थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूसंबंधी पत्रे


लेखांक १ )

श्री
          सेवेशी आपाजी त्रिंबक साष्टांग नमस्कार विज्ञापना. श्रीमंतांची स्मृती अमरणांत होती. दोन घटकाने पुढे प्राण जातेसमयी सर्व मंडळी व वैदिक मोठेमोठे ब्राह्मण बोलावून आणून नमस्कार केला. "महायात्रेस आम्ही जातो. आमचे स्वारीची तयारी करा." असे सांगोन 'गजानन', 'गजानन' असे म्हणताच नेत्राद्वारे प्राण गेला. त्याचप्रमाणे श्रीमंत सौभाग्यवती मातुश्री बाईसाहेबांनी शर्त केली. जवाहीर जे होते ते आपले हाताने वाटून धर्मशीलेवर उभे राहून श्रीमंत दादासाहेबांस बोलावून आणून धाकटे श्रीमंतांस त्यांचे हाती दिले. "सर्वांचे वडीलपण यथास्थित चालवावे" म्हणोन सांगून गेली. मोहरांच्या पिशव्या दोन जवळ ठेवून घेऊन जो नमस्कार करावयास आला त्यास कनिष्ठास देखिल एक मोहोर दिली. श्रीमंतांनी आपल्या खाशा गाई होत्या त्यांस ते दिवशी आपले हाते ब्राह्मणांस दान दिल्या. धर्माविशी श्रीमंतांनी काही मनाई केली नाही. मोक्षधेनूचा संकल्प आपण स्वमुखे करून दाने दिली. वैद्यास प्रार्थना अगोदरच असे की "अतिसार मरणसमयी व्हावा हे उतम. कफ होऊ न द्यावा. नाहीतर स्मरण  गजाननाचे व्हावयाचे नाही." असे अगोदर दोन चार दिवस बोलत असत. प्राण जाऊ लागला ते समयी " अन्न घालू नका, दूध अथवा गंगोदक मिळोन घालणे" अशी ताकीद. त्याचप्रमाणे ते पुण्यवंत म्हणून अतिसार झाला. कफ झाला नाही. स्मृतींत 'गजानन', 'गजानन' म्हणत मोठ्या योग्याप्रमाणे नेत्राद्वारे प्राण गेला ! बाईंनी समागमे यावे अशी पहिलीच आज्ञा. त्याप्रमाणे बाईंनी शर्त केली. हा विधी उरकल्यानंतर सातार्‍यास जाऊन आल्यानंतर पुढील कर्तव्य काय योजतात पहावे. श्रीमंत बाबास हिर्‍याची अंगठी आत गणपतीची मुहूर्त असलेली दिली. अंगठी चांगली दिली. भाऊस पाचेची दिली तीही चांगली आहे. वरकडास मोहरा दोन चार पाच अशा दिल्ह्या. हे विज्ञापना.

हे पत्र माधवरावांच्या मृत्यूनंतर केवळ दोन दिवसांनी म्हणजेच, कार्तिक वद्य १० शके १६९४- दि. २० नोव्हेंबर १७७२ रोजी लिहीलेले आहे.

संदर्भ : साधनपरिचय महाराष्ट्राचा अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास, लेखांक १५२

शब्दार्थ -

* श्रीमंत सौभाग्यवती मातुश्री बाईसाहेब म्हणजे माधवरावांच्या पत्नी रमाबाई  
* धाकटे श्रीमंत म्हणजे नारायणराव पेशवे. माधवरावांना मूलबाळ नव्हते.
* कनिष्ठास देखिल एक मोहोर दिली म्हणजे लहान मुलांनाही एकेक मोहोर दिली.
* बाईंनी समागमे यावे अशी पहिलीच आज्ञा म्हणजे आपल्यानंतर रमाबाईंनी सती जावे असे माधवरावांना वाटत होते. यामागे इतिहासकारांना आणि तथाकथीत समाजसुधारकांना माधवरावांचा प्रतिगामी स्वभाव दिसतो, परंतू माधवरावांच्या हयातीतच राघोबादांनी इतकी कारस्थाने केली तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर रमाबाईंना काही सोसावे लागू नये आणि राघुनाथरावांच्या कारस्थानांमध्ये रमाबाईंचा छळ होऊ नये एवढाच माधवरावांचा उद्देश असावा. कारण यापूर्वी पेशवे घराण्यात सतीची चाल नव्हती. खुद्द माधवरावांची पणजी राधाबाई, आजी काशिबाई, आई गोपिकाबाई या आपल्या पतीच्या निधनानंतर सती न जाता प्रतिष्ठेने राहत होत्या. तेव्हा माधवरावांनी हा उपदेश का केला याचा खुलासा सहज होतो. 
* शर्त म्हणजे कमाल केली.
* हा विधी उरकल्यानंतर सातार्‍यास जाऊन आल्यानंतर .. हा उल्लेख नारायणरावांच्या संदर्भात असावा.
* मुहूर्त म्हणजेच मूर्त अथवा मूर्तिलेखांक २ )
 श्री

इकडील वर्तमान तर आम्ही हिशेब लिहून तयार केले आहेत. परंतू पुसत कोणीच नाहीत ! श्रीमंत सौभाग्यवती पार्वतीबाईचा विधी. तिजपासून काहीच नाही. परंतू वस्त्रे झाली. सातार्‍यास त्या दिवसापासून मुख्य कारभारी व धणी ज्येष्ठ इतक्यांचे मनात नव्हते. त्याचे पर्याय बहुत आहेत. तेव्हा पुण्यात येऊन वचने काढून सिंहस्थपावेतो राहविले. त्यास विचारून करावे. असा मनसबा होता. परंतू ती म्हणणार जे 'पर्वतवासी आणून फडशा करून टाकणे. मग विधी उरकून टाकावा'. परंतू ते जालेच नाही. सकारनामकाचे मनात विधी उरकून मग ब्राह्मणांस सांगावे असे आहे. कारभारी यांचे व फडणीसांचे विसाजी केशव लेले यांजमूळे वाकडे आले आहे. फडणीसांचे घर कारभारासंबंधी राहीले. तेरीख मात्र घालावी. श्रीमंतांचा प्रकार तर बालकृष्णच आहे ! परंतू केवळ कारभारी यांचे स्वाधीन नाही. आमचे येथील तर काही पुसूच नका. बारीक सारीक गोष्टीतसुद्धा कारभारी यांस पुसावे लागते. असो. श्रीमंत रावसाहेब गेले. याजमूळे सर्वच फसल्यासारखे जाले आहे. वाघ गेला ! सारी कोल्ही राहीली आहेत. ईश्वर सत्ता प्रमाण ! 

 हे पत्र १३ जानेवारी १७७३ रोजी राघोबादादा पेशवेपदी आल्यानंतरचे आहे.

संदर्भ : साधनपरिचय महाराष्ट्राचा अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास, लेखांक १५३

शब्दार्थ -

* पार्वतीबाईंचा विधी म्हणजे केशवपनाचा विधी करण्याविषयी राघोबादादा आणि सखारामबापूचा आग्रह. यात मोठे राजकारण होते. कारण पानिपतनंतर सदाशिवरावभाऊ हे लौकीकार्थाने बेपत्ता होते. काशिराजाने आपल्या माणसांकरवी पेशव्यांना 'भाऊंचा अंत्यसंस्कार केला' इत्यादी गोष्टी कळवल्या होत्या पण पार्वतीबाईंना आणि इतर कुटूंबियांना धक्का बसू नये यास्तव त्यांना, आणि परिणामी इतर कोणालाही (नाना फडणीस इत्यादी विश्वासू सोडले तर) काही सांगण्यात आले नव्हते. या कारणास्तव पुढे सदाशिवभाऊंचा तोतया बनून आलेल्या कनोजी ब्राह्मणाने सर्वांना भ्रमात टाकले. खुद्द पार्वतीबाईंनाही ते खरे वाटले. नेमका याचाच फायदा बारभाईंच्यापैकि (सखारामबापू, चिंतो विठ्ठल रायरीकर असे दादांचे पक्षपाती सोडले तर)  इतरांनी घेऊ नये म्हणून त्याआधीच पार्वतीबाईंचा केशवपन सोहळा उरकावा अशी बापू आणि दादासाहेबांची घाई होती.
* कनिष्ठ याचे मनात नव्हते म्हणजे नाना फडणवीसांचा याला विरोध होता.
* पर्वतवासी आणून फडशा करून टाकणे म्हणजे तोतया आणून सोक्षमोक्ष लावा असे म्हणणे.
* सकारनामक म्हणजे सखारामबापू बोकील.
* फडणीसांचे घर कारभारासंबंधी राहीले. तेरीख मात्र घालावी... म्हणजे नानांचे महत्व केवळ नाममात्र कारभार करण्यासाठी उरले. कारभार बापू करणार आणि फडणीस म्हणून पत्रावर तारिख नानांनी घालावी असं सुरु होतं.
* श्रीमंतांचा प्रकार तर बालकृष्णच आहे ! परंतू केवळ कारभारी यांचे स्वाधीन नाही... म्हणजे नारायणराव तर लहानच आहेत, दुःखात सुख असे की ते कारभार्‍यांच्या विचाराने चालत नाहीत. 
* श्रीमंत रावसाहेब म्हणजे थोरले माधवराव पेशवे.
* या पत्रातील 'वाघ गेला ! सारी कोल्ही राहीली आहेत' हे वाक्य अतिशय समर्पक आहे. माधवराव गेल्यानंतर माघारी आता कोणीही हुशार उरलं नाही, सारे लबाड आहेत असा याचा अर्थ होतो. 


कौस्तुभ कस्तुरे   ।    kasturekaustubhs@gmail.com