लेखनप्रशस्ती

अनेकदा आपण ऐतिहासिक पत्रात मोकळ्या जागा पाहतो, उदाहरणार्थ "श्री__स्वामी", "श्री__चे" वगैरे. याचं कारण काय असावं असा प्रश्न अनेकांना पडतो. याकरिता अशी पत्रे नीट पहिली असता कोणत्याही देवस्थानला किंवा साधुसंताना लिहिलेल्या पत्राच्या उजव्या कोपऱ्यात, माथ्यावर देवतांची अथवा संतांची नावं लिहिलेली असतात. अशा वेळी पुढे पत्रात केवळ मोकळी जागा ठेवली जाते. यामागचा उद्देश असा, की एखाद्या पत्रात आपल्याहून मोठ्या पदावर असलेल्या माणसाचं अथवा देवाचं नाव आपल्या नावाच्या खाली येऊ नये !

उदाहरणार्थ, मायन्याच्या पहिल्या दोन ओळीत तरी पत्रलेखकाचं नाव येतं. जर पत्रलेखक हा त्याच्याहून मोठ्या अथवा पूजनीय व्यक्तीचा उल्लेख करणार असेल तर तिथे मोकळी जागा सोडतो. सोप्प उदाहरण पहा- शिवाजी महाराजांनी पुण्यातील कसब्याच्या गणपतीला दररोज नंदादीपाकरिता तेल देण्याची सनद करून दिली. यामध्ये माथ्यावर उजव्या कोपऱ्यात "श्री मोरया" असं लिहिलेलं असून खाली "श्री____कसबे" असं लिहिलेलं आहे. पत्र वाचताना तिथे "श्री मोरया कसबे" असं वाचायचं असतं. या पत्राच्या मुख्य मजकुराच्या पहिल्या ओळीतच "राजश्री सिवाजीराजे" हा शब्द आल्याने केवळ "मोरया" अथवा गणपतीचे नाव त्यांच्या नावाखाली लिहिले जाऊ नये म्हणून ते वर लिहिले गेले आणि खाली मोकळी जागा सोडली. खालील छायाचित्रावरून हे स्पष्ट होईल-हीच गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत लागू होत असे. राजा हा श्रेष्ठ असल्याने प्रधान किंवा इतर लोक राजाला पत्र लिहिताना हि काळजी घेत, प्रधान हा राजापेक्षा खाली पण इतरांपेक्षा वर असल्याने इतर लोक प्रधानाला लिहिलेल्या पत्रात हि काळजी घेत. पंतप्रधानाच्या शिक्का हा राजपत्रावर म्हणजे फर्मानावर असे पण राजाचं नाव हे दुसऱ्या ओळीत शक्यतो येत असल्याने कोणत्याही फर्मानात अथवा राजपत्रात प्रधानाचा शिक्का हा त्या दुसऱ्या ओळीच्या किंचित खाली, डावीकडे लिहिलेला आढळतो. जेव्हा राजा एखाद्या पूजनीय व्यक्तीला किंवा संतांना पत्र लिही तेव्हा स्वतःची राजमुद्रा देखील पत्रावर उमटवत नसे. जेव्हा पंतप्रधानाला पत्र लिहायची वेळ येई तेव्हा केवळ राजाचा शिक्का माथ्यावर असे. प्रधानापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेले लोक प्रधानाला पत्र लिहिताना पाठीवर शिक्का उमटवत, अथवा लहान वयाचा प्रधान आपल्याहुन वयाने ज्येष्ठ सरदारांना पत्र लिहिताना पाठीवर शिका उमटवे. एकूण, ज्याला पत्र लिहितो त्याचे पद, वय आणि त्याची समाजातील श्रेष्ठता ही सगळं पाहून लिखाणाचे नियम बनवलेले होते. उदाहरणार्थ हे पहा-शिवाजी महाराजांच्या कानूनजाबित्यानुसार केवळ पंतप्रधान अथवा पेशव्यांनीच राजपत्रावर शिक्का उमटवावा अशी तरतूद होती. सेनापती सोडून अष्टप्रधानातील इतर सर्व म्हणजे सहा मंत्र्यांना फर्मानाच्या मागे "संमत" निशाण करायला लागे. त्या त्या मंत्र्यांचा जिथे जिथे संबंध असे तिथे तिथे तो मंत्री निशाण करत असे. म्हणजे ते फर्मान अथवा राजपत्र या मंत्र्यांच्या संमतीने झाले आहे असा अर्थ होई. अनेक वेळा वेगळे शब्दही वापरले जात. सुरनीस अथवा सचिव "रुजू सुरुनिविस" असा शेरा करत, मंत्री "संमत मंत्री", सुमंत "संमत सुमंत" असं निशाण करत. हे पहा-राजपत्र अथवा फर्मान हे खुद्द चिटणिसांना लिहावे लागत असे. तिथे दुसऱ्या कोणाच्याही हस्ताक्षरातील चालत नव्हते. कानूनजाबित्यात म्हटलं आहे, "खास दस्तक ! मात्र वरकडाचा दाखल (अथवा) चिन्ह नाही ! (फक्त) चिटणिसांनीच करावे". म्हणूनच, बाळाजी आवजी चिटणिसांचे हस्ताक्षर ओळखता आले. अनेक पत्रांच्या मागे तर स्वतः बाळाजी आवजींनी स्वहस्ताक्षरात लिहिले आहे, "हे अक्षर बालपरभू चिटनिवीस". ते असे-कधीकधी इनामपत्रे, करीने किंवा महत्वाची कागदपत्रे लांबचलांब असतात. अशा वेळी एकाहून जास्त कागद एकमेकांना जोडावे लागत असत. पूर्वीपासून मानवी प्रवृत्तीच अशी आहे की स्वतःच्या स्वार्थानुसार आपल्याला हवे तसे अनेकदा बदल केले जातात. अशा वेळी कागदाच्या एकमेकांना चिकटवलेल्या बंदांमध्ये मधलाच कागद काढून आपल्याला हवा तो कागद कोणी जोडू नये याकरिता विशेष काळजी घेतली जाई. कधीकधी या जोडावरच अक्षरं येतील असं पाहिलं जाई. पण हि गोष्ट दर वेळेस शक्य नसे, कारण लिहिताना चिटणीस अथवा कारकून हे सुट्या बंदांवर लिहून घेत आणि ते नंतर एकमेकांना चिकटवत असत. यामुळे त्या चिकटवलेल्या भागाच्या मागच्या बाजूस, दोन कागदांच्या जोडावर मोर्तब अथवा समाप्तिमुद्रा उमटवल्या जात असत. हे जोड असे दिसत- एकूणच, कोणतंही पत्र असो, त्यात लिखाणाचे नियम हे ठरलेले असायचे.

- © कौस्तुभ कस्तुरे | kasturekaustubhs@gmail.com