नाना फडणीसांचे इंग्रजाविषयीचे धोरण

इंग्लंडहून आलेली पत्रे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी फर्मानबाडीचा समारंभ करून आणि सन्मानार्थ शंभर तोफांच्या सलामित सामोरे चालत येऊन स्विकारावीत हा पुण्याचा रेसिडेंट बॅरी क्लोजचा आग्रह नाना फडणवीसांनी धुडकावून लावला त्यासंबंधीचे दि. ८ जानेवारी १८०० रोजीचे पत्र.श्री

          सेवेशी बाळाजी विष्णू सहस्त्रबुद्धे कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. तागायत छ १२ साबानपावेतो वर्तमान येथास्थित असे. विशेष, पेशजी इंग्रजांकडील वकील मालिट होता तो विलाइतेस जाऊन आपल्या पातशाहाची पत्रे सरकारांत पाठविली ती मुंबईकर जनरालकडे आली. तेथून पुण्यास सरकारांत आली. बरोबर टोपिकर चार आहेत. येथे आल्यावर त्यांचे बोलणे सरकारांत पडले जे ''पातशाही पत्रे आणली आहेत, त्यास सरकारचा डेरा बाहेर होऊन श्रीमंतांनी सामोरे येऊन फरमानबाडीचा समारंभ करून श्रीमंतांनी उभ्याने पत्रे घ्यावी" याप्रमाणे चार रकमा त्यांच्या बोलण्याच्या पडल्या. त्याजवरून श्रीमंतांनी श्रीमंत राजश्री नानांस पुसावयास पाठविले जे या इंग्रजांच्या मागिल चाली कशा आहेत ? तेव्हा नानानी मागील चाली सांगितल्या. दिल्लीपतीशिवाय सामोरे जाणे अथवा फरमानबाडी करणे ही चाल नाही. मागे थोरल्या रावसाहेबांचे वेळेस इंग्रजांच्या पातशाहाकडील पत्र आले होते ते टोपिकरानी कचेरीस रावसाहेब यांचे हाती दिले. याप्रमाणे चाली असता नव्याच रकमा बोलण्याच्या काढाव्या या दौलतदारांच्या चाली नाहीत. तेव्हा इंग्रजांकडील बोलणे पडले जे, आजपर्यंत चाली चालत आल्या खर्‍या. त्या चालित इंग्रजांकडील मातबर मनुष्य सरकारांत बोलावयासी आला असता त्यास मदारुलमहाम अगर मातबरांतील इस्तकबिल येत गेले. हल्ली तो पातशाही पत्रे घेऊन आलो आहो. त्यापेक्षा चारी रकमा घडाव्या. तेव्हा मागती सरकारांतून नानांस विचारावया करीता पाठविले. याप्रमाणे आठ दिवस घाटत होते. नंतर नानानी चोहो रकमांची चार उत्तरे सांगितली जे " श्रीमंत सामोरे येणार नाहीत. डेरा देऊन फरमानबाडी व्हावयाची नाही. उभ्यानी पत्रे घ्यावयाची त्यांस इंग्रज पत्रे घेऊन वाड्यात येतील. तेव्हा श्रीमंत इंग्रजांच्या भेटीकरीता कचेरीस येतील. त्या संधीत इंग्रजानी पत्रे श्रीमंताच्या हाती द्यावी. श्रीमंतांनी पत्रे घेऊन मुनसीच्या हवाली करावी". आणि खुशालीच्या तोफा शंभर माराव्या असे इंग्रजांचे म्हणणे होते त्यापैकी वीस तोफा सोडाव्या असे ठरोन छ ११ साबानी लिहिल्याअन्‍वये घडले. श्रुत होये हे विज्ञापना. संदर्भ : साधनपरिचय महाराष्ट्राचा अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास, लेखांक २०७

सदर पत्रावरून, बाजीराव आणि नानांमध्ये परस्परभाव हा विरोधाचा असला तरीही इंग्रजांच्या बाबतीत नानांनी बाजीरावांचे, किंबहूना पेशव्यांच्या गादीचा मान राखून त्यांचे हित बघितले. या वेळेस बाजीरावाला विरोध करण्याच्या हेतूने पूर्वी राघोबादादानी जसे इंग्रजांशी संधान बांधले तसे नानांनी केले नाही. नाना इंग्रजांना पक्के ओळखून होते. महाराजांचे विचार या परकीय लोकांबद्दल, आणि विशेषतः इंग्रजांबद्दल काय होते ते रामचंद्रपंत अमात्यांनी लिहून ठेवलय-
“ सावकारांमध्ये फिरंगी इंगरेज, फरांसिस, डिंगमारादी टोपीकर लोकही सावकारी करीतात. परंतू ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक राज्यच करीतात. त्यांचे हुकुमाने हे लोक या प्रांते सावकारीस येतात.  राज्य करणार्‍यांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते. तथापी टोपिकरांचा या प्रांते प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावे हा पूर्ण अभिमान. तद्नुरूप स्थळोस्थळी कृतकार्याही जाले आहेत. त्याहीवरी हट्टी जात, हातास आलेले स्थळ मेलियानेही सोडावयाचे नव्हेत. यांची आमदरफ्ती आले-गेले ऐसीच असो द्यावी. त्यांसी केवळ नेहमी जागा देऊ नये. जंजिरेया समिप या लोकांचे जणे-येणे सहसा होऊ देऊ नये. कदचित वखारीस जागा देणे जालेच तर खाडीचे सेजारी समुद्रतीरीं न द्यावा. तैसे ठायी जागा दिधलियावरी आपले मर्यादेने आहेत तोवर आहेत. नाही तें समई आरमार-दारुगोळा हेच त्यांचे बळ. आरमार पाठीसी घेऊन त्याचे बळे त्या बंदरी नुतन किलाच निर्माण करणार. तेव्हा तितके स्थळ राज्यातून गेलेच. याकरीता जागा देणे तरीं खाडी लांब गाव दोन गाव राजापूरसारखी असेल तेथे फरांसिसांस जागा दिल्हा होता. त्या न्यायें दोन च्यार नामांकित शहरे असतील त्यांमध्ये जागा द्यावा. तोही नीच जागा, शहराचे आहारी शहराचा उपद्रव चूकऊन नेमून देऊन वखारा घालावाव्या. त्यासही ईमारतीचे घर बांधो देऊ नये. या प्रकारे राहिले तरी बरे. नाहीतरी याविनाही प्रयोजन नाही. आले गेले असोन त्यांचे वाटे आपण न वजावे, आपले वाटे त्याणी न वजावे इतकेच पुरे... ”
नानांनी नेमकं हेच मर्म ओळखलं होतं आणि म्हणूनच बाजीरावांच्या पाठिशी राहून नानांनी पुण्याचा इंग्रज रेसिडेंट बॅरी क्लोज याला स्पष्ट शब्दात धुडकावून लावलं. अखेरीस शंभर तोफांऐवजी वीस तोफांच्या सलामीने क्लोजने ती पत्र पेशव्यांच्या फडावर नजर केली आणि दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी ती स्वतः न वाचता फडणीसांकडून ऐकली.

कौस्तुभ कस्तुरे    ।     kasturekaustubhs@gmail.com