बाळाजीपंत नातूचा इंग्रजी कारभारातून संन्यास

इंग्रजांना मदत करणार्‍या बाळाजीपंत नातूविषयी अखेरीस लोकांत समज उत्पन्न होऊन त्याच्याविरुद्ध लोक बोलू लागले, छापू लागले. यामूळे आपले फार काही आता निभावणार नाही असं समजून बाळाजीने काशीस जाऊन राहण्याची तयारी केली. पण झाकली मूठ सव्वा लाखाची. आपण स्वखुशीने जातोय, मागे आपण काशी तथाकथित मोठी कामं केली, इंग्रजांविरुद्ध कसे आपण गेलो नाही वगैरे चढवून लिहून नातूने तो निर्दोष असल्याचा सरकारी अध्यादेश काढण्याकरिता जॉन वॉर्डनला दि. २४ फेब्रुवारी १८३३ रोजी एक विनंतीपत्र लिहीले. त्या विनंतीपत्रातील मुख्य अन महत्वाचा मजकूर असा-
"आपण तारिख १२ फेब्रुवारीच मला पत्र लिहीले की पुढे दुसरे गव्हनर साहेब येतील ते आपल्यास ओळखणार नाहीत व मेहेरबानी करावयास तुम्ही लायख नाहीत असे समजतील म्हणून लिहीले. त्यास खुदावंत बंदिगान अलि अलपिस्टन साहेब बहादूर मला कामकाजात बोलावू लागले. बाजीरावसाहेब आपल्याजवळ चाकरित रहावयाविशी फार आग्रह करित होते. थोर थोर बोलण्यास घातले. परंतू मी कबूल केले नाही. त्यामूळे बाजीरावसाहेब याची फार नाखुशी होऊन फोर्ड साहेब याचे मार्फतीने बाळाजीपंत तुम्ही आपलेजवळ घेऊ नये असे सांगून पाठवले. त्याचवेळेस मी हा मुलुख सोडून काशीस जात होतो तेव्हा अलपिष्टन साहेब यांनी मला जामिन देऊन ठेऊन घेतले. याची साक्ष अलपिष्टन साहेब व त्यावेळचे साहेब लोक आहेत. पुण्यावरचे दफ्तर जळाले. परंतू याचा दाखला बंगाल सरकारचे दफ्तरात असेल. पुढे सरकारचा अंमल जाला. बाजीरावसाहेब पळून गेले. त्यावेळेस पेशवे यांच्या वाड्यावर बावटा लावावयास राबिनसन (हेन्री रॉबर्टसन) साहेब याजबराबर  मलाच पाठविले. मी जात नव्हतो तेव्हा तुम्ही भीता की काय म्हणू लागले, सबब गेलो. ते राबिनसन साहेब हल्ली पुण्यात आहेत त्यास माहित आहे. यामूळे बाजीरावसाहेब व त्यांचे राज्यातील सारे लोकांची मजवर दुश्मनी ! सारे लोक एकीकडे, मी एकटा कंपनी सरकारच्या लष्करात होतो. सरकारने मेहेरबानी करून इनाम पेन्शन दिल्हे. तत्राप त्या लोकांस वाईट न वाटावे असे गरिबीचे चालीने सर्वांशी दोस्तीने वागतो. मजवर कोणी फिर्याद केली नाही व मीही कोणावर केली नाही याचा दाखला सरकारात आहे.करनल सर ब्यारो कलुष (बॅरी क्लोज) याजबरोबर सन १८१० चे साली माळव्यात होतो. तएव्हा पालखी, पंचवीस स्वार, पन्नास माणूस अशा तर्‍हेने होतो. खंडेराव रास्ते यांनी मरते वेळेस मी जवळ नसता वश्यतनामा (वसियतनामा = मृत्यूपत्र) केला. त्यात मला मुखत्यार लिहून ठेविले. माझी बेहुरमत  व बदनाम कोठेही नाही. लढाईचे वेळेस काही ऐवज सरकारांत ठेविला त्यांस पाटींजर (पॉटींजर‌) साहेब हली आहेत त्यास माहित आहे. अशी थोडीशी पत माझी पहिलीच होती, असा अहवाल आहे. परंतू हे बोलणे लायख नाही. पुढे गौरनर (गव्हर्नर) साहेब येतील ते सरकारची दफ्तरे व साहेब लोकांची वाकबगारी व सला न घेता माझा हुरमत खोटे छापखान्याचे भरावशावर कमती करतील. या गोष्टी परिक्षा पहावयास येथे राहणे मुनासिब नाही. याकरिता मनात विचार पुरा आणून हली लाट साहेब येथे आहेत व आपल्यासारखे साहेब लोक वाकब येथे आहेत तो पावेतो सार्‍यांच्या खुषीने रजा घेऊन काशीस जावे असा निश्चय करून हे आपल्यास पत्र लिहीले आहे. तर मजकरीता आपण मेहेरबानी करून तसदी सोसून सरकारात माझे तर्फेचा अर्ज करावा. जर माझे इनाम पेनशन सरकारात वापस घेतले असता मजवर कोणाचा वहिम राहणार नाही असे असल्यस वापास घ्यावयाचे ठरवून अबरु करीता सर्टिफिकीट देऊन काशीस जाण्याची रजा द्यावी, म्हणजे दसर्‍यास निघून काशीस जाईन. आपण मेहेरबानी करून हे केले म्हणजे यात माझी फार अबरू आहे व आपले यहसान जन्मपर्यंत विसरणार नाही".प्राथमिक स्रोत : भा.इ.सं.मं. वार्षिक इतिवृत्त, शके १८३८, पृ ८-१०
दुय्यम स्रोत : "महाराष्ट्रेतिहासाची साधने  लेखांंक १०१२" (संपादक : वा. सी. बेंद्रे)