शिवरायांचे जावळीचा देशाधिकारी आबाजी मोरदेव यास रामदासस्वामींबद्दल पत्र

दि. ३१ मार्च १६७६ रोजी, म्हणजेच राज्याभिषेकच्या दुसऱ्या शकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जावळी प्रांताचा देशाधिकारी आबाजी मोरदेव याला आज्ञा केली. काय ? तर कसबे चाफळ येथील श्री रघुनाथाचे देवस्थान, कसबे नाणेघोळ आणि कसबे कराड येथील देवालये येथील नित्य पूजा आणि तिथल्या देवाच्या सेवकांना वेतन तसेच श्री रामदासस्वामी जिथे कुठे असतील, त्यांच्या सोबत जो शिष्यसमुदाय असेल त्यांच्यासाठी नुकतीच सनद सादर केली आहे (हि चाफळची जुनी, पहिली सनद होय).समर्थांच्या चाफळच्या देवस्थानाबद्दल, अन्नछत्र आणि भक्तसमुदायाकरिता प्रतिवर्षी ६० खंडी तांदूळ व ६१ खंडी नागली म्हणजे नाचणी देत जाणे असं म्हणून तिथल्या सुभेदारांना आज्ञा केली होती. श्री रामदासस्वामी शिवथर असता या सनदेप्रमाणे पावतच होते. समर्थ महोत्सव वगैरे सर्व करून राहत असता त्यांच्या मनात काय आलं की, त्यांनी आपल्याला (शिवाजी महाराजांना) दत्ताजीपंत आणि समर्थांचा शिष्य रामजी गोसावी यांच्याबरोबर अचानक रायगडावर सांगून पाठवलं, "जे श्री रघुनाथासाठी दिलंत, ते सगळं मिळालं. याउपर एका रुपया अथवा एक दाणाहि धान्य देऊ नका. मला काही नको !".

यानंतर दत्ताजीपंतांनीही मला लिहिलं, की "महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्रींच्या पूजेकरिता सगळं पाठवत होतो. पण आता ते काहीच घेत नाहीत. माझ्याकडून कसलीही कसूर झाली नाही. असं काय कारण झालं ते मात्र समजत नाही. अलंकार, वस्त्रे, पालखी वगैरे सगळंच त्यांनी परत पाठवून दिलं. महाराजांनी समर्थांच्या शिष्यांना बोलावून काय झालं आहे नेमकं ते पाहिलं पाहिजे". यावरून महाराजांनी विचार केला की, पूर्वी श्रीसमर्थांची आणि महाराजांची भेट चाफळला झाली त्यावेळी समर्थांच्या सेवेसी महाराजांनी विनंती केली होती की "श्रीरामाच्या पूजेकरिता जे द्यायचं ते कोणाकडे द्यावं ? हे सगळं कोण पाहतं ?" त्यावर समर्थ महाराजांना म्हणाले (वास्तविक इथे समर्थांनी आज्ञा केली असं वाक्य मूळ पत्रात आहे), "देवाच सगळं दिवाकर गोसावी करतो, तो सध्या महाबळेश्वरी आहे. जे काही द्यायचं ते त्याच्या स्वाधीन करावं" असं म्हणून श्रीसमर्थांनी स्वमुखें महाराजांना आज्ञा केली होती व हेच नंतर दत्ताजीपंत मंत्री यांनीही महाराजांना सांगितलं.

दत्ताजीपंतांनी दिवाकर गोसाव्यांना पन्हाळ्यावर बोलावून घेतलं होतं, त्यांना पंतांनी विचारलं असता दिवाकर गोसाव्यांनी सांगितलं, "पूर्वीपासून समर्थांची निस्पृह स्थिती (मानसिकता) आहे हे प्रसिद्धच आहे. महाराजांच्या भक्तीस्तव वैभव, पूजा, अधिकार वगैरे कित्येक गोष्टी स्वीकार केल्या. पण पुन्हा मूळ स्थिती जशी होती तशीच आहे. काही घेत नाहीत म्हणून कोणत्याही गोष्टीबद्दल संशय येऊ देऊ नका (कसलीही काळजी करू नका)". याउपर समर्थांच्या पूजेकरिता आपल्याकडून काहीही मिळत नाही असं म्हणून महाराजांच्या मनाचं समाधान होत नव्हतं म्हणून त्यांनी आबाजी मोरदेवाला पूर्वीप्रमाणे जे होतं ते देत जाऊन शिवाय ऐवजाच्या वरात न देता जे जे लागेल ते पोतातून म्हणजे स्वराज्याच्या खजिन्यातून देत जाणे असं सांगितलं. याशिवाय १२१ खंडी गल्याची म्हणजे धान्याच्या वर्षासनाची सनद दिली होती ती समर्थांनीच नाकारली. पुढे समर्थ जेव्हा आज्ञा करतील तेव्हा ती सनद मी पुन्हा लिहून देईन, सांप्रत, ती सनद बाजूला राहू द्या, वरकड जे काही देत होतात ते देत जा असं महाराज आबाजीला सांगत आहेत. पावसाळ्यात कसलाही तुटवडा पडणार नाही अशी काळजी घ्या, पुढच्या वर्षाचा साथ आदल्या वर्षीच देऊन ठेवत जा जेणेकरून मध्ये खंड पडणार नाही. समर्थांनीच सनद आत्ता नाकारली असल्याने त्यांना जे धान्य लागेल ते बाजारभावाप्रमाणेच देत जाणे. जर यात काही चूक झाली, काडीइतकंही अंतर पडलं आणि माझ्या (महाराजांच्या) कानावर बोभाट आला तर "बारी ताकीद होईल" असं महाराज त्याला दटावतात. दिवाकर गोसाव्यांना बसायला घोडी दिली, तिला सरकारातून रोज १ पायली देत जाणे. दिवाकर गोसावी श्रीचा प्रसाद घेऊन येत जातील तेव्हा मोईन पावल्याचा जाब वेदमूर्ती दिवाकर गोसावी यांच्याकडून लिहून घ्यावा. वरकड शिष्य समर्थांचे जरी खूप असले तरी दिवाकर गोसावी यांच्याचकडे समर्थांनी कारभार सोपवला असल्याने त्यांचाच अधिकार गृहीत धरावा !

एकूणच, हे पत्र पाहिल्यानंतर शिव-समर्थ संबंध चांगलेच स्पष्ट होतात. जी १६७८ च्या सप्टेंबर मधील चाफळ सनद अनेक इतिहासकारांनी बनावट ठरवली आहे, तिचा संबंध या पत्रात आहे. चाफळच्या देवस्थानला दिलेली मूळ सनद १६७६ ची असून ती समर्थांनी नाकारली, त्यानंतर १६७८ च्या दसऱ्याला महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले आणि १६७८ मध्ये परत आले. यानंतर महाराज समर्थांना सज्जनगडावर जाऊन भेटल्याचा नोंदी आढळतात. यावेळी बहुदा समर्थांनी पूर्वी रद्द केलेली सनद महाराजांच्या आग्रहाखातर स्वीकारली असावी आणि म्हणूनच १६७८ च्या १५ सप्टेंबरला महाराजांनी ती नवी करून दिली. सादर, या आबाजी मोरदेवाला लिहिलेल्या पत्रातच महाराज म्हणतात, "श्रीनेच (समर्थांनीच) रोवली. पुढे आज्ञा करीतील तेव्हा हुजूरून सनद सादर होईल" ! एकूण हे पात्र सर्वच बाबतीत महत्वाचं आहे.

स्रोत : श्रीसंप्रदायाची कागदपत्रे, भाग १, लेखांक १४

- © कौस्तुभ कस्तुरे 
(मूळ लेख या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे याची नोंद घ्यावी).