२०१०चा नोव्हेंबर महिना. काही ओळखीच्या लोकांसोबत शिवथरच्या त्या पवित्र घळीत दुपारच्या वेळी शांतपणे बसलेलो असताना सुचलेले शब्द.. पी.दि ते ब्रह्मांडी म्हणतात ना, त्यातलंच काहीसं. बहुदा, समर्थांनी त्यावेळी मला माझ्याच अंतरंगात डोकावून पाहण्याची बुद्धी दिली असावी..
(२४ नोव्हेंबर २०१०)
- © कौस्तुभ कस्तुरे
मी कोण आहे ?
निळ्याशार नभांगणातील, मी तो शुभ्र मेघ आहे,
गूढ शांत सागराची, गर्भखोली मीच आहे !
धरित्रीच्या उदरातील तप्त रसही मीच आहे,
भास्करच्या दिव्यतेजाचा किरणही मीच आहे !
अणूमधल्या दिव्यकणांचा भार तोचि मीच आहे,
प्रथ्वीच्या भूगोलाचा आधार तोचि मीच आहे !
हिमालयाच्या मऊपणातून उभा असलो तरीही,
वज्रशक्तीच्या मनाचा सह्याद्री तो मीच आहे !!
वेद विद्या जाणतो जो, ब्रम्ह तोचि मीच आहे,
कैलासाच्या अधिपतीचा शैव तोचि मीच आहे !
हे उकलले गूढ, मनीच्या अंतरंगी पाहताना,
श्रीकृष्णाच्या मौक्तिकेतील 'कौस्तुभमणी' मीच आहे !!
(२४ नोव्हेंबर २०१०)
- © कौस्तुभ कस्तुरे