी, सेनामुख्य व अकृत्रिमास पूर्ण या नदीने संतुष्ट केले. एक तृष्णा मात्र त्या सुवर्णवोघाने वर्धमान केली. दक्षण देशांतू सुवर्णनदी मागे रघूजी फत्तेसिंगबावांनी आणिली, परंतू जागा जागा जिरली. मध्ये बहुत दिवस दक्षिण नदी न वाहीली. श्रीईच्छेने या वर्षीही कालानुरूप द्रव्यनदी उतमच या सैन्यात आहे. परंतू पुण्याकडे जाता रुक्ष देश फार आहे, याजमूळे सर्व जिरून जाईल. एकदा उत्तरेकडील सुवर्णनदी व दक्षिणेची नदी दोघींचा संगम सागरकूप समान पुणे या स्थळी, मध्ये न जिरता, पूरयुक्त योग घडणे, तेव्हा ऋणोद्धार श्रमसार्थक इहलोक परलोकी उतम होईल. भागीरथी सागरासाठी उत्पन्न, परंतू विश्वाते उद्धार करीते, तशी या काळी हे उतरदक्षण नदी वाहते. बहुत जनांस उपकारक होते. सर्वही नद्या जलौघे समुद्रास जातात. एक कावेरी मात्र बहुत लोकांनी आपले उपयोगास आणिली. तशी हे द्रव्यनदी मुख्य कार्य थोडे, व गौणजनकार्य बहुत करते. हा न्याय अन्याय, हा विचार साक्षी दृष्टीवंत असतील त्यांनी विचारून पुण्यातील रुक्षता दूर होय, व मध्ये कार्याकारण जिरे ऐसे करणे, हे योग्य असे. बहुत काय लिहीणे ? हे आशिर्वाद.


सदर पत्रावर तारिख नाही, पण पत्रातील "भगीरथसमान कैलासवासी यांनी उत्तरेहून दक्षणपावेतो सुवर्णनदीचा प्रवाह चोवीस वर्षे वाहविला" यावरून असा निष्कर्ष काढता येतो की हे पत्र १७४३ चे असावे. कारण पेशव्यांची पहिली उत्तरस्वारी ही बाळाजी विश्वनाथांच्या कारकीर्दीत १७१९ मध्ये झाली होती. आणि याच वेळेपासून प्रथम चौथ आणि इतर वसुली ही सुरु झाली. १७१९ पासून नानासाहेबांच्या म्हणण्यानूसार २४ वर्षे म्हटलं तर १७४३ सालचे हे पत्र आहे असे मानण्यास हरकत नाही...   • भगिरथसमान कैलासवासी म्हणजे बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि थोरले बाजीराव पेशवे.
  • अकृत्रिम म्हणजे येथे इतर सरकारी अधिकारी असा अर्थ असावा
  • सुवर्णनदी जागा जागा जिरली म्हणजे पैसा मधल्या मार्गात आपल्या खर्चासाठी राखून ठेवला.
  • पुण्याकडे जाता रुक्ष देश फार आहे म्हणजे दक्षिणेहून पुण्याला येताना अशी माणसे फार झाली आहेत.
  • एकदा उत्तरेकडील सुवर्णनदी व दक्षिणेची नदी दोघींचा संगम ... या वाक्याचा अर्थ असा की उत्तरेचा महसूल आणि दक्षिणेचा महसूल जेव्हा पुण्यात येईल तेव्हाच दौलतीवरील कर्ज फिटेल.
  • एक कावेरी मात्र बहुत लोकांनी आपले उपयोगास आणिली ... या वाक्याचा अर्थ असा की कावेरी नदीचे पाणी समुद्रास मिळण्याआधी जसे हव्या तेवढ्या लोकांना हवे तेवढे पाणी पुरवते तसं पैशाचा ओघ हा पुण्याकडे येण्याआधीच सरदारादी गौण लोकांकडे पोहोचतो.
  • विचारून म्हणजे विचार करून असा अर्थ घ्यायचा आहे.
  • कार्याकारण जिरे म्हणजे केवळ कामापुरताच पैसा सरदारांकडे जाईल अवास्तव जाणार नाही.
- कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com