रामदासी संप्रदायातील पत्रात थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख.

सदर पत्र सज्जनगड संस्थानाधिपती लक्ष्मण महारुद्र स्वामी यांनी मल्हार रामराव चिटणीस यांना लिहीलेले असून चिटणीस घराण्याने सुरुवातीपासून, म्हणजे अगदी बाळाजी आवजींपासून समर्थांची आणि संप्रदायाची सेवा केली या उल्लेखासह थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि थोरल्या शाहू महाराजांंचाही उल्लेख आहे.श्री राम समर्थ

श्री रामदासस्वामी
हनुमंत


श्रियासह चिरंजीव विजईभव राजमान्य राजश्री मल्हारीराव दादा चिटनवीस यास अनेक आसिर्वाद उपरी-
संस्थानचे गाव भूमी वगैरे बंदोबस्ताची राजपत्रे रुमाल तुम्हांपासी कैलासवासी श्री बाबास्वामींनी ठेविले. पूर्वी महादजी लिंगो याचे विद्यमाने दिल्हे ते ते पावले व चार मुख्य राजपत्रे, दोन थोरले कैलासवासी सिवाजी माहाराज यांचीदोन शाहू महाराज यांची ती आम्ही प्रौढ जालियावरी द्यावी म्हणोन ठेविली. ती हाली आणविल्यावरून तुम्ही आणून दिली ती पावली. त्यात येक पत्र सिवाजी महाराज यांणी श्री (येथे मान देण्यासाठी मोकळी जागा असून वर लिहीलेले "श्री रामदासस्वामी" हे शब्द वाचावयाचे आहेत) चे संंस्थानचा व्यापार राजद्वारी व संस्थानचे उस्तवारी बालाजी आवजी चिठनविस याजकडे नेमिली ते सेवा करितील म्हाणोन उत्तर पाठविले ते पत्र तुमचे तुम्हांपासी दिल्हे. बालाजी आवजी व खंडो बल्लाल व जिवाजी खंडेराव व गोविंद खंडेराव व  रामराव जिवाजी सेवा करीत आले त्याअन्वये तुम्हीही सेवा करीत आहा. पुढेही वंशपरंपरेने राजद्वारी व संस्थानी सेवा करीत जावी. सर्व पारपत्यगार व अधिकारी यांणी तुम्हांस कलऊन तुमचे समते चालावे, ऐसे राजाज्ञा व थोरले श्रींची आज्ञा. त्याप्रमाणे चालत जावे. तुम्ही सेवा करित आला तैसी करित जावी. बहुत काय लिहीणे. मिती शके १७३६ भावनाम संवछरे भाद्रपद शुद्ध १३ हे आसिर्वाद.


पत्राचा कालखंड : दि. २७ सप्टेंबर १८१४
भाद्रपद शुद्ध १३, शके १७३६, भावनाम संवत्सर


पत्राचा मूळ स्रोत : भा.इ.सं.मं. द्वितिय संमेलन वृत्त, शके १८३६, स्वीय ग्रंथमाला क्र. ८, पृ. २३४
दुय्यम स्रोत : "महाराष्ट्रेतिहासाची साधने, लेखांक ९३४" : संपादक - वा. सी. बेंद्रे