बखरीतील गोष्टी, भाग ३ : सरखेल मानाजीबावा आंग्रे

कान्होजी आंग़्र्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन पुत्रांमध्ये, संभाजीबावा आणि मानाजीबावांमध्ये वाद विकोपाला गेला. या वादात शेवटी असं ठरलं की मानाजीबावांनी कुलाब्याचा सुभा आणि संभाजीबावांनी सुवर्णदुर्गाचा सुभा सांभाळावा. बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सुमारे वर्षभरानी मानाजीबावा सातार्‍याला राजदर्शनाकरिता गेले. तिथे संभाजी आंग्रे यांचे वकील नारो मान शेणवी यांनी काही राजकारणं करून, मानाजीबावांना मारावं असा कट रचला.


याच सुमारास शाहू महाराजांचा “दळबादल” हा हत्ती अत्यंत मस्तवाल झाला होता. तो कोणाचंही, अगदी त्याच्या माहुताचंही ऐकायच्या तयारीत नव्हता. भडकलेल्या आणि मोकाट सुटलेल्या दळबादलने जवळपास वीस-पंचवीस माणसं अक्षरशः तुडवून मारली. त्या हत्तीला आवरण्याकरता त्याच्या जवळ जायलाही कोणाची छाती होत नव्हती. अखेरीस अनेकांनी, काहीतरी युक्तीने त्याच्या पायात भयंकर जाड असे साखळदंड अडकवून सातारा शहराबाहेर त्याला रोखून धरले. संभाजीबावांच्या वकीलाने इकडे शाहू महाराजांच्या मेव्हण्यांशी, शिर्क्यांशी संधान बांधून शाहू महाराजांकरवी मानाजीबावांना तो हत्ती शहरात आणण्यास पाठवायचा, आणि हत्ती आणायला गेल्यावर मानाजीबावा अनायसेच त्या गडबडीत मृत्यू पावतील असा घाट घातला. अर्थात, महाराजांना यामागचं राजकारण काहीच ठावूक नव्हतं. महाराजांना केवळ मानाजीबावा शिपाईगिरीत आणि बळात खुप पराक्रमी आहेत हेच महाराजांच्या मनात होतं. मानाजीबावांचीही महाराजांच्या पायाशी अत्यंत निष्ठा होती.

संभाजीबावांच्या वकीलाने घातलेला हा घाट मात्र कितीही गुप्त ठेवला तरी महाराजांच्या चिटणीसांना, गोविंदरावांना समजलाच ! त्यांनी लगेच आपल्या कारभार्‍यांना मानाजीबावांकडे निरोप घेऊन पाठवले, की “महाराजांचं तुम्हाला बोलावणं आलं तर आधी इथे येऊन मला भेटून मगच जा !”. पण इतक्यात महाराज दरबारात येऊन बसलेही होते. कारभार्‍यांना इकडे दरबारसुरु झाल्याचं वाटेत समजलं नाही, आणि तिकडे महाराजांनी बोलवलं म्हणून मानाजीबावा दरबारात गेले सुद्धा. मानाजींनी महाराजांना मुजरा केला, तेवढ्यात महाराजांची आज्ञा झाली, “मानाजी ! दळबादल हत्ती मस्तीस आला आहे, त्याला घेऊन या !”. मानाजीबावांनी मान लववून, “आज्ञा” असं म्हणत ते तडक शहाराबाहेर निघाले आणि हत्तीजवळ येऊन उभे राहिले. मानाजीबावांनी जराबेनेच हत्तीला “पाय दे” असं म्हणत इशारा केला. तो उमजून, हत्तीने अतिशय शांतपणे आपला पाय थोडासा मुडपला. मानाजीबावा पायावरून थेट जाऊन अंबारित बसले आणि त्यांनी माहुताला हत्तीच्या पायातील साखळदंड काढण्यास सांगितलं. घाबरत घाबरतच माहुताने साखळदंड उघडून काढले. त्या ठिकाणाहून मानाजीबावांनी तो हत्ती हाकून थेट राजावाड्याजवळ आणला. खाली उतरून मानाजीबावांनी शाहू महाराजांना मुजरा केला. महाराज मनापासून प्रसन्न झाले आणि म्हणाले, “मानाजी ! तू हे काम निष्ठेने पार पाडलंस ! शाबास !”, आणि असं म्हणून महाराजांनी तो हत्ती मानाजीबावांना बक्षिस दिला.

झालेल्या या घटनेने शेणवी वकीलाची प्रचंड चरफड झाली, शिर्केही खट्टू झाले. त्यांनी आणखी प्रयत्न करावा म्हणून आपला एक सुंदर घोडा एका माणसाबरोबर मानाजीरावांच्या छावणीजवळ पाठवला. मानाजीबावांनी घोडा पाहून त्यांना रपेटीची इच्छा झाली. मनपसंत रपेट करून झाल्यावर त्यांनी घोडा पुन्हा त्या माणसाकडे दिला आणि विचारलं, “घोडा कोणाचा आहे ?”. त्यावर तो इसम उद्गारला, “शिर्क्यांचा आहे”. त्यावर मानाजीबावांनी लगेच मानाने घोड्याचा लगाम धर असं त्या इसमाला सांगितलं असता त्याने लगाम धरायला नकार दिला. मानाजीबावांना आपली अवज्ञा झाल्याचा राग आला. त्यांनी तडक त्या इसमाच्या दोन-चार श्रीमुखात भडकावून दिल्या, आणि त्याला लगाम धरायला लावला.

त्या इसमाने ही सगळी घडलेली घटना जाऊन शिर्क्यांना सांगितली, आणि ते ऐकताच शिर्क्यांना प्रचंड राग आला. त्यांनी मानाजीबावांच्या छावणीवर हल्ला करण्याची तयारी सुरु केली. इकडे मानाजीबावांना हे सगळं समजताच त्यांनीही आपली पूर्ण तयारी केली, पण शिर्के चालून यायच्या आधीच त्यांनी आपला एक माणूस शिर्क्यांना निरोप पाठवला, की “एकदा पुर्ण विचार करून, जेवढे लोक घेऊन येणार असाल तेवढ्यांना घेऊन अजिबात उशिर न करता लगेच या ! मी सुद्धा तयारच आहे”. इकडे हा घडलेला प्रकार महाराजांच्याही कानावर गेला. त्यांनी ताबडतोब शिर्क्यांना बोलवून घेतलं आणि म्हटलं, “तुम्ही त्यांच्यावर चालून गेलात तर परिणाम काय होईल याचा विचार करा ! मानाजीबावा एकटाच निघाला तरी तुम्हां सगळ्यांचं पारिपत्य करेल. त्याने तुम्हाला हरवलं तर आमचा काही इलाज नसेल. तुम्ही कोणीही त्याच्या वाटेला जाऊ नका”. प्रत्यक्ष महाराजांनीच अशी कानउघडणी केली असता मानाजीबावांचे सगळे विरोधक वरमले. नंतर महाराजांनी मानाजीबावांची रवानगी कुलाब्याला केली, आणि मानाजीबावा “दळबादल” हत्तीला घेऊन कुलाब्याला आले.

---------------------------------------------------------

इतिहासदृष्ट्या काही महत्वाचं :- सदर हकीकत रावबहाद्दूर दत्तात्रय बळवंत पारसनिसांनी आपल्या “इतिहाससंग्रह” या मासिकात जुलै इ.स. १९०९ मध्ये प्रसिद्ध केली, आणि त्याखाली एक शेरा दिला त्यात त्यांनी म्हटलंय की, “या मूळ प्रतिच्या नकलेत बरेच हस्तदोष आढळून आले, तथापी यातील मजकूर हा अनेक दृष्टींनी बोधपर असा आहे”.

स्रोत : आंग्रे यांची हकीकत

©कौस्तुभ कस्तुरे