रायगड आणि शिवशाहिरांसोबतच्या आठवणी

२००९ सालचा ऑक्टोबर महिना मी आयुष्यात कधीच विसरू नाही शकणार.. कारण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा, प्रत्यक्ष कवींद्र परमानंदच जणू पुनर्जन्म घेऊन शिवभारत सांगतात असा भास होतो त्या गुरुवर्य महाराष्ट्रभूषण श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत रायगड अनुभवण्याचा योग्य आला. खरंतर एकूण सात दिवसांची सहल असल्याने कॉलेज बुडवून जाणं अशक्य होतं, पण तिथे काहीतरी कारणं सांगून अखेर हि संधी गमवायची नाही असं ठरवलं आणि अखेर निघालो. प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड वगैरे बघून शेवटच्या दिवशी किल्ले रायगडावर मुक्काम होणार होता. खरंतर रायगड चढायला संध्याकाळ झाली आणि सगळे जण गडावर रात्रीच्या आसपास पोहोचले. खरंतर वाटलेलं, की आता एवढ्या रात्रीचं फारतर जेवण होईल आणि सगळे झोपायला जातील, पण होळीच्या माळावर काही औपचारिक कार्यक्रम झाल्यानंतर मात्र पुढे जे अनुभवलं ते विलक्षण होतं ! आम्ही सगळे शिवप्रभूंच्या समाधीचं दर्शन घेऊन वाडेश्वर महादेवाच्या मंदिरात बसलो. त्यानंतरच्या सुमारे दोन तासभर सुरु होतं ते शिवशाहिरांचं शिवचरित्रकथन ! बाबासाहेबांनी अनेक गोष्टी सांगितल्या. रायगडविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. त्यातल्या दोन दंतकथा म्हणजे सर्जा डोंबारी आणि हिरा गवळण यांची !

मिरझाराजा जयसिंहाच्या स्वारीत मुघल फौजा राजगडाच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या, त्यामुळे स्वराज्याची राजधानी सुरक्षित असावी म्हणून महाराजांनी रायगडावर वास्तव्य करायचं ठरवलं. हिरोजी इंदुलकर या निष्णात माणसाकडे रायगडचं काम सोपवण्यात आलं होतं. हिरोजींचं पद होतं, 'सुभेदार, सुभा इमारतखाते' ! हिरोजींनी रायगड बेलाग केला होताच, पण तरीही महाराजांनी अजून कसून तपासणी करण्याच्या हेतूने एक गम्मत केली. त्यांनी रायगडच्या आसमंतातील गावागावात दवंडी पिटायला सांगितलं की, "रायगड नेहमीच्या वाटेने अथवा वाघ दरवाज्याने न चढता इतर कोणत्याही मार्गाने जो चढेल त्याला बक्षीस दिलं जाईल". खरंतर आसपासच्या लोकांना रायगड काय चीज आहे हे माहित होतं. पण दूरदूरची काही माणसं बक्षिसाच्या आशेने यायची, गड चारही बाजूंनीं फिरून फिरायची, मान वर करून पाहायची आणि वर पाहता पाहता डोईवरलं पागोटं खाली पडलं की समजून जायची, गड्या हे साधंसुधं काम न्हवं !". अनेक लोकं आली आणि गेली, पण रायगड आडवाटेने चढायची हिम्मत कोणाची होईना. महाराजांना वाटलं की रायगड खरंच बेलाग आहे.पण एके दिवशी एक डोंबारी तरुण रायगडच्या पूर्वेला असणारा भवानीचा कडा घोरपडीसारखा चढू लागला आणि गडावरच्या लोकांची, खुद्द हिरोजींचीही बोटं आश्चर्याने तोंडात गेली. त्या तरुणाने भवानी कडा चढला ! तो कड्यावरून रायगड चढला ! महाराज आश्चर्यचकीत झाले, आणि त्यांनी त्या तरुणाचं खूप खूप कोडकौतुक केलं, त्याला बक्षीस दिलं. यानंतर मात्र महाराजांनी भवानी कडा सुरुंग लावून अजून तासण्याची आज्ञा दिली. तो तरुण कांदा चढून आला तरी हिरोजींनी केलेलं काम कमी होत नव्हतं, कारण इतकं मोठं बक्षीस लावून सुद्धा अनेक महिन्यात केवळ एक तरुण कांदा चढून येण्याची हिम्मत दाखवू शकला होता. त्यामुळे शत्रू अशा वाटेने गड चढून येणार नाही इतका गड हिरोजींनी सुरक्षित बनवला होता हे महाराजांना समजलं होतं.

रायगडाविषयीची अशीच एक दुसरी रोचक दंतकथा म्हणजे हीरा गवळणीची. रायगडाखालच्या वाडीत राहणारी हिरा नावाची गवळण कोजागिरीच्या पुनवेला गडावर दूध देण्यासाठी गेली आणि पहिल्यांदाच वर गेल्याने गड पाहण्यात हरखून गेली. सूर्यास्ताला गडाचे दरवाजे बंद होतात याचंही तिला भान राहीलं नव्हतं. खाली, वाडीत तिच्या घरी तिचं तान्हं लेकरू पाळण्यात होतं. मोठ्या नवलाईने गड पाहत असताना फिरत फिरत हिरा बाजारपेठेतून पुढे जात होती. आणि अचानक.. आकाश भेदणारा "धड्डम्मssss" असा आवाज आला. नकळत हिराचं लक्ष पश्चिमेकडे गेलं. सूर्य पश्चिमेच्या डोंगररांगांच्या पूर्ण मागे गेला होता. सूर्यास्त झाला होता. इकडे महादरवाजा कर्रर्रर्रर्र कडकड करत बंद केला जात होता. हातातला हंडा तसाच घट्ट धरत हिरा धावत धावत महादरवाजाकडे निघाली, पण जाईल कुठवर ? ती बाजारपेठ पार करायच्या आताच इकडे गडाची दारं बंद झाली होती. आता उद्याच्या सूर्योदयाशिवाय गडाचे दरवाजे उघडणार नव्हते. हिराने तिथले जे दौलतबंदी वा कोणी असतील त्यांना खूप विनवण्या केल्या पण महाराजांचा हुकूम मोडायला कोणी कसा धजावेल ? त्या पहारेकरी शिपायांना हिराची खूप दया येत होती पण तरीही नाईलाजास्तव गडाचे दरवाजे काही उघडणार नव्हते. खाली आपलं तान्हं लेकरू एकटं आहे, ते भुकेने रडत असेल या चिंतेने हिरा कळवळली. काहीतरी निश्चय करून ती उठली, आणि गडाच्या दक्षिण कड्याकडे जाऊ लागली. श्रीगोंदे टोकाच्या शेजारीच असलेल्या कड्यावरून हिराला खालच्या वाडीतील मिणमिणते दिवे दिसत होते. सोसाट्याचा वारा वाहत होता आणि अशातच हिरा हंडा खाली ठेऊन कड्याला बिलगली. हिरा तो भयानक ताशीव कडा उतरून खाली आपल्या घरी आली. हि बातमी दुसऱ्या दिवशी महाराजांना समजली तेव्हा महाराजांना नवल, कौतुक आणि भीतीही वाटली. एक तरुण स्त्री रायगडचा कडा उतरून खाली जाते हे निव्वळ आणि निव्वळ अशक्य होतं. महाराजांनी पालखी पाठवून हिराला गडावर बोलावून घेतलं. तिला साडी-चोळी देऊन, तिच्या बाळाला अंगडं-टोपडं देऊन तिचं कोडकौतुक केलं. हिरा माघारी गेल्यानंतर महाराजांनी ती जिथून कांदा उतरली तिथे एक बळकट बुरुज बांधायची आज्ञा दिली आणि त्या बुरुजाला हिराचं नाव देण्यास सांगितलं.

एकूणच, खरंतर या दोन्हीही दंतकथा आहेत. कागदपत्रांतून हिरकणीच्या बुरुजाचा वारंवार उल्लेख येत असला तरीही हे नाव याच घटनेमुळे पडले का त्या बुरुजाच्या नावावरून हि दंतकथा नंतर रूढ झाली हे इतिहासाला माहित नाही हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं. पण, त्यांची सांगण्याची पद्धत इतकी विलक्षण आहे, की जणू ते सगळे प्रसंग आपल्या समोरच घडत आहेत, आपण स्वतः त्या घटनेचे साक्षीदार आहोत व भाग आहोत असा भास होत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आम्ही सगळे वाडेश्वराच्या मंदिरात जमलो. सकाळी बाबासाहेबांनी कविराज भूषणाची महाराजांशी झालेली पहिली भेट, त्याचं रायगडावरील वास्तव्य आणि त्याने महाराजांना सादर केलेली "इंद्र जिम्मी जंभ पर" हि कविता वगैरे सगळ्याबद्दल सांगितलं. त्यांनी त्या आवेशातच, ती कविता जणू अशी काही हावभाव आणि हातवारे करत सादर केली की प्रत्यक्ष कवी भूषणच आपल्याला त्याचा छंद ऐकवतोय असा क्षणभर भास झाला. तिथून मग आम्ही बाजारपेठ, टकमक, होळीमाळ, वगैरे करत बालेकिल्ल्यातून मागच्या बाजूने राजसभेत आलो. राजसभेत बाबासाहेबांनी शिवराज्याभिषेकाचा सोहळा तंतोतंत डोळ्यांसमोर उभा केला. ती राजसभा कशी बांधली, त्यात कोणकोणते विभाग केले, राजसभेच्या आग्नेय कोपऱ्यात असलेल्या धर्मसभा आणि न्यायसभेच्या चौथर्यांपासून ते अगदी सिंहासनाच्या आणि नगारखान्याच्या एकेक गोष्टी बारकाईने बाबासाहेबांनी समजावून सांगितल्या. त्यानंतर मग राज्याभिषेकाच्या सुमारे आठवडाभर चाललेल्या सोहळ्याचं इत्यंभूत वर्णन.. बाबासाहेबांची ती खास शैलीतील अलकाब राजसभेत दुमदुमली.. "महाराजsss प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती कीsss" आणि मग तिथे उपस्थित आम्हा साऱ्यांच्या तोंडून भारलेल्या स्वरात शब्द आले.. "जय ! जय ! जय !"

खरं सांगायचं तर ते दोन दिवस माझ्या आयुष्यातलय सर्वोच्च आनंदाच्या दिवसांतले दोन दिवस होते. त्यानंतर अनेकदा बाबासाहेबांच्या सान्निध्यात, वेगवेगळ्या मित्रमंडळींसह रायगडावर 'शिवकाळ' अनुभवण्याचा योग आला. दरवेळी बाबासाहेबांकडून नवनवीन माहिती मिळत गेली, रायगड दरवेळेस पूर्वीपेक्षा वेगळा भासू लागला. कधी हिरकणी टोक असेल तर कधी वाघ दरवाजा, कधी महादरवाजा असेल तर कधी कुशावर्त.. निरनिराळ्या स्थळांची आणि वस्तूंची माहिती शिवशाहिरांकडून मिळणे या गोष्टीला तुळणा नाही. २००९ नंतर आज जवळपास आठ वर्ष झाली आहेत. पण आजही या मधल्या काळात अनेक वेळा गुरुवर्यांसोबतच्या त्या रायगडच्या वाऱ्या मनात पुन्हा उचंबळून वर येतात, अन मग पुन्हा हे मनातून त्यांच्यासोबत रायगडावर जाणं होतं..


- © कौस्तुभ कस्तुरे
kasturekaustubhs@gmail.com

सदर लेख हा 'बा-रायगड' समूहाच्या विशेषांकासाठी लिहिण्यात आला होता.