शिवशाहीर
सासवडचे पुरंदरे घराणे
हे इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. या घराण्याला निजामशाही वजीर मलिक अंबर आणि
शहाजीराजे भोसल्यांकडून पुण्यात पर्वतीच्या पायथ्याला जमिनी इनाम मिळाल्याची पत्र
आहेत. कसबे सासवडचे कुलकर्ण्य आणि कर्यात सासवडचे देशकुलकर्ण्य पुरंदरे घराण्याकडे
वंशपरंपरागत चालत आले होते. शिवकाळातही या घराण्याने मोलाची कामगिरी बजावली. पुढे
पेशवाईत तर पुरंदरे म्हणजे पेशव्यांच्या घरातलेच एक बनले.
मुळात बाळाजी विश्वनाथांना स्वराज्याच्या चाकरीत येण्यापासून ते पेशवापद मिळेपर्यंत अंबाजी त्रिंबक पुरंदरे यांनी पुढाकार घेतल्याने पेशव्यांनीही अखेरपर्यंत पुरंदर्यांना सख्ख्या नात्याहून अधिक मानले. शनिवारवाडा बांधल्यानंतर शनिवारवाड्याच्या प्रांगणात खुद्द पेशव्यांच्या नातेवाईकांची घरे नव्हती, पण हा अधिकार नानासाहेबांनी महादोबा पुरंदर्यांना दिला. पानिपतला जाताना वाटेत १९ एप्रिल १७६० रोजी भाऊसाहेब बजाबा पुरंदरे यांना पत्र लिहून “घोड्यावर बसणे व लिहीणे पढणे चांगले करणे, लाडके व्हाल ते कामाचे नाही” असं मायेने समजावतात. महिपत त्रिंबक उर्फ बजाबा पुरंदरे हे १०-१२ वर्षांचे असून त्यांचे वडील त्रिंबक सदाशिव उर्फ नानासाहेब पुरंदरे हे भाऊसाहेबांसोबत मोहीमेवर होते. अशा या इतिहासप्रसिद्ध आणि
मुळात बाळाजी विश्वनाथांना स्वराज्याच्या चाकरीत येण्यापासून ते पेशवापद मिळेपर्यंत अंबाजी त्रिंबक पुरंदरे यांनी पुढाकार घेतल्याने पेशव्यांनीही अखेरपर्यंत पुरंदर्यांना सख्ख्या नात्याहून अधिक मानले. शनिवारवाडा बांधल्यानंतर शनिवारवाड्याच्या प्रांगणात खुद्द पेशव्यांच्या नातेवाईकांची घरे नव्हती, पण हा अधिकार नानासाहेबांनी महादोबा पुरंदर्यांना दिला. पानिपतला जाताना वाटेत १९ एप्रिल १७६० रोजी भाऊसाहेब बजाबा पुरंदरे यांना पत्र लिहून “घोड्यावर बसणे व लिहीणे पढणे चांगले करणे, लाडके व्हाल ते कामाचे नाही” असं मायेने समजावतात. महिपत त्रिंबक उर्फ बजाबा पुरंदरे हे १०-१२ वर्षांचे असून त्यांचे वडील त्रिंबक सदाशिव उर्फ नानासाहेब पुरंदरे हे भाऊसाहेबांसोबत मोहीमेवर होते. अशा या इतिहासप्रसिद्ध आणि
पराक्रमी घराण्यात शनिवार दि. २९ जुलै १९२२ (श्रीशालिवाहन
शके १८४४, दुंदुभीनाम संवत्सर, नागपंचमी)
रोजी, सदाशिवपेठेतील शिर्केवाड्यात बाबासाहेबांचा जन्म झाला.
अशा या अतिशय तालेवार ऐतिहासिक घराण्याच्या रीतिरिवाज आणि संस्कारांच्या वातावरणात
बाबासाहेबांचं बालपण हळूहळू आणखी प्रगल्भ होत गेलं. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि
इतिहास संशोधनाची परंपरा घरातच असताना हे बाळकडू अंगी उतरले नसते तरंच नवल !
बालवयातील त्या शिवचरित्रातील गोष्टींपासून ते पुढे भारत इतिहास संशोधक मंडळ, पेशवे दफ्तर अथवा पुणे पुराभिलेखागार आणि अशाच असंख्य संस्थांकडील
ऐतिहासिक मोडी कागदपत्र धुंडाळून त्याचा अभ्यास करण्यापर्यंत हा इतिहाससंशोधनाचा
प्रवाह वाहतच राहिला. भारत इतिहास संशोधक मंडळातील दत्तो वामन पोतदार, य. न. केळकर, ग. ह. खरे इत्यादी संशोधकांच्या सान्निध्यात
हे शिवचरित्राचे वेड आणखीनच फुलत गेले. आणि परिणामी त्यातून जे उदयाला आले ते
अलौकीकच !
अनेक
पुराभिलेखागारांतील अस्सल पत्रे, शकावल्या, याद्या, तहनामे, करीने, बखरी, महजर, कैफियती इत्यादी अभ्यासून आणि अनेक ज्येष्ठ
अन् श्रेष्ठ इतिहास संशोधकांच्या संशोधनातून योग्य असलेले ते पडताळून
“राजाशिवछत्रपति” हे शिवचरित्र साकार झालं. राजाशिवछत्रपतिच्या प्रत्येक पानावर, प्रत्येक ओळीगणिक आपल्याला शिवचरित्रातील शिवगंगा अतिशय निर्मळपणे
खळाळताना आढळेल. या शिवचरित्रात ठामपणे केलेल्या प्रत्येक वाक्याला संदर्भ आहेत, अगदी एकच नव्हे तर दोन-दोन, तीन-तीन संदर्भ !
त्यामूळे अमुक एक कशावरून असं बोट ठेवायला अजिबात जागा नाही. शिवचरित्रासाठी
लागणार्या या संदर्भग्रंथांची यादी कोणी करू म्हणेल तर जुन्नरी कागदाचे चार बंद
नक्कीच भरतील. दिवसरात्र इतिहास
संशोधक मंडळांमध्ये बसून शेकडो संदर्भग्रंथांतून
हजारो नोंदी काढून मग हा ग्रंथ साकार झाला आहे. आणि म्हणूनच,
“राजाशिवछत्रपति” वाचताना आपण प्रत्यक्ष शिवकाळात जाऊन पोहोचतो ! बाबासाहेबांच्या
प्रतिभेचं हे सामर्थ्य आहे. एकेक वाक्य इतकं अलंकारिक आहे की त्या साजशृंगारांनी
हा ग्रंथ अजूनच झळाळून उठतो. हजारो वाक्य खर्ची घालूनही एखाद्याला जे साधणार नाही
ते बाबासाहेब एका वाक्यात सहज समजावून सांगतात.
वास्तविक,
राजाशिवछत्रपति हे अत्यंत साधार असं शिवचरित्र आहे, पण
बाबासाहेब स्वतः मात्र नम्रपणे “राजाशिवछत्रपति म्हणजे मी लिहीलेली विसाव्या
शतकातील एक बखर आहे” असं म्हणतात. प्रचंड
ज्ञान, पुराव्यांची शहानिशा करून,
शिवाजी महाराजांचे साद्यंत चरित्र लिहूनही शिवचरित्राच्या प्रस्तावनेत ते
स्वतःविषयी नम्रपणे “मी विद्वान नाही. पंडित नाही. साहित्यिक नाही. बुद्धीवंत
नाही. इतिहास संशोधक नाही. इतिहासकार नाही. भाष्यकार नाही. जो काही आहे, तो वरच्या
गावरान मर्हाठी सरस्वतीभक्तांच्या केळीच्या पानावरचं त्यांच्या जेवणातून उरलेल्या
चार शिताभातांवर गुजराण करणारा येसकर आहे” असं सांगतात. अर्थात हेच त्यांचे मोठेपण
! कधीही निराधार बोलायचं नाही किंवा लिहायचंही नाही हा नियम बाबासाहेबांनी
आयुष्यभर पाळला. शिवचरित्रातही अनेक गोष्टींना आज हवा तितका ठोस आधार सापडत नाही.
मग अशा वेळेस त्या गोष्टींकडे पुर्णतः दुर्लक्ष करूनही चालत नाही. म्हणूनच जेव्हा
जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा बाबासाहेब “इतिहास मुका आहे”, “इतिहास आंधळा आहे”, “इतिहासाला दिसलं नाही, जाणवलं नाही” असं अगदी सोप्पं करून समजावतात. याचा अर्थ असा की त्यावेळेस
त्या घटनेला ठामपणे विधान करण्यासारखा पुरावा उपलब्ध नाही.
दुर्गतपस्वी कै. गोपाळ
निळकंठ दांडेकर बाबासाहेबांबद्दल म्हणतात, “या माणसाला मी चांगला ओळखून आहे.
शिवचरित्रावरील भक्तीपोटी हा काय वाटेल ते करू शकतो, याविषयी
माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. कुण्या भुतानं
झपाटल्यासारखे बाबासाहेब महाराष्ट्रभर धावत होते . शिवाजी राजांविषयीचे संशोधन ही
एक सतत पेटती ज्योत . झाले तेवढे संशोधन अपुरे आहे . पुर्वसुरींनी केलेल्या
संशोधनावर भरवसून राहणे खरे नाही”. मग त्याकरता पन्हाळा ते विशाळगड हा भर
पावसाचा केलेला प्रवास असो वा दोर लावून सिंहगडचा डोणगिरीचा उतरलेला कडा असो, शिवचरित्रातील जे जे अध्याय जिथे जिथे घडले तिथे तिथे जावून आणि अगदी
त्या पद्धतीनेच अनुभवून पाहायचं हा बाबासाहेबांचा अट्टहास. त्याशिवाय त्या घटनांचे
महत्व, त्यांतील धोके, त्यातील
निरनिराळे पैलू समजायचे नाहीत. तरुण पिढीला मार्गदर्शन करताना बाबासाहेब कायम
सांगतात, “वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही. नवीन
इतिहास निर्माण करण्याचं वेड लागावं लागतं. इतिहास गुलाबपाण्याच्या शिंपणातून आणि
अत्तराच्या थेंबांतून निर्माण होत नाही. तो रक्ताच्या थेंबांतून आणि श्रमाच्या
घामातून निर्माण होतो”. आणि हे केवळ तरुणांना सांगण्यासाठी नाही, हे वेड त्यांनी स्वतः आत्मसात केलं आहे. शिवचरित्राच्या वेडातूनच हे सारं
वैभव बाबासाहेबांनी आयुष्यभर मांडलं.
माझ्या आयुष्यातले काही
सर्वोच्च आनंदाचे क्षण असे आले की बाबासाहेबांसोबत त्यांच्याच अद्भुत आणि अतुल्य
वाणीत प्रत्यक्ष रायगड, पन्हाळगड, प्रतापगड अशा शिवप्रतापी
किल्ल्यांवर तिथे घडलेला इतिहास अक्षरशः अनुभवता आला. आज वयाची ९२ वर्षे पुर्ण
करूनही बाबासाहेबांचा उत्साह एखाद्या बावीस वर्षाच्या युवकासारखा आहे. नुकताच
मागच्या महिन्यातला अनुभव, घरगुती कार्यानिमित्त पुण्याला
जाणे झाले. सकाळी बाबासाहेबांना भेटायला गेलो. इतर बोलण्याच्या ओघात सहज सोबत
असलेल्या पुस्तकांची
यादी बाबासाहेबांना दाखवली. साधारणतः अडीचशे पुस्तके असतील.
त्या यादीतले एकेक नाव काळजीपुर्वक वाचून झाल्यावर बाबासाहेबांनी त्या पुस्तकांची
निगा कशी राखावी, त्यांच्यातली महत्वाची कोणती आहेत इत्यादी
सगळं अगदी नीट समजावलं. शेवटी फाईल बंद करत असताना माझ्या कानावर शब्द पडले “पुस्तकं, सांभाळून ठेवा, हरवू नका. दुर्मिळ आणि
अमुल्य ठेवा आहे हा. या बखरींचे जतन करून ठेवा, भविष्यात हेच
तुम्हाला मार्गदर्शक ठरतील आणि कदाचित या दुर्मिळ पुस्तकांचे संग्राहक म्हणून
अभ्यासक तुमच्याकडे येतील”. काय बोलावे यावर ? त्यातही मला
एक गंमतीची गोष्ट सहज जाणवली, त्या यादीत “पुरंदरे दफ्तर
खंड” चा उल्लेख असल्याचे पाहून त्यांच्या चेहर्यावर एक सुक्ष्म बालसुलभ हास्य
उमटले होते. आपल्या पराक्रमी घराण्याबद्दलचा अभिमान हा ! त्यांच्या याच बालसुलभ
निरागस वागण्याने पण तितक्याच प्रगल्भ आणि हिमालयाच्या उंचीने गेल्या दोन
पिढ्यांना बाबासाहेब अक्षरशः गुरुस्थानी आहेत. श्रावण शुद्ध पंचमी अथवा नागपंचमी
हा बाबासाहेबांचा जन्मदिवस. इंग्रजी कालगणनेनुसार ही तारिख २९ जुलै अशी येते, पण परंपरा जपणार्या या शिवभक्ताला नागपंचमीच जवळची वाटते. आणि म्हणूनच, महाराष्टाचा मानबिंदू असणार्या थोरल्या शककर्ते शिवाजी महाराजांचं
चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवणार्या या ऋषितुल्य शिवशाहीरांना साष्टांग
दंडवत ! आई भवानी त्यांना शतायुषीच नव्हे तर शक्य झाल्यास सहस्रायुषी करो हीच
जगदंबेचरणी प्रार्थना ! अधिक काय लिहीणे ?

- कौस्तुभ कस्तुरे
kasturekaustubhs@gmail.com