समाजसुधारणेतील ब्राह्मणांचे महत्वाचे योगदान


        ब्राह्मण ! ब्राह्मण म्हणजे कोण ? तर, “ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण”. ब्रह्म म्हणजे या विश्वात सामावलेल्या सुक्ष्मात सुक्ष्म वस्तुपासून अतिप्रचंड वस्तुंपैकी काहीही ! अगदी, हिंदू धर्मानुसार आत्मा हे देखिल ब्रह्माचेच एक रूप आहे. अशा प्रत्येक वस्तुचे ज्ञान असणारा ज्ञानी मनुष्य म्हणजे ब्राह्मण ! अन्‍ म्हणूनच वैदिक काळापासूनच ब्राह्मण हा हुशार आणि ज्ञानी असल्या कारणाने त्याला त्रैवर्णीय व्यवस्थेत उच्चतम स्थान दिले गेले. होय त्रैवर्णीय ! कारण मूळ वैदिक वर्णव्यवस्था {जातिव्यवस्था नव्हे हे येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे} ही ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य अशी त्रैवर्णीय होती, नंतर वैदिकोत्तर काळात आर्यां व्यतिरीक्तच्या जमातींना वैदिक धर्मात अंशतः प्रवेश देऊन त्यांचा वेगळा असा वर्ण तयार झाला, हा वर्ण म्हणजे शूद्रहोय. परंतू त्याकाळीही, शूद्र हे वैदिक धर्मात बाहेरून आले असल्याने त्यांचे रानटी प्राण्यांचे मांस खाणे इत्यादी पाहून त्यांना अपृष्य मानले गेले. या विषयाशीसंबंधीत अधिक माहितीसाठी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संपादीत केलेल्या जयराम पिंड्ये कृत राधामधवविलास चम्पू” या पुस्तकाची प्रस्तावना वाचावी.
        
            आजघडीला अनेक जातियवादी आणि समाजविघातक व्यक्ती, संस्था आणि संघटना समाजात जाणूनबुजून पूर्वीपासून ब्राह्मणांनी कायम देशाचे नुकसान केले, कधिही भलं केलं नाही अशा आशयाचा गैरप्रचार करत आहेत. पण, जर पुराणकाळापासून ब्राह्मणांचे कार्य बघितले असता हा दावा किती फोल ठरतो ते उघडपणे समजून येते ! आपल्याकडे पूर्वीपासूनच खूप वाईट सवई आहेत, सनातनी ब्राह्मणांचे जसे थोतांड उघड केले जाते, तसे ब्राह्मणांच्या चांगल्या बाजूवर मात्र प्रकाश टाकण्याचे धारिष्ट्य कोणीही दाखवत नाही. मी असे म्हणत नाही की सर्वच ब्राह्मण चांगले आहेत. पूर्वीपासून, म्हणजे साधारणतः वैदिकोत्तर कालखंडापासून निर्बुद्धपणे सनातनी विचार आणि अनिष्ट चालिरीति पाळणार्‍या ब्राह्मणांना “ब्राह्मण” हे पवित्र विशेषण लावावे अशी त्यांची लायकीही नाही. किंबहूना, या अशा ढोंगी सनातनी वर्चस्ववादी ब्राह्मणांचे वर्णवर्चस्व उखडून काढण्यासाठीही ब्राह्मणांनीच पुढाकार घेतला या गोष्टीचा मात्र कधिही विचार केला जात नाही. महाराष्ट्रातील समाजसुधारकांची नावे घ्यायची झाली तर त्यात बहुतांशी ब्राह्मणच सापडतील. ही पहा यादी-

ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी उर्फ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (१२७५-१२९६) : मराठीचे आद्यकवी आणि वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे मनाव घ्यावे लागेल. आपल्या भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी या ग्रंथातून त्यांनी भगवद्‍गितेचे सार शुद्ध मराठीत लोकांना सांगितले. याशिवाय अमृतानुभ आणि चांगदेव पासष्टी अशा ग्रंथांचे लेखन करून समानता आणि ज्ञानपूर्ण भक्तीरसाचे मार्गदर्शन केले.

श्री एकनाथ (पूर्ण नाव उपलब्ध झाले नाही) (१५३३-१५९९) : एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी ची पुनरावृत्ती सुरू करून सुलतानांच्या काळात दुर्लक्षित झालेल्या संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला. चतुःश्लोकी भागवत’, ‘भावार्थ रामायण’, ‘एकनाथी भागवत इत्यादी काव्यग्रंथां सोबतच समाज प्रबोधनार्थ अनेक पदे,गौळणी, विराण्या रचल्या. याशिवाय एकनाथ महाराजांनी मृतप्राय झालेल्या हिंदू समाजाला जागृत करून एकत्र येण्यासाठी भारुड या नव्या काव्य प्रकाराची निर्मिती केली.

अनंतफंदी (१७४४-१८१९) : श्रीमाधवनिदान या ग्रंथासोबतच अनंतफंदींनी अनेक समाज प्रबोधनपर लावण्या लिहील्या. याशिवाय त्यांनी समाजात चांगल्या गोष्टी रुजवण्यासाठी आणि समाजाला जागृत करण्यासाठी कटाव आणि फटका हे काव्यप्रकार निर्माण केले.

नारायण सूर्याजीपंत ठोसर उर्फ श्री समर्थ रामदास स्वामी (१६०८-१६८१) : महाराष्ट्राच्या संत परंपरेतील देवभक्तीच्या संकल्पनांची पुनर्मांडणीकरणारे थोर संत म्हणजे समर्थ. नुसतेच देव देव करून धुपारत्या करत बसण्यापेक्षा शरिरसामर्थ्य वाढवून, बलोपासना करून, हातात शस्त्र घेऊन, एकसंध होऊन देवाचे-धर्माचे संरक्षण करण्याची शिकवण समर्थांनी महाराष्ट्राला दिली. महाराष्ट्र-धर्माची शिकवण महाराष्ट्राला देणार्‍या समर्थांना शिवाजी महाराज गुरूस्थानी मानत असत हे प्रत्यक्ष महाराजांच्या कित्येक पत्रांवरून सिद्ध होते. जिवन कसे जगावे याचे सुंदर उदाहरण ठरणारा दासबोध हा ग्रंथराज वगळता करुणाष्टके’, ‘सुंदरकांड’, ‘युद्धकांड या काव्यरचना, स्फुट कवीता आणि गणपतीची सुखकर्ता दुःखहर्ता’, हनुमानाची व अशाच अनेक आरत्या रचल्या.

बाळशास्त्री जांभेकर (१८१२-१८४६) : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक. जांभेकरांनी आपले दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. म्हणूनच बाळशास्त्रींना आद्य पत्रकारमानले जाते. याशिवाय बाळशास्त्रींनी विधवा विवाह आणि स्त्रियांचे शिक्षण यासाठी अनेक उपक्रम राबवून विज्ञानाच्या प्रसारासाठी दिग्दर्शन या नावाचेएक मासिकही सुरू केले.

दादोबा पांडूरंग तर्खडकर (१८१४-१८८२) : थोर समाजसुधारक. मानवधर्म सभा आणि परमहंससभा यांची स्थापना करून ईश्वर एक आहे अशी शिकवण दिली. तर्खडकरांनी मराठी भाषा आणि व्याकरण यांच्यात आमुलाग्र प्रगती करणारी पुस्तके लिहीली, शिवाय विधवा विवाहाचा पुरस्कार केला.

गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) (१८२३-१८९२) : आपल्या प्रभाकर या साप्ताहिकाद्वारे आणि शतपत्रांद्वारे ब्राह्मणांचा दांभिकपणा, कर्मकांड, बालविवाह, सती इत्यादी प्रथांवर सडकून टीका केली. ते स्वतः विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते होते.

डॉ. भाऊ दाजी लाड (१८२४-१८७४) : दैवज्ञ ब्राह्मण असणार्‍या भाऊंनी अनिष्ट सामाजिक रुढी आणि चालिरीतींना विरोध केला. स्त्रि-शिक्षण, विधवा विवाह याबरोबरच त्यांनी मादक द्रव्यांच्या सेवनाविरुद्ध मोहीम सुरू केली. मुंबईचा पहिला गव्हर्नर माऊंट्स्टुअर्ट एलफिन्स्टन याच्या कारकिर्दीत मुंबई वसवण्याच्या कार्यात पुढाकार घेतला.

विष्णुशास्त्री पंडित (१८२७-१८७६) : स्त्रि-शिक्षण आणि विधवाविवाहाचे कट्टर पुरस्कर्ते असणार्‍या विष्णुशास्त्रींनी स्वतःएका विधवेशी विवाह करून समाजात एक नवा पायंडा पाडून दिला. याशिवाय आपल्या इंदुप्रकाश या वृत्तपत्रातून आधुनीक विचारांचा प्रसार केला.

रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५) : भांडारकरांनी आपले स्नेही न्या. माधवराव रानडे यांच्यासोबत प्रार्थना समाज ची स्थापना केली. त्यांनी विधवा-विवाह आणि स्त्रि-शिक्षणाचा पुरस्कार केला, एवढेच नव्हे, तर स्वतःच्या विधवा कन्येचा पुनर्विवाह लावून दिला. भांडारकरांनी वैदिक ग्रंथ आणि पुराणांच्या आधारे समाजसुधारणा करण्याचे सर्वात मोठे कार्य केले.

न्यायमूर्ति महादेव उर्फ माधवराव गोविंद रानडे (१८४२-१९०१) : भांडारकरांच्या साथीने प्रार्थना समाज स्थापना करण्यात रानडे यांचा पुढाकार होता. सामाजिकपरिषद’, ‘डेक्कन सभा अशा संस्थांचीस्थापना करून जातिभेद, वंशभेद, अंधश्रद्धेला विरोध करण्याचेमोलाचे कार्य माधवरावांनी केले. यासोबतच त्यांनी स्त्रि-शिक्षण आणि विधवा विवाह,बुद्धीनिष्ठा यांचा कट्टर पुरस्कार केला.

विष्णुशास्त्री चिपळूणकर (१८५०-१८८२) : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सर्वात प्रथम स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृती यांचा पुरस्कार करणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी म्हणूनओळखले जातात. परंतू मराठीसोबतच त्यांनी इंग्रजीचेही महत्व ओळखले होते. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सअहकार्याने पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात चिपळूणकरांचा मोलाचा वाटा होता.

गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५) : आगरकरांनी सुधारक या नावाचे नियतकालिक काढून त्यामार्फत जातिभेद, बालविहाव, केशवपन, सतीची चाल, अस्पृष्यता इत्यादी अनिष्ट चालिरीतिंना कडकडीत विरोध केला.

महर्षी धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) : महर्षी कर्व्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळ’, ‘अनाथ बालिकाश्रम मंडळ यांची स्थापना करून विधवा विवाह आणि स्त्रि-शिक्षण यांचा पुरस्कार केला. आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतः एका विधवेशी पुनर्विवाह केला. पुण्याजवळ हिंगणे या गावी त्यांनी स्त्रियांसाठी विद्यालय सुरू केले. अखिल हिंदुस्थानातील स्त्रियांना मातृभाषेतील का होईना, पण शिक्षण घेण्यासाठी देशातील सर्वात प्रथम महिला विद्यापीठ स्थापन केले. हे विद्यापीठ म्हणजे श्रीमती नाथिबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ (S.N.D.T University)

पंडिता रमाबाई (१८५८-१९२२) : स्त्री-शिक्षण आणि विधवाविवाहाचा पुरस्कार करणार्‍या पंडिता रमाबाईंनी पुढे ख्रिश्चनधर्माचा स्विकार केला. आर्य महिला समाज’, ‘शारदा सदन’, ‘मुक्तीसदन या संस्थाचीस्थापना करून पंडिता रमाबाईंनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य केले.

 रमाबाई रानडे (१८६३-१९२४) : न्यायमूर्ति माधवराव रानडे यांच्या पत्नी असलेल्या रमाबाईंनी स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार केला. शिवाय स्त्रियांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून मुंबई आणि पुण्यात सेवासदन या शिक्षण संस्थेची स्थापना केली.

रघुनाथ धोंडो कर्वे (१८८२-१९५३) : महर्षी कर्व्यांचे सुपुत्र. आजच्या काळात ऐरणीवर असलेल्या संतती नियमनाच्या मुद्द्यावर र.धो. कर्व्यांनी मोलाचे कार्य केले. त्यांनी समाजस्वास्थ्य हे मासिक सुरू करून समाजात संतती नियमन आणि लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (१८८३-१९६६) : थोर क्रांतिकारक, हिंदुधर्माचे गाढे अभ्यासक, महाकवी, महान नाटककार, हिंदु राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते असणार्‍या स्वातंत्र्यवीरांनी हिंदूंच्या अनिष्ट चालिरीती आणि दोषांवरही तितक्याच उघडपणे घणाघाती टीका केली. सावरकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी ठिकठिकाणी धर्मसभा आणि धर्ममार्तंडांच्या आणि विचारवंतांच्या परिषदा भरवल्या. सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सुचनेवरून रत्नागिरीच्या शेट भागोजी कीर यांनी दलितांसाठी आणि अस्पृश्यांसाठी आणि इतरही सर्व जाती-धर्मांसाठी खुले असणार्‍या पतितपावन मंदिराची स्थापना केली. समता, विवेकनिष्ठा, विज्ञानवाद अशा पायभूत खांबांबर उभा असलेला प्रगत हिंदुसमाज उभा करण्यासाठी सावरकरांनी अलोट प्रयत्न केले.

ताराबाई मोडक (१८९२-१९७३) : शिशुविहार या बालशिक्षण संस्थेची मुंबईत स्थापना करून त्याद्वारे मुलिंनामोफत शिक्षण देण्याचे कार्य चालवले. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील बोर्डी जवळील कोसबाड या गावी आदिवासी मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठीही कार्य सुरु ठेवले.

डॉ. शिवाजीराव पटवर्धन (१८९२-१९८६) : अमरावती येथे जगदंबा कुष्ठधाम अथवा तपोवन या संस्थेची स्थापना करून डॉ. पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांची सेवा आणि पुनर्वसनाचे मोलाचे कार्य केले. कुष्ठरोग्यांना मानसिक आधार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे आणि जमेल तितके रोगमुक्त करण्याचे कार्य पटवर्धनांनी आयुष्यभर सुरुच ठेवले.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार (१८८९-१९४०) : असहकार चळवळ आणि कायदेभंग आंदोलनात भाग घेणार्‍या डॉ. हेडगेवारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन हिंदूंचे संघटन करण्यासाठी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. याच रा.स्व.संघाच्यामधुकरराव देवलांसारख्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यात सावकारांकडे गहाण पडलेल्या दलितांच्या शेतजमिनी सोडवल्या आणि म्हैसाळ या गावी श्री विठ्ठल संयुक्त सहकारी शेती सोसायटी ची स्थापना केली, ज्याच्या आधारे अनेक दलित कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी राहिली.

पांडुरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरुजी (१८९९-१९५०) : थोर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, लेखक वा कवी असणारे साने गुरूजी हे समाजसुधारकही होते. सामाजिक समता आणि विविध धर्माच्या ऐक्याची विचारसरणी रुजवली. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी बेमुदत उपोषण केले, आणि अखेरीस मंदिर दलितांना खुले झाले. आधुनीक विचारांचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी साधनाया साप्ताहिकाची निर्मिती केली.

पांडुरंगशास्त्री आठवले (१९२०- ) : संस्कृत भाषेचे पंडित आणि धर्मविद्वान असणार्‍या आठवले यांनी  स्वाध्याय आंदोलनाची उभारणी करून गुजरात-महाराष्ट्र आणि कोकणपट्टीतील कोळी समाजाला संघटीत केले आणि त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग शिकवला. आठवले यांच्या या आधुनिक समाज कार्याबद्दल त्यांना टेम्पल्टन पुरस्कार आणि रेमन मॅगसेसे या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे (२६ डिसेंबर १९१४ - ९ फेब्रुवारी २००८) : नागपुरातील प्रतिष्ठीत वकील होऊनही बाबांनी १९४९ मध्ये कुष्ठरोगनिदान अभ्यास करून १९५२ साली वरोर्‍याजवळ "आनंदवन" स्थापन केले. कुष्ठरोग्याचे आयुष्य हे मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे. कुष्ठरोग्याची शुश्रूषाच करायची नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला. भामरागड तालुक्यात आदिवासींसाठी बाबांनी हेमलकसा येथे "लोकबिरादरी"  प्रकल्प सुरु केला. बाबांच्या परिवारील प्रत्येक जण समाजसेवेच्या ध्यासाने प्रेरित झालेला असून त्यांचे पुत्र प्रकाश आमटे आणि स्नुषा मंदाकिनी आमटे हेमलकसा येथे बाबांचे कार्य पुढे चालवत आहेत.

डॉ. अनिल अवचट (१९४४) : आपल्या माणसं या पुस्तकातून त्यांनी देवदासी प्रथा आनि भट्क्या-विमुक्त समाजाबद्दलच्या व्यथा मांडून समाजा प्रबोधनाचे कार्य केले.

        हा होता मला ज्ञात असलेल्या काही ब्राह्मण व्यक्तींचा थोडक्यात परिचय, अजून अशी बरीच नामावळी आहे, पण अख्खे पुस्तक लिहीण्याचा मानस नाही.. माझा हा प्रस्तुत लेख म्हणजे ब्राह्मण-अब्राह्मण वादाला फोडणी देण्यासाठी नसून फक्त ब्राह्मणांविषयीचे गैरसमज दूर करावे हा आहे. याउपरही काही निरुद्योगी लोक नेहमी प्रमाणेच प्रसिद्धीसाठी अथवा विरोधासाठी विरोध करणार हे उघड आहे, असो.. निदान विरोध करण्यासाठी का होईना, पण वरील लोकांचे योगदान नजरेखालून घालतील हे ही नसे थोडके. बहुत काय लिहीणे ? आपण थोर सुज्ञ आहात. आमचे अगत्य असू द्यावे ही नम्र विनंती..
- कौस्तुभ सतीश कस्तुरे
kasturekaustubhs@gmail.com