श्रीमंत गोपिकाबाईसाहेब पेशवे


गोपिकाबाईंचा जन्म १७२५ सालचा. वाईच्या भिकाजीराव शामजी रास्त्यांची ही मुलगी. पेशवे घराण्याच्या हकीकतीनुसार दि. ११ जानेवारी १७३० रोजी वाई येथे शाहु महाराजांच्या उपस्थितीत नानासाहेब आणि गोपिकाबाईंचा विवाह झाला.


गोपिकाबाई या बर्‍याच वेळा नानासाहेबांसोबत स्वार्‍यांवर जात असत. त्यांना मोडी लिपी येत नसे परंतू देवनागरी मात्र उत्तम प्रकारे लिहीता-वाचता येई. राजकारणी बाबतीतही गोपिकाबाईंचा हातखंडा होता. अतिशय करारी, तेजस्वी महत्वाकांक्षी, आणि उग्र पण तितक्याच हुशार आणि समंजस स्वभावाच्या गोपिकाबाईंचा माधवरावांवरही धाक होता. पानिपतची बखर लिहायला गोपिकाबाईंनीच रघुनाथ यादवाला लिहावयास सांगितली.. बखरकार म्हणतो- "पाणिपतची बखर ही श्रीमंत महाराज गोपिकाबाईसाहेब मुकाम शहर पुणे यांणी लिहीण्यास सांगितली ती रघुनाथ यादव लेखक दिमत चिटणीस यांणी लिहीली".

माधवरावांच्या स्वभावाची बीजे गोपिकाबाईंच्या या धाडशी आणि धडाडीच्या स्वभावातूनच रुजली होती. अखेरीस एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत म्हणून गोपिकाबाई १७६४ पासून शनिवारवाडा सोडून गंगापुरला स्थायिक झाल्या. माधवरावांनी त्यांना बेलगाव आणि गंगापुर ही नाशिकजवळची दोन गावे खासगत खर्चासाठी लावून दिली होती. गंगापुरला गोपिकाबाईंसाठी माधवरावांनी १८ हजार रुपये खर्चून प्रशस्त दोन चौकी आणि तीन मजली वाडा बांधून दिला होता. येथे गंगाबाईंचे कारभारी म्हणून रामचंद्र नारायण गोरे नावाचे एक कारभारी माधवरावांनी नेमून दिले होते.

स्वतःच्या हयातीतच आपले पती नानासाहेब आणि विश्वासराव, माधवराव, यशवंतराव, मोरेश्वरराव आणि नारायणराव अशा पाचही पुत्रांचे मृत्यू पाहूनही गोपिकाबाईसाहेब पुढची १४ वर्षे जगल्या. नारायणरावांच्या मृत्यूनंतर त्या पंचवटीतील एका मठात रहायला गेल्या आणि जोगिणीप्रमाणे जोगवा मागून मिळणार्‍या भिक्षेवर राहिल्या. पुन्हा सवाई माधवरावांना पेशवाईची वस्त्रे मिळाल्यानंतर त्या गंगापुरला परतल्या. त्यांनी नाशिकजवळ बरीच देवळे बांधली शिवाय गंगापुरचे श्रीकृष्ण बालाजीचे मंदिर बांधवून घेऊन सालिना १ लक्ष रुपयांची सनद सवाई माधवरावांअडून करवून घेतली. इ.स. १७८४ मध्ये त्यांनी आपल्या नातवाला, सवाई माधवरावांना प्रथम पाहिले. पुढे १७८८ मध्येही नाना-हरिपंततात्यांनी सवाई माधवरावांना गंगापुरला नेले होते. यावेळेस आजीने आपल्या नातवाला राज्यकारभार कसा करावा यासंबंधी उपदेश केला. अखेरीस पुढे ३ ऑगस्ट १७८८ रोजी पहाटे गोपिकाबाई पंचवटी येथे वारल्या. गोपिकाबाईंच्या उत्तरक्रियेसाठी रोख रु २७९५० आणि कापड रु ५५७९ मिळून एकूण ३३५२९ रु खर्च झाला. उत्तरक्रिया त्यांचे बंधू गंगाधर भिकाजी रास्ते यांनी पंचवटीला तर पुढचे सर्व विधी सवाई माधवरावांनी पुण्यात केले.

संदर्भ :
१) पेशवे घराण्याची हकीकत
२) खरेकृत ऐ.ले.संग्रह लेखांक ११३५
३) मराठी रियासत उत्तरविभाग १
४) काव्येतिहास संग्रह लेखांक ३९३
५) पेशवे दफ्तर खंड ४ मधील पत्रे

टीप : सदर छायाचित्र गोपिकाबाईंचे नसुन प्रातिनिधिक आहे. गोपिकाबाईंचे एकही मूळ चित्र अस्तित्वात नाही.
© कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com