बखरीतील गोष्टी, भाग २ : बाळाजी आवजींचे चातुर्य

एकदा शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीसांना एक राजकारणी पत्र लिहायला सांगितलं होतं. ते पत्र लगेच पाठवायचं म्हणून महाराजांनी काही वेळाने, दिवेलागणीच्या सुमारास बाळाजी आवजींना बोलवून घेतलं आणि म्हटलं, “ते सांगितलेलं पत्र आत्ता लगेच पाठवायचं आहे, लगेच आणा !”. वास्तविक काही कारणास्तव बाळाजी आवजींना त्या संपूर्ण दिवसभरात ते पत्र लिहायला वेळ मिळाला नव्हता, पण आता महाराज म्हणतायत “पत्र आणा” ! नाही तरी कसं म्हणावं ?


आता फडावर जाताच लगेचपत्र लिहू असा विचार करून बाळाजींनी “पत्र लिहीले आहे” एवढंच म्हटलं. पण महाराजांनी लगेच आज्ञा केली, “वाचा..” ! बापरे पंचाईतच झाली की आता. बाळाजी आवजींनी आपल्या जवळ असलेल्या कागदाच्या दोन बंदांची गुंडाळी उलगडली. संध्याकाळची वेळ झाली होती. अंधार जवळपास पडलाच होता. बाळाजीपंतांनी दरवाजाजवळ मशाल घेऊन उभ्या असलेल्या मशालजीला जवळ बोलवले, आणि त्या मशालीच्या उजेडात हळूहळू त्या दोन बंदावरील “पत्र” अगदी साद्यंत वाचून दाखवलं. शेवटची लेखनसीमेची वाक्य संपल्यावर बाळाजीपंतांनी वर पाहिलं. महाराज एकदम प्रसन्न दिसत होते. बाळाजी आवजींनी महाराजांनी सकाळी सांगितल्या बरहुकूम अगदी जसेच्या तसे पत्र लिहीले होते. महाराज खुष होऊन म्हणाले, “पंत, ल्याहावयास सांगितले तसे मतलब बहुतच कारस्थानीचे, त्या अन्वयेच लिहीलेत”.

महाराज बाळाजी आवजींचं हे कौतुक करत असतानाच तिथे, बाळाजी आवजींच्या शेजारी उभा असलेला तो मशालजी न राहवून पटकन हसला. एवढा जबर राजकारणी पत्राचा विषय सुरु असताना मशालजी हसला हे महाराजांना काहीसं खटकलं. त्यांनी त्या मशालजीला विचारलं, का हसलास?”... मशालजी काहीही बोलला नाही, त्यामूळे महाराजांना आणखीनच संशय आला, आणि त्यांनी करड्या आवाजात मशालजीला हसण्याचं कारण सांगण्याची आज्ञा केली. आता मात्र मशालजीची बोबडी वळली. त्याने घाबरत घाबरत पंतांकडे पाहिलं. बाळाजी आवजींना मशालजी खुद्कन का हसला हे समजलं होतं. आपल्यामूळे उगाच त्या मशालजीवर महाराजांची गैरमर्जी होणार हे लक्षात येऊन शेवटी बाळाजी आवजी पुढे झाले आणि अर्जीच्या स्वरुपात हात जोडून म्हणाले, “महाराज.. कागद तयार नव्हता म्हणून कोराच वाचला. आता तयार करणारच होतो, पण तेवढ्यात आपण बोलवलं. पण, माझी चूक झाली. क्षमा करण्यास स्वामी समर्थ आहेत !” असं म्हणून बाळाजीपंतांनी महाराजांना मुजरा केला. त्या मशालजीनेही म्हटलं, “पंतांनी कागाद कोराच वाचला म्हणून हसू आलं महाराज”, अन‌ असं म्हणत त्यानेही महाराजांना मुजरा केला..

महाराजांना सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. त्यांनी इतकंच म्हटलं, “बरं केलंत, पण आता पत्र लिहून, वाचून दाखावा !”. बाळाजीपंतांनी लगेच, तिथेच बसून मशालीच्या उजेडात पत्र लिहून पूर्ण केले आणि पुन्हा महाराजांना वाचून दाखवले. आता मात्र महाराज चकीतच झाले. आपण जे पंतांना सकाळी पत्र सांगितलं ते लिहीलं नसतानाही मगाशी त्यांनी एका अक्षराचा बदल न करता, पत्राच्या मजकूर अतिशय संगतवार जसा हवा तसाच कोर्‍या कागदावरचा वाचून दाखवला, आणि आताही तसंच, एका अक्षराचा बदल न करता पुन्हा तेच पत्र लिहून-वाचून दाखवलं ! महाराज चिटणीसांवर बेहद्द खुष झाले. “तुम्ही चिटणीस म्हणून अतिशय योग्य आहात” असं महाराजांनी पंतांचं कौतुक केलं. महाराजांनी ताबडतोब त्या मशालजीला काहीतरी आणायला आज्ञा केली. थोड्या वेळातच एक सेवक तबक घेऊन हजर झाला. महाराजांनी पंतांना मानाचा पोषाख, मोत्यांचा कंठा, पदक आणि शिरपेच बक्षिस दिला.. आणि चिटणीसांना खुप कौतुक करून नावाजले.

स्रोत : मल्हार रामराव विरचित सप्तप्रकरणात्मक चरित्र

© कौस्तुभ कस्तुरे