नारायणराव पेशव्यांच्या खूनासंबंधीचे कागद : भाग २

पुण्याहून शिवाजी बाबाजी यांनी हे पत्र नारायणरावांच्या खूनानंतर तिसर्‍या दिवशी म्हणजेच दि. २ सप्टेंबर १७७३ रोजी मिरजेला वामनराव यांना लिहील्याचे आहे.

श्री

          सेवेशी साष्टांग नमस्कार विनंती. तागायत गुरुवार दोनप्रहर वर्तमान तर काल लेखकांच्या माणसाबरोबर त्वरेने येण्याविषयीचा प्रकार दर्शविला होता. तेसमयीचा प्रकार तसाच होता व लेखकाचे विचाराप्रमाणे पत्र पाठविले होते. अलिकडील अर्थ, गारद्यांचे प्राबल्य बहुतच होते की "राज्याचा खावंद मारिला. होता तो मारिला. आता निम्मे राज्य वाटून देणे". असे बहुतच पाय पसरून बोलत होते. आत तमाम बंदोबस्त सुमेरसिंग व महंमद इसफ व खरकसिंग चौकीदार यांचा. परवानगी रसानगी त्यांची. मराठे माणूस आत अगदी नव्हते. शहर लुटीतात अशी धास्त बसून कोणास कोणी न पुसे. अशी अवस्था होती. गाडद्यांस हा मनसबा सांगितला. ते समयीचा करार-
           किल्ल्यांपैकी पुरंदर, नगर व साष्टी हे तीन किल्ले व पाच लाख रुपये रोख द्यावे. येणेप्रमाणे करार असता आडमुद्दे राज्याचे वगैरे गाडद्यांनी मनस्वी घातले. "नाही तरी त्यांची गत ती यांची ! अल्लिबहाद्दर राज्यांस खावंद करू." असे चित्तांस येईल तसे बोलत. गावांत जितका मुसलमान होता तितक्यांनी बंदुका घेऊन वाड्यात जथ पाडीला. तोफखान्यातून धाकट्या तोफा आणून बुरुजावर ठेवाव्या असा मनसबा विलक्षण करून बसले. तेव्हा भकारनामक प्रतिनिधी याणी सांगितले की, "राज्य अथवा किल्ले कोणाचे ? वाटून देणार कोण ? राज्याचे चाकर आम्ही. जतन करावे. द्यावयाचा अखत्यार आम्हांवर नाही. चार रुपये अधिक मागितल्यास चिंता नाही. देऊ. परंतू किल्ले अथवा राज्य देणार आम्ही कोण ?" तेव्हा रदबदली पडून पाच लक्ष रुपये द्यावेसा करार होता ते व किल्ल्याचे तीन लक्ष एकूण आठ लक्ष रुपये द्यावे येणेप्रमाणे ठराव होऊन दोन तीनशे गाडदी बाहेर निघोन दरवाजे मोकळे झाले. मराठे आणून आत दोन तीनशे हत्यारबंद जमा झाले. आता विचारे विचारे गाडदी बाहेर निघतील. परवानगी रसानगी दरवाज्यास गाडद्यांची नाही. आत लोक जातात येतात असे झाल्यामूळे जरा स्वस्थ झाले आहे. कर्म झाल्यावर दुसरे दिवशी (श्रीमंतांनी) मकारनामक लेखक यास बोलावून नेऊन सांगितले की नकारनामकास घेऊन येणे. तेव्हा ते येऊन त्यांस घेऊन गेले. (श्रीमंतांनी) उभयतांस सांगितले की "तुम्ही फडणीसीचे कामकाज करीत जाणे." तेव्हा उत्तम म्हणून बाजीपंत व परचूरे यांस सांगितले की लिहीण्याचे जाबसाल आज्ञा होईल त्याप्रमाणे करीत जाणे म्हणून सांगोन घरास आले. उभयता नित्य जातात. (श्रीमंत) सांगतात त्याप्रमाणे कागदपत्र समजावितात. रोजमरा गाडद्यांस वगैरे देवितात त्याप्रमाणे देतात. चिकारनामक व भिडे उभयतां कामकाजाच्या गडबडीत आहेत. भकारनामक प्र॥ व सकारनामक मच्छाहारी बकारनामक बरवे व सकारनामक परभू सारा दिवस (श्रीमंतांचे) जवळ असतात. चौघांपैकी थोरले दोघे या राजकारभारात पुर्ते होते असे म्हणतात. त्यासारखे दिसून आले. तमाम शागिर्द लहान मोठ्यांस तमाम बोलावू पाठविले. चिरंजिव आणविले. बारामतीकर गृहस्थांस तीन चार पत्रे गेली ते येणार. काम कारभार त्यांचे विचारे करावा असे मानस दिसते. मुख्य कारभारी समाधान नाही म्हणून या मंत्रापूर्वीच चार दिवस दरबारात येतच नव्हते. हे झाले, गाडद्यांची गोळा गोळी होऊ लागली. तेव्हा कोतवालचावडीजवळ बापूनी सारे मुत्सद्दी जमा केले होते. राऊतांचा जथ पाडिला तो आतून चिठ्ठी आली की, "गुंता उकरला. आता बाहेर बसून खटपट काये निमित्य करीता ? आत येणे." तेव्हा (सखारामबापू) वाड्यात गेले व त्यांचे (श्रीमंतांचे) कानी लागून सांगितले की "गोष्ट फटफळ जाली. फडणीस लेखणीचे धणी आहेत त्यांस बलावून सांगावे. लिहीण्याचे कामकाज त्याणी केल्याखेरीज परिणाम नाही. आम्हांस समाधान नाही, घरास जातो." म्हणून सांगून गेले. त्यापासून दरबारात येत नाहीत. चिकारनामक त्यांजकडे जाऊन खलबत करून येत असतात. (सखारामबापू) काल दोन प्रहरी पळून गेले. पर्वतीजवळ माणसास आढळले. बायकामूले घरातच आहेत. चार कोस गेला. मागती काय विचार केला न कळे.  फिरोन रात्रौ घरास आला. कारभार करावा असे चिकारनामक नित्य त्यासी बोलतात. त्रिकारनामकही नित्य वाड्यात जात असतात.  फडके याजवर फारच रोष याजकरीता त्या गडबडेत ते निघोन गेले. मोरेश्वर पावेतो गेलेले आढळले. घरी चौकी बसली आहे. त्या गडबडित ईच्छारामपंतास तीन जखमा झाल्या. दुसरे दिवशी मृत्यू पावला. नारायण सदरेस बसल्यावर मारून टाकीला. त्याप्रमाणे फडके यांस करावे म्हणून बोलीले. आणखी ब्राह्मण चार पाच व चाफाजी खिजमतगार ठार झाला. त्या गडबडेत (नारायणराव) थोरल्यांजवळ जाऊन पोहोचले होते. "दादासाहेब वाचवावे. किल्ल्यावर घालावे. नाचण्याची भाकर द्यावी." असे म्हणून गळा मिठी घातली. तेव्हा लोटून दिला. तुळाजी पवार भेदला होता त्याणी पायास भरून ओढीला. सुमेरसिंगाने वार टाकीला. पाच सहा वारांनी पुरा झाला. तेथेच चाफाजी ठार झाला. असे होतांच (दादासाहेब) सदरेस जाऊन बसले. तमाम चोपदारांस वगैरे यांस बोलावू पाठवून बदोबस्त करू लागले. सुतक नाही. नित्य नमस्कार सूर्यास घालितात. "वैरियाचे सुतक कशास ?" म्हणतात ! गोवधदेखिल वाड्यात जातात. दोघी कुणबिणीला मेल्या. बालहत्या, ब्राह्मणहत्या, गोहत्या, स्त्रीहत्या सारेच झाले ! गंगाबाई आनंदीबाईने कोंडोन खोलोन ठेविली, दहनास तिकडे गेल्यावर विधी उरकविला. रात्रीस करू नये पण ते समयीच गुंता उरकवीला. हे राजकारण फार दिवस घाटात होते. त्यात मोठे मोठे होते असे आता उद्गार निघतात. ज्यांनी राजकारणे केली होती त्यांचे मानस (नारायणरावांस) कैद करावे असे होते. परंतू करावयास गेले एक आणि झाले एक ! ईश्वराच्या चित्तांस आले तसे झाले. आता त्राता कोणी नाहीसा झाला. आपण येसाजीबरोबर पत्रे पाठविली ती पावली. मजकूर कळला. पंढरपुराकडे जावयाचा प्रकार लिहीला. त्यास इकडून वरचेवर पत्रे गेलीच आहेत. त्वरेने येण्याविशी पत्रे गेली होती. त्यास (आता) गाडद्यांचा उलगडा होतच आहे. आता लेखकाचे व आमचे मते तूर्त न यावे येणेप्रमाणे ठरोन त्यांचे पत्र व आमचे पत्र लिहीले आहे. थोडक्या फौजेनिशी येथे येणे हेही ठिक नाही.जेथे पत्र पावेल तेथे मुक्काम करोन रहावे. फौज जमा करावी. कोची अदकोसी कूच तासगावाकडे केल्यास चिंता नाही. मागे मात्र जाऊ नये हे विज्ञापना. संदर्भ : साधनपरिचय महाराष्ट्राचा अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास, लेखांक १५४

शब्दार्थ -
* लेखकांच्या माणसाबरोबर म्हणजे नाना फडणीस आणि मोरोबादादा फडणीसांच्या माणसांबरोबर
* रसानगी म्हणजे लिखित परवानगी
* जथ पाडिला म्हणजे तळ दिला
* आगळे म्हणजे जास्त
* रदबदली म्हणजे भीड
* जाबसाल म्हणजे सवाल जवाब अथवा चर्चा
* रोजमरा म्हणजे रोजचा पगार अथवा रोजंदार
* चिरंजीव हा उल्लेख रघुनाथरावांचा दत्तकपुत्र अमृतराव यांच्याबद्दलचा आहे. 
* मंत्रापूर्वीच म्हणजे नारायणरावांच्या कारस्थानासंबंधी कानगोष्टी होण्यापूर्वीच.
* फटफळ म्हणजे अशुभ.
* फडके म्हणजे हरिपंततात्या फडके.
* गंगाबाईचा विधी म्हणजे नारायणराव गेल्यानंतर होणारा केशवपन विधी.

मुत्सद्द्यांची सांकेतिक नावे -

* भकारनामक प्रतिनिधी : भवानराव पंतप्रतिनिधी
* मकारनामक : मोरोबादादा फडणीस.
* नकारनामक : नाना फडणीस
* चिकारनामक : चिंतो विठ्ठल रायरीकर
* सकारनामक मच्छाहारी : सदाशिव रामचंद्र शेणवी. मत्स्याहारी म्हणजे सारस्वत ब्राह्मण.
* सकारनामक परभू : सखाराम हरी गुप्ते. हे कायस्थ प्रभू होते.  
* त्रिकारनामाक : त्रिंबकराव मामा पेठे.

सदर पत्रावरून नारायणरावांच्या खूनाच्या संबंधी अनेक महत्वाचे दूवे सापडतात. विशेषतः रघुनाथरावांना नारायणरावांचा खून करावयाचा नव्हता, केवळ धरावयाचे होते हे स्पष्ट होते. पेशव्यांचा बखरकारही म्हणतो, की "दादासाहेब यांणी गारदी यांजकडे फितूर मांडला. नऊ लाख रुपये गारद्यांस देऊ म्हणून कागद लिहून दिला आणि नारायणरावसाहेब यांस कैद करावे". पण बखरकार पुढे म्हणतो की ही मसलत आनंदीबाईने करून 'धरावे' चे 'मारावे' केले याला अर्थ वाटत नाही. कारण असे असते तर आनंदीबाईने गंगाबाईला, विशेषतः ती गरोदर असताना आणि तिच्या पोटात नारायणरावांचा वंश वाढत असताना (जो पुढे तिच्याच नवर्‍याचा प्रतिस्पर्धी बनला असता) गारद्यांपासून सुरक्षित म्हणून आपल्या महालात सुरक्षित ठेवले नसते. शिवाय महंमद इसाफ याने पुढे आपल्या जबानीत म्हटले की "नारायणरावांस मारावे असे ठरले नव्हते. ते काम आयत्या वेळी (डोक्यात राग जाऊन) सुमेरसिंगाने केले". याशिवाय पत्रात नेमके कोणाबद्दल काय लिहीले आहे ते सारे त्या व्यक्तिच्या सांकेतिक नावांमधून दर्शवले आहे, जेणेकरून एखाद्या अनोळखी व्यक्तिच्या हातात पत्र पडले तर व्यक्तिंचा उलगडा होऊ नये हा त्यामागचा उद्देश !


कौस्तुभ कस्तुरे    ।     kasturekaustubhs@gmail.com