इंग्रजांची नीती : माऊंटस्टुअर्ट एलफिन्स्टनच्या पत्रातील विचार

माऊंटस्टुअर्ट एलफिन्स्टनने व्हिलर्स या अधिकार्‍याला दि. ५ ऑगस्ट १८३२ रोजी पाठवलेल्या पत्रातील प्रमुख मुद्दे पुढे उधृत केले आहेत. प्रथमतः पाहून असे वाटेल की शिक्षण आणून एलफिन्स्टनचा उद्देश काही थोर आहे, पण शेवटचा भाग वाचल्यास केवळ ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी आणि इंग्रजांना राज्य करण्यास सुलभ व्हावे यासाठी लोकांच्या मनात तेच बिंबवणारे शिक्षण इंग्रजांना अपेक्षित होते. सुरुवातीच्या परिच्छेदात इंग्रजी राज्य येण्यापूर्वी पेशवाई असताना किती सुलभता होती  याविषयीही माहिती मिळते..
परकी अंमल प्रथम प्रथम बरा मानवला. कारण सगळीकडे स्वास्थ्य झाणि व कारभारात पुष्कळच सुधारणा झाली. पण पुढे तो बरा वाटेनासा झाला. संस्था व लोकं ही एकमेकांशी जुळतं घेतंच असतात, पण स्वराज्य (म्हणजे मराठी राज्य) असताना सर्व समाजभर निरनिराळ्या थरांतून कसलाही प्रत्यवाय नसलेली अशी सलगपणाची व त्या परस्परांना जोडून त्यांची एकच साखळी बनवणारी नाती येथे होती. जातिसंस्था असूनही अत्यंत निकृष्ट दर्जापासून तो अत्यंत वरिष्ठ दर्जापर्यंत माणसांचा प्रवास या देशात जितक्या सुलभतेने होतो त्याहून जास्त सुलभतेने इतरत्र कोठेही होत नसे. अयोद्धेचा पहिला नवाब हा एक चिल्लर बनिया होता. पहिला पेशवा चावडीवरचा कारकून होता. होळकराचा मूळ पुरुष मेंढपाळ होता आणि शिंंद्यांचा मूळ पुरुष गुलामवजा हुजर्‍या होता. ही व यासारखी अनेक उदाहरणे गेल्या शतकात झालेली आहेत. आज अगदी सामान्य माणूस असावा आणि तोच वाढत वाढत मुलकी आणि लष्करी पेशातील कोणत्याही अंमलदारीच्या जागेपर्यंत वाढत जावा. फक्त राजा मात्र होता येत नाही, अशी उदाहरणे एतद्देशिय राज्यात प्रत्यही घडत आहेत. यामूळे लोकांचे तेज टिकून राहते व काही अंशी तरी लोकप्रतिनिधींच्या ज्या संस्था आपलेकडे आहेत त्यांचे काम या पद्धतीने भागते. निरनिराळ्या लोकांची ही जी अनिरुद्ध सरमिसळ आहे तीमूळे समाजाच्या पोटी वावरत असलेल्या भावना व समाजाचे ज्ञान यांचा संपूर्ण समाजभर फैलाव होतो व त्यांना चलन मिळते. उलट आपले राज्य सुरु झाल्यापासून या समाजाचे अलग अलग पडणारे व कसलाच सारखेपणा नसाणारे दोन खंड पडले आहेत. एक हातपाय आवरून घोरत पडलेला आणि दुसरा मात्र सत्ता आणि शहाणपणही हस्तगत करून  बसलेला. म्हणून या दोन वर्गातील हा अलगपणा नष्ट करणे आणि शिक्षणाने व त्यांजवर सार्वजनिक कामगिरीचा बोजा विश्वासाने टाकून त्यांना आपल्या बरोबरीस आणणे हे आपले पहिले काम आहे. पण याही कामी आपले परकी सरकार असल्यामूळे पुष्कळच अडचणी येतील. कारण की, आपण काही नवे करावयास पहावे आणि ते समजून पत्करण्यास लोकांची मात्र तयारी नसावी. कदाचित आपल्या कृत्यांचे हेतू बरोबर न उमगल्यामूळे लोक त्वेषाने प्रतिकारही करतील. काही विशेष प्रसंगी तर आपले प्रयत्न समाजाच्या सर्वसाधारण प्रकृतिमानाला मानवेसे नसले, आणि अजून चालू असलेली जी काही जुनी बांधणी येथे आहे, तिच्या काही काही  अंगास ते घासू लागले तर ते आपले प्रयत्न यशस्वी होऊनसुद्धा आपल्याला मोठाच धोका उत्पन्न व्हावयाचा...

... आता लोकांना जबरदस्तीने जागच्याजागी डांबून टाकणे हे जरी शक्य असले तरी ही जबरदस्ती आपल्याला नेटीव्ह सैन्याच्या बळावरच करता येईल आणि या नेटीव्ह सैन्याच्या भावना मात्र येथील इतर प्रजाजनांच्या भावनांसारख्याच असणार हे उघड आहे. म्हणून आपल्या मनात जो हेतू आहे तो फलित व्हावा असे वाटत असेल तर याला उत्तम उपाय म्हणजे सावधगिरीने पाऊल टाकणे हा होय. अअपले राज्य चालू राहिले म्हणजे येथील लोकांची सुधारणा होणार हे खासच समजावे. माझे एवढेच म्हणणे आहे की सामान्य लोकांना कनिष्ठ प्रतिचे शिक्षण सरसकट देण्याच्या ऐवजी वरिष्ठ वर्गांना उच्च प्रतिचे शिक्षण देणे अधिक महत्वाचे आहे असे मला वाटते...

... नेटीव्हांना नोकर्‍या देण्याविषयी म्हणाल तर न्यायखात्यात पुष्कळसे आधीच घेतलेले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या व मोठ्या पगाराच्या व मग अधिक जोखमीच्या जागा त्यांना हळूहळू देणे ईष्ट आहे. बोर्डावर एखादा नेटीव्ह मेंबर असला तर काय झालं ? एखादा जिल्हा प्रयोग म्हणून नेटीव्ह न्यायाधिशाच्या हवाली केला किंवा दुसर्‍या एखाद्या जिल्ह्यावर नेटीव्ह कलेक्टर नेमला म्हणून काय बिघडलं ? पण एवढं खरं की वरून साख्त देखरेख पाहिजे व या कामाला युरोपिअन लोक खूप आणले पाहिजेत. जर का हे केले नाही तर नेटीव्ह लोक पहिल्या सपाट्याला आपल्या राज्यकारभाराच्या घडीत त्यांचा तो जुना बदफैलीपणा पुन्हा सुरु करतील आणि मग मात्र त्यांंचा बिमोड करणे दुरापास्त होईल. वरिष्ठ  प्रतिच्या जागा नेटीव्हांना देताना अशी दक्षता घ्यावी की त्यांच्या मनात भलत्याच आकांक्षा उत्पन्न होऊ नयेत आणि त्या सफल झाल्या नाहीत म्हणून त्यांना असंतोषही वाटू नये. लष्करातील वा राज्यकारभारातील मर्मस्थानाची कोणतीही जागा नेटीव्हाला अजून कित्येक वर्षापर्यंत देऊ नयेत असं मला वाटतं...

... येथील लोकांना जए इंग्रजीचे आणि त्यांच्या भाषेचे शिक्षण द्यावयाचे त्याचा परिणाम असाच व्हावा की ख्रिस्तीती धर्माच्या प्रसाराला अनुकूल भूमी उत्पन्न व्हावी. खरोखर ख्रिस्ती धर्माचा प्रसार होण्याला अनुकुलता उत्पन्न करण्यास शिक्षणाशिवाय मला कोणताही मार्ग दिसत नाही. या लोकांचे जुने ग्रह अजून कायम आहेत, तोच जर का लोकांस बाटवण्याचे काम सुरु केले तर विरोध आणि भांडणे करण्याचे वारे त्यांच्यात उत्पन्न होईल. याहून प्रखर असे काही झाले नाही तर विशेषच म्हणावयाचे. पोर्तुगीज लोकांनी जे काही लोक धर्मांतरीत केले आहेत - हे धर्मांतर म्हणजे नुसते नावाचे आहे - ते सोडून दिले तर हिंदुस्थानांतील लोकांत आपल्या धर्मप्रसाराचे काम काही विशेष होत आहे असे मला वाटत नाही. त्रावणकोराकडे पुष्कळ लोक ख्रिस्ती झाले आहेत असं मी ऐकतो, पण मला विशेष माहिती नाही...


स्रोत : "महाराष्ट्रेतिहासाची साधने लेखांक १०१०" (संपादक : वा. सी. बेंद्रे)