वर्चस्ववादी मानसिकता : २२ जानेवारी २०१२च्या महाराष्ट्र टाईम्स मधील लेख

दि. १८ डिसेंबर २०११ रोजी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहीलेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या "संवाद" पुरवणी मधील लेखात दादोजी कोंडदेवांची पाठराखण केली होती. त्यावर  १ जानेवारीच्या लेखात संजय सोनवणी यांनी "इतिहास संशोधन विश्वसनिय कसे होणार ?" या लेखात आक्षेप घेत अनैतिहासिक गोष्टींना लक्ष्य करत, उपलब्ध पुराव्यांना बगल देऊन दादोजींचा शिवाजी महाराजांशी काही संबंध नसून ते आदिलशाही सुभेदार होते असं मत व्यक्त केलं. वास्तविक, दादोजी कोंडदेवांविषयी अनेक पुरावे उपलब्ध आहेत, असं असतानाही, त्यांचा महाराजांशी संबंध नही असं म्हणणे हे कितपत सयुक्तिक आहे हे देवच जाणे.. यावर सोनवणींच्या मुद्द्याला प्रतिवाद करणारा आणि मेहेंदळें सरांची बाजू मांडणारा लेख मी दि. २२ जानेवारी २०१२ रोजी संवाद मध्ये लिहून दादोजींबद्दल अस्सल संदर्भ सादर  केले होते. तो लेख आणि त्यापुढे वृत्तपत्रात जागेच्या अभावी देता न आलेले दादोजींबद्दलचे काही अस्सल समकालिन पुरावे..
वर्चस्ववादी मानसिकता

गेल्या काही दिवसात दादोजी कोंडदेव हे मराठ्यांच्या इतिहासातलं वादग्रस्त प्रकरणं ठरलं आहे. इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनी त्यांच्या मुलाखतीत दादोजी कोंडदेव यांच्या केलेल्या समर्थनाचं संजय सोनवणी यांनी जोरदार खंडन केलं होतं. सोनवणी यांच्या मतांचा प्रतिवाद करणारा हा लेख...

' इतिहास संशोधन विश्वसनीय कसे होणार?' (रविवार, दि. १ जाने.) हा संजय सोनवणी यांचा, ज्येष्ठ इतिहास-संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या प्रतिपादनाचा प्रतिवाद करणारा लेख वाचला. मेहेंदळे हे अत्यंत निरपेक्ष आणि श्रेष्ठ असे इतिहास संशोधक आहेत. त्यांनी दादोजी कोंडदेव मलठणकरांविषयी मांडलेली मतं (संवाद - १८ डिसें. २०११) योग्यच आहेत. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे उल्लेख असणारे प्रत्यक्ष पुरावे नसले तरीही, ते चांगले गृहस्थ असल्याची आणि त्यांच्या न्यायदानाविषयी खुद्द शिवाजी महाराजांची शिफारसपत्र उपलब्ध असताना दादोजींच्या चारित्र्यावर चिखलफेक करणं हा कोणता पराक्रम? कोण कुठला तो जेम्स लेन आणि त्याने त्याच्या पुस्तकात काहीतरी मूर्खासारखं लिहिलं आणि आमच्याच सरकारने आमच्याच महापुरुषाचा पुतळा भर मध्यरात्री दिवाभीतासारखा उखडून टाकला. आजही महाराष्ट्राला संस्कृतीपेक्षाही विकृतीच जवळची वाटते हेच यावरून दिसून येतं. मेहेंदळे यांनी उपस्थित केलेला पुढचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे - 'शिवाजी महाराजांचे दादोजीच नव्हे, तर इतर कोणीच गुरू नव्हता, तसा एकही पुरावा उपलब्ध नाही!' तर मग शिवाजी महाराजांचे गुरू नसलेल्या अनेकांचे पुतळे अजूनही उभेच आहेत त्यांचं काय? देहुरोडमधील तुकाराम हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा लेखी अस्सल पुरावा आज उपलब्ध आहे का? असेल तर तो आधी सादर व्हावा!

सोनवणी म्हणतात की, मूळ इतिहास हा वर्चस्ववादी भूमिकेतून लिहिला गेला आहे आणि कोणाचे उदात्तीकरण वा कोणाला बदनाम करायचे हे आधीपासूनच ठरले होते. अर्थातच याविषयी बोलताना एका कटू पण सत्य गोष्टीकडे लक्ष वेधावे वाटते, ती गोष्ट म्हणजे अर्थात 'जातीयवाद'! दादोजी आणि समर्थ हे दोघेही ब्राह्माण असल्याने ब्राह्माण इतिहासकारांनी त्यांचे स्तोम माजवले, असा अपप्रचार केला जातो. परंतु अस्सल पुरावे मात्र वेगळंच सांगतात. महाराजांच्या समकालीन असणाऱ्या कृष्णाजी अनंत मजालसी उर्फ सभासदाच्या बखरीत किंवा खुद्द परमानंद गोविंद नेवासकरांच्या 'शिवभारता'त, जो अत्यंत विश्वसनीय पुरावा मानला जातो त्यात शहाजीराजांनी दादोजींना जिजाऊ आणि शिवाजी महाराजांसोबत कारभारी म्हणून पाठवले आणि इतकेच नव्हे तर त्यांना 'सरकारकून' म्हणजे 'मुख्य कारभारी' म्हणून नेमल्याचे उल्लेख आहेत. शिवाय भारत इतिहास संशोधक मंडळाच्या 'शिवचरित्र साहित्य खंड' यामध्ये पुणे आणि कर्यात मावळ पुन्हा वसवण्याचे काम दादोजींनी जिजाऊंच्या सल्ल्याने केल्याचा (आदिलशाही सुभेदार म्हणून नव्हे!) स्पष्ट उल्लेख आहे. 'रानातल्या जनावरांचा अन चोरांचा पंतांनी बंदोबस्त केला (संदर्भ : एक्याण्णव कलमी बखर).' इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यांच्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाच्या सतराव्या आणि अठराव्या खंडात दादोजींनी केलेले अनेक 'महजरनामे' प्रसिद्ध केले आहेत. याच्या चौथ्या खंडात महाराजांनी दादाजी नरसप्रभू गुप्ते यांना लिहिलेले एक पत्र आहे त्यात महाराज म्हणतात - 'श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारालगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हांस यश दिल्हे... राजश्री दादापंतांचे विद्यमाने (दादोजी कोंडदेवांच्या मदतीने) बाबाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान जाहले...' म्हणजेच शिवाजी महाराजांच्या कार्याला दादोजींचा पाठिंबा होता, ते आदिलशाहीचे 'नाममात्र' सुभेदार होते हे स्पष्टच कळून येते. यातच सोनवणी यांनी उपस्थित केलेल्या 'दादोजींनी शिवाजी महाराज वा दादोजींचे सेवक या नात्याने निवाडे केले हे कोठे सिद्ध होते?' या प्रश्नाचे उत्तर सहज मिळते.

दादोजींनी १६३० ते १६३६च्या दरम्यानची अनेक कामे 'आदिलशाही सुभेदार' या नात्याने केली असतीलही, परंतु १६३६मध्ये त्यांना शहाजीराजांनी आपला कारभारी नेमल्यानंतर या म्हाताऱ्या निष्ठावंत सरकारकुनाने अखेरपर्यंत भोसले घराण्याची सेवाच केली आणि १६३६नंतरची बहुतांश कामे जिजाऊंच्या आज्ञेने केल्याचे अनेक उल्लेख सापडतात. त्यांनी केलेली सुधारणेची कामे ही दुष्काळानंतरची असण्यापेक्षाही आदिलशाही सरदारांनी पुणे प्रांतात घातलेल्या जुलूमी धुमाकूळानंतरची आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. इतिहासलेखन हे वर्चस्ववादी भूमिकेतून झाले असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा वरील अस्सल साधने तपासून इतिहासाचे मूल्यमापन करणेच अधिक इष्ट ठरेल.

' तथाकथित शिवप्रेमी' केवळ ब्राह्माणद्वेषाने सत्य इतिहास दडपून नवीन प्रतिइतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे 'महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळा'च्या इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील दादोजींचे उल्लेख वगळून 'शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली' झाल्याचे दाखवले आहे. हे पाहून हसावे का रडावे तेच समजेनासे झाले आहे. इ.स. १६३६च्या सुरुवातीसच शहाजीराजांची 'निजामशाही' मोंगल आणि आदिलशाहाने बुडवली. शाहजहानने आदिलशहाला बजावले की, राजांना महाराष्ट्रात न ठेवता दूर कर्नाटकात पाठवावे. त्याप्रमाणे आदिलशहाने राजांची पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची जहागीर पूर्ववत चालू ठेवून राजांना कायमचे कर्नाटकात पाठवले. राजे दूर बंगलोरला (बंगळुरु) स्थायिक झाले व अखेरपर्यंत ते पुन्हा परत महाराष्ट्रात आल्याचे उल्लेख नाहीत; तर मग पुण्यात राहणाऱ्या बाल शिवबांचे शिक्षण त्यांच्या देखरेखीखाली कसे झाले?

सोनवणी म्हणतात की, दादोजींचा शिवैतिहासाशी संबंध नसून ते फक्त आदिलशाही सुभेदार होते. तेव्हा सोनवणी यांनी वरील पुरावे तपासून पहावेत. पेशवाईतही महादजी शिंद्यांनी दिल्लीच्या बादशहाकडून स्वत:ला 'वकील-इ-मुतालिक' ही पदवी घेतली होतीच की! परंतु म्हणून काही महादजी पेशव्यांना सोडून मोंगलांचे 'मनसबदार' झाले नव्हते. ते पद फक्त नाममात्र होते. नेमकी हीच गोष्ट दादोजींच्या बाबतीतही आहे.

सोनवणी म्हणतात ते खरे आहे- आधीच जातीय अस्मिता टोकदारच नव्हे, तर काटेरी होत आहेत. मात्र आजपर्यंतचे बहुतांश इतिहाससंशोधन हे निरपेक्षपणे झालेले आहे. म्हणायचेच झाले, तर सध्याच्या तो़डफोड करणाऱ्या शिवप्रेमींची मानसिकता पाहता इतिहासाचे 'कथित पुनलेर्खन' हे वर्चस्ववादी मानसिकतेतून होऊ लागले आहे. दादोजी कोंडदेव मलठणकर आणि रामदासस्वामी हे त्याचे पहिले बळी ठरले. 

 *****************

१)  पुढे दादोजी कोंडदेवांविषयी काही अस्सल पुरावे सादर करत आहे..

ग. ह. खरे संपादित "ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड १" मधील हे आदिलशाहाने कान्होजी जेध्यांना पाठवलेले फार्सी फर्मान. दादाजी कोंडदेव हे आदिलशहाचे सुभे कोंडाण्याचे सुभेदार होते हे आपल्याला माहित आहेच. पण त्याही आधी दादाजी हे शहाजीराजांचे विश्वासू सेवक होते आणि तात्पर्याने आदिलशहापेक्षा ते शहाजीराजांचे कारभारी या नात्याने शिवरायांच्या प्रत्येक कार्यात सामिल होते हे पुढील पत्रावरून सिद्ध होते. आदिलशहाचा दादाजींवर अजिबात विश्वास नव्हता हे सांगणारे एक पत्र खर्‍यांनी छापले असून ते अस्सल फार्सी पत्र आदिलशहाने कान्होजी जेध्यांना लिहीलेले आहे. या पत्रात आदिलशहा दादाजींचा उल्लेख "हरामखोर" असा करतो. या पत्राचा सारांश रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी आपल्या "ऐतिहासिक पत्रबोध" या अमुल्य ग्रंथात लेखांक ३ मध्ये "हरामखोर दादाजी" या मथळ्याखाली दिला आहे. आता दादाजी कोंडदेवांना आदिलशाही हस्तक म्हणण्याआधी कोणीही १० वेळा विचार करावा कारण खुद्द आदिलशहाच त्यांना "हरामखोर" म्हणतो आहे.


२) तान्हाजी जनार्दन हवालदार याला २६ जून १६७१ रोजी पाठवलेल्या पत्रात महाराज "वैकुंठवासी साहेबाचे (शहाजीराजांचे) व दादाजीपंताचे (दादोजी कोंडदेव) कारकीर्दीस चालिले आहे तेणे प्रमाणे चालवणे" असं म्हणतात. हे पत्र पंतांच्या मृत्यूनंतर २५ वर्षांनी लिहीलेले आहे, तरिही शहाजीराजांसोबतच पंतांचे निर्णय महाराजांना वंदनिय होते. ते अस्सल मोडी पत्र असे-

३) यापुढे दादाजी कोंडदेवांचे निर्णय तसेच चालू ठेवण्याबद्दल शिवाजी महाराजांच्या कोणकोणत्या पत्रात उल्लेख आहेत त्याचा सारांश दिला आहे-
४) महाराजांचे सगळ्यात प्रथम चरित्र लिहीणारा महाराजांचा समकालीन "कृष्णाजी अनंत सभासद" याने आपल्या बखरीत दादोजी कोंडदेवांविषयी, शहाजीराजांनीच "शहाणा, चौकस" ठेविला होता असं म्हटलं आहे.. म्हणजे शहाजीराजांनीच दादाजीपंतांची नेमणूक केलेली. ते आदिलशहाचे सुभेदार होते हा वेगळा भाग असून त्याव्यतिरिक्त ते शहाजीराजांचे कारभारीही होते हे सभासदाने स्पष्ट केले आहेच. शिवाय, ही बखर खुद्द महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून तयार झालेली असल्याने अविश्वासाचा प्रश्नच नाही. सभासद म्हणतो-

६) याशिवाय खुद्द सातारकर छत्रपती भोसल्यांच्या संग्रहात असणारी संभाजी भोसले शेडगावकर यांची बखर हीसुद्धा एक विश्वसनिय बखर आहे. कारण या बखरीतल्या घटनांना आधार असणारे अनेक इतर पुरावेही सापडले आहेत. सभासदाने ज्या गोष्टी नमुद केलेल्या आहेत त्यातील बर्‍याचशा गोष्टी याही बखरीत आहेत. बखरकार नक्की कोण ते सांगता येत नाही, पण त्याने दिलेली माहिती पहा-

          “... दादोजी कोंडदेव यांजकडे पूर्वी काम सांगितल्या दिवसापासोन तो मुलुख निज्यामशाई मुलुखालगत होता. तेव्हा दादोजी कोंडदेव यांणी मलकांबर ( निजामशाहाचा वजीर मलिक अंबर हबशी) रीति जमिनीची चालवली. कितीएक प्रतिवर्षी पाहणी करोन सेताचे उत्पन्न अन्वये वसुल घ्यावा. त्या सेत करणारापासोन कधी जिनस विकत घेतला, तर त्याचा पैका त्यास देत असत. हे निजामशाई पेक्षा रीति रयतेस फार चांगली. त्यास ते सुखकारक सेत करणारांस पडत होते. व मावळात लोक राहणार हे केवळ दरिद्री (गरीब) परंतू शरिरेकरोन बलकट होते. त्याणी अति मेहनत करोन त्यास (फक्त) उदरनिर्वाहापुरते उत्पन्न होत असे. मग दादोजी कोंडदेव यांणी त्या मुलुकाची व त्या लोकांची आवस्ता पाहिली की, हे लोक झाडीतून राहणारे आणि ज्यांस वस्त्रे पात्रे नाहीत ते लोक झाडीत राहणारे म्हणोन त्यानी शरिराचे संरक्षण जाहले पाहीजे. त्यासाठी सर्वांनी घरोघर शस्त्रे मात्र बालगली होती. ते लोक फार सावधपणे वागत होते. तेव्हां दादोजी कोंडदेव यांणी त्या लोकांचे पोषणाकरीता कीतीएक वर्षे त्या लोकांपासोन वसूल घेतला नाही. त्याखेरीज दुसरे माहालाचा वसूल जमा होण्याचे कामावर ते मावळे लोक बहुत चाकरीस ठेविले. त्या योगे करून ते मावळे लोक सहजच पोसले गेले. याप्रमाणे दादोजी कोंडदेव याणी रीति चालविली. तेव्हा सिवाजीराजे यांस बालपणी दादोजी कोंडदेव हा सिवाजी राजे यांस विद्याअभ्यास करणारा सिक्षाधारी होता. त्याणीं विद्याभ्यासात सिवाजीराजे यांस तयार केले. परंतू धनुर्विद्यांत व शिपाईगिरीत ते खुद्द राजे जातिने निपूण होते. त्याजला घोड्यावर बसता येत होते तसे दुसरे मराठे लोकांस बसता येत नव्हते... ”

          हे झाले दादोजी कोंडदेवांच्या ‘आदिलशाही सुभेदार’ या नात्याने केलेल्या कामांचे आणि शिवाजी महाराजांच्या शिक्षणासंबंधीचे ! याव्यतिरीक्त पुढे दिलेली माहिती पहा-

          “ ... शाहाजी माहाराज यांचे दौलतीमध्ये पुरंधर परगणा होता. त्यास तेथे तो दादो बाबाजी कोंडदेऊ म्हणून कारकून शाहाणा फार चौकशीने ठेविला होता. तो माहाराजांचे भेटीस बंगळूर सरदेश चंदीचंदावरास आला. तेथे त्याचेबरोबर त्याचे वोलखीने कारकून शामजी निळकंठ व बालकृष्णपंत व नारोपंत दीक्षित व सोनोपंत व रघुनाथ बल्लाळ असे च्यार असाम्यास पुरंदर किल्ल्याचे अंमलात त्यावेलेस पुनवडी म्हणून लहान खेडे होते तेथे दाखल जाहले. येताच सिवाजीराजे पुनवडीस होते तेथे जाऊन भेट घेतली आणि शिवाजीराजे यांचे स्वारीबरोबर गेले आणि बारा मावळे काबिज केली. आणि मावळची देसमुखीबद्दल जे तेथे गुमस्ते बेबदल होते त्यास दस्त करून मारीले. शके १५६६ तारणनाम संवत्सरे फसली सन १०५४ या सालापासून सिवाजीराजे बंडावा करू लागले. त्यांनी मोठेमोठे कारकून व परभू वगैरे ज्ञातीचे पुरुष धारिष्ट्याचे व मावळे लोक पाईचे सरदार व शिपाई मोठे शूर धारकरी विसवासुक इतबारे असे मनुष्य जमा करून पादशाई किल्ले शयाद्रीचे बळकावून मुलुख काबिज कऱीत चालले. व च्यार पादशाईचे खजिने मारू लागले. त्यास शिवाजीराजे हे पादशाईस काळ जाले. तेव्हा त्यांचे वडील शाहाजीराजे माहाराज वजिर त्याचे वेळचे दादो कोंडदेऊ कारकून ब्राह्मण हा शिवाजीराजे यांजला बाळपणी शिक्षाधारी विद्याभ्यास करणारा तो फार शाहाणा व मोठा शूर होता व शामराव निळकंठ ब्राह्मण (शामराजपंत निळकंठ पंतपेशवे) व मोरो त्रिमल पिंगळे ब्राह्मण व येसाजी कंक व तानाजी मालुसराव व बाजी पासलकर हे पाईचे सरदार मोठे शूर धारकरी व मावळे लोक सिपाई अशी भरवशाची मनुष्ये जमा करून राज्य काबिज करू लागले... पुढे काही दिवसांनी दादो कोंडदेव यांस देवाज्ञा झाली... अंतकाळसमई त्याणे सिवाजी राजे यांस बोलावून आणोन विनंती केली की मी (केवळ) आपले धन्याचे (शहाजीराजे) हीताविसी आपणांस वारंवार निसिद्धीत होतो. परंतू आता माझी आपणांस एक प्रार्थना आहे, की आपण स्वतंत्रपणे वागत जावे. गाई-ब्राह्मण व प्रजा यांचे प्रतिपाळण करून मुसलमान लोकापासून हिंदू लोकांची देवस्थानें रक्षावी. आणि सिवाजीराजे यांचे हाती आपले कुटूंबाचीं मनुष्यें राजे यांचे हाती स्वाधींन करून मग दादोजी बाबाजी कोंडदेव देशस्त ब्राह्मण मौजे मलठण भीमातीर येथील जोसी कुलकर्णी याणी प्राण सोडीला. नंतर सिवाजीराजे यांणी दादोजी कोंडदेव यांणी अंतःकाळसमई सांगितल्याप्रमाणे आपले मनात वागऊन त्या रीतिने करू लागले व आपण जातीने राजे कारभार स्वतंत्रपणे करू लागले... ”हे आणि असे अनेक अनेक पुरावे सापडतील.. फक्त, ते स्विकारण्याची तयारी असेल तरच इतिहास हा चंदनाचा होईल.. नाहीतर अखेरीस तो कोळशाच्या रुपातच पहावयास मिळणार हे नक्की !! असो, येथे मांडलेल्या गोष्टी, संदर्भ आणि पुरावे हे वाचकांना समजतील ही आशा आहे. बहुत काय लिहीणे ??आमचे अगत्य असु द्यावे ही विज्ञापना...