पुण्याचे वैभव : श्रीमंत पेशव्यांचा शनिवारवाडाबाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर बाजीराव पेशव्यांना शाहू महाराजांनी २ एप्रिल १७२६ मध्ये पुणे शहर इनाम दिले (सं: पेशवे दफ्तर). पुणे ही सुरुवातीपासूनच अतिशय मोक्याची जागा होती. या ठिकाणी जबरदस्त असामी असणे अतिशय गरजेचे होतेच, अन म्हणूनच खुद्द पेशव्यांनी येथे वाडा बांधून रहावयाचे निश्चित केले. वाड्याची पाहणी करण्यात आली. योग्य अशी जागा शोधण्यातच बराच अवधी गेला. या वेळेपर्यंत पुण्यात पेशव्यांचा एकही वाडा नसल्याने तत्कालिन पुण्याचे तालेवार सरदार धडफळे यांच्या वाड्यात पेशव्यांनी आपले तात्पुरते बिर्‍हाड मांडले. दि. १० जानेवारी १७३० रोजी शनिवारवाड्याचे भूमीपुजन करण्यात आले.
शनिवारवाड्याचे बांधकाम पुण्याच्या खाजगीवाल्यांकडे होते. शिवराम गणेश आणि जिवाजी गणेश हे इचलकरंजीकर घोरपड्यांच्या चाकरीत होते. व्यंकटराव घोरपड्यांची पत्नी अनुबाई ही बाजीराव पेशव्यांची सख्खी बहिण. खाजगीवाल्यांच्या यादीत शनिवारवाड्याचे बांधकाम केल्याचा पुढील उल्लेख आहे.
 
"बाजीरावसाहेब पेशवे यांणी घोरपडे यांजवल आमचे वडील शिवराम गणेश व जिवजी गणेश हे बहुत शाहाणे मोठे कामाचे, हरएक जाणोन मागोन घेऊन त्यांजकडे सरकारातून मामलती प्रथम सांगोन नंतर पुण्यातील शनवाराचे थोरले सरकारचे वाड्याचे काम सांगोन दरोबस्त दौलतीची खाजगी सांगितली ". 

यामूळेच या घराण्याला 'खाजगीवाले' असं म्हणू लागले. दि २२ जानेवारी १७३२ मध्ये रथसप्तमीच्या मूहूर्तावर वाड्याची मोठ्या थाटात वास्तुशांत करण्यात आली. वाड्याचे नाव शनिवार कसे ठेवले गेले या बाबतीत एक आख्यायिका आहे. वाड्याची पाहणी करण्यात आली तो शनिवार होता, वाड्याची पायाभरणी झाली तोही शनिवार होता (१० जानेवारी १७३०). वाड्याची वास्तुशांत आणि गृहप्रवेश झाला तोही (२२ जानेवारी १७३२) शनिवारच असल्याने वाड्याचे नाव "शनिवारवाडा" ठेवण्यात आले. शनिवारवाड्याच्या आसपास बाजीरावांनी नवी पेठ वसवायला सुरुवात केली होतीच, त्या पेठेलाही 'शनिवारपेठ' असे नाव दिले. वाड्याचा एकूण खर्च सुमारे १६०१० इतका आला.

कितीही नाही म्हटलं तरिही शंभर एक माणसे सहज राहू शकतील अशी प्रशस्त हवेली उभारण्यात आली होती. खाजगीवाल्यांनी जिव ओतून वाडा उभारला होता. मूळ वाडा प्रचंड जोत्यावर उभारलेला असून तो दुमजली होता. वाड्यात शस्त्रागार, देवघर, ग्रंथशाळा, धान्यशाळा इत्यादी अनेक महाल होते. वाड्यात सुरुवातीला फक्त बाजीराव-काशिबाईंचा महाल, देवघर, अप्पा-अन्नपूर्णाबाईंचा महाल, मातुश्री राधाबाईंचा महाल आणि आश्रितांचे निवारे अशा मोजक्याच इमारती होत्या. पुढे मस्तानीसाठी आणि नानासाहेबांसाठी नवी हवेली उभारण्यात आली. यानंतर प्रत्येक्क पेशव्यांच्या काळात शनिवारवाड्यात गरजेनुसार बदल करण्यात आले. आणि अखेरीस आज दिसणारा प्रचंड शनिवारवाडा उभा राहिला.

कृष्णाजी विनायक सोहोनीच्या पेशवे बखरीत शनिवारवाडा बांधण्याबद्दलचा पुढील उल्लेख आहे-
"पुढे महाराज यांची आज्ञा घेऊन पुण्यास आले. वाडा बांधावयास प्रारंभ केला. तोही मजकूर महाराजांस विदीत केला. तेव्हा महाराज बोलले 'बरे आहे' पुढे स्वारीस जाण्याची आज्ञा  मागितली. ते समई श्रीमंत शाहूराजे यांणी पेशवे  यांस सांगितले, 'कारभार कराल तितका सावधगिरीने जुर्तीने करीत जावा'. असे सांगून स्वारीस जाण्याची आज्ञा दिल्ही. मग बाजीरावसाहेब पुण्यास येऊन दाखल जाले, वाड्याचा कारखाना चालता केला. वाड्याभवती तट बांधिला. तटास दहा बुरूज चांगले केले... नंतर वाड्याचे काम पुरे झाले. बुरुज, दरवाजे व तट सारे काम तयार झाले. वाड्याची वास्तुशांती करून आत रहावयास गेले ".
मस्तानीच्या बाबतीतही बखरकार म्हणतो - "मस्तानी कलावंतीण इजला सरकारच्या वाड्यात जागा वेगळी राहाण्यास बांधून दिल्ही "

मराठी साम्राज्याच्या पेशव्यांनी शनिवारवाडा बांधायला घेतला तेव्हा तो कोटबंद असावा अशी साहजिकच अपेक्षा होती. पण शाहू महाराजांनी वाड्याभवताली कोट बांधावयास परवानगी नाकारली. याबद्दल नानासाहेबांच्या पत्रात सखोल माहिती मिळते. ते पत्र असे-
" तिर्थरूप राजश्री राऊ तथा आपास्वामींचे सेवेसी विनंती. आजि मंदवारी प्रातःकाळी दरबारास गेलो होतो. राजश्री नारबोवा (नारोराम मंत्री) व आणिकही कित्येक लोक मुजर्‍यास आले होते. तेव्हा राजश्री स्वामी बोलिले की, 'राजश्री पंत्रप्रधान पुण्यास कोट  बांधतात. ये विषयी पहिले हुजरे व कागद पाटविले. परंतू ते गोष्ट न ऐकता आपलाच हेका करून किल्ला बांधितात. तस्मात मोंगलांचे पुण्याचे ठाणे बसावे. असे त्यांच्या मनात आहे की काय ? सिंहगड किल्ला जवळ. तेथे चिरेबंदी कोट पक्के काम करिताती. द्वाही हुजरे याणी दिली. तथापी मोजित नाहीत आणि कोट बांधतात. राजश्री सचिव पंतांचा किल्ला सिंहगड जवळ आहे. ऐशियास सचिवाकडील किल्ल्यास मोंगलांचा मोर्चा बसवावा असे त्यांचे चित्तात आहे हे काहीच कळत नाही. तसेच जागा जागा किल्ले वाघोली व नांदडे व वाडी व आंबी वगैरे जागी किल्ले बांधितात. मोंगलांची आवई जाली तरी यातून एकही जागा रुचणार नाही. आणि आपले आपल्यासच प्रतिबाधक कर्म का करितात ? व वडिलही उगाच डोळेझाक करीतात {हा टोमणा राधाबाईसाहेब आणि अंबाजीपंत पुरंदर्‍यांना आहे} परंतू गळफास बसेल. पूर्वी पिलाजी जाधव वाडा बांधित होते. तेव्हा आम्ही मनाई करीत होतो. परंतू राजश्री चंद्रसेनराव जाधव थोराताची पाठ राखित यामूळे वाडीस कोट जाला. शेवटी राजश्री बाळाजीपंत {बाळाजी विश्वनाथ}धरिले तेव्हा तीच वाडी पुरंदरास मोर्चा जाहाला व मुलुख हैराण जाहला. आम्ही सांगत होतो ते न ऐकले. शेवटी त्याच गोष्टीस आले. तसेच  हे ही कर्म आहे. राजश्री प्रधानपंतांनी  काही पुण्यात कोट बांधावा असे काही नाही' म्हणून बहुत श्रमी होऊन बोलिले. चोरपाळतीने बातमीही पाठविणार आहेत. 'किल्ला कसा बांधितात ?' असे आहे. तरी स्वामींनी राजश्री स्वामींचे आज्ञेप्रमाणे किल्ला न बांधावा. हवेली भवती बुरुज न घालिता चार दिवाळी मात्र करावी. जुने काम आहे ते मात्र फार पक्के तो नाही. परंतू उगिच भ्यासूर दिसते. त्यास पांढरे मातीने भिंतीच्या बाहेरील आंग सारवावे म्हणजे डोळेफोड दिसणार नाही. अर्थसूचना लिहीलेला आहे. स्वामी खावंद आहेत. खातरेस येईल ते करावे. विदित जाले पाहिजे, सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना ' [ महाराष्ट्रेतिहास मंजिरी, पृ १८८ ]  
या पत्रात नारोराम इत्यादी मंडळी बाजीराव काहीतरी घोर अपराध करत आहेत अथवा बंड करत आहेत अशा प्रकारे शाहू महाराजांना चूकीचे समजावत असल्याचं स्पष्ट दिसून येतं. अर्थात, कोट न बांधण्याविषयी शाहू महाराजांच्या मनात 'बाजीरावांविषयी संशय' नसून चंद्रसेन जाधवाच्या प्रकरणावरून आलेले शहाणपण आहे. १७४९ मध्ये शाहू महाराज मृत्यू पावल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी कोटाचे बांधकाम पुरे करून घेतले. १७५३ च्या अखेरीस शनिवारवाड्याचे महत्वाचे बांधकाम पुन्हा सुरु झाले. वाड्याला भक्कम तटबंदी आणि उत्तरेच्या रोखाने भव्य प्रवेशद्वार असावे अशी बाजीरावांची इच्छा होती ती पूर्ण करण्यात आली. या उत्तरेच्या महाद्वाराला नाव देण्यात आले "दिल्ली दरवाजा". तटात एकूण सात गोल बुरूज आणि महादरवाजाचे दोन अष्टकोनी बुरुज असे एकूण नऊ बुरुज बांधण्यात आले. दिल्लीदरवाजाव्यतिरिक्त मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा (कवठी दरवाजा), गणेश दरवाजा आणि जांभळी दरवाजा असे आणखी चार दरवाजे बांधण्यात आले. गणेश दरवाजाच्या बाहेर तटालगत गजाननाचे सुरेख मंदिर उभारण्यात आले. या गणेश दरवाजातून थेट दरबारच्या 'गणपती रंगमहाला'त जाण्याची वाट असल्याने तेथे विशेष सुरक्षा पहारे असत. दिल्ली दरवाजातून आत गेल्यावर दोन लहान चौक होते. हे चौक ओलांडून पुढे गेल्यावर एक विस्तिर्ण चौक आणि त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला भक्कम इमारती उभारण्यात आल्या. डाविकडे होती दफ्तराची कचेरी तर उजवीकडे होता जवाहीरखाना. या चौकाला 'फडाचा चौक' म्हणत असत. फडाच्या चौकाच्या पुढच्या विस्त्तिर्ण चौकात एक मोठा हौद होता. याला म्हणत 'पुष्करणीचा हौद'. पुष्करणीच्या हौदाच्या डावीकडे हजारी कारंज, थोरल्या माधवरावांचा दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, रघुनाथरावांचा बदामी बंगला इत्यादी इमारती होत्या तर हौदाच्या पूर्वेस बकुळीचा चौक, गोदूबाईचा चौक, अन त्या पलिकडे गणपती रंगमहाल होता. बाजीरावांनी आपले बंधू चिमणाजी उर्फ चिमाजीअप्पा यांच्या कौतुकास्तव 'चिमणबाग' नावाची लहानशी बाग बांधली होती. या चिमणबागेच्या दक्षिणेला अप्पांचा आणि नानासाहेबांचा दिवाणखाना होता. चिमणबागेच्या पूर्वेला थोरल्या रायांचा म्हणजे बाजीरावांचा दिवाणखाना आणि दक्षिणेला मस्तानीचा महाल होता. याशिवाय पश्चिम तटाला आतून घोड्यांची पागा आणि गोशाळा उभारण्यात आली होती.


शनिवारवाडा पाडला केव्हा ?

दीड प्रहर रात्र होते श्रीमंत दम खाऊनी । गेली स्वारी मशाला हिलाला मग लाऊनी ॥
जलदी करुनी साहेबांनी लाविले निशाण पुणियाला । खेचून वाड्याबाहेर काढले कदिम शिपायाला ॥
                                                 - शाहीर प्रभाकर

दि. १६ नोव्हेंबर १८१७ रोजी येरवड्याच्या मैदानात पेशव्यांच्या फौजांची पिछेहाट झाली आणि पेशव्यांना पुणे सोडून मागे हटणे भाग पडले. दुसर्‍याच दिवशी दि. १७ नोव्हेंबर रोजी इंग्रजांच्या फौजा पुण्यात शिरल्या. माऊंटस्टुअर्ट एलफिन्‍स्टनने पुण्याच्या नगरशेट सावकार हरेश्वरभाईंना म्हटले, "संगम बंगल्याची जी अवस्था मराठ्यांनी केली तीच आम्ही पुण्याची करणार आहोत". पण हरेश्वरभाई आणि बाळाजीपंत नातू यांनी साहेबाला पुण्याला तोशिस न देण्याबद्दल समजावले तेव्हा एलफिन्‍स्टन म्हणाला, "जर शहर राखणे तरी (शनिवारवाड्यावर) निशाणे लवकर लावा. एकदा का मोठा साहेब (जनरल स्मिथ) आला म्हणजे मला काही करता येणार नाही". ही कामगिरी बाळाजीपंत नातूंवर सोपवण्यात आली. नातू म्हणतो, " बाजीरावसाहेब ता. १६ नोव्हेंबर रोजी पुण्यातून पळून गेले. त्यावेळेस पेशव्यांचे वाड्यावर बावटा लावावयास रॉबिन्‍सनसाहेबा बरोबर मलाच पाठविले. मी जात नव्हतो, तेव्हा तुम्ही भिता की काय असे म्हणू लागले. सबब मी माझ्याबरोबर २५ स्वार द्या म्हणजे मी झेंडा चढवून येतो" . रॉबिन्‍सन साहेब आणि नातू तिनशे कुडतीवाले म्हणजेच हत्यारबंद स्वार घेऊन शहरात शनिवारवाड्यापाशी आले आणि किल्ल्या मागवून दरवाजे उघडवले. यानंतर दोघांनीसी आत जाऊन पेशव्यांच्या मसनदीला मुजरा केला (ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे) आणि आकाशदिव्याच्या काठीला निशाण लावले. नंतर वाड्यापाशी १०० लोक ठेवून पुढे पेशव्यांचे बुधवार, शुक्रवार, विश्रामबाग इत्यादी वाडे ताब्यात घेण्यासाठी गेले. शनिवारवाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकू लागला.  

सरदार पुरंदर्‍यांच्या कारकुनाचे ४ मार्च १८२६ रोजीचे पेशवे दफ्तरातील पत्र शनिवारवाड्यातील इमारती पाडत असल्यासंबंधीचे एक पत्र आहे. त्यात " शनिवारचेही वाड्यातील हजारी कारंज्याकडील वगैरे इमारत पाडून लाकडे गारपीरावर नेत आहेत"   असा उल्लेख आढळतो. यापूर्वीच्या शनिवारवाड्यातील इमारतींचे इत्यंभूत वर्णन मराठी कागदात सहसा आढळत नाही, पण तत्कालिन मुंबई इलाख्याचा मुख्य न्यायाधिश एडवर्ड वेस्ट (Sir Edward West, chief justice of the King's court, 1823-1828) हा पुण्यात आला असताना ३ डिसेंबर रोजी त्याने शनिवारवाडा जाऊन पाहिला. त्याच्या पत्नीने तिच्या रोजनिशीत (the book by F Dawtrey Drewitt: Bombay in the Days of George IV; Memoirs of Sir Edward West) त्याबद्दल लिहीले आहे. ती नोंद पुढीलप्रमाणे आहे-
" December 4, 1823 : Yesterday we went into the city of Poonah. which contains 18000 inhabitants Melancholy to see how ruinous it is becoming. Our object was the Peshwa's palace. An immense pile of buildings fine gateway and the ceilings like mosaic work, some in colored glass, which must have had a brilliant effect when the walls were covered mirrors; the wooden carved work is fine. but the rooms (are) small but the numerous; The Peishwa is living at Calcutta. A jail is building here. but at present this building contains the prisoners, the mad, and the hospital which made the visit a melancholy one "

याचा मराठी सारांश असा- "४ डिसेंबर १८२३ : काल आम्ही पुणे शहर पाहण्याकरीता गावात गेलो होतो. पुण्याची वस्ती ऐंशी हजार आहे. पण आता या शहराला ज्जी अवकळा येत चालली आहे, ती पाहून मन उदास खिन्न होते. शहरात जाऊन मुख्यतः आम्हाला पेशव्यांचा वाडा पहायचा होता. वाडा फारच प्रचंड आहे. दरवाजा (बहुतांशी हा दिल्ली दरवाजा असणार) छान आहे. वाड्याच्या दिवाणखान्याची छते मोझेईक पद्धतीछी असून काही ठिकाणी  रंगित काचा बसवलेल्या आहेत. यामूळे भींतींवर लावलेल्या आरशांत नक्कीच अतिशय सुंदर शोभायमान प्रकाश दिसत असेल. खांबांवरचे नक्षीकाम सुंदर आहे. वाड्यातील दालने लहान भासत असली तरी पुष्कळ आहेत. पेशवा हा सध्या कलकत्त्यास रहात आहे (बिचार्‍या बाईला नुकतेच हिंदुस्थानात आल्याने ब्रह्मवर्त आणि कलकत्त्यातील अंतराची जाणिव नसावी). येथे (म्हणजे पुण्यात, शनिवारवाड्यात नव्हे) तुरुंगाची इमारत बांधण्याचे काम सुरु झाले आहे. पण अजूनही बांधून पुर्ण झाला नसल्याने वेड्यांचे व इतर लोकांचे रुग्णालय, तसेच कैद्यांना वाड्यात ठेवण्यात आले आहे ".

या वर्णनावरून शनिवारवाड्याच्या एकंदरीत वैभवाची आणि कलाकुसरीची कल्पना येते. वाड्याच्या आयुष्यात इ.स. १८०८, १८१२, १८२८ मध्ये इमारतींना अनेकदा आगी लागल्या. शेवटच्या आगीत शनिवारवाड्यातील इमारती जळून खाक झाल्याचे सांगितले जाते, पण वर दिलेले पुरंदर्‍यांच्या कारकुनाचे पत्र पाहिले असता इंग्रजांनी या आगीच्या २ वर्षे पूर्वीच पेशव्यांचे शुक्रवार-शनिवारातील वाडे पाडले होते. आणि लाकडे, तुळया इत्यादी गारपीरावरील (सध्याचे ससुन हॉस्पिटल) इंग्रजी कंपूत नेली होती हे सहज समजून येते. यानंतर इंग्रजांनी काही बांधकामे केली असावित असा अंदाज आहे. परंतू शनिवारवाड्याचे जोते, कारंजी, बुरुज आणि भक्कम असा दिल्ली दरवाजा हे मात्र मूळ जे होते ते तसेच आहे. एकूणच, पेशव्यांचा हा शनिवारवाडा तत्कालिन इतिहासाची साक्ष देत निदान या अवशेषांच्या रुपात उभा आहे ! अजूनही वाड्यात पाऊल ठेवले की नकळत हात छातीशी जातो.. अन्‌ मनात पेशव्यांची ती मसनद तरळते...

 

संदर्भ : 
१) मराठी रियासत उत्तरविभाग (दुसरे बाजीराव पेशवे)
२) शनिवारवाडा : ग.ह.खरे
३) वैभव पेशवेकालिन वाड्यांचे : मंदा खांडगे
४) महाराष्ट्रेतिहास मंजिरी : द. वि. आपटे
५) पुण्याचे पेशवे : अ. रा. कुलकर्णी
 ६)
Bombay in the Days of George IV; Memoirs of Sir Edward West :
F Dawtrey Drewitt© सदर लेख हा "श्रीमंत पेशवाई" या प्रस्तावित पुस्तकाचा एक भाग असून कोणत्याही प्रकारे अंशतः अथवा पुर्णतः प्रकाशित करण्यास बंदी आहे  |  कौस्तुभ कस्तुरे  ।   kasturekaustubhs@gmail.com