इतिहासातून भविष्याकडे


          इतिहास ! इतिहास हा विषय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कारणाने सतत रुंजी घालतच असतो. काहींना तो आवडतो, तर काही त्यापासून जितकं लांब राहता येईल तितकं अंतर  ठेवतात.  असो, पण जर नीट बारकाईने निरखून पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट नीट समजून येईल.. इतिहासासारखा गुरु नाही ! इतिहास आपल्याला अनपेक्षितपणे अन्‌ आपल्या नकळत अनेक गोष्टी शिकवून जात असतो. आपण थोडंसं काळजीपुर्वक लक्ष दिलं, तर त्यातून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे नक्कीच सापडतात !
          या सार्‍याची मांडणी करण्याआधी आपल्या बहुतेकांच्या मनातला एक गैरसमज दूर होणं गरजेचं आहे, तो म्हणजे इतिहास म्हणजे केवळ लढाया आणि राजकारण ! असं खचितही नाही.. आपल्याला ज्ञात असणार्‍या अथवा आपल्या बुद्धीला समजणार्‍या प्रत्येक गोष्टीशी हा इतिहास निगडीत असतो. धर्म, वाणिज्य, समाज, संस्कृती, कला, विज्ञान-तंत्रज्ञान, साहित्य, जिवशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी कोणतंही क्षेत्र घ्या, त्या प्रत्येक क्षेत्राला अथवा गोष्टीला इतिहास मिळेलच ! थोडक्यात सांगायचं तर एखाद्या गोष्टीचा वर्तमान आणि भविष्य घडवणार्‍या त्या संज्ञेला इतिहास असं नाव पडलं आहे.
          आज जर मला कोणी विचारलं की भारताच्या दृष्टीने अभिमानास्पद एखादी गोष्ट सांग, तर नकळतही ओठांवर एकच उत्तर येईल ते म्हणजे भारताचा इतिहास’. प्राचिन काळापासून आपल्याला अतिशय दैदिप्यमान अशा इतिहासाची जोड मिळालेली आहे. अगदी वैदिक आणि वैदिकोत्तर काळापासून भारताच्या इतिहासात नवनविन संशोधनं होत आलेली आहेत. ही संशोधनं कलेतली आहेत, ही संशोधनं युद्धशास्त्रातली आहेत, ही संशोधनं जिवशास्त्र आणि शरिरशास्त्रातली आहेत, ही संशोधनं गणितातली आहेत, इतकच नव्हे तर ही संशोधनं खगोलशास्त्रावरही आहेत ! आपल्याला आश्चर्य वाटेल हे ऐकून कदाचित, मला ठावूक आहे. चला, एक ओझरती नजर फिरवूया-
          गणितातलं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला पायथ्यॅगोरस चं प्रमेय माहितच आहे. हे प्रमेय पायथ्यॅगोरसने इ.स. पूर्व ५ व्या शतकात मांडलं. पण तेच प्रमेय आपल्याकडे इ.स. पूर्व १५व्या शतकातील शल्वसूत्रांत सापडतं. आपल्याकडच्या सहा वेदांगांपैकी वेदांग कल्प’. कल्प म्हणजे विधी अथवा आपण सध्या ज्याला Process म्हणतो ते. या भागात शाल्वसूत्र आहेत. तर वेदांग ज्योतिष या भागात ज्योतिषशास्त्राविषयीची माहिती आहे. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील कणाद ऋषींचा प्रत्येक गोष्ट अतिसुक्ष्म कणांनी बनलेली असते हा सिद्धांत आपण शाळेत ऐकलाच असेल. हे अतिसुक्ष्म कण म्हणजेच अर्थात- अणू-रेणू होत. पुढे सातव्या शतकात आर्यभट्ट या खगोलशास्त्रज्ञाने आपल्या आर्यभटीय या ग्रंथात ज्याप्रमाणे आपण नावेतून जाताना झाडे उलटी जाताना दिसतात तद्वत आकाशातील हे तारे आपल्याला दिसतात असं प्रतिपादन केलं. याचाच अर्थ, पृथ्वी हे केंद्रस्थान असून विश्व पृथ्वीभवती फिरत आहे असा जगद्मान्य मतप्रवाह डावलून  पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आहे असा निष्कर्ष काढला. हा शोध युरोपियन कोपर्निकस-गॅलिलिओ आदि शास्त्रज्ञांनी लावायला अजून जवळपास एक हजार वर्षे अवकाश होता. गणित आणि खगोलशास्त्राप्रमाणेचं वैद्यकशास्त्रात चरक, सुश्रुत, धन्वंतरी आदि शास्त्रज्ञांनी अनेकानेक शोध लावले. चाणक्याचा कौटील्यिय अर्थशास्त्र हा ग्रंथ तर अनमोल आहे. राज्यकारभार कसा करावा, उत्तम राजाची कर्तव्ये काय इत्यादी चाणक्याने घालून दिलेले नियम हे नंतरही उपयोगी पडले आहेत. कलेच्या अन्‌ साहित्याच्या इतिहासातही भारतात अगदी व्यासांपासून ते कालिदासापर्यंत आणि हाल सातवाहनापासून ते अगदी रघुनाथ पंडितांपर्यंत अनेकांनी आपली दानं ओंजळी भरभरून टाकली आहेत. कोणत्याही क्षेत्रात मागे नसलेला असा हा भारताचा इतिहास आहे.
          वास्तविक या सार्‍याचा उपयोग काय ? केवळ कागदी लिखाणातून होणारा वेळेचा उपयोग ? आपला हा समृद्ध इतिहास केवळ कथा-कादंबर्‍यांमधून वाचण्यासाठी उपयोगाचा आहे का ? बाकीच्यांचं सोडा, मी माझं मलाच विचारतो, खरंच काय शिकलो आपण इतिहासाकडून ? आपल्या वर्तमानासाठी आपण खरंच काय उपयोग करुन घेत आहोत इतिहासाचा ? अन्‌ मग स्वतःचच स्वतःला जे उत्तर मिळतं ना, ते सांगायचीच लाज वाटते..
          आज आम्ही सतत उठता-बसता शिवाजी महाराजांचं नाव घेतो. खरंच आम्हाला शिवाजी महाराज समजलेत ? महाराजांच्या आयुष्याचं ईप्सित, त्यांची महत्वाकांक्षा अन्‌ मुख्य म्हणजे त्यांचं ध्येय काय होतं हे आम्हाला समजलंय ? स्त्रियांचं आयुष्य निर्धोक व्हावं यासाठी झटणार्‍या, अबलेवर बदअंमल केलेल्या बाबाजी गुजर पाटलाचे हात-पाय तोडणार्‍या आणि विधवेवर बलात्कार करणारा रंगो वाकडे “देवकरणीने मयेत झाला” असं समाधानाने म्हणणार्‍या महाराजांचं मन आम्हाला कधी समजलंच नाही.. आज आमच्याकडे स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दल एवढे काटेकोर नियम आहेत ?
          शिवाजी महाराजांना आदर्श राज्यकर्ता मानणारी आजची सरकारी व्यवस्था भ्रष्टाचाराने पूर्णतः पोखरलेली आहे. खटाव प्रांताचा सुभेदार व्यंकाजी रुद्र याने वेलापूर देवस्थानच्या इनामातील केवळ ५ होन घेतले तर (२२ सप्टेंबर १६७८ च्या पत्रात)महाराज म्हणतात, “सांप्रत वेलापूरच्या इनामापैकी कारकुनानी ५ होन घेतले म्हणोन कलो आले. तरी हे कोण शहाणपण ?.. ताकीद जाणोन ५ होन परतोन देणे. व पुढे अवधियासही इनामास काडिची तसवीस न देणे”. प्रभावळीचा सूभेदार जिवाजी विनायक याने कामात कुचराई केली म्हणून “ब्राह्मण म्हणोन कोण मुलाहिजा धरू पाहतो अशा ताकदीचे १९ जानेवारी १६७५ चे पत्र प्रसिद्धच आहे ! सध्यासारखे धर्मांध दहशतवादी त्याकाळीही होतेच की, पण महाराजांनी अशा अफजलखान, खवासखान, शायिस्ताखान, हुसेनखान इत्यादींना कसे कडक शासन केले, ते शासन आज आमचं सरकार करतं का ?ò
          आज जनतेला केवळ निवडून येण्याकरता निरनिराळी अमिषं दाखवली जातात, पण निवडून आल्यावर जनतेची, शेतकर्‍यांची काळजी खरंच कितपत घेतली जाते ? दुष्काळी दौरे काढण्यापेक्षा आणि कधिही न मिळणारी दुष्काळी मदत घोषित करण्यापेक्षा रयतेला दुष्काळ पडू नये म्हणून उपाययोजना हव्या असतात. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस सलग दोन वर्षे महाराष्ट्रात भिषण दुष्काळ पडला होता. गवताची एक काडी शेतात उरली नव्हती. श्रीसमर्थ रामदासस्वामींनी 

पदार्थमात्र तितुका गेला । नुसता देशची उरला ॥
जन बुडाले बुडाले । पोटेविण गेले ॥
माणसा खावया अन्न नाही । अंथरुण पांघरुण तेही नाही ॥
भिक्षा मागता मिळेना । अवघे भिकारीच जना ॥

अशा शब्दात या भयंकर दुष्काळाचं वर्णन केलं आहे. अशा वेळेस आणि यानंतरही रायारावाने उजाड केलेल्या पुण्याच्या शेतकर्‍यांमध्ये उत्साह यावा म्हणून तत्कालीन आदिलशहाचे सुभे कोंडाण्याचे सूभेदार दादाजी कोंडदेव मलठणकर यांनी “सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला. सहावे साली तनखा घेतला” (संदर्भ: सहा कलमी शकावली) म्हणजे शेतकर्‍यांना मधली सहा वर्षे चक्क शेतसारा माफ केला. महाराजांनी यापुढे दुष्काळात त्रास होऊ नये यासाठी कोंढव्याला आणि शिवापूरला धरणे बांधल्याचे उल्लेख मिळतात. इ.स. १६७६ च्या प्रभावळीच्या सुभेदार रामाजी अनंतांना लिहीलेल्या पत्रात महाराज म्हणतात, “येक भाजीच्या देठास तेही मन न दाविता रास व दुरुस (दुरुस्त=नीट) वर्तणे. रयेतीवर काडीचे जाल वा गैर केलिया साहेब तुजवरी राजी नाहीत यैसे बरे समजणे”. म्हणजेच, रयतेच्या उत्पन्नावर हात मारलास आणि हाव धरलीस तर महाराज नाराज होतील, अन्‌ महाराजांची नाराजी म्हणजे काय ते सार्‍यांनाच ठावूक होतं.
          या सार्‍यातून आपण जे नेमकं घ्यायला हवं ते खरंच घेत आहोत का ? वास्तविक शिवचरित्रच नाही, अशा अनेक महापुरुषांचं चरित्र आपल्याला खरंच कितपत समजलं आहे ? वास्तविक आपला इतिहास इतका दैदिप्यमान आहे, की आपण त्याच्या आधारावर नवा इतिहास घडवू शकतो. आपल्याकडे आर्थिक आणि शारिरीक ताकदही आहे. पण नाहीये ती मानसिक ताकद, अन्‌ तिच महत्वाची असते. नवं ध्येयं, नवी महत्वाकांक्षा आणि मुख्य म्हणजे एकजूट असेल तर प्रयत्नांच्या जोरावर हिमालयही सहज चढता येतो. इतिहास हा विषय अतिशय संवेदनशील आहे. या विषयामूळे कित्येक गोष्टी होत्याच्या नव्हत्या होतात. इतिहासातील मढी उकरून काढून काही लोक त्याचे राजकारण करतात तर काही जण उगाच मजा म्हणून वाद पेटवून देतात. हिंदुत्वाच्या नावाने गळे काढणारे सावरकरांची विज्ञाननिष्ठा आणि वैज्ञानिक शिकवण नेमकी बाजूला काढतात आणि निव्वळ कथा असलेल्या पुराणांना धर्म मानतात. आज धर्म राखण्यासाठीच विज्ञानाची गरज आहे हे मात्र आपण विसरत आहोत. स्वतःच्या धर्माबद्दल अढळ श्रद्धा आणि परधर्माबद्दल योग्य ती सहिष्णुता राखल्यास, अन्‌ त्यालाच विज्ञानवादाची जोड दिल्यास देशाची प्रगती फार दूर नाही.
          अमुक एकाने अमुक एकाचे राज्य बुडवले म्हणून तो वाईट इत्यादी गोष्टी चघळण्यापेक्षा त्या जेत्याने ज्या गोष्टी अवलंबल्या त्या आपण घ्याव्यात आणि पराजिताने जे करायला हवे होते त्याचा विचार करावा. या सार्‍याचा उपयोग आजच्या काळातही होणारच आहे ! जगाचा नियमच आहे, ज्याला आदि आहे त्याला अंत आहेच ! एक पर्व संपलं की दुसरं सुरु होतं. पण ते दुसरं पर्व ही कधीतरी संपणार असतंच की. म्हणूनच, या सार्‍याचा व्यवस्थित अभ्यास करून त्याचा उपयोग भविष्य घडवण्यासाठी केला तर तो सत्कारणी लागेल. इतिहासातून नेमकं चांगलं ते घ्यायचं असतं. इतिहास म्हणजे जणू रत्नांची खाण आहे. इथे हिरेही आहेत अन्‌ गारगोट्याही ! आपण ठरवायचं आहे आता आपलं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी  काय घ्यायचं ते.. अर्थात ती सुरुवात माझ्यापासूनच केली पाहिजे हे मी जाणतो.. आपणही विचार करावा ! आमचे अगत्य असू द्यावे ही विज्ञापना ।


©   कौस्तुभ सतीश कस्तुरे,

दिनांक : १३ ऑक्टोबर २०१३, विजयादशमी

ईमेल : kasturekaustubhs@gmail.com