बाजीराव पेशव्यांचे दिल्ली मोहीमेवरील पत्र

॥ श्री ॥

श्रीयासह चिरंजीव राजश्री आपा यांसी :-
     बाजीराव बलाळ आशीर्वाद उपरी येथील कुशल तागाईत वैशाख वद्य छ १५ जिल्हेज मु॥ नजिक सवाई जयनगर जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष बुनगे बुंदेलखंडाचा राजा जगतराज याचे हवाली करून, बुंदेलखंडात रवाना करून  आम्ही सडे जाहलो. लांब लांब मजली वीस कोसांच्या करून, दोन मजलींनी छ ७ जिल्हेजी दिल्लीस बारापुला व कालीकेचे देऊळ उजवे हातें टाकून जाऊन कुशबंदीनजिक शहर येथे मुकाम केला. पुर्‍यास आगी देऊन खाक शहर करावे,  त्यास दिल्ली महास्थळ, पादशाहा बरबात जालियात फायदा नाही. दुसरे, पादशाहाचे व खानदौराचे चित्तांस सलुख करावयाचे आहे. मोगल यास सलुख करूं देत नाहीत. व अमर्यादा केल्यास राजकारणाचा दोरा तुटतो याकरीता आगी लावयाचे महकूब करून पादशाहास व राजे बखतमल यांसि पत्रे पाठविली. शहरांतून दोन हत्ती व घोडी, उंटे आली होती ती सापडली. लष्करचे लोकांनी शहरचे लोक भवानीच्या यात्रिस बाहेर आले होते त्यांस झांबडा झांबड केले. दुसरे दिवशी बुधवारी पादशाहाच्या आज्ञेने राजे बखतमल यांणी उत्तर पाठविले की धोंडोपंतास पाठविणे. त्यावरून मशारनिल्हेस पाठवावे तरी आम्ही शहराजवळ आलो. यामूळे दिल्लीस गलबला झाला. यामूळे पाठविले नाही. 'भला मजूरा व स्वार पाठवून देणे. मशारनिल्हेस पाठवून देतो. आम्ही शहरानजिक राहिल्याने शहरास उपसर्ग लागेल. याकरीता कूच करून झीलच्या तलावावर जातो. म्हणून उतर पाठवून आम्ही कूच केले. तदनंतर आम्ही झीलच्या तळावर मुक्काम केला. संध्याकाळच्या चार घटीका दिवस बाकी राहीला. तो कमर्दिखान पादशाहापूरावरून आल्याची बातमी खबर आली. तेच क्षणी आम्ही तयार होऊन गेलो. त्यांचे आमचे फौजेचे युद्ध जाहले. बारात गेलेला एक हत्ती राजश्री यशवंतराव पवार यांणी घेतला. घोडी उंटे लष्करात आली. त्यास दिवस अस्तमानास गेला. रात्रीचा दम धरून चौकीर्द मोगल वेढून बुडवावा तरी झीलचा तलाव सोळा कोस लांब. अम्ही मोंगल पाठीवर घेऊन दाबांत आणून बुडवावे या विचारे कूच करून रेवाद कोटपुतळी मनोहरपूरावरून आलो. परंतू अद्याप मोंगल सारे आलावर्दी व झीलच्या तलावरी आहेत म्हणोन बातमी वर्तमान आले व मीर हसनखान कोका पहिल्या झूंजात जखमी जाहला होता तो मेला म्हणोन वर्तमान आले. आम्ही ग्वालेर भडावर प्रांते आता बाकी साकी राहिली आहे ते वसूल करून मोंगल मागे मागे आले तरी त्यांस हैरानपेरोसान करून पाईची धापा देऊन, धावता धावताच खराब होत तेच करून, दाबांत आणून, गाठ घालून, राजश्री स्वामींचे पुण्ये व वडिलांचे आशिर्वादे बुडवितो. आमची चिंता न करणे. मुख्य गोष्टी पादशाहाचे व खानदौराचे चित्तांत सलुख करावयाचे आहे. मोंगल यांणी हिंमत धरिली आहे. त्यांते शीरउपस्त सादतखान आहे. याचा गर्व हत श्रीसंकल्पे जाहलियास सर्व मनोदयानुरुप होईल. जरी मनोदयानुरु सलुख जालिया करू; नाहीतर सलुख करत नाही. दिल्ली भवता मुलुख़ खालसा केला. पुढे सोनपत पाणीपत यमुनापार मुलुख राहीला. तोही ताराज करून मोंगल अन्नास महाग होत ऐसेच केले जाईल. मागाहून होईल ते वृत्त तुम्हांस लिहून पाठवू. कदाचित मोंगल दिल्लीस राहीले तरी आगरियास जाऊन अंतर्वेदीत उतरून मुलुख कूल मारून ताराज करीतो. नबाब निजामनमुलुख यांणी गडबड केली, रेवा उतरले, तरी तुम्ही मागे शह येणे, पेशजी लिहीले आहे त्याप्रमाणे करणे, मारू ताराज करणे. इकडेस सक नाही. तिकडेसही नाहीसा करणे. निजाम यास पायबंद असलिया उत्तम आहे. लोभ असो दीजे हे आशिर्वाद.

इ.स. १७३४ च्या दिल्लीवरील स्वारीदरम्यान श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी चिमाजीअप्पांना लिहीलेले दि. १५ मे १७३४ रोजीचे पत्र...

कठीण शब्दार्थ :

* श्रीयासह - ऐश्वर्यसंपन्न 
* जयनगर - जयपूर
* बुनगे - सैनिकांव्यतिरिक्तचे लोक
* जगतराज - बुंदेलाराज छत्रसालांचा पुत्र, मस्तानीचा सावत्रभाऊ, बाजीरावांचा मेव्हणा.
* बारापुला - दिल्लीचा एक भाग बारापूरा
* महकूब - मूळ शब्द तहकूब आहे, पण पत्रलेखकाने भराभर लिहीताना महकूब लिहीले.
* झांबड झांबड - लहानशी हातघाई अथवा चकमक
* मजूरा - सैनिकांचा आणि बुनग्यांचा भत्ता
* झील - तलाव
* तळावर - मैदानावर
* पादशाहापूर - कदाचित हे दिल्लीनजिकचे एक शहर असावे
* बारात गेलेला - म्हणजे मोकळा सुटलेला
* दाबांत आणून म्हणजेच सापळा रचून
* रेवाद - रेवाडी
* कोटपुतळी - हे गाव जयपूरच्या ईशान्येस ७४ मैलांवर आहे
* मनोहरपूर - जयपूराजवळील गाव
* हैरानपेरोसान - हैराणपरेशान
* पाईची - पायदळाची
* धापा देऊन - दमवून
* शीरउपस्त - डोके वर करून
* ताराज - उध्वस्त
* अंतर्वेदीत - गंगा आणि यमुनेच्या मधला प्रदेश, दोआब
* रेवा - नर्मदा
* सक - शक अथवा संशय


कौस्तुभ कस्तुरे    ।    kasturekaustubhs@gmail.com