आम्ही गनीमलोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो !

शिवाजी महाराजांच्या नंतर असा सर्व गुणांचा समुच्चय एका ठाय असणारा शासक परत झाला नाही. पेशवाईत थोरला बाजीराव हा एक उत्कृष्ट सेनापती होता, थोरला माधवराव हा निग्रही आणि अतिशय चारित्र्यसंपन्न पेशवा होता. परंतु राजकारणात मात्र बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशवा हा चतुर होता. नानासाहेबाची अनेक पत्रे त्याच्या चातुर्याची साक्ष देण्यास समर्थ आहेत. पत्रातील शब्द, भाषा निर्विवादपणे उत्तम आहे. सदाशिवरावभाऊ पानिपतावर पडल्यावर 'भाऊविना डौलात व्यर्थ आहे' असे उद्गार नानासाहेबांनी काढल्याचे सर्वश्रुतच आहे. नानासाहेब राष्ट्रीय बाण्याचा कडवा पेशवा होता. छत्रपती शाहूने स्वहस्ताक्षरात जवळ जवळ मृत्युपत्रच लिहून हे स्वराज्य नानासाहेबास संभाळावयास सांगितले याची कित्येकांना माहिती नसेल. पण नानासाहेबास शाहूविषयी आदर, भक्तिभाव होता. शनिवारवाड्याच्या तटाबुरुजाचे काम शाहूच्या आज्ञेमुळे जे थांबवण्यात आले होते ते इ.स. १७४९ नंतरच पूर्ण करण्यात आले. शिवाजीराजांची आठवण, कर्तृत्व सतत मनात ठेऊन नानासाहेब पत्रे लिहीत असे. शिवाजीराजांची जी उत्कृष्ट भाषाशैली पत्रातून दिसते, त्यासारखीच भाषा नानासाहेब पत्रांतून वापरताना दिसतो. आपली शक्ती, लोकांना बसवावयाची जरब याचा दृष्टांत नानासाहेबाच्या पत्रातून घडतो. नानासाहेब पेशव्याने पिलाजी जाधवरावाला लिहिलेल्या पत्रात बोल फारच बोलके आहेत.

"आम्हांसी स्नेह चित्तपासून करावा. सर्व प्रकारे आम्हां निखालस करावे, यासाठी नबाबांनी (निजामाने) जानबास व खानास पाठवले. त्यापासी किल्ल्याचा मजकूर नबाबाचा मर्जीप्रमाणे आम्ही कबुल केला. आमचा स्वार्थ त्यामध्ये काही नाही. असे असता नबाबाने सर्व एकीकडे ठेऊन गरमी दाखवू लागले तर आम्हांस श्रीकृपेने काय चिंता आहे ? आम्ही किल्ल्याविषयी काय इमान देणे ते देऊ. नाहीतर जे त्यांस बरे दिसेल ते करतील. आम्ही गनीमलोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो". 

नानासाहेबाची हि भाषा वाचल्यावर फार कौतुक वाटते. 'आम्हांस काय करावयाचे ते आम्ही करू' अशी जरब हा आशय आहे. शिवाजी महाराजांचा शिष्य म्हणवणारा हा नानासाहेब सारखा आठवत राहतो.


- ज्येष्ठ इतिहाससंशोधक कै. निनादराव बेडेकर
(इतिहासातील उद्गार या निनादरावांच्या पुस्तिकेतून साभार)