पळपुट्यांचे पारिपत्य करा : थोरले बाजीराव पेशवे


पोर्तुगिजांवरील मोहीमेदरम्यान शंकराजी केशव यांनी केळवे-माहिम या पट्ट्यातील आपले सैन्य हटवून माघार घेतली. हे समजल्यावर बाजीरावांनी रामचंद्र हरी यांना पत्र पाठवून 'पळ्याचे' अथवा पळपुट्या माणसांचे पारिपत्य करण्याच्या आणि ३२५० माणसांनीशी केळवे-माहिम घेण्याच्या आज्ञा दिल्या. या पत्रातून बाजीरावसाहेबांची 'जरब' दिसून येते.


॥ श्री ॥

अखंडीतलक्ष्मीअलंकृत, राजमान्य राजश्री रामचंद्र हरी गोसावी यांसी-
सेवक बाजीराव बलाल प्रधान नमस्कार. सु॥ समान सलासीन मया व अलफ. फिरंगीयाचे आरमार खांदेरीच्या बार्‍यावरी आले. हे खबर अणजूरकर यांनी राजश्री शंकराजी केशव यांस लिहीली. त्यावरून त्यांनी सलाबत खाऊन केळवे माहिम येथील लोक उठवून माघारे नेले. गनिमाची सलाबत वाढविली. ऐशियास वसई, अरनाळा आदिकरून लोकांचे सामान असे तसे नाही. नामांकित माणूस किती आणि गनिमाची सलाबत खातात ! यावरून त्यांचे व त्यांजवळील लोकांचे मर्दुमीच्या तारिफा काय कराव्या ? असो. न व्हावे त जाले. अतःपर गनिमावरी सलाबत चढवून केळवे माहिम ही स्थळे जबरदस्तीने घेतली तरीच त्या  लोकांची व सरदारांची शाबास. नाहीतर पैका खाऊन नाचिज होतो ! असो, तुम्ही सदरहू साडेबत्तीसशे माणसांनिशी केळवे माहिमास लगट करून दोन्ही स्थले हस्तगत करणे. मराठे, कानडे, परदेशी लोक आहेत. त्यांस झंझ भांडणाचे प्रसंगी कित्येक माणूस सलाबत खाऊन पळून जातात, याजमूळे कैद सलाबत होते. ऐसीयास लाखोलाख रुपये खर्च करून लोकांस द्यावे आणि प्रसंगी पळ काढतील त्या पाजींचा मुलाहिजा काय ? जे दालीची शरम धरून साहेबकाम करितील त्यांचे उर्जित करीतच आहो. पळून जातील त्यांचा मुलाहिजा काय निमित्य करावा ? ज्या ज्या वाटा पळून जावयाच्या आहेत तेथे चौक्या ठेऊन, पळतील त्यास धरून, परिछिन्न डोचकी मारणे. सरदार अगर प्यादा न म्हणणे. बिना एकाद दुसरा सरदार अगर परदेशी कानडे मारल्याविना माणूस भय धरून वर्तणार नाही. यास्तव हेच परवानगी जाणून पळ्याचे पारपत्य करणे. फिरंगीयाच्या लोकांनी वारे घेतले आहे. तुम्हांवरही तोंड टाकीतील. त्यांस जपून एक वेळ कापून काढणे. म्हणजे तेही बलखुद राहतील. जाणिजे छ २६ रजब.


पत्रांतील कठिण शब्दार्थ :

* बार्‍यावरी - धक्क्यावर. बारी म्हणजे धक्का अथवा बंदर
* सलाबत - दहशत अथवा धाक
* तारिफ - प्रशंसा
* नाचीज - निरुपयोगी
* लगट - नेटाने जोर लावून पठलाग.
* झंझ - युद्ध
* कैद सलाबत होते - येथे कैद हा शब्द शिस्त असा घ्यायचा आहे. पळून गेल्याने लष्कराची शिस्त बिघडते.
* दालीची या शब्दाचा अर्थ नीट समजला नाही पण त्याच्या अर्थ झेंड्याची अथवा निशाणाची असा असावा.
* मुलाहिजा - गय.
* परिछिन्न - म्हणजे कोणाचेही न ऐकता निश्चयाने.
* वारे घेतले आहे - जोर धरला आहे.
* येथे शेवटी जपून असा शब्द आला आहे तेथे तो 'टपून' असण्याचा संभव आहे.
* बलखुद - ओळखून अथवा धास्त खाऊन.

संदर्भ : द. ब. पारसनिसकृत "ब्रह्मेंद्रस्वामी  धावडशीकर यांचे चरित्र"

कौस्तुभ कस्तुरे    ।    kasturekaustubhs@gmail.com