मस्तानी संबंधी पेशवे दफ्तरातील पत्रव्यवहार

मस्तानीसंबंधी वा तीचा उल्लेख असलेली काही पत्रे पुढे देत आहे. सदर पत्रे गो. स. सरदेसाईंच्या 'पेशवे दफ्तर खंड ९ व १८', द. ब. पारसनीसांच्या 'इतिहाससंग्रह' तसेच वि. का. राजवाड्यांंच्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' मध्ये प्रकाशित झालेली आहेत.

१) दि. २७ नोव्हेंबर १७३७ रोजीचे बाबुराव राम फडणीसंचे (बहुदा नानासाहेबांना) पत्र (स्रोत :  पेशवे दफ्तर खंड १८, लेखांक १२)

श्री 
विनंती. सेवक बाबुराव राम साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल वर्तमान तागाईत छ १३ रज़ब पावेतो यथास्थित असे. विशेष, येथील वर्तमान जासूदाबराबर गुळ्यांबरोबर पाठविले आहे त्यावरून विदित होईल. हल्ली येथे दसरेयाआदले दिवशी मल्हारबा व राणबा व येशवंतराऊ, तुकोजी, जिवाजी पवार व बांडे व उदाजी पवार यैसे सारे सरदार जमा झाले. मालवे प्रांतीचे महाल सामायिक होते ते सरकारांत घेतले. त्यांचा एकंदर मक्ता तेच करीतील अथवा दुसरा कोण्ही करेल ऐसा इत्यर्थ जाला आहे. काय होईल ते पाहावे. ********* मालही आले. देवजी यांस रेमीरखान वगैरे लोक जमा जाहले. ********** विशीचाही थोडा थोडा निकाल पडावा यैसे आहे. आजी छ.मजकूरी हुजुरे यांस तीनशे रुपये देऊन रवानगी केली, येऊन पावतील. हा कागद स्वामींनी ठेऊ नये, फाडून टाकावा हि माझी विनंती मान्य करावी. औषधाची बहुतकरून मुख्याकडे न्यूनता जाली. सौभाग्यवती काशीबाई व मस्तानी यांकडे न्यूनता होत नाही. दिवसेंदिवस अधिकताच आहे. प्रत्यही राऊ आपा प्रातःकाळचे येतात. दीड प्रहार दिवसपर्यंत कारभार करितात. संध्याकाळी संध्या केलियावर जातात. घटिका दोन दोन असतात, मग निद्रेस जातात. असे प्रतिदिनी होते. वरकड अधिकोत्तर वर्तमान लिहिणेसे नाही. सेवेसी श्रुत होये हे विज्ञप्ती.

---------------------------------------


२) मस्तानीला १७३९ च्या मध्यावर मस्तानीला शनिवारवाड्याच्याच तिच्या राहत्या वाड्यात कैद करण्यात आले. पण नोव्हेंबर १७३९ मध्ये ती पाटस येथे बाजीरावांकडे मोठ्या शिताफीने पळून गेली. (पुरंदरे शकावली, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड ६, पृ. ३०-३१)

मार्गेश्वर शुद्ध ५ मंदवारी रात्री मस्तानी, राजश्री रायांची कलावंतीण आपले हवेलीतून निघोन पाटसास रायाकडे गेली. तिचा व रायाचा अति सहवास जाला. यामुळे राऊ फार विलासी जाले. याजकरिता मातुश्रींनी व अप्पांनी रायांना सांगितले की इच्छा वियोग चार दिवस करावा. ऐसे म्हणोन तिजला हवेलीत ठेवले. बाहेर जाईल रायाकडे म्हणोन चौक्या ठेविल्या. राऊ राजेच कुरकुंभास श्रींच्या दर्शनास गेले. इजला यांखेरीज करमेना. याजकरिता युक्तीने हवेलीतून निघून गेली असे.


---------------------------------------


३) दि. २८ डिसेंबर १७३९ चे चिमाजीअप्पांचे मातोश्री राधाबाईंना पत्र (स्रोत : पेशवे दफ्तर खंड ९, लेखांक ३५)

श्री 
तीर्थरूप मातुश्रीबाई वडिलांचे सेवेसी अपत्ये चिमाजीने साष्टांग नमस्कार विनंती. येथील क्षेम ता|| छ ८ सवाल पावेतो समस्त सुखरूप असो विशेष. शिवाजी कृस्ण यांस नासिकास चिरंजीवांस (सदाशिवरावभाऊ) नोवरी पाहावयास पाठविले होते. तो आला की नाही, काय वर्तमान ते लेहून पाठविले पाहिजे. माघमासी लग्न व मुंजी नेमिली आहे. ऐसियास, राजश्री स्वामी (शाहू महाराज) जेजुरीस माघमासी येणार. त्यांचे साहित्य केले पाहिजे व घरचेही साहित्य जाहले पाहिजे. दोन्ही साहित्ये एकदांच होणार नाहीत. यास्तव वैशाख मासी लग्नाचा व मुंजीचा मुहूर्त आहे की नाही ते मनास आणावे. वैशाख मासी मुहूर्त असीला तरी  वैशाख मासी करावे, म्हणजे माघमासी राजश्री स्वामींचे साहित्य होईल. तदनंतर वैशाख मासी घरचे साहित्य होईल. आपले विचारे माघमासीच उरकून घ्यावे ऐसेच असीले तरी साहित्य जसे होईल तसे होऊ. बहुत काये लिहिणे, कृपा केली पाहिजे. रायासही (बाजीरावांस) च्यार गोस्टी नम्रतेने बोलणे तैशा बोललो. सांप्रत पहिल्यापेक्षा बोलून चालून भोजन करून सुखरूप आहेत. देवाची दया आहे तर दिवसेंदिवस संतोषीच होत जाईल. चित्तात मात्र वेध आहे तो कललाच आहे. सविस्तर नानाही सांगतील त्याजवरून कलेल हे विनंती.


---------------------------------------


४) दि. ६ जानेवारी १७४० चे चिमाजीअप्पांचे नानासाहेबांना पत्र (स्रोत : पेशवे दफ्तर खंड ९, लेखांक ३०)

श्री 
आसीर्वाद उपरी. वाटेस घोड्यावर बसोन राऊ चालत होते. तेव्हा येके गावचा पाटील भेटीस आला तेव्हा असावध होते. त्यामुळे पाटलासी सहजात बोलले जे कोंबड्याचे प्रयोजन आहे, घेऊन येणे. काये बोलतो हा अर्थ चितात नाही. हे विचार मस्तानी जवळून निर्माण जाले असेत. ती पीडा जाईल तेव्हा पुण्यच प्राप्त होईल. न होई यैसे दिसत नाही. "राऊत लष्कराभवते चौकीस ठेवावे. इकडे राऊत येऊ लागेल तो धरून येखाद्याचे पारपत्य केले म्हणजे दुसरा कोणी येणार नाही" म्हणून लिहिले. यैसीयांस ते गोस्ट कार्याची नाही. यास्तव राऊत चौकीस ठेवले नाहीत. लस्करातून राऊत जाईल तो वोलखू येईलसे नाही. यैसे असता लटका लौकिक करावा यैसे नाही. तुम्हांकडे बोभाट मस्तानीने लिहिला तर तो लटके म्हणावयास आम्हांस कार्यास येईल. छ १७ सवाल हे आसीर्वाद

---------------------------------------


५) दि. १२ जानेवारी १७४० चे चिमाजीअप्पांचे नानासाहेबांना पत्र (स्रोत : पेशवे दफ्तर खंड ९, लेखांक ३१)

श्री 
चिरंजीव राजश्री नाना यांस चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद उपरी. येथील कुशल तागाईत छ २४ सवाल शनिवार संध्याकाळ यथास्थित असे. विशेष, बाळोबाने आमचे सांगितलेप्रमाणे उत्तर रायांस सांगितले. त्याउपर त्यांनी विचार केला जे, "गडमुक्तेश्वरहून गंगोदकाच्या कावडी आल्या आहेत त्या जमा करून ठेवल्या आहेत. या उदके आपण स्नान करावे व आम्हांसही स्नानास उदक देऊन स्नान जालियावर गंगोदक आमच्या हातावर घालावे. मस्तानी आणून देणे म्हणजे महिन्या दो-चौ मध्ये आपण प्रश्नाचे सोडतो". बलकी ********** आजपासूनही सोडतो ऐसे म्हणणे पडले तर म्हणावे. याप्रमाणे बाळोबाजवळ आम्हांस निरोप सांगणे ऐसे सांगितले. त्यावर फिरोन निरोप न सांगणे ऐसे सांगून मना केली आहे. उद्या परवा गंगातीरास गेलीयावर हा विचार करावा हा अर्थ चित्तांत असावासा आहे. परंतु कशीही क्रिया ** मस्तानी **** सता ****** सांप्रत ये ******* त्यास धीर निघत नाही. लोक फटकळ म्हणतात. आम्ही सन्निध आहो ते शंका चित्तांत येऊन खोड सोडवत नाही. तेव्हा, तिचा समागम जालियावर व आमचा सहवास दूर जालियावर आताच्यापेक्षा अधिकही करू लागतील. क्रिया केल्याची शंका कोठून चित्तांत येईल ? आहे अर्थ तो कळलाच आहे. राऊत पाठवावयाची तजवीज आजपावेतो योजिली नाही. पूर्वी येका दोघांसी बोलले आहेत. अलीकडे चर्च्या राऊतांचे रवानगीची करीत नाहीत. तुम्हांस तिकडे जावयाची निकड न लागती तर आणिक च्यार दिवस आजपावेतो घालविले तैसेच घालवावयास कार्यास येते. आता तिकडील जाण्याची लग्नघटिका प्राप्त जाली आहे. इकडून राऊताची रवानगी तो तूर्त होत नाही. एखादे समई अकस्मात करतील तर न कळे. जे समई रवानगीची चर्चा करू लागतील ते समई येऊन सांगेन यैसे बाळ्या म्हणत असतो. पारपत्य न करावे तर तुम्ही तिकडे गेलिया ********* जाईल हे न कळे. (पुढील दोन ओळी फाटल्या आहेत). हे आशीर्वाद. 


---------------------------------------


६) दि. २१ जानेवारी १७४० चे गोविंद खंडेराव चिटणिसांचे नानासाहेबांना पत्र (स्रोत : पेशवे दफ्तर खंड ९, लेखांक ३२)

श्री 
श्रीमंत राजश्री नानास्वामींचे सेवेसी 
पोष्य गोविंद खंडेराव कृतानेक साष्टांग दंडवत प्रणभ्य विनंती उपरी. येथील कुशल छ ३२ जिल्काद जाणोन स्वकीय कुशललेखन करीत गेले पाहिजे. यानंतर स्वामींनी राजश्री दादा यांस लिहिले की मकारीविसी (मस्तानीविषयी) राजश्री स्वामींची मर्जी कैसी काय आहे ते राजश्री यशवंतराव यांस व आम्हांस पुसून पुरता शोध करवून लेहून पाठवणे. त्याजवरून हे वर्तमान म।।रनिलेनी आम्हांस सांगितले. ऐशीयांस राजश्री स्वामींची मर्जी पाहता ते वस्तू यांजबरोबर न द्यावी, ठेऊन घ्यावी, चौकी बसवावी, यांजमुळे राजश्री राऊ खटे जाले तऱ्ही करावे ऐसी नाही. त्याची वस्तू त्यांस द्यावी. त्याचे समाधान करावे. दुर्वेसनाचा मजकूर त्या वस्तूवर नाही. त्याच्या चित्तांत पश्चाताप होऊन टाकतील तेव्हाच जाईल. ऐसे असता या वास्तूस अटकाव करून सखा तोडू नये ऐसी मर्जी आहे. येथील अर्थांतर विदित व्हावे याजकरिता लिहिले असे. बहुत काय लिहिणे. कृपा असो दिल्ही पाहिजे हे विनंती. 


---------------------------------------


७) दि. २६ जानेवारी १७४० रोजी नानासाहेबांनी चिमाजीअप्पांनी पाठविलेले पत्र (स्रोत : इतिहाससंग्रह, ऐतिहासिक टिपणे भाग २, पृष्ठ १२)

श्री 
तीर्थरूप राजश्री आपास्वामींचे सेवेसी अपत्ये नानाने साष्टांग नमस्कार विनंती. येथील वर्तमान ता|| छ ७ जिल्काद शनवार संध्याकाळ पर्वतीचा बाग येथे असे. मस्तानीस बागात बोलावून कैद केली. कोणी हत्यार धरिले नाही. रात्री घरास घेऊन जाऊ. मग घरी ठेवावीसा विचार जाहला तर घरात स्वामींचे लिहिल्याप्रमाणे बंद करून ठेऊ अथवा चोरून दहा माणसे बराबर देऊन कोथळा घनगड येथे भलते जागा पाठवू. स्वामींनी रायाचा (बाजीरावांचा) जीव जतन करावा. नसरजंगाचा मनसबा तो या गोष्टींनी बुडाला. रायाची मर्जी गेली, असे असता स्वामींची आज्ञा व आमचा तवकल करून येणेप्रमाणे आज संध्याकाळी जाहले. येथून घरात येऊन गेल्यावर सुचेल ते करू. मारीत नाही. घरी ठेऊ अथवा गडावर चोरून पाठवू. भोवती चौकी केली पाहिजे. नासरजंगाचा मनसबा तो होत नाही, तवकल करून फंद नियमित केले. कपाळी असेल ते होईल हे विनंती.


---------------------------------------


८) मस्तानीला पार्वतीच्या बागेत कैद केल्यानंतर तिने अतिशय साळसूदपणाने नानासाहेबांना पात्र लिहून मी पळून जाणार नाही असं कळवलं आहे. सदर पत्र मस्तानीने नानासाहेबांना लिहिलेले आहे. या पत्रात मस्तानी नानासाहेबांना "साहेब, धनी" अशा नावाने उल्लेखते आहे. (स्रोत : इतिहाससंग्रह, अंक दुसरा, सप्टेंबर १९०९) 

श्री 
सेवेसी विज्ञापना. साहेबी (नानासाहेबांनी) रात्रीस वाडियाभोवती चवक्या बसवावयाची आज्ञा केली आहे, की हे पळून जातील तरी जाऊ न द्यावी. तरी साहेबांशी पुसल्यावाचून जाऊ हे होणे नाही. ऐशियास साहेबांशी वसवास (भीती) असेल की रावसाहेब (राऊ) यांसी चोरून नेतील अथवा रात्री दिवसा हर तजविजीने जातील. ऐसे कित्येक गोष्टीने खतराच असेल तरी आज्ञा होईल तर वाडियातील दहा बायका जेथे नीजत असतील त्यात निजावयासी तेथेच येत जाईन. यासी साहेब धणी आहेत. जे आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्तणूक करू. हे तस्लीमात. 


---------------------------------------


९) दि. २९ मार्च १७४० चे चिमाजीअप्पांचे नानासाहेबांना पत्र (स्रोत : पेशवे दफ्तर खंड ९, लेखांक ३३)

श्री 
चिरंजीव राजमान्यराजश्री नाना यांस चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद उपरी. येथील कुशल तागाईत छ ११ मोहरम, शनवार जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष, राजश्री बापूजीराव मल्हार व राजेश्री चिमणाजी भिवराव यांची पत्रे आली. त्याच्या नकला करून तुम्हांकडे पाठविल्या आहेत, त्यांवरून सविस्तर वर्तमान कळेल. तीर्थरूप राजश्री राऊस्वामीं छ १९ जिल्हेजी गेले त्या दिवसापासून आजपावेतो आम्हांस पत्र लेहून पाठविले नाही. त्यांची आमची ***************** र्थ नाही. जेथपर्यंत आमचा यत्न चाले तो केला; परंतु ईश्वराचे चित्तांस न ये. त्यास आमचा उपाय काये आहे ? त्यांचे प्राक्तनी जे असेल ते सुखरूप होऊ (दे). आपण निमित्त घ्यावे ऐसे नाही. यास्तव आज आम्ही निंबदेव्हाऱ्याचा घाट चढलो. दोहो तीही दिवसांत पुण्यास जाऊ. पुण्यास गेल्यावर तिची (मस्तानीची) रवानगी त्याजकडे (राऊंकडे) करावी, आपले निमित्य वारावे. त्यांचे प्राक्तनी असेल ते होईल, ऐसा विचार केला आहे. याचे उत्तर सत्वर पाठउन देणे. तीर्थस्वरूप राजश्री राऊस्वामींस आम्ही लिहून पाठविले आहे की आपले शरीरी समाधान नाही. यास्तव स्वारीस जावे यैसे अर्थ नाही. घरास यावयाचा विचार करावा म्हणोन लेहून पाठविले आहे. त्याचे विचारास येईल तसे करतील. त्यास आमचे लिहिण्याचे पथ्य आहे ऐसे नाही, हे आशीर्वाद. 


---------------------------------------


१०) (बहुदा मार्च) १७४० चे मातोश्री राधाबाईंचे चिमाजीअप्पांना पत्र (स्रोत : पेशवे दफ्तर खंड ९, लेखांक ३४)

श्री
चिरंजीव राजमान्यराजेश्री आपा यांजप्रती राधाबाई आसीर्वाद उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असले पाहिजे. विशेष चिरंजीव राजश्री राव यांजपासी बहुत युक्तीच्या विचारे जो विचार करणे तो करून येणे. चालीवरी नजर देऊन जे कर्तव्य ते करावे. बहुत काये लिहिणे हे आसीर्वाद. 


---------------------------------------


११) हे पत्र नेमके कोणी लिहिले ते समजत नाही. पण पत्रलेखकाच्या लेखनावरून असं दिसतं की मस्तानी हि या व्यक्तीकडून बाजीरावांकडे आली. लेखक स्पष्ट म्हणतो, "मस्तानी माझ्याकडून तुम्ही हिरावून घेतली असा लौकिकात समज झाला आहे, तरी लक्ष असू द्यावे". 

श्री
राजश्री बाजीराऊ पंतप्रधान स्वामींचे सेवेसी
द।। सेवेसी विनंती. साहेबांपासून आलियावर येथे सुखी असो, व साहेबांचे हुकुमाप्रमाणे वर्तणूक केली. त्यास साहेब प्रदेशामध्ये गेल्यामुले काही समाधान नव्हते. त्यास साहेब दिग्विजये करून आपले स्वस्थलास आले, त्यावरून परम समाधान जाले. यानंतर साहेबापासी मस्तं आहे त्यावरून आम्हांसही समाधान आहे. यामध्ये काही अनमान असेल तऱ्ही साहेबाचे पायाची आण आहे. आमचा काही परामर्श न केला, साहेब थोर आहेत. आम्ही विनंती लेहावी ऐसा काही अर्थ नाही. परंतु लौकिक बहुतसा जाला आहे की आम्हांपासोन पोर हिरोन घेतली याईसा विचार जाला आहे. यैसे न कीजे. दोनी महिने पाठवून दीजे. मागती सवेच पाठउन देऊन आपण साहेबाची जोड केली आहेच आणि आम्हांस पायापासी बोलवलं तरी सेवेसी येऊ. आमची फिकीर साहेबांस आहे. सेवेसी तुकोजी पाठविला आहे. विनंती करील त्यावरून विदित होईल. विशेष काय लि।। हे विनंती.


*********************