बखरीतील गोष्टी, भाग १ : गोवळकोंडा आणि भागानगर

भोईटे, सुर्वे, जाधवराव, कदम, शिंदे, रविराव (?), भांडवलकर, मोरे, घाटगे, झुंजारराव, नलावडे, सालोंखी, पाटणकर, दहिगावकर, येलाहूरकर (येल्लूरकर?), म्हसवडकर माने वगैरे घरंदाज मराठा घराणी विजयनगरच्या कृष्णदेवरायाची मानाने चाकरी करत, राजाज्ञेत राहून जहागीर-मनसब उपभोगत होती. या कदिम मराठा घराण्यांसोबतच ईब्राहिम कुत्ब, अली आदिल आणि बहिरी निजाम हे लोक सुद्धा कृष्णदेवरायाची मनोभावे चाकरी करत होते. कृष्णदेवरायाने यामूळे खुश होऊन ईब्राहिमला तेलंगण प्रांताचा सुभा बहाल केला आणि त्याच्यासोबत आपली खास लोकं नेमून दिली. ईब्राहिमही तेलंगण प्रांतात जाऊन जम बसवून तिथला प्रदेश सांभाळू लागला.

एके दिवशी ईब्राहिम शिकारीकरीता मुसी नदीच्या काठावर गेला असता शिकारीच्या शोधात तो जवळच्याच एका डोंगरावर गेला. तिथे अचानक एक ससा बाहेर येऊन काहीकुत्रे त्या सशाचा पाठलाग करू लागले. ससा आपला झाडाझुडपांतून लपत पळू लागला आणि एका मोकळ्या जागेवर येताच सगळ्यांची बोटं आश्चर्याने तोंडात गेली. तो ससा चक्क उलटला आणि कुत्र्यांच्या अंगावर आला. तो ससा अचानक उलटलेला पाहून सगळी कुत्री चक्क पळून गेली. ईब्राहिम चकीतच झाला ! त्याने ताबडतोब आपल्या हस्तकांकरवी एका हाफिझाला, म्हणजे जो कुराण तंतोतंत जाणतो अशा भल्या माणसाला आणि एका ब्राह्मणाला बोलवून आणलं आणि विचारलं, “हे काय आश्चर्य आहे ?”. तेव्हा ते दोघेही जण म्हणाले, “ही जागा मर्दानागिरीची आहे. इथे किल्ले बांधाल तर तो अतिशय बळकट होईल. तो कधिही पडणार नाही”. हे ऐकताच ईब्राहिमने त्यांना विचारले, मुहूर्त कधिचा चांगला आहे याकरीता ?”. तेव्हा त्यावरते दोघे म्हणाले, उद्याचा दिवस चांगला आहे, उद्याच सुरुवात करा”.

ज्या जागेवर हा प्रकार घडला तिथे जवळच एक लहानसं झोपडं होतं. एक धनगर आपल्या बायको–मुलांसह, आणि एका बकरीसह राहत होता. जवळच एक गोड्या पाण्याची विहीर होती. ईब्राहिमने त्या धनगराला बोलावून घेतलं आणि विचारलं, “अरे धनगरा ऐक, मी तुझ्या एवढी जागा मागतो आहे, तू स्वखुशीने ती द्याविस अशी माझी इच्छा आहे, पण जर तुझी इच्छा नसेल तर मी काही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही”. यावर तो धनगर बोलला, “सुभेदारसाहेब, ही जागा माझ्या आजोबा-पणजोबांपासून चालत आलेली आहे. तुम्ही खरे इथले शासक असूनही मला विनंती करत आहा, हेच अप्रुप आहे. या जागेवर मीच कशाला, अशा अनेक लोकांची यापूर्वीही वस्ती झाली असेल, नांदणूक झाली असेल. हे सगळं देणारा तो ईश्वर आहे. त्याच्या इच्छेने सगळं उभं राहतं आणि नष्टही होतं. पण माझी एक लहानशी इच्छा आहे. तुम्ही इथे किल्ला बांधून राहू म्हणता, तर माझी आठवण म्हणून तया किल्ल्याला माझं नाव ठेवावं, मी तुम्हांला स्वखुशीने जागा देतो”. ईब्राहिमला हे पटलं. त्याने त्या धनगराला तसं आश्वासन दिलं. तेलंगण प्रांतात धनगरांना गोलावाडू असं म्हणतात. त्या धनगराने त्याला म्हटलं, “किल्ल्याचं नाव गोलकुंडा आणि बालेहासार (बालाहिस्सार म्हणजे उंच ठिकाणी असलेला) ठेवा”, त्याप्रमाणे ईब्राहिमने किल्ला बांधून पूर्ण झाल्यावर त्याचं नाव “गोलकुंडा” ठेवलं.

असंच पुन्हा एकदा ईब्राहिम शिकारीला गेला असता तो भुकेने भयंकर कासाविस झाला होता. सोबत फारसा शिधाही नेलेला नव्हता. याच वेळी भागम्मा नावाची एक ब्राह्मणाची कन्या तीर्थयात्रेला जात असता, वाटेत थांबून जेवणाची तयारी करत होती. ती अतिशय देवभक्त होती. ईब्राहिमने तिला अन्नासाठी विनवलं आणि तिनेही आपल्यासोबत अजून एक ताट वाढून ईब्राहिमला जेवायला दिलं. जेवण झाल्यावर ईब्राहिमला हायसं वाटलं. त्याने आपल्या सेवकाकरवी पाचशे रुपये आणि वस्त्र दिली, आणि म्हटलं, “भागम्मा, तु मला मुलीसारखी आहेस. कसलाही संकोच न करता हे घे, आणि काही हवं असेल तर अजून माग !”. त्यावर भागम्मा ईब्राहिमला म्हणाली, फार काही मला मागायचं नाही, पण तुम्ही गोलकुंडा किल्ला बांधला. कदाचित पुढे किल्ल्याच्या पायथ्याला तुम्ही एखादं शहर वसवायचं ठरवलं तर त्या शहराला माझ्या नावावरून भागानगर असं नाव ठेवावं”. त्यावर ईब्राहिमनेही तिला शहर वसवून त्याचे नाव भागानगर ठेऊ असं आश्वासन दिलं !

एकूणच पुढे कुतुबशाहीचा गोवळकोंडा किल्ला आणि भागानगर शहर प्रसिद्ध झाले त्यामागची गोष्ट ही अशी आहे.

इतिहासदृष्ट्या काही महत्वाचं :- खरंतर बखरकाराने एक चूक केली आहे ती म्हणजे ही गोष्ट कुतुबशाहीचा संस्थापक कुली कुतुबशहाच्या ऐवजी त्याचा नातू ईब्राहिम कुतुबशहाच्या नावावर दिली आहे. भागानगर आणि  गोवळकोंड्याची निर्मिती कुली कुतुब या व्यतीने इ.स. १५१२ नंतर निकटच्या काही वर्षात केली. जावळीकर मोर्‍यांचा बखरकार हा सतराव्या शतकातील वा कदाचित त्यानंतरचा असल्याने त्याला परंपरेने ही गोष्ट तर माहित होती, पण नेमकं संस्थापकाचं नाव देण्यात त्याने गडबड केली.

स्रोत : जावळीकर मोरे यांची छोटी बखर.

© कौस्तुभ कस्तुरे