शिंदे-होळकरांची स्वतंत्र होऊ पाहण्याची वृत्ती

शिंदे-होळकरांची दक्षिणेकडे दुर्लक्ष करून उत्तरेत पेशव्यांपासून स्वतंत्र होऊ पाहण्याची वृत्ती याबद्दल काव्येतिहास संग्रहातील श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची ही पत्रे अतिशय बोलकी आहेत.

इ.स. १७५१ च्या अखेरीस पेशव्यांचे उत्तरेतील सरदार मल्हारराव होळकर आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्यात काही कारणास्तव गैरसमज निर्माण झाले होते असे दिसते. दि. १६ डिसेंबर १७५१ रोजी शिंद्यांच्या पदरचे रामाजी अनंत दाभोळकर यांना नानासाहेबांनी लिहीलेल्या पत्रात, “सर्व प्रकारे कर्जे फेडावयाचा व आम्ही केले ते शेवटास न्यावयाचा भरवसा आम्हांस या समयीं जयापाचा (जयाजी शिंदे) आहे. त्यांणी तिळमात्र मल्हारबाचे बुद्धीस कोणी भेद करतील तो न होऊ देता आमचेच एकनिष्ठेत राहात ते करावे” असे लिहीले आहे.

यानंतर दि. १२ फेब्रुवारी १७५२ रोजीच्या जयाजी शिंद्यांना लिहीलेल्या पत्रात नानासाहेब म्हणतात, “मल्हारबाचा शफतपुर्वक बेलभंडारा पाठवला तो पावला. आधीच भरवसा, त्यात येणेप्रमाणे पाठविला तेणेकरून संतोष जाहला... ताराबाई हजार मनसबे राजकारणे घाटीतात. तुम्ही हरप्रकारे आषाढमासी निघोन येणे. याउपर पंचवीस-तीस लक्ष वैशाखाअखेर येऊन पावले तरच स्थित राहील. घरात बाहेर सर्व भरवसा तुमचा आहे”.. याच दिवशीच्या दुसर्‍या पत्रात श्रीमंत लिहीतात, “येथे घराऊ प्रकार फार कठिण आहेत. हजारो प्रकारे मातबरांनी, लहानांनी लिहीले तर ते सर्व एकीकडे ठेऊन येथे आल्यावर आमचा मनोदय असेल त्यास शफतपुर्वक अनुकूल वर्तावे”.

यानंतर दि. ७ मार्चच्या पत्रात नानासाहेब चिडून जयाजी शिंद्यांना लिहीतात, “पूर्वी दोन-तीन पत्रे पाठविली. नंतर पाच-सात पत्रे पाठविली. तुमचे मनसब्यास बरे वाटेल ते करीता. आम्हांस शिष्टाचारास मात्र लिहीता की, जे आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्तणूक करू. ऐसे दिसोन आले. येथील अर्थ अद्याप लिहीता जे ईश्वर तुम्हांस बुद्धी देईल ते करा. यंदा तुम्ही ज्येष्ठमासी न आलेस तर आम्ही फिरोन पत्र तुम्हांस लिहीणार नाही”..

यानंतर मात्र २७ मार्च १७५२ च्या मल्हारराव होळकर आणि जयाजी शिंदे यांना लिहीलेल्या पत्रात सुरुवातीला दक्षिणेत ताराबाईंनी नानासाहेबांना काढून टाकण्याची जी राजकारणे चालवली होती, आणि त्याला हैद्राबादचा दिवाण रामदासपंत (राजा रघुनाथराव), नागपुरकर भोसले, दाभाडे, गायकवाड, निंबाळकर इत्यादींची साथ होती त्याबद्दल असून पुढे नानासाहेब उद्वेगाने लिहीतात, “वारंवार लिहीले की लक्षा प्रकारे यावे. वजिराची (सफ्दरजंग) अब्रु राखिली व आमची गमावली हे कामाचे नाही. तुम्ही दौलतेचे स्तंभ, राज्यात खेळ फार जाले आहेत, खामखा यावे”.. नानासाहेबांची अखेरची खंत फार बोलकी आहे- “तुम्हांस कैलासवासी यांणी वाढवले व तुम्ही इराण-तुराण पावेतो लौकीक केला, तो सर्व व्यर्थ ! आम्हीही रायांचे वंशी व्यर्थ जन्म घेतला”.. शिंदे-होळकर उत्तरेत राहून स्वतंत्र होऊ पाहात होते याचीच ही सुरुवात होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


संदर्भ : काव्येतिहास संग्रहातील पत्रे, लेखांक ९२, ९३, ९६, ९७, ९८, ९९


© कौस्तुभ कस्तुरे । kasturekaustubhs@gmail.com