श्रीमंत पेशवाई : समज-गैरसमजसध्या काही जातियवादी व्यक्ती म्हणा अथवा काही समाजविघातक शक्ती म्हणा, पण एक मेसेज व्हॉट्सअ‍ॅप, चॅटऑन सारख्या मेसेजिंग सर्व्हिसेस आणि सोशल मिडीयावर सतत पसरवला जातोय ज्यात "पेशवे शिवरायांच्या स्वराज्यावर जगले" इत्यादींसारखी पेशव्यांची जात उघडपणे प्रकट न करता जातियवाद सुचवणारी वाक्य आहेत. पण खरंच वस्तुस्थिती तशी आहे का ? सर्वसामान्यपणे लोकांना, असे लोक की ज्यांना आपल्या नेहमीच्या धावपळीच्या नादात आणि धकाधकीच्या आयुष्यात अस्सल इतिहास कोणता हे तपासून पाहता येत नाही, मग अशा प्रकारचं वाचल्यावर प्रथम तेच आपल्या मनात घर करून राहतं आणि आपल्याही नकळत ही विषवल्ली आपल्या मनात रुजत जाते. पण दुर्दैवाने आपणही इतिहासाच्या या अपप्रचाराला बळी पडत असतो आणि यामूळेच जातियवादी वृत्ती आणखी फोफावत जाते. पेशवे शिवाजी महाराजांच्या जिवावर जगले, पेशव्यांनी शिवाजी महाराजांचं स्वराज्य विकून खाल्लं, पेशव्यांनी पुण्यात बसून ऐषआराम केला, पेशव्यांनी कायमच जातियवादी धोरण स्विकारलं इत्यादी अनेक बेछूट आरोप आजवर केले गेले. पण हे आरोप किती बिनबुडाचे आहेत, त्यांत आणि सत्य इतिहासात किती तफावत आहे हे समजवून देण्याचा हा लहानसा प्रयत्न आहे.
पुढील आरोप आणि त्यांचे खंडन या रुपातील सदर लेख आधी नीट वाचून, त्यातील पुरावे आणि सत्यासत्यता समजून घेऊन आपणही या सार्‍याचा विचार करावा. सदर लेखात जिथे जिथे 'मराठे' असा शब्द आला असेल तो जातिवाचक नसून 'अठरापगड जातींचा आणि महाराष्ट्राच्या मातीतला मराठी' समाज असा अर्थ घ्यायचा आहे.

आरोप : पेशव्यांनी दिल्लीच्या सनदा स्विकारून छत्रपतींना बादशाहाचे अंकीत बनवले.
खंडन : भट घराण्यातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीदरबारातून चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा आणल्या हे खरे. पण हे शुद्ध राजकारण होते. इथे प्रथम एक गोष्ट अशी, की औरंगजेबाचा पुत्र आझमशहाने शाहू राजांची माळव्यात दोराहा येथे सुटका केल्यानंतर शाहू महाराज दक्षिणेत आले. या वेळेस, राजारामांच्या पत्नी ताराबाई यांनी शाहूंना आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळून घेण्याऐवजी 'आलेला शाहू हा खरा नाही, तोतया आहे' अशा प्रकारे राजकारण केले. यावेळेस सरसेनापती धनाजी जाधवराव आणि बाळाजी विश्वनाथ यांनी शाहू राजांची खातरजमा करून हाच शाहू असल्याचे ओळखले होते. वास्तविक खुद्द रामराजांचं असं म्हणणं होतं की शंभूराजांनंतर 'शाहू' हाच उत्तराधिकारी आहे, मी शाहूचा एक प्रतिनिधी म्हणून राज्य करतो आहे. दि. २५ ऑगस्ट १६९७ रोजी राजारामांनी शंकराजी नारायण सचिव यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे, 

" चिरंजीव (शाहू) कालेकरून (काही काळानंतर) श्री देसी (महाराष्ट्रात) आणील तेव्हा संकटी जी माणसे उपयोगी पडली त्याचा तसनसी (नाश) आम्ही करविल्या हे इकडे यावे त्याचे चित्ती द्वेश यावा (अर्थात शाहू इकडे यावे आणि त्याला माझ्याबद्दल म्हणजेच राजारामांविषयी द्वेष वाटावा) व राज्यकर्त्यास इनसाफ पाहाणे जरूर, त्यात हे तरी अविचाराचे कलम (म्हणजे ही अविचाराची गोष्ट). भलाई जाली ती सारी आमची. एकीकडे जाऊन असी करणी तुम्ही केली यास स्वामीद्रोहाचेच करणे, ते (शाहू) मुख्य, सर्व राज्यास अधिकारी, आम्ही करीतो तरी त्याच्यासाठीच आहे, प्रसंगास सर्व लोकांस तिकडेच पाहणे येईल, व वागतील हे कारण ईश्वरीच नेमले आहे."  

अशा वेळेस धनाजी जाधवराव आणि बाळाजी विश्वनाथांनी शाहूंची बाजू घेतली, पण शाहूंना राज्यकारभार करण्यासाठी सैन्य असले तरीही खजिन्याची आवश्यकता होतीच. अशा वेळेस बाळाजी विश्वनाथांनी मुत्सद्देगिरीने दिल्लीदरबारातून दक्षिणच्या "सहा सरसुभ्यांच्या" चौथ आणि सरदेशमुखीच्या सनदा मिळवल्या. या सनदा म्हणजे मोंगलांचे मांडलिकत्व असा अर्थ घेण्याऐवजी मोंगलांच्या पैशावर सुरुवातीचे शाहू महाराजांचे स्वराज्य वाढले आणि मराठेशाही बळकट झाली असा अर्थ घेतला तर आणखी उत्तम ! शिवाय निजामाने हैद्राबादला जी 'असफजाही' स्थापन केली होती तिलाही या 'युती'मूळे वचक बसणार होता. आणि या सहा सरसुभ्यांच्या चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा ही निव्वळ सुरुवात होती. इथपासून पुढे पेशव्यांनी मराठी राज्य हे एक "साम्राज्य" बनवले हे पुढच्या काळात इतिहासाने सिद्ध केले आहे.

आरोप : पेशवे कायम शिवरायांच्या स्वराज्यावर जगले.
खंडन : हा आरोप म्हणजे नेमका काय आहे ते अद्यापही समजलं नाही. कारण पेशवे हे महाराजांच्या स्वराज्यावर जगले म्हणावं तर अटकेपर्यंत मराठी घोड्यांच्या टापा उमटल्या अन्‌ यमुनेच्या पात्रात मराठी भीमथडी घोडी नाचली ती राघोबादादांच्या आणि भाऊसाहेबांच्या स्वप्नात नाचली असा अर्थ घ्यायचा का ?? पेशव्यांनी शिवाजी महाराजांचं स्वराज्य नुसतंच वाढवलं नाही तर ते बलशाली केलं हे इतिहासात आपल्याला स्पष्ट दिसून येत. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पेशव्यांनी आणि त्यांच्या सरदारांनी बर्‍याचशा अंशी पुर्णत्वाला नेलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अतिशय अल्प पण तितक्याच धावपळीच्या आयुष्यात अटोकाट प्रयत्न करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, पण महाराष्ट्राच्या दुर्दैवाने महाराजांचं आयुष्य अवघं ५० वर्षांचं ठरलं. पुढे शंभूछत्रपती महाराजांच्या काळात औरंगजेबाच्या फौजांनी महाराष्ट्राची पुन्हा धुळदाण केली आणि महाराष्ट्राच्या छत्रपतींना अतिशय अमानुषपणे मारण्यात आलं. यानंतर राजारामछत्रपतींच्या काळात स्वराज्य वाढावं यापेक्षा मोंगलांच्या घोड्यांच्या टापांखाली स्वराज्य आणि स्वराज्यातील रयत टिकवावी कशी हाच मोठा प्रश्न होता. १७०० ते १७०७ या दरम्यान राजनेतृत्व नसले तरीही मराठे प्राणपणाने एक जनसंग्राम म्हणून लढले. पण १७०७ नंतर मात्र शाहू-ताराबाई संघर्षातच जास्त शक्ती वाया जात होती. कान्होजी आंग्‍र्‍यांसारख्या आरमारी वीराने शाहूंचे पेशवे बहिरो मोरेश्वरांना लोहगडावर कैद केले. बाळाजी विश्वनाथ आणि जाधवरावांसारख्यांना काही हे पटत नव्हते. अखेरीस बाळाजी विश्वनाथांनी कान्होजी आंग्‍र्‍यांची समजूत काढली, आणि समर्थांच्या 'अवघे मराठे येक करावे' या उक्तीनुसार कार्य सुरु केले. कोल्हापूरची गादीही तोपर्यंत ताराबाईंच्या हातून जाऊन राजसबाई-संभाजी (दुसरे) यांच्या हातात गेल्याने बाळाजी विश्वनाथांनी पुढाकार घेऊन संभाजी-शाहू यांच्यात 'वारणेचा तह' घडवून (निदान वरकरणी तरी) शांतता प्रस्थापित केली. यानंतर सहा सरसुभे दख्खनच्या सनदा घेऊन बाळाजी विश्वनाथांनी नियोजित हिंदवी स्वराज्याचा पाया बळकट केला. इथपर्यंत मराठी राज्य हे महाराष्ट्राच्या एक चतुर्थांश भागापुरतंच मर्यादीत होतं पण यानंतर शिवाजी महाराजांचं 'संपूर्ण हिंदवी स्वराज्या'चं स्वप्न पुर्ण होत आलं.

आरोप : मस्तानीला पेशव्यांनी अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली.
खंडन : मूळात मस्तानीचं उगम आणि मूळ काय याबाबतच मूळात अजून ठोस पुरावे उपलब्ध नाहीत, मस्तानी कोण होती, ती खरंच एक नाची होती अथवा ती खरंच छत्रसालांची कन्या होती याबाबत काही ठोस सापडल्यासच यावर अधिकारवाणीने बोलता येऊ शकते. पेशव्यांचा बखरकार म्हणतो की मस्तानी ही मोंगल सरदार सादतखान याच्याकडील कलावंत असून तीने पेशव्यांना आपणाजवळ ठेवण्याची विनंती केली. तारिख-ए-महंमदशाही मध्ये नमुद केले आहे, "मस्तानी कंचनी असून ती अश्वारोहणात विशेष कुशल होती. बाजीरावांप्रमाणेच तलवार, भाला घेऊन ती त्याजबरोबर भरधाव घोडदौड करी. त्या तीव्र वेगात उभयतांच्या रिकीबी यत्किंचितही मागेपुढे होत नसत (थोडक्यात पेशव्यांच्या तोडीची होती). मोहीमांत ती बाजीरावांबरोबर हजर असे". अर्थात प्रत्येक मोहीमेत नसणार हे उघडच आहे ! मस्तानीचा उल्लेख मराठी पत्रात "यवनी" असा नसून "कलावंतिण" असाच आढळतो. खुद्द पेशव्यांच्या घरून मस्तानीला विरोध हा तिच्या धर्मावरून नसून 'एकपत्नीत्वाच्या' प्रथेला परंपरा जाण्याला होता. बाजीरावांची पहिली पत्नी हयात असताना मस्तानीपासून झालेली संतती ही आणखी वाद उत्त्पन्न करील असे कदाचित राधाबाईंना वाटले असावे, आणि ते साहजिकच होते. सावत्रपणाचा दाखला त्यांनी अनुभवला होता. खुद्द छत्रपती महाराजांच्या घराण्यात सावत्रपणाच्या भाऊबंदकीतून नको त्या कटकटी उद्भवल्या होत्या. सातारा आणि कोल्हापूर गादी होण्यासाठी भोसले घराण्यातील भाऊबंदकीच कारणीभूत होती. त्यातून मस्तानी मातुल कुळाकडून मुसलमान, त्यामूळे उद्या तिची संतती ही 'वाटेकरी' होण्याची भाषा करू लागली तर भलताच अनर्थ ओढवेल या भितीने राधाबाई आणि चिमाजीअप्पांनी तिला विरोध केला. मस्तानीला विरोध हा १७३८-३९ सालापासून विशेष वाढला होता असं उपलब्ध पत्रांवरून दिसतं. अखेरीस बाजीरावांची प्रकृती मस्तानीपायी बिघडत चालल्याचे पाहून पेशव्यांच्या घरच्यांनीही त्यांना समजून घेतले, २९ मार्च १७४० च्या पत्रात चिमाजीअप्पा नानासाहेबांना लिहीतात, "राऊस्वामी १९ जिल्हेजी गेले त्या दिवसापासून आजपावेतो त्यांचे पत्र नाही.  जेथपर्यंत येत्न चाले तो केला, परंतू ईश्वराचे चित्तास न ये त्यास आमचा उपाय काय ? त्यांचे प्राक्तनी असेल ते सुखरुप होऊ(दे). आपण निमित्त व्हावे यैसे नाही. पुण्यात गेल्यावर तिची (मस्तानीची) रवानगी त्याजकडे (बाजीरावांकडे) करावी". पुढे महिन्याभरातच दि. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीरावसाहेब मौजे कलमडे परगणे रावेर येथे मृत्यू पावले आणि काही काळातच मस्तानीनेही आपले जिवन संपवले. पण म्हणून मस्तानीच्या पुत्राला पेशवे घराण्याने वाळीत टाकले अथवा वार्‍यावर सोडले असे अजिबात नाही. कृष्णसिंह अथवा समशेरबहाद्दरला नानासाहेबांनी सख्ख्या भावाप्रमाणे जपले. त्याला राघोबादादा, जनार्दनपंत आणि सदाशिवरावभाऊंच्या बरोबरीचा दर्जा दिला. हे समशेरबहाद्दर पुढे १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या संहारात मृत्यू पावले. 

आरोप : नानासाहेब पेशव्यांनी शिवाजी महाराजांनी कष्टाने उभारलेले आरमार नष्ट केले.
खंडन : नानासाहेब पेशव्यांनी आरमार नष्ट करावे हा हेतू डोळ्यांसमोर ठेऊन कोणतीही गोष्ट केली नव्हती. तुळाजी हा फार बळजोर झाला होता. पेशव्यांच्या पक्षातील लोकांना तर तो पाण्यातच पाहत असे. इ.स. १७५३ मध्ये तुळाजी आंग्रे काहीएक कारण नसताना विशाळगडावर चालून गेला. केवळ प्रतिनिधी हे पेशव्यांच्या पक्षातले म्हणून.. विशाळगडचा किल्लेदार लिहीतो, ‘...आंगर्‍याने मर्यादा सोडून मुलकाचा उच्छेद केला. प्रभावळी, साखरपे दोनही तोंडास शह देऊन बसला आहे. प्रतिनिधीच्या मुलकाची खराबी केली. कोणी खावंद त्यास विचारता नाही (इतका तो माजला आहे!)... पेशवे दफ्तर खंड २४ मधील पत्रांवरून या गोष्टींची कल्पना येते. ताराबाईंनीही तुळाजीला याबद्दल जाब विचारला असता ताराबाईंनाही त्याने किम्मत दिली नाही. अखेरीस प्रतिनिधींनी आपले मोठे सैन्य पाठवल्यानंतर तुळाजी पुन्हा वेढा उठवून माघारी गेला. सरदेसाईंनी मराठी रियासतीत याचे कारण नमुद केले आहे ते असे- "तुळाजीबद्दल पेशव्याचे मनातजबरदस्त तेढ निर्माण होण्यास तशीच कारणे उत्पन्न होत गेली. पोर्तुगिझांचा वसईकडील प्रदेश पेशव्यांनी काबिज केला तो हरउपाय करून परत मिळवावा अशी खटपट पोर्तुगिझांनी सारखी चालू ठेवली. हा त्यांचा प्रयत्न विफल करण्यासाठी पेशव्याने वाडीकर सावंतास हाताशी घेवून त्याजकडून गोव्यावर आक्रमण चालविले.पेशव्याशी तुळाजीचे फाटत चाललेले पाहून पोर्तुगिझांनी तुळाजीशी सख्य जोडले. सावंताने गोव्यावर स्वार्‍या करून पोर्तुगिझांचा बराच प्रदेश काबिज केला, त्याचे बदल्यात तुळाजीने सावंतांचा उच्छेद चालविला. हे प्रकार चालू असता शाहू मरण पावला आणि ताराबाईने पेशव्याविरुद्ध कारस्थान उभारले. पेशव्याला शह देण्यासाठी तीने पोर्तुगिझांस कळवले, तुम्ही पेशव्याचा पाडाव कराल तर आम्ही तुमचा वसईकडचा प्रदेश परत देऊ’’. सलाबतजंग (मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा थोरला मुलगा‌), बुसी यांजकडेही ताराबाईने पेशव्याविरुद्ध कारस्थाने चालवली. बुसीला (फ्रेंचांचा गव्हर्नर) सलाबत्जंगाची सत्ता टिकवणे जितके अगत्याचे तितकेच सलाबतजंगास काढून गाजीउद्दीनास (मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा धाकटा मुलगा‌) निजामीवर आणणे पेशव्यास अगत्याचे वाटले. अशी यावेळच्या राजकारणाची गुंतागुंत आहे.नानासाहेब आणि इंग्रजांची युती ही फक्त तुळाजीला नामोहरम करण्याबाबत आणि पोर्तुगिजांबाबत होती, त्यात मराठी आरमाराचा नाश व्हावा असे कधीही पेशव्यांच्या मनातही आले नव्हते.
 
तुळाजी आंग्रे आणि मानाजी आंग्रे या बंधूंमधले वैरही पेशवे-तुळाजी इतकेच प्रचंड होते. तुळाजीने मानाजीच्या कुलाबा किल्ल्यावर हल्ला करून मानाजी आंग्र्यांचा कुटूंबकबीला पकडून कैदेत ठेवला होता. आंग्रे आणि पेशव्यांचे, दोघांचेही गुरु ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनीही याबाबतीत तोड काढण्याचा प्रयत्न केला होता. ब्रह्मेंद्रस्वामींचा तुळाजीवर फार जीव होता. या बाबतीत एका पत्रात ते तुळाजीला म्हणतात, चवदालक्षांचा धणी तो आहे देवळी (श्री परशुराम), त्याचा भक्तराज शिरोमणी तुळाजी सरखेल... सरखेल...तुम्हांस शाहुजीने सरखेल दिल्ही. तुम्हांवरी दया फार आहे हे आज्ञा.. परंतू हेच ब्रह्मेंद्रस्वामी तुळाजीची वाढती पुंडगिरी पाहून तुळाजीस फर्मावतात काय फर्मावतात ते पहा, ते संपूर्ण पत्रच लहान असल्यामूळे पुढे देत आहे-
          “श्री. सहस्त्रायु चिरंजीव विजयीभव तुळाजीस आज्ञा ऐसी जे- तुझे सहस्र अस्न्याय झाले. तुजलापत्र न लिहीतो. परंतू मानसिंग(मानाजी) तुमची गोडी व्हावी, महत्कार्य सिधीस जावे याजकरीतापत्र लिहीले आहे. तर, कबीला व बायका जे तुम्हांकडे मानाजीची आहेत ती लावून (मानाजीकडे) रवाना करावी. येविसी राजपत्रे व आमचे पत्र गेलेच आहे. बहुत काय लिहीणे हे आज्ञा. मानसिंगास दोन गोष्टी सांगितल्या. त्यात अंतर काडीइतके सहस्त्र वाट्याने पडणार नाही. आम्ही चित्त शोधून पाहीले. तुम्ही आता लेकूरबुद्धी न करणे हे आज्ञा. दोघे भाऊ एक होऊन एखादे आभाळास हात घालणे”.
          या पत्रातून स्पष्ट समजून येते, ब्रह्मेंद्रस्वामी म्हणतात की वास्तविक तुझे अपराध इतके झाले की माझी तुझ्याशी बोलण्याची इच्छा नव्हती पण मानाजी आणि तुझे, भावाभावांचे सख्य व्हावे यासाठी पत्र लिहीले. मानाजीच्या मनात काहीही वाईट नाही तेव्हा तु ही लहान मुलासारखे न वागता, दोघे भाऊ एक होऊन एका महत्वाच्या कामगिरीस हात घालणे’. मानाजी आंग्रे हे मात्र पेशव्यांशी कायम निष्ठा ठेवून होते. पूर्वी १० ऑक्टोबर १७५२ च्या एका पत्रात मानाजी नानासाहेबांना म्हणतात, “आमचा एक निश्चय की आपले म्हणून आहो. आपला अवलंब करून मानाने आहो..”
इंग्रजांचा सरखेल विल्यम जेम्स त्याच्या वरिष्ठाला लिहीतो की "पेशव्यांनी मोहीमेत मुद्दम वेळकाढूपणा केला. रामाजीपंत हा केवळ 'पोरखेळ' करत होता, त्यांच्या मनात खरंच आपल्याला मदत करण्याचे आहे याविषयी शंका वाटते". १२ फेब्रुवारीला संध्याकाळी चारच्या सुमारास इंग्रजी तोफेचा एक गोळा आंग्‍र्‍यांच्या ७४ तोफांच्या गुराबावर आदळला आणि एकाला एक लागून असलेल्या आठ लहान गुराबा आणि साठ गलबते जळून खाक झाली. या सार्‍यावरून स्पष्ट होते की पेशव्यांचा हेतू काय होता.

आरोप : पानिपतावर पेशव्यांनी गनिमी कावा खेळायला हवा होता. शिवाय पानिपतावर मराठे मरत असताना नानासाहेबांनी आपल्या ख्याली खुशालीकरता दुसरे लग्न केले.
खंडन : पानिपतावर गनिमी कावा खेळायला हवा होता अन्‌ भाऊसाहेबांनी विंचूरकर-होळकरांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून इब्राहिमखान गारद्याच्या युद्धनीतिवर विश्वास ठेवल्याने पानिपत हरलो असा दावा अनेक इतिहासकार करतात. परंतू त्या प्रदेशात खरंच 'गनिमी कावा' खेळला जाऊ शकत होता का या गोष्टीचाही विचार करायला हवा. पानिपतच्या उत्तरेस (काहिशी वायव्येस) एक लहानशी टेकडी वगळता संपूर्ण मैदानी प्रदेश होता. पूर्वेकडे रोहिलखंडातील हिमालयाच्या रांगा, वायव्येकडील दूरवरच्या हिंदूकूश, नौऋत्येकडील अरवली, आणि आग्नेयेच्या शिवालिक टेकड्या यासुद्धा खूपच लांब होत्या. त्यामूळे 'गनिमी कावा' लढण्यासाठी आणि शत्रूला चकवा देण्यासाठीची परिस्थिती तीथे अजिबात नव्हती. शत्रूला चकवा तेव्हाच देता येतो जेव्हा आपण काही काळासाठी त्याच्या नजरेआड होऊ शकतो. अन्‌ भाऊंनाही याची कल्पना होती. अब्दालीहा पाश्चिमात्य युद्धतंत्राने वागणारा होता आणि म्हणूनच या आधीच्या उद्गिर येथील निजामाच्या युद्धात भाऊंच्या पक्षात आलेल्या इब्राहिमखान गारदी या तोफखान्याच्या अधिकार्‍याची मदत अतिशय उपयुक्त वाटली. पाश्चिमात्य लढाईचे तंत्र हे (गोलाचे तंत्र) मल्हारराव प्रभुतींना सहज समजण्यासारखे नव्हते, अन्‌ त्यांनी विरोध केला इथपर्यंत त्यांचे काहीच चूकले नाही. पण पुढे दुसर्‍या दिवशी विश्वासराव पडले आणि भाऊसाहेब देहभान हरपून लढाईचा पवित्रा घेतल्यावर रणभूमीवर दमाजी गायकवाड, होळकर-विंचूरकरांच्या पथकाने (उजव्या बगलेने) रणांगणातून काढता पाय घेतला. पाठोपाठ सोनजी भापकरसुद्धा 'गेलेल्यांना परत आणतो' अशा सबबीवर पकूकन गेला. आणि हुजूरातीला पठाणांचा वेढा पडला. पानिपत हरण्याची कारणे तशी बरिच आहेत. अगदी मराठी फौजांच्या मनोधैर्यापासून ते मराठी फौजेसोबत असणार्‍या कबिला-बाजारबुनग्यांपर्यंत आणि मराठ्यांच्या बेसावधपणापासून ते अप्रगत तंत्रापर्यंत सगळ्याच गोष्टी पानिपत होण्यास कारणीभूत झाल्या, पण त्याचा दोष एकट्या पेशव्यांना देऊन अथवा एकट्या भाऊंना देऊन चालणार नाही.

पानिपतावर मराठे लढत असताना नानासाहेबांचे दुसरे लग्न हासुद्धा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. पण इतिहासकार कसलाही विचार न करता आपला 'अंदाज' बांधून मोकळे होतात. दि. २७ डिसेंबर १७६० रोजी नानासाहेबांनी पैठणच्या नारायणराव नाईक वाखरे पैठणकर यांच्या कन्येशी विवाह केला. यावेळेस नेमके काय घडले असेल हे पाहुया :
भाऊसाहेबांना पानिपत मोहीमेवर असताना पैशाची फार कुचंबणा होत असे. आधीच निजामाच्या मोहीमेवरून भाऊसाहेबांना आणि मराठी सैन्याला उसंत न मिळता परतूरवरून थेट उत्तरेकडे जावे लागले होते. सतत वर्ष-दीड वर्ष मराठी फौज ही घरापासून दूर होती, शिवाय पहिल्या मोहीमेनिमित्त झालेला खर्च अन्‌ शारिरीक श्रम भरून जायच्या आतच ही कटकट उद्भवली होती. या परिस्थितीचा फायदा घेत निजामानेही मराठ्यांना उद्गिरच्या तहात कबूल केलेली खंडणी पावती केली नाही. इकडे पेशव्यांची आणि भाऊंची आर्थिक कुचंबणा होऊ लागली. २६ जून १७६० रोजी भाऊसाहेब आग्‍र्‍याहून नानासाहेबांना लिहीतात, "दंग्यामूळे हिंदुस्थानात सालमजकूरचा ऐवज वसूल झाला नाही. गिविंद बल्लाळ (गोविंदपंत बुंदेले) कडील बाकी सालोसाल ओढत येत आहे. जाटाकडे खंडणीचा पैका येणे तो या समयी मागता येत नाही. पठाणांची मसलत लांबली तर आम्हांकडे व आपल्याकडेही खर्च भारी लागेल. दिल्लीच्या दंग्यामूळे सावकार परागंदा झाले, कर्जवाम मिळत नाही. घरचा पैका आणणे वाईट वाटते. पण ईलाज नाही". (म.रि.नानासाहेब) यानंतरही पैशाची चणचण भासल्याने भाऊसाहेबांनी लाल किल्ल्यातील दिवाणखान्यातील रुप्याचे छत काढून त्याचे नऊ लक्ष रुपयांची नाणी पाडली. यामूळे (फक्त) महिनाभर स्थिती राहिली. (म.रि.नानासाहेब). दि. ९ डिसेंबर रोजी नाना फडणवीसांनी पानिपताहून जयपूरच्या सावकाराला लिहीलेले एक पत्र आहे त्यात ते म्हणतात, "तुम्हांस तीन चार पत्रे पाठविली, एकाचेही उत्तर न आले, परंतू आताच तुमचे पत्र (८ डिसेंबर) आले. त्यावरून दिसोन आले की आम्हांकडून पत्रे गेली ती तुम्हांस पावलीच नाहीत"(म.रि.नानासाहेब). यावरून स्पष्ट समजते की नोव्हेंबर-डिसेंबर च्या सुमारास पानिपतवरील मराठी फौजेचा बाहेरील जगाशी संबंध संपला होता. अशा वेळेस पानिपतावर भाऊंची सध्याची (डिसेंबर) परिस्थिती काय आहे हे मात्र दक्षिणेत नानासाहेबांना समजू शकत नव्हते. पेशव्यांना भाऊंचे 'पैशाच्या अडचणी'विषयीचे पत्र मिळाले होते, त्यानुसार पेशव्यांना पैसा पाठवणे शक्य नव्हते, कारण आधीच निजामाच्या स्वारीकरता आणि त्यापूर्वीची कर्जे प्रलंबित होती. त्यामूळे कोणताही सावकार नवे कर्ज द्यायला उत्सुक नव्हता. यातच नागपुरकर भोसल्यांसारखे मराठा दरबारातीलच हितशत्रू पेशव्यांच्या वाईटावर उठल्याने त्याचा आणखीच परिणाम झाला. त्यामूळे पैठणकर नाईक वाखरे हे सावकार असल्याने नानासाहेबांना त्यांच्याकडून पैशाची चणचण भागवण्यासाठी 'दुसरे लग्न' करावे लागले हे उघड आहे. हे लग्न सुखासुखी झाले असं नक्कीच वाटत नाही.. याचे कारण, एकतर या वेळेस नानासाहेबांची करारी आजी राधाबाईसाहेब (बाजीरावांच्या मातुश्री) या हयात होत्या. आपली सोन्यासारखी नातसून (गोपिकाबाई) जिवंत असताना नानासाहेबांच्या दुसर्‍या लग्नाला त्या राजी होऊच शकल्या नसत्या. कारण या वेळेपर्यंत पेशवे घराण्यात परंपरागत एकपत्नीत्वच सुरु होते (पहिली पत्नी मृत्यू पावल्यानंतर दुसरा विवाह केल्याच्या नोंदी आहेत). याच कारणास्तव बाजीराव-मस्तानीच्या विवाहाला राधाबाईंनी विरोध केला होता. शिवाय पैठणकर वाखरे सावकार हे देशस्थ होते, चित्पावन ऋग्वेदी भट घराण्यात यापूर्वी देशस्थ मुलगी सून म्हणून आलेली नव्हती. अन्‌ यावेळेसही चित्पावन मुलगी मिळाली नसती असंही नाही. शिवाय हे लग्न घाईघाईने पार पाडण्यात आले. यासंबंधीचे पुढील उल्लेख पहा- "येथील मनसबा तरी मार्गेस्वार वद्य सप्तमीस श्रीमंतांचे लग्न जाले. नवरी पैठणची सावकारांची देशस्थांची नवा वर्सांची असे. प्रातःकाली देवप्रतिष्ठा जाली. दो प्रहरा रात्री लग्न जाले. पहाटे साडे जाले. नवरी घरास आणिली"(पे.घ.इ. पृ ११२). यानंतर नानासाहेब लगेच उत्तरेला निघाले (वाटलं असतं तर नानासाहेबांना इकडे मधुचंद्रासाठी थांबता येणं शक्य होतं हे इतिहासकारांनी लक्षात घ्यावं). भाऊंचे शेवटचे पैशाविषयीचे पत्र नानासाहेबांना १४ नोव्हेंबर १७६० रोजी मिळाले. त्यानंतर एकही पत्र नाही. भाऊंच्या कैफियतीत ७ डिसेंबर नंतर ३ पत्रे पुण्याला पाठवल्याचा उल्लेख आहे पण ती पत्रे पोहोचलीन सल्याचे पुढील पत्रावरून समजते. दि. १८ जानेवारी १७६१ च्या पत्रात नानासाहेब भाऊंना लिहीतात, "पूर्वी लिहीत आलो त्याअन्‍वये चाळीस हजार फौजेनिशी कोटाबुंदीवरून जयनगरचे सुमारे येतो. आपण अब्दालीस कोंडून राखावे. सर्व फौजा येक होताच सापक्षपातिसह उत्तम प्रकारे पारिपत्य जाहलिया सर्व कामे त्यात होतात" (पु.द.१). यावरून भाऊच्या पराभवाची बातमी अथवा हलाखीची बातमी अजूनही नानासाहेबांना कळली नव्हती हे दिसून येतं. नानासाहेब २४ जनेवारी मध्यप्रांत्तातील भेलसा (विदीशा) येथे असताना त्यांना एका सावकारी डाकेतून प्रथम त्रोटक माहिती मिळालि, "दो मोती (भाऊ-विश्वासराव) गलत, दस-बीस आसेरफीत (सरदार) फरकात खुर्देकू रुपयाकू गणत नाही (अगणीक सैन्य पडले)". त्यामूळे मराठी फौजा पानिपतावर  मरत असताना नानासाहेब विलास करत होते इत्यादी सर्व आरोप धादांत खोटे आहेत.

आरोप : सवाई माधवराव पेशवे हे नारायणरावांचे पूत्र नसून तो एका दैवज्ञाचा पुत्र होता, नारायणरावांना मुलगी झाली होती, अन्‌ बारभाईंनी त्यांची अदलाबदल केली / सवाई माधवराव हा नाना फडणवीसांचा पुत्र होता.
खंडन : अशा प्रकारचे आरोप हे खुद्द पेशवाईच्या काळातही करण्यात आले होते. पण हे आरोप संपूर्णतः खोटे होते. खुद्द ग्रँट डफ हा पुढील काळातला इंग्रज इतिहासकार याविषयी चौकशी करतो आणि त्याविषयी आपला मित्र जॉन ब्रिग्ज ला २८ फेब्रूवारी सन १८५४ ला लिहीतो- "I cannot now lay my hand on the notes of evidence as to the matter you mention; nor do I know where I may have deposited them. But, I perfectly recollect the universal opinion of the well informed about Poona & Satara courts, & that no doubt was entertained among them as to the legitimacy Madhoo Rao Narrian that the ministers had several pregnant women carried up, to make sure of a successor somehow, was also generally believed, & that Nana Furnavees was afterwards much too intimate with Narrian Rao's widow, but nevertheless no-one of any consequence expressed any suspicion as to the legitimacy of the child born at Poorandhar, Ballajee Pant Nathoo, Abbba Joshee (Bajirao's private secretary), Abbbaji Gonddeo, all of whom you knew, had no doubt about it, & I also recollect asking Madhoo Rao Rastia if he had ever heard it doubted, and his reply was a decided negative". (विविध ज्ञानविस्तार मासिक, डिसेंबर १९२०, सं: वाकस्कर-पारसनिस).

आरोप : दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी ऐषआरामासाठी मराठी राज्य इंग्रजांच्या घषात घातले.
खंडन : हा आरोपही निराधार आहे. दुसर्‍या बाजीरावांचा इतिहास तपासून पाहिला असता, (वडिल रघुनाथरावांच्या प्रतापाने) आयुष्याची सुरुवातीची जवळपास २० वर्ष कैदेत होते. नाना फडणवीसांची इथे चूक निश्चितच झाली. नानांनी रघुनाथरावांचा राग त्यांच्या कुटूंबावर काढला नसता आणि बाजीराव-चिमाजीअप्पाच्या शिक्षणासाठी आणि शिस्तीसाठी तजवीज केली असती तर पुढचा इतिहास नक्कीच बदलला असता. बाजीरावांच्या उनाडपणाबद्दल आनंदीबाई स्पष्ट म्हणतात, "मूल शहाणे होऊ नये असेच सार्‍यांस वाटते". सवाई माधवरावांचा अकाली मृत्यू झाला, त्यामूळे तोपर्यंत बाजीरावांकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते. पण सवाई माधवराव निपुत्रिक मरण पावल्याने पेशवे पदासाठी यशोदाबाईंच्या  मांडीवर एखादे मूल दत्तक देऊन त्याला पेशवा करण्याची निकड भासली. या वेळेस बाजीरावांना हे समजले असता, त्यांनी दौलतराव शिंद्यांकरवी आपल्याला पेशवाई मिळावी असे प्रयत्न सुरु केले. पण बाजीरावांचे कैदेतील प्रताप नानांना माहित होते. त्यामूळे त्यांनी बाजीरावांऐवजी चिमाज्जीअप्पाला यशोदाबाईंच्या मांडीवर दत्तक दिले. पण नात्यानुसार चिमाजीअप्पा हा यशोदाबाईचा चूलत सासरा लागत असल्याने त्याचे दत्तकविधान अशास्त्रिय ठरवण्यात आले. यानंतर नानांनी नाईलाजाने बाजीरावाला पेशवा करण्यास सहमती दर्शवली. पण नुकत्याच चिमाजीअप्पाच्या दत्तक प्रकरणावरून तसेच वडिलांच्या अपमानामूळे बाजीरावांचा नानांवर विशेष राग होता. ५ मार्च १७९६ रोजी नानांनी बाजीरावाला गादीवर बसण्याविषयी सुचवले असता बाजीरावांनी नानांकडे दुर्लक्ष केले. त्यामूळे नाना प्रथम सातारा नंतर महाडला गेले. यापुढील महाडचे प्रसिद्ध कारस्थान होऊन अखेर पुन्हा ४ डिसेंबर १७९६ रोजी बाजीराव गादीवर आले. दुर्दैवाने पेशवाईतल्या अखेरच्या गादीविषयीची ही राजकारणे पाहता गादीसाठी भांडणार्‍या मोंगल शाहजाद्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही एवढे मात्र खरे ! परंतू बाजीराव अशा गडबडीत राज्यावर आलेले, त्यात नाना फडणवीसांविषयीची मनातली धूसफूस, दौलतराव शिंद्याची संगत, जो दौलतराव स्वतः त्याचा सासरा सर्जेराव घाटग्याच्या हातातलं बाहुला बनला होता, शिवाय नाना-परशुरामभाऊ इत्यादी मुरब्बी राजकारण्यांबद्दलची असुरक्षिततेची भावना या सार्‍यांचा परिणाम फार भयंकर झाला. अचानक गादीवर आल्याने बाजीरावांना कारभार सांभाळता आला नाही. या सुमारे ५-६ वर्षांच्या काळात बाजीरावांच्या हातून अतिशय गंभीर चूका घडल्या हे मात्र खरं. नाना फडणवीसांसारख्या हुशार कारभार्‍यांना वृद्धत्वात कैदेत टाकणे, विठोजी होळकराला हत्तीच्या पायी देववणे, आणि सर्वात गंभीर चूक म्हणजे 'तैनाती फौजेचा तह' ! पण यानंतर मात्र (साधारण १७०५ नंतर) बाजीरावांनी पुढची १२-१३ वर्ष इंग्रजांना पुन्हा राज्याबाहेर घालवण्याची नीति आरंभली होती हे तत्कालिन पत्रांवरून उघड होतं. बाजीरावांविषयी 'मराठी दफ्तर'कार वि. ल. भावे यांनी अतिशय समर्पक विश्लेषण केले आहे. भावे यांचे विचार वाचताच आपल्यालाही यातील अर्थ-अनर्थ समजू शकतो-

या रुमालातलें लेखांक १- बापू गोखले यांची कैफियत व लेखांक २- सातारकर महाराजांची दिनचर्या हे वाचून झाले म्हणजे म्हणजे श्रीमंत बाजीराव रघुनाथाबद्दलचे आपले विचार सहजासहजी बदलू लागतात. लागतात. लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलेल्या कल्पना हळूहळू झडू लागतात. बाजीराव अगदी आयदी वा पळपूटा असून केवळ ऐषआरामाचे सुख शांततेने भोगण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या हातावर मराठी राज्याचे उदक घातले घातले ही कल्पना तर तर अगदीच साफ लयास जाते. इतकेच नव्हे, तर मराठ्यांचे राज्य राखण्यासाठी त्याने आपल्या शक्तीप्रमाणे आटोकाट प्रयत्न केले हे म्हणणे भाग पडते. अगदी अखेरपर्यंत तो सारखा झगडत होता.इंग्रजांचा पाय मराठी राज्यातून काढून टाकावा यासाठी त्याने अनेक कारस्थाने केली. लक्षावधी रुपये खर्च केले. .व शेवटी खालावलेल्या स्थितीतही एक कोट रुपये त्यानें आपल्या विश्वासातल्या सरदाराजवळ सैन्य उभारण्याकरता दिले; धुळपास सांगून सांगूनारमाराचे डागडुजीचे काम चालविले; भोसले यांस वस्त्रे पाठविली. काळे, मेहेंदळे वगैरे बिनसलेल्या सरदारांना लोभ दाखवून त्यांस लढाई देण्यास वळविले. अशी त्याने लढाईची तयारी केली वा शत्रूस तोंड दिले. प्रत्यक्ष युद्धात लढाईचे दिवशी त्याला कूच करून (सुरक्षित ठिकाणी) जाण्याविषयी त्याचा मुख्य सेनापती गोखले याने सांगितले असताही तो अखेरपर्यंत गेला नाही. इतकेच नव्हे, तर असा सल्ला वारंवार दिल्याबद्दल त्याने आपल्या सेनापतीस दोष दिला. आपलें बरोबरच्या ईमानी शिपायांस व सरदारांस सोडून तो स्वसंरक्षणार्थ पळाला नाही. उलट त्याचे सरदार वा शिपाई मात्र त्यास सोडून ऐन प्रसंगाचे वेळी पळून गेले. गोड घास सुखाने मिळत होता तोपर्यंत त्यांनी येथेच्छ आकंठ खाल्ला. पण आपल्या अन्नदात्यावर संकट येताच ते मतलब साधून दूर सरले. बाजू सावरून धरणेची आशा आहे तोपर्यंत तोपर्यंत छातीचा कोट करून कोणीही शहाणा सरदार सैन्यास धीर देत उभा राहील. पण जो बाजू पूर्णपणे अंगावर येते असे दिसत असतांही शिपायांना नशिबाचे स्वाधीन करून पाय काढणार नाही तोच धनी खरा ! बाजीराव नुसता एकटाच सैन्यात होता असे नाही, तर आपले बायकोस मर्दानी पोषाख चढवून चढवूंत्याने तीस सैन्यात बरोबर घेतली होती. आपल्या पती बरोबर मृदूशय्येवर आणि समरांगणात दोन्हीकडे सारख्याच उल्हासाने असणार्‍या स्त्रियांची उदाहरणे युरोपातच कायकाय, पण महाराष्ट्राबाहेरही फार क्वचितच आढळतील. आता सैन्याचा मोड होऊ लागला असता तेथून कूच करून दुसरीकडे जाणे जाणेवा तेथे पुन्हा तोंड देणे याला कोणीही पळून जाणे म्हणत नाही. असा कोणता सरदार आहे की साधत असता हे ज्यानें केले नाही ? मग बाजीरावालाच पळपूटा म्हणावे हा कोठला न्याय ? ज्याचा डाव साधला तो शहाणा, व ज्याचा डाव गेला तो मूर्ख हाच एक जगातलां न्याय आहे, दुसरे काय ?
हे असो ! पळाला कोणकोण, किंवा अमुक पळपुटा होता की नाहीनाही, यापेक्षा मराठ्यांचेराज्य आत्मसुखाकरता परकियांच्या हातात कोणी दिले हा प्रश्न विशेष महत्वाचा आहे ! शेवटील झटापटीपूर्वी दोन तीन वर्षे सातारच्या छत्रपतींनी इंग्रजांशी गुप्त खलबत करून करुन काही संकेत ठरवला होता. वा आपण होऊन इंग्रजांना स्वाधीन होण्याविषयी करार मदार केला होता. या गोष्टीचा संशय किंवा सुगावा बाजीरावाला होता वा आपल्या खावंदांच्या या चाळ्याने राष्ट्रावर येणारा अनर्थकारक प्रसंग प्रसंगा टळावा म्हणून त्याने त्याला आपल्या बरोबर नजरेखाली घेतले होते. पण तितक्यातूनही संधी काढून तो धनी इंग्रजांच्या स्वाधीन झालाच. घरचा मालक, राज्याचा खावंद, स्वतः छत्रपती महाराज जर आपणा होऊन उठून जाऊन शत्रूच्या स्वाधीन झाले तर त्याच्या मुनिमाने काय करायचे होते ? फ्रान्सच्या लुई राजाने राजाने व त्याच्या राणीने आपल्या लोकांचे नुसते बेत परकीयांस कळवलेळवले, किंवा आपल्या आप्तेष्टांस आपल्या मदतीस म्हणून बोलावले तेव्हा त्यांच्या प्रजेने काय केले ? पण त्यावेळी फ्रेंच लोक वेडावून गेले होते व वेडाच्या भरात त्यांनी अनन्वित कृत्ये केली; असे कोणी म्हणेल. याकरता हा दाखला आपण सोडून देऊ व क्षणभर अशी कल्पना करू की गेल्या महायुद्धाचे वेळेस आपले बादशाहा पंचम जॉर्ज हे जर जाऊन कैसरच्या स्वाधीन होण्याचा यत्न करते, किंवा जर्मन सेनापतींशी आपल्या प्रधानमंडळाविरुद्ध त्यांनी नुसता पत्रव्यवहार ठेवला असता तर आस्क्विथसाहेब किंवा लॉईड जॉर्ज यांनी त्याचे त्याचे काय केले असते ? याचे उत्तर एखादे लहान पोर देखिल देईल. ग्रीसचा राजा कॉन्स्टेंटाईन याचे त्याचा प्रधान व्हेनिज्युलास याने परवाचे दिवशी काय केले व इंग्रजांनी त्याबद्दल व्हेनिज्युलासची किती पाठ थोपटली हे जाहीर आहे. तेव्हा आणिबाणीच्या वेळी व राष्ट्रांत युद्धप्रसंग चालू असतां तेथील राजा झाला म्हणून त्याने कसे वागावे हा सिद्धांत ठरलेला आहे. या सिद्धांताविरुद्ध वागणार्‍या राजाला कोणती बक्षिसी देणे राष्ट्रीयदृष्ट्या आवश्यक आहे हे ही उघडच आहे. यात अदब राखण्याच्या, दयेच्या, धर्माच्या किंवा दुसर्‍या कोणत्याही सबबीने गय केली तर त्याचा परिणाम कसा घडतो हे कोणीही सांगू शकेल. त्यावेळी राष्ट्राची सुत्रे ज्याच्या हातात असतील,राष्ट्रसंरक्षणाची जबाबदारी ज्याचे शिरावर असेल त्याने असा मनुष्य देशद्रोही वा राष्ट्रद्रोही ठरवून ज्यांना मराठी राज्याची पोटतिडीक आहे असे जाधव, शिर्के वगैरेंसारखे चार कुळवान मराठा सरदार जमवून व त्यांचेपुढे हा आरोप शाबित करून त्यांचे सल्ल्याने सर्वांसमक्ष त्याला झाडावर टांगून देहांत प्रायश्चित्त देणे अवश्य वा न्याय्य होईल. आणि हे करण्याची हिंमत बाजीरावाने केली नाही म्हणून राज्य गमवून, राष्ट्राचा नाश करून तो फजित पावला व लोक त्याला बेहिंमती, कमअकली, धोरणशून्य आणि मूर्ख म्हणू लागले.
          या संदर्भात सातारकर महाराजांतर्फे एक म्हणता येते की त्यांस बाजीरावाने कैदेत ठेवले होते वा त्यांची आज्ञा त्याने शिरसावंद्य केली नाही म्हणून ते शत्रूस जाऊन मिळाले. पण हे म्हणणे फारसे टिकाऊ नाही. बाजीराव हा गादीचा एक नोकर होता. त्यास महाराजांनी दूर करून त्याची खोड मोडावयास पाहिजे होती. त्यास काढून वा काढल्याचे जाहीर करून कोणीही दुसरा इसम ते त्या जागी नेमते, किंवा स्वतःच कारभार पाहते तरी उत्तम झाले असते. पण तेवढा आटोप महाराजांत नव्हता. आणि असें होते तर त्यांनी आपल्या गादीवर दुसरा कोणी पराक्रमी पुरुष नेमावयाचा होता. किंवा प्रतिनिधीच्या अथवा चिटणीसाच्या हाती कारभार द्यावयाचा होता. पण तसे ना करता ते जाऊन शत्रूच्या अंकीत झाले. परक्या सैन्याच्या जोरावर जो राजा आपला अंमल बसवू पाहतोतो नेहमी फसतो. शत्रूच्यामदतीने जो राजा आपल्या राजधानीतप्रवेशकरतो त्याचेहातात ती राजधानी फार काळ कधिःही टिकत नाही. महाराज, महाराजांचे चिटणीस, त्यांचे खानदानी सल्लागार या सगळ्यांचीच अक्कल कशी गेली याचे फार नवल वाटते. इंग्रजांनी राघोबादादाला वा त्याचे मुलाला अडचणीत गाठून त्याजपासून राष्ट्राला परिणामी घातक असे तह करून घेतले, वा या बापलेकांनी पेचात सापडून ते करून दिले हे खरे आहे.....
          हा लेखांक वाचला म्हणजे बाजीरावाने स्वराज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर घातले हे म्हणणे लुळे पडते. स्वराज्यावर तिलांजली देऊन सातारकर महाराजांनी आपण होऊनइंग्रजांच्या हातावर उदक घातले ही गोष्ट स्पष्ट होते. या दानाची सामग्री करून त्याचे सर्व मंत्र महाराजांच्या चिटणीसांनी म्हटले होते....
          बाळाजी विश्वनाथापासून चार सहा पिढ्या पेशव्यांच्या पुरुषांनी कमरेला तलवार बांधून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सतत गस्त घातली. सदैव महाराष्ट्राची कोतवाली केली. महाराष्ट्राने स्वस्थ निजावे या करीताते रात्रंदिवस जागत राहिले राहिलेवा अनेक संकटे भोगलीती सर्व लयास गेली. राघोबाने वा बाजीरावाने दरवाजाची दिंडी उघडून इंग्रजांस आत घेतले हे खरे असलेतरी आत आलेल्याला बाहेर घालवणे आणि नोकरांना नतिजा पोचविणे हे घरच्या घरधन्याचे काम होते. आता अगदी शेवटी माल्कम साहेबानी बाजीरावा जवळून ब्रह्मावर्तास स्वस्थ बसण्याचा करार करून घेतलावा तो त्यांनी करून दिला हा दोष कोणी बाजीरावावर लादू पाहील. पण बाजीरावाच्या पदरी हा ही दोष कोणा विचारवंताला बांधता येणार नाही. कारण माल्कमसाहेबाचा करार ता ४ जून १८१८ रोजी झाला. व यापूर्वी बरेच दिवस, म्हणजे दोन महिने पूर्वी बाजीरावास सातारकर महाराजांनी पेशवाई पदावरून दूर करून बंड ठरविल्याचे दि ४ एप्रिल १८१८ रोजी जाहीर केले होते. त्यामूळे हा करार केला त्यावेळी बाजीराव हा पेशवा नव्हता. राज्याची कोण्याही प्रकारची मुखत्यारी सातारकर महाराजांनी त्याच्याकडे ठेवली नव्हती. त्यावेळी बाजीराव हा कोणी जबाबदार मनुष्य नसून खासगी ईसम होता वा या नोकरीवरून दूर केलेल्या ईसमाने स्वतःच्या पोटाची व्यवस्था केली ईतकेच. ज्यांनी शिवाजीमहाराजांचीआणि त्यांच्यावंशजांची पाच सात पिढ्या नोकरी बजावली बजावली व औरंगजेबाने नामशेष केलेल्या शिवाजीच्या वंशजांना हिंदुस्थानात अत्युच्च पदावर नेऊन बसवले वा त्यांच्या पुढे प्रत्यक्ष दिल्लीच्या बादशहांना लवावयास लाविले त्या भटांच्या वंशजाला परकीयांच्या चिथावणीने प्रतापसिंहानी नोकरीवरून दूर करून बंड ठरविले आणि त्याला व त्याच्या कुटूंबातील सर्व माणसांना दोन प्रहरच्या अन्नाच्या घासाला मोताद करून सोडले सोडले तेव्हा आपल्या अन्नाची सोय लावून घेणे त्याला भाग पडले यात चूक ती काय ?
          बाकी बाजीरावात असावी तितकी कर्तबगारी नव्हती हे उघड आहे. त्याच्या नावावर अनंवित कृत्ये व असह्य जुलूम करून दौलतराव शिंद्याने सर्व पुणे शहराला त्याचा वीट आणला होता. त्याचे बहूतेक हस्तक व सरदार शत्रूच्या जाळ्यात गुंतले होते. वा आपमतलबानेते त्याच्या मानेवर फिरवण्यासाठी सुर्‍या पाजवीत होते. इंग्रजांनी त्याचे घर पोखरून टाकले होते व सावकारांनी त्याला गिळला होता. उठावे त्याने लचके तोडावे अशी त्याची कुतरतोड झाली होती. आजाची अक्कल नातवात नव्हती असे उघड दिसते. पण याच्या पलिकडे जाऊन आपण बाजीरावावर नसते आरोप करतो वा काही त्याच्या अंगी नसलेले दुर्गुण चिकटवू पाहतो तेव्हा मात्र आपण सपशेल गोत्यात पडतो. कोणी कोणी बाजीरावाला फार खादाड वा मोठा खर्चिक म्हणतात. पण उपलब्ध हिशेबावरून हे खरे दिसत नाही. वर्षानुवर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या दरिद्री कपाळ करंट्यांनी आपल्या भिकार राहणीशी हिंदुस्थानात सर्वात खानदानी राहनीच्या व सात पिढ्यांच्या श्रीमंतीची राहणी तोलून पाहून त्या राहणीला व भोजनाला उधळपट्टी म्हणावी हे साहजीक आहे. वस्तुतः बाजीराव आपला खर्च कसोशिने करीत असे असे पेशव्यांचा बखरकार म्हणतो. बरं पेशव्यांचा कट्टर शत्रू एलफिन्‍स्टन काय म्हणतो पहा- “ He was frugal but not parsimonious in his expenses & at once courteous & dignified in his manners (Life of elphinstone Vol I- page 289) ”
     यावेळी इंग्रजांवर स्वारी करण्याची आवश्यकता बाजीरावांस निकट जाणवली होती, व या आपल्या स्वारीस श्रीमंत महाराज प्रतापसिंह यांची मंजुरी घेण्यासाठी बाजीरावांनी माहुली मुक्कामी भेट घेतली आणि त्यांस सांगितले की इंग्रज यांचा व आमचा बिघाड झाला आहे. हे बोलणे बोलून बाजीरावांची पाठ फिरली न फिरली तोच सातारकर महाराजांनी बळवंतराव चिटणीस यांस आज्ञा केली की हा मजकूर आलपिष्टन बहादूर यांस कळवावा. आणि त्याप्रमाणे आपल्या पेशव्याने केलेल्या मसलतीची बित्तम बातमी महाराष्ट्राच्या या मालकाने महाराष्ट्राच्या शत्रूंस ताबडतोब कळवली. बाजीरावांना प्रतापसिंहांची ही लक्षणं पूर्वीपासूनच माहित असल्याने त्यांनी प्रतापसिंहांना नजरकैदेत ठेवले होते. पुढे अर्थात, पेशव्यांना दूर केल्यावर काही वर्षे सातारकर महाराजांना राज्य नशिबास आले, पण काही काळातच एलफिन्स्टनने त्यांना दूर केले अन्‍ मग रंगो बापुजीचे राज्यासाठी इंग्रजांकडे हेलपाटे सुरू झाले. सातारकर महाराजांना गादीवर बसवणे व त्यांच्या हातून जाहिरनामे काढवणे हेच महाराष्ट्राचे राज्य साधण्याचे उत्तम साधन आहे असे इंग्रजांनी ठरविले. महाराष्ट्राच्या सिंहासनावर चढण्याची सातारकर महाराज ही एक सोयिची पायरी आहे असे जाणून त्यांनीती पायरी सोयीसाठी पुन्हा उभी केली व आपले कार्य उरकून महाराष्ट्राचे सिंहासनावर चढल्यानंतर त्यांनी त्या पायरीची वाटेल ती वाट लावली. सुमारे पंचवीस-तीस पावसाळे लोटले नाहीत तोच त्यांनी ती पायरी उचलून दूर भिरकावून दिली. सातारकर महाराज प्रतापसिंह यांना काशिस नेऊन टाकले याप्रमाणे करून त्यांस व त्यांच्या पेशव्यांस गंगास्नान करून स्वस्थ बसणे भाग पडले. सातारकर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज व त्यांचे पेशवे असे दोघेही जण जे एकदा महाराष्ट्राबाहेर गेले ते कायमचेच गेले. त्यांचे पाय पुन्हा महाराष्ट्रास लागले नाहीत. मराठ्यांनी मोठ्या अभिमानाने स्थापलेल्या सातारच्या गादीची यापुढे झालेली विटंबना व त्या गादीच्या खावंदांची दैना महाराष्ट्राच्याने खासच ऐकवणार नाही अशी ती हृदयविकारी आहे. कडू बदामाच्या व आक्रोडाच्या झाडाला पन्नास-साठ वर्षांनी फळे येतात असे म्हणतात. परंतू प्रतापसिंह महाराजांनी रुजवलेल्या या कारस्थान वृक्षाला तीस पस्तिस वर्षातच फळे आली आणि ती त्यांस, त्यांचे वंशजांस व त्यांचे सेवक जे आम्ही महाराष्ट्रीय लोक, त्या आम्हां सर्वांस चाखित बसणे भाग पडले, हे महशूरच आहे !
          असो, जुने ऐतिहासिक लेख मिळवून त्यांच्या अस्सलपणा बद्दल खात्री करून घेऊन तो शाबित करावा व त्यांच्या अभ्यासाने जे सिद्धांत निघतील ते महाराष्ट्रापुढे निर्भिडपणे मांडावेत हेच इतिहास संशोधकाचे खरे कर्तव्य आहे व यातच राष्ट्राचे कल्याण आहे असे जाणून राष्ट्राचे विचार लिहून काढले. आज गेली शंभर वर्षे आपण ज्या पेशव्यावर शिव्यांची लाखोली वाहत सुटलो त्याचे शेवटचे वर्तन आता नवीन पुराव्याच्या दृष्टीने कसे दिसते हेहीन्यायी महाराष्ट्र उत्सुकतेने ऐकेल असे वाटून हे विचार प्रसिद्ध केले. तूर्त इतकेच म्हणावयाचे आहे की, ज्या व्यक्तीवर केवळ सुखविलासाकरता आळशी बनून महाराष्ट्र इंग्रजांच्या स्वाधीन केला असा आरोप ठेवितो तो आरोप कितपत खरा आहे ? त्या व्यक्ती शिवाय इतर कोणी या कृत्यांत भागिदार होता किंवा काय ? असल्यास दोषाची वाटणी कशी होऊ शकेल ? की हा दोष सर्वस्वी आपण समजत होतो त्याहून निराळ्याच व्यक्तीकडे जाऊन पडेल ? असे काही मुद्दे यावे इतकाच हेतू आहे. (संदर्भ : मराठी दफ्तर रुमाल २, प्रस्तावना : वि.ल.भावे )

वरील लेखात मराठी राज्य बुडण्यास खरंच बहुतांशी बाजीराव दोषी होते का इतरांचाही त्यात 'मोलाचा वाटा' होता हे स्पष्ट समजून येतंच आहे, पण हे झाले भाव्यांचे प्रतिपादन. खुद्द एलफिन्‍स्टन पेशवाई बुडण्याआधी तीन वर्ष (१८१५) मध्ये त्याच्या रोजनिशीत लिहीतो, "यांच्या मनात जे मोठेमोठे बेत सुरु असतात ते तडीस नेण्यास यांच्या अंगचा मुख्य मनोविकार- भित्रेपणा आड येतो. मनात एक आणि जनात एक असे दाखवण्याचे विलक्षण कपट यांच्या अंगी आहे. त्यामूळे आपले खरे मनोविकार हेतू गुप्त ठेऊन मनात ज्यांचा गंधही नाही असे विचार यांना बाह्यात्कारी दाखविता येतात. यामूळेच यांच्या स्वभावाविषयी कोणालाही नक्की अंदाज येत नाही. जर यांच्या अंगी थोडेसे अधिक धैर्य असते, तर ते महत्वाकांक्षी, जुलमी, दुराग्रही व मोठे खटपटी झाले असते. तसेच ज्या गोष्टी करण्याकडे (म्हणजे इंग्रजांना हाकलून लावण्याकडे) यांच्या मनाची प्रवृत्ती असते व जी प्रवृत्ती हल्लीतर विशेष प्रबळ आहे ती जोरावली असती. हे दुर्गुणांचे (इंग्रजांच्या दृष्टीने) पारडे झाले. याशी गुणांचे पारडे लावून पाहता आपणास असे कबूल केले पाहिजे की पेशव्यांचे बुद्धीसामर्थ्यही काही कमी नाही. पैशासंबंधी यांचा व्यवहार सचोटीचा आहे. यांची वागणूक सभ्यपणाची व यांच्या पदवीस शोभण्यासारखीही आहे" (सं: ओककृत पे.घ.इ., मूळ सं: Life of Mount-Stuart Elfinston, J. S. Cotton). आता बाजीरावांचा भित्रेपणा सोडल्यास एलफिन्‍स्टनसारखा बाजीरावांचा कट्टर शत्रू, ज्याने मराठी राज्य बुडवण्यासाठी अथक प्रयत्न केले तो सुद्धा एकप्रकारे बाजीरावांचं कौतुकच करतो आहे पहा. एलफिन्‍स्टन ज्या गोष्टी 'जुलमी, दुराग्रही आणि मोठ्या खटपटीच्या' म्हणतो त्या इंग्रजांच्या दृष्टीने आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्या फायद्याच्या गोष्टी या इंग्रजांच्या दृष्टीने जुलमीच्या असणार यात शंका ती कोणती. 

एकूणच पेशवाईविषयी आणि पेशव्यांविषयी आजही मराठी माणसाच्या मनात आदरापेक्षा तिरस्कारच दिसून येतो. वास्तविक पाहता पेशवाईचा कालखंड म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपानच म्हटलं पाहिजे, कारण तसं पाहिलं तर कोणतंही राज्य बाल्यावस्थेत असताना 'आदर्श राज्य' असतंच, पण त्याचा विस्तार होतो तेव्हा मात्र काही गोष्टी या नीतिनियमांना सोडून घडतात. जगातील कोणतंही साम्राज्य या गोष्टीला अपवाद नाही. मूळात,  कोणतंही राज्य कायम टिकत नाही आणि ते राज्य बुडताना साहजिकच त्याच्या नाशाकरीता त्या राज्याच्या शेवटच्या राजाला कारणीभूत धरलं जातं, कारणं काहीही असोत. त्यामूळे या न्यायानुसार बाजीराव कारणीभूत होते हे इतिहासात नमुद करावं लागतंच, पण आपणही सारासार विचार केला पाहिजे हे तितकंच खरं. सध्याच्या दिवसेंदिवस वाढणार्‍या राजकारणाच्या डावांत इतिहास आणि त्यातील पात्रांना खेचून त्यातील विकृतीकरण करण्याकडे कल वाढला आहे. अशा वेळेस निदान आपण आपल्या समोर ठेवलेला इतिहास कितपत सत्य आहे याची पडताळणी करायला हवी. नाहीतर जातियवाद्यांचं चांगलंच फावतं. पेशव्यांच्या विषयी असलेले  गैरसमज दूर करावेत हा एकच उद्देश नजरेसमोर ठेवून सदर लेख मी लिहीलेला आहे. इथे जातियवाद आणावा अथवा एखाद्याची जात हेरून त्याला निशाणा करावे हा हेतू अजिबात नाही. बहुत काय लिहीणे ? आपण वाचक थोर सुज्ञ आहात, दिलेल्या पुराव्यांची पडताळणी करून हे लिखाणही तपासू शकता. अखेरीस, आमचे अगत्य असू द्यावे ही विज्ञापना... 

: कौस्तुभ कस्तुरे     ।     kasturekaustubhs@gmail.com
Also visit : www.facebook.com/shrimantpeshwai