श्रीमंत बाजीराव पेशवे : अद्वितीय योद्धा


थोरल्या श्री शिवछत्रपती महाराजांचं स्वप्नं बहुतांशी पुर्ण करणारा, हिन्दुस्थानातील मोंगल, निजाम, हैदर, सिद्दी अशा सुलतानांना आणि इंग्रज, पोर्तुगिज अशा परकीय सत्तांना मात देणारा एकमेवाद्वितिय अजिंक्य योद्धा म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे !

श्री शिवछत्रपती महाराजांनंतर सर्वात आधी जर एखाद्या पराक्रमी अन् बुद्धिनेही तितक्याच हुशार सेनापतीचं नाव घ्यायचं झालं तर ते बाजीरावांचं घ्यावं लागेल ! शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मनामनात रुजवलेल्या गनिमी काव्याचे तर बाजीराव पंडित होते. बाजीरावांनी खेळलेल्या लढायांचा इतिहास पाहता आपल्याला ठायी ठायी याची प्रचिती येते.


दि. १७ एप्रिल १७३० रोजी वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी पेशवेपद मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत बाजीरावांना युद्धाच्या आघाडीवर जावे लागले. दिल्लीदरबारच्या सय्यद बंधूंपैकी हुसेनअली सय्यद हा खानदेशात आपल्याच एका बंडखोर सरदाराविरूद्ध् लढत होता, परंतू त्याला यश येत नव्हते. म्हणूनच त्याने सातार्‍याला शाहू महाराजांना पत्र पाठवून मदत पाठवण्यास कळवले. शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना खानदेशात जाण्याची आज्ञा केली. पेशवे आपल्या फौजेसह खानदेशात पोहोचले. परंतू त्याच सुमारास बाळाजी विश्वनाथ गेल्याची खबर मिळालेला निजाम-उल-मुल्क मीर कमरुद्दीन सिद्दिकी हा स्वराज्यावर आक्रमण करण्याच्या तयारीतच होता. आता मात्र नुकत्याच गादीवर आलेल्या तरूण बाजीराव पेशव्यांची ही खरी कसोटी होती. प्रथम बाजीरावांनी शाहूंच्या आज्ञेबरहूकूम खानदेशात हुसेनअल्लीला मदत करून बंड मोडले. इतक्यात निजामाच्या फौजा शेवगाव-पैठण ओलांडून औरंगाबादच्या परिसरात पोहोचल्याचे बाजीरावांच्या हेरांनी कळवले. अतिशय जलद हालचा ली करून, निजाम औरंगाबाद जवळ पोहोचतो न पोहोचतो तोच पेशव्यांच्या फौजा निजामावर तुटून पडल्या. युद्धाच्या आघाडीवर स्वतः पेशवे युद्धवेश घालून सैन्याला जोश देत होते. मराठ्यांचा तो भयप्रद आवेश आणि आकाशाला भेदणार्याा त्या रणगर्जना ऐकून निजामाचे निम्मे सैन्य जागच्या जागीच गर्भगळीत झाले. आणि शेवटी अपेक्षीत होते तेच झाले. निजामाचा दारूण पराभाव झाला. बाजीराव पेशवा दिसायला एखाद्या स्त्रीलाही लाजवेल असा ’सुरतपाक’ सुंदर आहे हे कळल्यानंतर निजामाच्या बेगमांनी बाजीरावांना पाहण्याचा हट्ट धरला. जेव्हा बाजीराव आले तेव्हा तर निजामाच्या बेगमांनी चिकाच्या पडद्याआडून बाजीरावांवर चक्क मोती उधळले. अर्थात हा सारा प्रकार पाहून निजामाचे काय झाले असेल हे वेगळे सांगायलाच नको !

मार्च १७२१ मध्ये दिल्लीदरबारचा माळव्याचा सुभेदार दाऊदखान पन्नी याने बंड मांडले. सोरटी सोमनाथच्या पवित्र ज्योतिर्लिंगालाही तो उपद्रव देऊ लागला. हे पाहताच स्वतः पेशव्यांनी माळव्यात जाऊन त्याचा पराभव केला. ( जून १७२१ ). माळवा हा प्रांत अतिशय सुपिक आणि मोक्याचा होता. दाऊदखान पन्नीच्या पराभवानंतर बादशाहाने त्याच्या जागी दयाबहाद्दर या पराक्रमी राजपूतास नेमले होते. स्वराज्याला समृद्ध बनवण्यासाठी माळवा आपल्याकडे हवा असे बाजीरावांना वाटत होते. इकडे दिल्लीदरबारकडून मिळालेली चौथाई व सहा सरसुभे दख्खन्ची सरदेशमुखी निजाम सहजासहजी सोडत नव्हता. मग ती चौथ माळव्यातून का वसूल करू नये अशा आशयाचे पत्र बाजीरावांनी दयाबहाद्दरकडे रवाना केले, आणि दयाबहाद्दरच्या उत्तराची वाटही न बघता स्वतः पेशव्यांनी इ.स.१७२३ च्या अखेरीस माळव्यात जाऊन वसुलीला सुरवात केली. अर्थातच हे पाहताच दयाबहाद्दर भडकला. परंतू तो सैन्य घेऊन उज्जैनीच्या वेशिबाहेर पडतो न पडतो तोच बाजीरावांच्या तुफानी फौजेने त्याच्यावर मारा सुरू केला. मोंगली सैन्य अचानक आलेल्या या हल्ल्याने बावचळले ! अन् अशातच खुद्द बाजीराव पेशव्यांचीच दयाबहाद्दरशी गाठ पडली. अखेरीस दयाबहाद्दरने गुढघे टेकले. तो पेशव्यांना शरण आला. पेशव्यांच्या अटी दयाबहादरने बिनशर्त कबूल केल्या आणि शेवटी पेशव्यांच्या फौजा पुण्याच्या रोखाने वळल्या, पण नुसत्या नव्हे... माळव्यातून इतक्या वर्षांच्या चौथाई आणि सरदेशमुखीचा महसूल बरोबर घेऊनच !

बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची लढाई म्हणजे ’पालखेडची लढाई’. इ.स.१७२५ मध्ये बाजीराव पेशवे कर्नाटकात उतरून त्यांनी अर्काटचा नबाब, चित्रदूर्ग, लक्ष्मेश्वर, गदग, कनकगिरी, सुरापूर, गुबी, म्हैसूर, श्रीरंगपट्टणम, बिदनूर अशी संस्थाने मराठी राज्याची मांडलीक बनवली. बाजीराव कर्नाटकात आहे याचा फायदा घेऊन इकडे निजामाने खुद्द पेशव्यांच्या पुण्यावरच हल्ला करण्याचा बेत आखला. निजामाच्या फौजा हैद्राबादहून कूच करताच बाजीरावांना हेरांकरवी ही वार्ता समजली. निजाम स्वराज्यात शिरतो न शिरतो तोच त्याला एक भयंकर बातमी समजली... बाजीराव पेशवा फौजेनिशी खुद्द आपली राजधानी, हैद्राबाद जवळ करतोय ! आणि खरेच होते ते... बाजीरावांच्या मराठी फौजांनी निजामाच्या मुलूखात लुटालूट आणि जाळपोळ सुरू केली होती. झालं ! इथे बाजीरावांच्या पुण्याला जाळण्याची स्वप्नं पाहणारा निजाम हातभर उडालाच ! त्याचे बुलंद अस्मानी बुरूज धडाधड कोसळू लागले. निजामाने ताबडतोब आपल्या सैन्याला हैद्राबाद जवळ करण्यास सांगून त्या हेतूने आपला अवजड तोफखाना अहमदनगरलाच ठेवून तो पारनेरा, चांभारगोंदे, नगर, पैठण या मार्गाने परत फिरला. निजामाच्या प्रत्येक हालचालींवर बाजीराव पेशव्यांची नजर होती. निजाम औरंगाबाद जवळ असणार्या् पालखेडच्या मैदानात पोहोचतो न पोहोचतो तोच बाजीरावांच्या फौजांनी पालखेड गाठले. रात्री निजामाचा तळ पालखेडच्या मैदानात पडला. निजामाचे सैन्य गाढ झोपी गेले. हे पाहताच पेशव्यांनी अतिशय अलगद, निजामाच्या सैन्याला गराडले आणि मुख्य म्हणजे जवळचा पाणवठा ताब्यात घेऊन त्याचे पाणी तोडले. दुसर्याा दिवशी निजाम बघतो तो काय? मराठ्यांनी आपल्याला वेढलेले आणि खुद्द बाजीराव पेशवे हातात तलवार घेऊन आघाडीला उभे होते. निजामाने भराभर आपल्या सैन्याला हुशार करून लढाईला तोंड फोडले. मराठ्यांची फौज उधळून लावून कोंडी फोडण्याचा निजामाने आटोकाट प्रयत्न केला. पण मराठे त्याला पुन्हापुन्हा आत ढकलत होते. निजामाच्या सैन्याला प्रचंड तहान लागलेली होती. मराठवाड्याचा मुलुख हा ! उकाडा जिव काढत होता. आणि अशातच पाणवठ्यावर मराठ्यांच्या सशस्त्र चौक्या बसलेल्या ! पाण्यावाचून निजामाची अवस्था फारच बिकट झाली.अखेरीस नाईलाजाने निजाम दाती तृण धरून शरण आला. बाजीरावांच्या चौथाई आणि सरदेशमुखीच्या आणि कोल्हापूर दरबारला मदत न करण्याच्या अटी बिनतक्रार मान्य करून निजामाने शरणागती पत्करली. पालखेडचे हे युद्ध दि.२५ फेब्रुवारी रोजी झाले आणि लगेचच ६ मार्च १७२८ या दिवशी मुंगी-पैठण येथे निजाम-उल-मुल्क मीर कमरूद्दीन सिद्दीकी आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यात तह झाला. पुढे साधारण दहा वर्षांनी (इ.स.१७३८) बाजीराव पेशवे दिल्लीवर चाल करून येत आहेत हे पाहताच दिल्लीच्या बादशाहाने निजामाला मदतीसाठी साद घातली. निजामाला हेच हवे होते. निजाम बाजीरावांना अडवण्यासाठी भोपाळ येथे तळ देऊन राहीला, आणि निजामाच्या दुर्दैवाने पालखेडला जे झाले त्याचीच पुनरावृत्ती येथे झाली. पेशव्यांनी अतिशय जलद हालचाली करून निजामाला वेढले आणि त्याचे पाणी तोडले. निजामाचा मुलगा नासिरजंग हा बापाच्या मदतीसाठी जात असता तापी नदीच्या दक्षिण तिरावरच चिमाजीआप्पांच्या फौजेने त्याला रोखून धरले. अखेरीस चंबळ आणि नर्मदा नदीच्या अंतर्वेदीतील सर्व प्रदेश मराठ्यांना द्यावा आणि या मोहीमेसाठी खर्चाचे म्हणून पेशव्यांना पन्नस लक्ष रुपये द्यावेत या अटी बिनशर्त कबूल करून निजाम शरण आला आणि आता या पेशव्याला अडवणे कोणालाही शक्य नाही हे दिल्लीच्या बादशहालाही समजून चूकले...

औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या तालमित तयार झालेल्या निजाम-उल-मुल्काला हरवणे यासारखी अशक्यप्राय गोष्ट बाजीरावांनी एक-दोनदा नव्हे, तीनदा शक्य करून दाखवली. यातच बाजीरावांची हुशारी आणि कर्तबगारी दिसून येते. नुसत्या निजामासारख्या परकियांशीच नव्हे, तर गायकवाड, दाभाडे, भोसले, प्रतिनीधी, मंत्री, डबीर अशा आपल्याच माणसांच्या विरोधाला देखील बाजीराव पुरून उरले.
 उण्यापुर्‍या चाळीस वर्षांच्या आयुष्यात, अन् त्यातही केवळ वीस वर्षांच्या पेशवाईच्या काळात बत्तीस लढाया खेळणारा आणि सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यातली एकही लढाई न हारलेला हा अजिंक्य योद्धा एकमेवाद्वितिय आहे !

बाजीरावांच्या युद्धाच्या तयारीचा आणि त्यांच्या योजनांचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर आपल्याला त्यांच्या यशाचे रहस्य कशात आहे हे नक्की समजू शकते. बाजीरावांच्या या विजयांचे अनेक पैलू होते. त्यात सर्वांत मुख्य म्हणजे सावधपणा ! सावधपणासठी हवी चौफेर नजर. पुण्यात असणार्याू पेशव्यांचे हेर दक्षिणेत तंजावरपासून पार काबूल-कंदहारपर्यंत पसरले होते. असे म्हटले जाई की निजाम सकाळी काय जेव्तो ते संध्याकाळपर्यंत आणि बादशाहाला रात्री काय स्वप्न पडले ते दुसर्याम दिवशी सकाळपर्यंत बाजीरावांना इत्यंभूत समजत असे. ‘ पहिले ते साअधपण अन् दुसरे ते राजकारण ’ हा मंत्र बाजीरावांनी अहोरात्र जपला होता. युद्धशास्त्राचा दुसरा पैलू म्हणजे जलद हालचाली ! बाजीरावांची कुठलीही मोहीम पहा, अतिशय जलद गतीने फौजांच्या हालचाली होत की शत्रूला नेमके पेशवे कुठे आहेत तेच समजत नसे आणि सम्जे तेव्ह बाजीरावसाहेब अगदी हाकेच्या अंतरावर येऊन पोहोचले असत. दिवसाला तीस-पस्तिस कोसांची घोड्यावरून दौड ( १ कोस = २ मैल, १ मैल = १.६ कि.मी. ) मारणे ही केवळ अशक्यप्राय गोष्ट होती, परंतू हे अंतर पेशव्यांच्या फौजा सहज पार करत.. तिसरा पैलू म्हणजे विश्वासू अन् शूर सरदार ! बाजीरावांनी एकेक सरदार हिर्यारसारखा पारखून घेतलेला. बाजी भिवराव रेठरेकर, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार, संताजी कदमबांडे, होनाजी बलकवडे, महादजीपंत पुरंदरे असे बाजीरावांचे शूर सवंगडी त्यांच्यासाठी जीव ओतायलाही तयार असत. अन् या सगळ्याहून मुख्य म्हणजे अचूक योजना आणि सूत्रबद्ध मांडणी हे सारे पैलू बाजीरावांच्या यशाचे दर्शन घडवतात...

बाजीराव पेशव्यांसारखा अजिंक्य योद्धा शतकानुशतकातूनच जन्माला येतो. एका समकालीन पत्रात तर म्हटलंय, ".. रायांचे (बाजीरावांचे) पुण्यप्रताप ऐसे जाहले की आज हस्तिनापूरचे राज्य घेऊन स्वामींस (शाहू महाराजांस) देतील तरी समय अनुकूल आहे..."

प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार म्हणतात "अस्थिर झालेल्या मराठी राज्याचे स्वातंत्र्य बाजीरावांनी पक्के केले, आणि हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. शिवाजीराजांनी ‘महाराष्ट्रराज्याची’ निर्मिती केली, परंतू त्या राज्याला ‘बृहत्तर महाराष्ट्राचे’ रूप देण्याचा प्रारंभ बाजीरावांनी केला ही गोष्ट सामान्य नव्हे खासच !..."

आणि म्हणूनच या महान पेशव्याचे स्मरण करून, त्यांच्या पवित्र स्मृतींस वंदन करूया... मराठ्यांच्या कर्तृत्वाला नवे आव्हान देणार्‍या, या अजिंक्य योद्ध्याला, श्रीमंत बाजीराव पेशव्यांना मानाचा मुजरा... त्रिवार मुजरा !!!

: कौस्तुभ कस्तुरे  ।   kasturekaustubhs@gmail.com
© All Rights Reserved.