छत्रपती शिवरायांचा सावरकरांच्या राजनीतिवरील प्रभाव        छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत ! मग आयुष्याच्या प्रत्येक क्षणी केवळ मातृभूमीच्या कल्याणाचा विचार करणारा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा महान देशभक्त याला अपवाद कसा असेल ? वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात असताना सावरकरांनी शिवरायांची आरती रचली. शिवराय हे सावरकरांचे स्फुर्तीस्थान होते हे उघडच आहे, पण त्यासोबतच शिवरायांचं नाव उच्चारल्यावर महाराष्ट्राचं मन कृतज्ञतेनं अपरंपार भरून येतं हे सावकर जाणत होते.
म्हणूनच शिवरायांच्या आरतीत तिसर्‍या चरणात म्लेंच्छांच्या घाल्यासोबतच तत्कालिन आंग्लांच्या दास्याविषयी सुद्धा आडून सुचवतात, “त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलो । परवशतेच्यापाशी मरणोन्मुख झालो”. वरवर पाहता सावरकरांनी रचलेली ही आरती इतर आरत्यांसारखीच वाटत असली तरी ती सावरकरांची कविता होती ! शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून इंग्रजांच्या वर्चस्ववादाला आव्हान करण्याचे आवाहन सावरकर याआडून करत होते ! इथे एक गोष्ट मुद्दाम नमुद कराविशी वाटते. शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या सोळाव्या वर्षी मातृभीमीच्या स्वतंत्रतेची आणि संरक्षणाची शपथ घेतली होती आणि सावरकरांनीही वयाच्या सोळाव्या वर्षी भगूरच्या निवासस्थानी महामंगला अष्टभूजा देवीसमोर नेमकी तीच शपथ घेतली ! फक्त महाराजांची शपथ म्लेंच्छांच्या विरुद्ध होती आणि तात्यारावांची आंग्लांच्या विरुद्ध एवढाच काय तो फरक !
          हिंदुपदपादशाही या ग्रंथाच्या हिंदवी स्वराज्य या प्रकरणाची सुरुवातच तात्याराव “त्या तरुण वीराने क्रांतियुद्धाची उठावणी केली” अशी करतात. सावरकरांच्या हिंदुत्वाची मूळ संकल्पना ही शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याचीच आहे ! सावरकर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यकल्पने बाबत म्हणतात, “मराठ्यांनी केलेली उठावणी ही अगदी प्रारंभीसुद्धा केवळ वैयक्तिक किंवा विशिष्ट वर्गाची संकुचित चळवळ नव्हती. हिंदूधर्माच्या संरक्षणासाठी, परकी मुसलमानी सत्ता उलथवून पाडण्यासाठी, स्वतंत्र आणि समर्थ असे हिंदवी साम्राज्य स्थापन करण्यासाठी केलेली ती आमुलाग्र हिंदू चळवळ होती”. हिंदूंचं तत्व ते हिंदुत्व ! सावरकरांचं हिंदुत्व हे सुद्धा कोणत्याही प्रकारचं जातिभेद अथवा वंशभेद, किंबहुना धर्मभेदही मानणारं नसून ते अखिल हिंदुस्थानच्या प्रति निष्ठा व्यक्त करणार्‍या प्रत्येक मनुष्याशी निगडीत होतं. म्हणूनच, या  हिंदुत्त्वाची व्याख्या करताना हिंदू म्हणजे नेमके कोण ? सावरकर म्हणतात –
आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका ।
पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृतः ॥
म्हणजेच सिंधुनदीपासून सिंधुसागरापर्यंत पसरलेली ही भारतभूमी आपली पितृभूमी आणि त्याचसोबत पुण्यभूमी म्हणून जो जो मानतो आणि गर्वाने सांगू शकतो तो तो हिंदू होय (हिं.रा.द.-४) ! मग तो कोणत्याही पंथाचा असो, तो हिंदूच ! यामूळेच शिख, जैन, बौद्धादी पंथातले लोक हेसुद्धा हिंदूच आहेत ! हिंदूंच्या स्वराज्याविषयी सावरकर म्हणतात, “नुसते भौगोलिकदृष्ट्या बोलावयाचे झाले तर एखाद्या  अल्लाउद्दीन खिलजीचे किंवा औरंगजेबाचे राज्य चालू असते वेळीही दुसर्‍या कोणत्याही अहिंदू सत्तेपासून भूमी नि राज्य या नात्यानी हिंदुस्थान पुर्णपणे स्वतंत्रच होते ! परंतू हिंदुस्थानचे त्याप्रकारचे स्वातंत्र्य हे हिंदुराष्ट्राला खरेखुरे मृत्यूचेच आज्ञापत्र ठरले. संग आणि प्रताप, गुरु गोविंदसिंह नि वीर बंदा, शिवाजी नि बाजिराव हे जे आपल्या मातृभूमीत सर्वत्र लढले नि पडले नि अंती जयही पावून मराठ्यांच्या नि राजपुतांच्या नि शिखांच्या नि गुरख्यांच्या सत्तेखाली हिंदू साम्राज्याची प्रस्थापना करते झाले; आणि अहिंदू अतिक्रमणाच्या मुठीतून आपले हिंदुजगत रक्षिते झाले; ते या कारणाने होत ! या देशात जन्माला आलेले इंग्रज हे देखिल याच भारताचे नागरिक होतात. मग शंभर वर्षांनी इंग्रजांची सत्ता आपण का मान्य करू शकत नाही ? औरंगजेब काय आणि टीपू सुलतान काय, या दोघांचाही जन्म इथलाच असल्याने त्यांचे राज्य हे हिंदूंचे स्वराज्य होते काय ? नाही. कारण त्यांचा जन्म इथला असला तरीही ते हिंदूंचे कट्टर वैरीच होते. आपली मूळ हिंदूंची राज्ये नष्ट करून त्यांनी त्यांची राज्ये स्थापन केली होती. त्यांची निष्ठा मक्क-मदिनेलाच होती. आणि म्हणूनच हिंदूंचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी महाराणा प्रतापापासून श्रीमंत पेशव्यांपर्यंत सार्‍यांना या मुस्लिम वर्चस्ववादाशी झगडावे लागले होते.
          पण असं असतानाही, हे स्वराज्य धर्मभेदावर आणि जातिभेदावर आधारीत असल्याचं सावरकरांना अजिबात मान्य नाही. याविषयी सावरकर म्हणतात, “.. पण ते हिंदी राज्य मात्र निर्भेळ हिंदी असूद्या ! त्या राज्याने मताधिकार, नोकर्‍या, अधिकाराची स्थाने, कर यांच्या संदर्भात धर्माच्या नि जातिच्या तत्वांवर कसल्याही मत्सरोत्तेजक भेदाभेदांना मूळीच थारा देऊ नये. कोणताही मनुष्यहिंदू आहे की मुसलमान आहे की ख्रिस्ती आहे की ज्यू आहे इकडे लक्षच दिले जाऊ नये. त्या हिंदी राज्यातील सर्व नागरीक सर्वसामान्य लोकसंख्येतील त्यांची धार्मिक किंवा जातीय शेकडेवारी विचारात घेतली न जाता ज्यांच्या त्यांच्या वैयक्तिक गुणावगुणानुसार वागविले जाऊ द्यात..” असं राज्य बनवण्याकरीता जो कोणी विरोध करेल त्याला सावरकर बजावून सांगतात, “याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यावाचून; पण जर तुम्ही विरोधाल तर तुम्हाला न जुमानता आम्ही हिंदू हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा लढा यश येईतो लढत राहू नि चांगली झुंज देऊ !”.
          हिंदू समाज हा शांती, अहिंसा, विश्वबंधुत्त्व या तत्त्वांवर आधारीत असल्याने येथील पारंपारीक राज्यकर्त्यांच्या नशिबी विरह आला. मुसलमानांनी आणि सुलतानांनी आपल्या भूमीत बस्तान मांडले. क्रांती हा उत्क्रांतीचा नियमच आहे. निर्माण केलेली कोणतीही गोष्ट अखेर नाशच पावते. शिवाजी महाराजांनीही अखेर सुलतानांविरुद्ध बंड मांडले. नव्हे नव्हे, क्रांतीच केली ! स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्त्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रातल्या मुसलमानांना, जे महाराष्ट्रभूमीशी निष्ठा राखून होते, इथल्या भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानत होते, त्यांना कधिही आपल्यापासून वेगळे मानले नाही. उलटपक्षी, दौलतखानासारख्या, इब्राहीमखानासारख्या मुसलमानांना त्यांनी आपल्या बलाढ्या आरमाराचे ‘सरखेल’पद दिले. नूरखान बेग सारख्या मुसलमानांकडे पायदळाचे सेनापतीपद दिले. केळशीकर बाबा याकुत, श्रीगोंद्याचे शेख महंमदबाबा यांच्याचरणी शिवाजी महाराजांची समर्थ रामदास स्वामी अथवा तुकाराम महाराजांइतकी निष्ठाच होती. परंतू औरंगजेबासारख्या, आदिलशाहसारख्या, हबश्यांसारख्या क्रूर मुसलमानांविषयी मनात प्रेम कसे निर्माण होऊ शकते ? शिवाजी महाराजांनी यांच्या बंदोबस्ताकरीता, त्यांना हाकलून लावून अखिल हिंदुस्थान यवनांच्या कचाट्यातून सोडवून तिर्थक्षेत्रे मुक्त करण्याकरताच हा स्वराज्याचा उद्योग आरंभला होता. सुलतान हे हिंदूंचे आणि हिंदुधर्माचे कधिच पुरस्कर्ते नव्हते. हिंदूं पुरुषांचा वापर त्यांनी फक्त लढायांकरता आणि हिंदू स्त्रियांचा वापर केवळ शारीरिक उपभोगाकरताच करून घेतला होता. अहमदनगरच्या निजामशाही सुलतानांचे, विजापूरच्या आदिलशाहीचे, दिल्लीच्या मोंगलांचे मोठमोठे मनसुबे मराठेच पूर्ण करत होते, पण त्याबदल्यात मराठ्यांना काय मिळत होते ? केवळ कस्पटासारखी वागणूक !
          विशिष्ट असा हिंदुधर्म आणि सार्वभौम हिंदुत्त्व यातील फरक सावरकरांनी विषद केला आहे तो असा-  हिंदुलोक ज्या धार्मिक पंथांना वा मार्गांना अनुसरतात ते पंथ वा मार्ग म्हणजे हिंदुधर्म अथवा Hinduism. पण हिंदुत्वाचा अर्थ हा त्यापेक्षाही व्यापक नि संग्राहक असा आहे. यात हिंदुधर्म या शब्दाप्रमाणे केवळ हिंदू लोकांच्या धार्मिक दृष्टीचा विचार नसून सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीचाही त्यामध्ये अंतर्भाव होतो. या शब्दाचे इंग्रजीत तंतोतंत भाषांतर करायचे झाले तर ते Hinduness असे होईल.
          सावरकरांना आपल्या मातृभूमीसाठी आयुष्यभर सगळ्यात जास्त कोणाशी झगडावे लागले असेल तर ते अर्थातच इंग्रजांशी ! इंग्रजांविषयी रामचंद्रपंतांनी आज्ञापत्रात शिवाजी महाराजांचे विचार लिहून ठेवले आहेत,सावकारांमध्ये फिरंगी इंगरेज, फरांसिस, डिंगमारादी टोपीकर लोकही सावकारी करीतात. परंतू ते वरकड सावकारांसारखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्येक राज्यच करीतात. त्यांचे हुकुमाने हे लोक या प्रांते सावकारीस येतात.  राज्य करणार्‍यांस स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते. तथापी टोपिकरांचा या प्रांते प्रवेश करावा, राज्य वाढवावें, स्वमत प्रतिष्ठावे हा पूर्ण अभिमान. तद्नुरूप स्थळोस्थळी कृतकार्याही जाले आहेत. त्याहीवरी हट्टी जात, हातास आलेले स्थळ मेलियानेही सोडावयाचे नव्हेत.” अशा या इंग्रजांचे पाणी सावरकरांनी चांगलेच जोखले होते. ते म्हणतात, “हिंदुस्थानातील ख्रिस्ती धर्मप्रचारकांना राज्यसत्तेचा राजकीय पाठिंबा अर्थात प्रत्यक्ष सहाय्य पुरवून हिंदूंना ख्रिस्ती करण्याचा उघड उपायही ब्रिटीशांनी चोखाळून पाहिला. हिंदुस्थानास अराष्ट्रीय बनवणारी पाश्चिमात्य शिक्षणाची योजना प्रविष्ट करून हिंदू तरुणांच्या उगवत्या पिढीच्या मनातील साक्षात हिंदुराष्ट्राविषयीच्या कल्पनेखालीच सुरुंग लावण्याचे धोरण त्यांनी चालू केले. स्वतः मेकॉलेचेच उद्गार त्याविषयी आहेत. आपल्या लिहीलेल्या एका  घरगुती खासगी पत्रातच आपली पाश्चिमात्य  शिक्षणाची योजना चालू केल्यास हिंदू तरुणांना आपण होऊनच ख्रिस्ती होणे अंतर्बाह्य पाश्चिमात्य बनणे आणि  शेवटी ब्रिटीश लोकांशी संलग्न नि समरस होणे प्रिय वाटू लागेल असे मेकॉलेने स्पष्ट दाखवून दिले आहे.
          सामाजिक चळवळींतही महाराजांच्या सामाजिक समता आणि न्यायाचा प्रभाव सावरकरांवर पडलेला दिसून येतो. वर वर्णन केल्याप्रमाणेच सावरकरांच्या हिंदुत्वात धर्मभेदाला थारा नव्हता तर जातिभेदाला कुठून असणार ! पूर्वीपासून हिंदुधर्मातील रोटीबंदी-बेटीबंदी व्यवहार, अस्पृष्यता इत्यादी अनिष्ट प्रथांना सावरकरांनी कायम विरोध केला एवढंच नव्हे तर एकसंध हिंदुसमाज निर्माण करण्यासाठी सहभोजन’, मंदिरप्रवेश यांसारखे सामाजिक कार्यक्रम हाती घेऊन महाराजांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याचा पाया बळकट केला. जी गोष्ट सामाजिक समतेची तीच देशाच्या संरक्षणाची ! हिंदुस्थानच्या सीमा या बळकट असाव्यात आणि परकीय आक्रमण झाले तर आपले सैन्य सदैव तत्पर असावे हे सावरकरांचे कायम सांगणे होते. महाराजांनीही स्वराज्यातील सीमांचे संरक्षण आणि सैन्याच्या उभारणीला कायम प्रोत्साहन दिल्याचे दिसून येते.
          सावरकरांच्या आयुष्यातील अनेक घटनाही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील घटनांशी मिळत्याजुळत्या दिसतात, अर्थात, महाराजांचा काळ आधीचा असल्याने सावरकरांच्या आयुष्यावर त्यांचा प्रभाव पडला हे उघडच आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर मे १६६६ साली महाराज आग्र्याला औरंगजेबच्या दरबारात गेले. इतिहासतज्ञांच्या मते महाराजांनी ही एक मोठी चूक केली. पण तत्कालिन परिस्थिती पाहता, महाराजांनी प्रत्यक्ष औरंगजेबाच्या घरात जाऊन त्याची नीट पाहणी करण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घेतला. दुर्दैवाने महाराज औरंगजेबाच्या कैदेत अडकले. सावरकरांच्या बाबतीतही काहीसे असेच झाल्याचे दिसते. सुरुवातीला सावरकरांनी मित्रमेळा आणि पुढे तिचे अभिनव भारत मध्ये रुपांतर केले खरे, पण इंग्रजांच्या राजनितीला नीट समजून घ्यायचं झाल्यास इंग्लंडला जाण्यावाचून पर्याय नाही हे सावरकरांनी पक्के ओळखले ! दुर्दैवाने इथे शिवाजी महाराजांप्रमाणे सावरकरांनाही अटक करण्यात आली. पुढे महाराजांनी औरंगजेबाला दाखवण्यापुरती जी क्षमायाचना केली त्याचप्रकारे सावरकरांनीही इंग्रजांच्या कैदेतून येनकेनप्रकारे सुटण्यासाठी इंग्रजांना लिहीएल्या पत्रात दिखाऊ वाक्य लिहीली असतील समजा (वास्तविक तसा माफिनामा लिहील्याचे पुरावे अजिबातच नाहीत, आणि हे नुकतंच सिद्धही झालं आहे) तरी सावरकर हे इंग्रजांचे अंकीत होते अथवा त्यांना शरण गेले हे मात्र सिद्ध होत नाही ! उलट १९३७ साली रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून सुटल्यानंतर; ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह मोडल्यानंतर औरंगजेबाविरुद्ध वेगवान आघाडी उघडली त्याप्रमाणे सावरकरांनीही पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने आपले काम जोमाने सुरु केले.
          सावरकरांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या राजकारणांवर महाराजांच्या राजकारणांचा प्रभाव पडला होता हे सहज दिसून येते ! मग तो प्रभाव धार्मिक विचारांचा असेल, तो सामाजिक एकात्मतेचा आणि विचारांचा असेल वा तो संरक्षणात्मकदृष्ट्या असेल ! अन्‌ म्हणूनच, महाराजांच्या विचाराने प्रभावित असा शतपैलू द्रष्टा आणि थोर देशभक्त या पवित्र भूमीला लाभला. महाराष्ट्राच्या मातीतल्या या दोन थोर युगपुरुषांना साष्टांग नमन !


© कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com