यादी किल्ले विजयदूर्ग उर्फ घेरिया !श्री रामेश्वर

                                                                              असलमोजिब नकल १/२ दोन बंद रास

                 यादी किले विजयदूर्ग हा किल्ला कोणी कोणते शकात बांधिला व तो बांधावयासि काय खर्च लागला व त्याचे (इमार)तीचा अजमास काय होतो व आणखी सरकारी इमले तेथे असतील त्याची सदरहू चौकशी करणेविशी हुजूरचा हुकूम नंबर त॥ माहे दिजंबर (डिसेंबर) सन १८३५ चा सादर जाहाला त्याजवरून किल्ले मजकूरी आनंदराव रायाजी सानालेकर शिरस्तेदार जाऊन तेथील राहणार भले माणूस व माहितगार याजवल चौकसी केली ते सुरु सर सीत सलासीन मयातेन अलफ शके १५५७ मन्मथनाम संवत्सरे -

१ सिवाजी महाराज यांचे वडील सहाजीराजे हे निजामशाहा पातशाहा राजा याजकडे चाकरीस होते ते समयी चाकण किल्ला आपले निसबतीस घेतला नंतर आपली जहागिरी पुणे व कर्नाटक प्रांत घेतला. शाहाजीराजे यांणी आपली स्त्री जिज्याबाई ही गरोदर होती त्यास सिवनेरी किल्ल्यावर ठेऊन कर्नाटक प्रांती गेले. जिज्याबाई सिवनेरीवर असताना सिवाजी माहाराज शके १५४९ प्रभवनाम संवत्सरे सन समान अशरिन अलफ वैशाख बहुल द्वितियेस जन्म जाहाला. ते तीन वर्षांचे होत पर्यंत तेथेच होते. तेव्हा पातशाहाचे भेटीस नेले त्याणी पातशाहास मुजरा केला नाही हे शाहाजीराजे यांणी पाहोन याची वर्तणूक ठिक नाही सेवटपर्यंत याची बुद्धी असीच राहून पादशाहास व आपल्यास वैरत्व पडेल असी करणी याचे हातून होईल यास्तव आपले जहागिरीत रवाना करून द्यावे असा सिद्धांत करून विजापूरहून जिज्याबाईसाहेब व सिवाजीमहाराज यांसी पुणे सुभ्यावर दादाजीपंत  कोंडदेव कुलकर्णी हे होते ते बहुत विश्वासू त्याजवळ पाठविले. तेव्हा दादाजीपंत ५००० फौज महाराजांचे हुजुरातीत ठेविले. नंतर माहाराज रायगडास येऊन किल्लेकोट बांधित गेले त्यास विजयदूर्ग किला शाहलीवान (शालिवाहन) शके १५७५ विजईनाम संवत्सरे सन आर्बा खमसेन खाली बांधला. त्यास सताविस बुरूज आहेत. हा विजयी संवत्सरी बांधिला सबब याचे नाव विजयदूर्ग असे ठेविले. तो विजय संवत्सर माहाराज यांचे कारकिर्दीत सिहूशकात आला याजवरून १५७५ शकात बांधला असे होते. मागिल कागदपत्र कोण्हाजवल नाही. हा किला बांधावयास येक कोटी रुपये लागले असतील असा अजमास दिसतो. हे काम समुद्रातील पैका खर्च करूनच होते असे नाही. माहाराज ईश्वर अंश पुण्यप्रतापी त्यायोगेकरून काम सिद्धिस जाऊन कीर्ति चालत आहे त्या आलिकडे किल्ल्याचे आत इमले (इमारती) वगैरे कामे केली त्यास खर्च लागला असेल त्याचा अजमास रुपये -

८२०००       आंगरे सरखेल यांणी काम केले ते अमुक शकांत येक वेळ चालले असे माहिती नाही.
 ४००००      किल्ल्याचे पूर्वेचे बाजूस फडास जागा पातकाम (बांधकाम?) बांधोन तट त्यास तोफाच्या बंड्या
                  केल्या आहेत त्यासुधा खर्च लागला ते रुपये.
 १००००      चर किल्ल्याचे आंगाबरोबर दक्षणेकडून पूर्वेपासून पश्चिमेस समुद्रापर्यंत मिलविला त्यास.
 ३००००      कोठी चिरेबंद चौअंगे वितीवर पर्यंत तिमजला कौलारा बांधिली खाली फरसबंदी आहे त्यास
   २०००      सदर प्रथम बांधिली त्यावेळी खर्च लागला ते रुपये.
‌‌‌‌‌----------
८२०००      
----------

१७५०००     पेशवे यांचे अमलात मामलेदार तालुकी मजकुरी आले त्याणी कामे केली ती अमुकच शकात व
                  येकच वेल केले असे मिलत नाही. त्यासी खर्च रु॥
  १५०००     लादणी यशवंत दरवाज्याआत दक्षणेस रामसेज्या नजीक दुलबाजी मोरे हवालदार याणी महादाजी
                  रघुनाथ मामलेदार याचे कारकीर्दीत बांधिली.
  ४००००     हौद चिरेबंदी पाण्याचे साठ्याकरीता महादाजी रघुनाथ बिवलकर मामलेदार याणी बांधिला.
  ३००००     लादणी हौदानजिक चिरेबंदी चौफेर आत दारुगोळा ठेवावयाची जागा वर बैठकीची जागा दर्या
                  वगैरे हवा पहावयाची जागा या लादणीचे काम प्रथम काही महादाजी र्घुनाथ यांणी केले त्याजवर
                  गंगाधर गोविंद मामलेदार यांणी पुरे केले त्यासुधा खर्चाचा अजमास.
  १००००      घनचक्राचे बुरुजाचे उतरेस खाली खुबलढा म्हणोन तट नारो त्रिंबक यांणी बांधिला त्यास खर्च.
 ८००००      सतोल बुरूज फुटोन तो(ल)ला होता त्याचे कामा मुळापासून गंगाधर गोविंद भानू यांणी केले.
-----------
१७५०००
-----------

  २७५००    हाली सरकार अंमल जाहाल्यावर इंजनेर (इंजिनिअर) खात्याकडून कामे केली ते सन १८२१ पासून
                 सन १८३० पर्यंत दरसाल होत गेले ते रुपये.
    ९५००    महांकाळ बुरुज यासी पायथ्यास भांब मोठी पडीली ती अजम मेहेरबान जारव्हिस साहेब याजकडून
                 काम करण्यास विठ्ठल रघुनाथ कामत आले त्याणी काम केले  त्यास रुपये.
   १८०००    अजम पोजीर साहेब यांणी वेताळ बुरुजानजिक ३/४ भांबी (चीरा) तटास पडल्या होत्या त्या नीट 
                 केल्या व कोठी व सदर व नगारखाना व रामसेजा व येसवंत दरवाजावरील तक्तपोसी सुद्धाबंगला व 
                 गरुड दरवाजा व हणमंत दरवाजा व ग्याट (गेट ?) येक व विहीर वगैरे  किल्ल्याचे दागदुजीचे वगैरे
                 नवे कामे केली त्यास.
-----------
 २७५००
-----------

२८४५००    येकूण येक कोटी २ लक्ष चौर्‍यांशी हजार पाचशे रुपये प्रथम काम करते वेळी लागले असतील असा 
                अजमास नजरे येतो. हाली सदरहूचा अजमास रुपये येक कोटीपर्यंत होईल असे दिसते.

           २ गोद किल्ल्यापासून येक कोशपर्यंत लांब पूर्वेच्या आंगास आरमारच्या पालगुराबा वगैरे गलबते छावणीस ठेवावयाबद्दल आंग्रे सरखेल यांणी खणोन खाली पापडी व खाडीचा धका वगैरे इमारत बांधिली आहे त्याचा अजमास रुपये दहा हजार हल्ली किंमत रुपये सहा हजार पर्यंत १ नाके भेट किल्ल्यापासून दक्षिणेच्या अंगास खुसकी (खुष्की=जमिन) मागे आहे. याशिवाये दुसरा टापू बरये यांस खुसकीमार्ग नाही हे नाके आंगरे सीरखेल यांणी बांधिले त्याचे काम बुरूज व तट मोळोन येकंदर रुपये १००० हल्ली किंमत रुपये ५०० अजमासे.

               येणेप्रमाणे जंजिरे मजकूरी इमले हली आहेत तारिख १३ माहे दिजंबर सन १८३५ मिती मार्गशीर्ष व॥ ९ शके मजकूर

सया (सह्या)

१ रामभट बिन संभुभट मुर्तजोतिसी उपाध्ये धर्माधिकारी मौजे गिरे (गिर्ये) दस्तुरखुद
१ गंगाजी बिन रामजी नाईक जावकर खुद
१ बच्चाजी महादेव दामले व॥ गोपालबाग दस्तुरखुद 
१ कृष्णाजी धोंडदेव लेले दस्तुरखुद
१ मोरो बापुजी जाईखे तलाटी पेटा गिरे (पेठ गिर्ये)


संदर्भ : (विजयदूर्ग येथील लेले दफ्तरातील अप्रकाशित पत्र) मराठेशाहीतील वेचक-वेधक : य. न, केळकर.