छत्रपती संभाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी

थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समर्थ रामदासस्वामींप्रती असलेली भक्ती सर्वश्रुत आहे. समर्थांना महाराज किती मानत असत हे त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांमधून स्पष्ट होतं. चाफळच्या मंदिरात लष्करी लोकांचा त्रास होतो म्हणून वेळोवेळी तेथील अंमलदारांना दिलेल्या आज्ञा असोत, वा वेळोवेळी करून दिलेल्या गावांच्या आणि धान्याच्या सनदा असोत. महाराजांनी समर्थांच्या संप्रदायाकडे विशेष लक्ष पुरवले होते. दि. ८ ऑगस्ट १६७६ रोजी महाराजांनी महिपतगड आणि सज्जनगड येथील किल्लेदारांना पत्र पाठवून, "समर्थ गडावर येतील, ते जितके दिवस राहतील तितके दिवस राहू द्या, जेव्हा जाऊ म्हणतील तेव्हा जाऊ द्या, त्यांची योग्य प्रकारे काळजी घ्या, त्यांना राहायला उत्तम जागा करून द्या" अशा आज्ञा दिल्या (श्री.सं.का.ले.१५ व १६). दि. १५ सप्टेंबर १६७८ रोजी दिलेल्या विस्तृत सनदेत तर महाराज समर्थांना "श्री सकळ सद्गुरुवर्य, श्री कैवल्यधाम, श्री महाराजस्वामी" असं संबोधतात (जमाव दफ्तर, पुणे पुराभिलेखागार). परंतु अचानक, ध्यानीमनी नसताना, दि. ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांचं रायगडावर निधन झालं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचे थोरले पुत्र संभाजीराजे सिंहासनाधिश्वर छत्रपती झाले. आपल्या वडिलांप्रमाणेच, संभाजीराजांनीही पुढे समर्थांचा आणि संप्रदायाचा योग्य प्रकारे परामर्श घेतला. महाबळेश्वरकरांना दिलेल्या एका सनदेत तर प्रत्यक्ष संभाजी महाराजांची वाक्य आहेत, "राजश्री आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हांस अगत्य". मग समर्थांच्या बाबतीत शिवाजी महाराजांचा संकल्प कसा होता हे त्यांच्या पुत्राला ठाऊक नसलं तरच नवल. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुरुवातीचे जवळपास सहा महिने संभाजीराजांना अंतर्गत राजकारणाला तोंड देत रायगड हस्तगत करण्यात आणि राज्यकारभार पूर्वपदावर आणण्यात गेले. पण अशातही, प्रत्यक्ष राज्याभिषेक व्हायच्या आधीच संभाजीराजांनी कार्तिक शुद्ध ६, शके १६०२ म्हणजेच दि. १८ ऑक्टोबर १६८० रोजी कऱ्हाड प्रांताच्या सुभेदाराला आज्ञा केली की, "कसबे चाफळ इथे श्रीदेव-स्वामी (श्रीराम आणि रामदासस्वामी) आहेत, त्यांना दरवर्षी रामनवमीच्या महोत्सवाकरिता पूर्वी दत्ताजीपंत मंत्री यांनी शिधा, पाने, कापड, रुपये दिले आहेत, ते यापुढेही जसेच्या तसे देत जा. नवमीच्या उत्सवानंतर दशमीला एकशेएकवीस ब्राह्मणांना भोजन आणि प्रत्येक ब्राह्मणास चार रुपये दक्षिणा देत जा. दरवर्षी दरबारातून नव्या सनदेची वाट पाहू नका, याच सनदेची नक्कल लिहून घेऊन हि अस्सल सनद दिवाकर गोसाव्यांकडे सुपूर्द करा". याशिवाय याच दिवशी संभाजीराजांनी वेदमूर्ती रघुनाथभट उपाध्ये यांना नैवेद्यानिमित्त, नंदादीपानिमित्त आणि किरकोळ साहित्यानिमित्त सनद करून दिली (श्री.सं.का.ले.३२ व ३३).

संभाजीराजांच्या विरोधात असलेल्या गटाला मात देऊन ते जेव्हा कारभार पाहू लागले तेव्हा समर्थांनी संभाजीराजांना एक उपदेशपर पत्र पाठवले. हे पत्र म्हणजे अक्षरशः संभाजी महाराजांसाठी नंदादीपच होता. समर्थांनी शंभुराजांना "आपले वडील कसे वागत होते, कसे कारभार करत होते, लोक कसे जोडत होते, त्यांचं बोलणं कसं होतं, चालणं कसं होतं" वगैरे सगळं समजावत आहेत. हे सदर पत्र असं –

अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे ।
तजविजा करीत बसावे । एकांत स्थळी ।।१।।
काही उग्रस्थिती सोडावी । काही सौम्यता धरावी ।
चिंता लागावी परावी अंतर्यामी ।।२।।
मागील अपराध क्षमावे । कारभारी हाती धरावे ।
सुखी करुनि सोडावे । कामाकडे ।।३।।
पाटातील तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना ।
तैसे जनांच्या मना । कळले पाहिजे ।।४।।
जनाचा प्रवाहों चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला ।
जन ठायी ठायी तुंबला । म्हणिजे खोटे ।।५।।
श्रेष्ठी जे जे मेळविले । त्यासाठी भांडत बैसले ।
मग जाणावे फावले । गलीमासी ।।६।।
ऐसे सहसा करू नये । दोघे भांडता तिसऱ्यासी जाये ।
धीर धरून महत्कार्य । समजून करावे ।।७।।
आधीच पडला धस्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती ।
याकारणे समस्ती । बुद्धि शोधावी ।।८।।
राजी राखता जग । मग कार्यभागाची लगबग ।
ऐसे जाणोनि सांग । समाधान राखावे ।।९।।
सकळ लोक एक करावे । गनिमा निपटुन काढावे ।
ऐसे करीता कीर्ति धावे । दिगंतरी ।।१०।।
आधी गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके ।
ऐसे न होता धक्के । राज्यास होती ।।११।।
समय प्रसंग वोळखावा । राग निपटुन काढावा ।
आला तरी कळो नेदावा । जनांमध्ये ।।१२।।
राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देवून करावे सेवक ।
लोकांचे मनामध्ये धाक । उपजोचि नये ।।१३।।
बहुत लोक मेळवावे । एक विचारे भरावे ।
कष्टे करोनी घसरावे । म्लेंच्छांवरी ।।१४।।
आहे तितुके जतन करावे । पुढे आणिक मेळवावे ।
महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ।।१५।।
लोकी हिम्मत धरावी । शर्तीची तरवार करावी ।
चढ़ती वाढती पदवी । पावाल येणे ।।१६।।
शिवरायास आठवावे । जीवित तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी राहावे । कीर्तीरुपे ।।१७।।
शिवरायांचे आठवावे स्वरूप । शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप । भुमंडळी ।।१८।।
शिवरायांचे कैसे चालणे । शिवरायांचे कैसे बोलणे ।
शिवरायांची सलगी देणे । कैसे असे ।।१९।।
सकळ सुखांचा त्याग । करुनी साधिजे तो योग ।
राज्यसाधनाची लगबग । कैसी केली ।।२०।।
त्याहुनी करावे विशेष । तरीच म्हणावे पुरूष ।
या उपरी आता विशेष । काय लिहावे।।२१।।

दि. १८ ऑक्टोबर १६८० रोजी जावळीच्या कशी रंगनाथ सुभेदाराला लिहिलेल्या आज्ञापत्रात शंभूराजांनी यापूर्वी थोरल्या कैलासवासी स्वामींनी म्हणजेच शिवाजी महाराजांनी खुद्द समर्थ रामदासस्वामींना दिलेल्या इनामांचा उल्लेख केलेला आहे. हे इनाम चाफळच्या देवस्थानाला नसून वैयक्तिकरित्या समर्थांना आहे हे विशेष. यात तांदूळ, कणिक, डाळ, तूप, मीठ तेल, सुपारी, विड्याची पाने वगैरेचा उल्लेख असून यासोबतच नव्या आज्ञा देताना संभाजीराजे म्हणतात, "पूर्वीप्रमाणे थोरल्या स्वामींनी जे जे दिलं आहे ते तसंच देत जा. पूर्वी एक दुभती म्हैस दिलेली होती, तिने दूध देणे थांबवल्यास ती सरकारात घेऊन नवी म्हैस त्यांना देत जा. या सनदेप्रमाणे सगळं देत जा, दरवर्षी नव्या सनदेची वाट पाहू नका. समर्थांना कोणत्याही सामग्रीची कमी पडू देऊ नका. त्यांच्याकडे सरकारातून एक हरकारा दिलेला आहे त्याला त्याचा खर्च देत जा आणि तो खर्च धर्मादाय खात्यात लिहीत जा" (श्री.सं.का.ले.३४). याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे दि. १९ ऑक्टोबर १६८० या दिवशी वासुदेव बाळकृष्ण यांना आज्ञापत्र पाठवलं. हे संपूर्ण आज्ञापत्र वाचनीय आहे. त्याचा थोडक्यात सारांश असा -

"कसबे चाफळ इथे श्री रामदास गोसावी यांनी श्रीरघुनाथस्वामीचे देवालय केले आहे. तिथे (नवमीला) यात्रा भरतेच, पण इतरही महोत्सव चालतात. अशास, तिथे जे कटकीचे म्हणजे लष्कराचे शिपाई आणि कित्येक वरकड लोक राहतात त्यांच्याकडून श्रींचा मान ठेवला जात नाही आणि जे यात्रेकरीत लोक येतात त्यांना हे शिपाई आणि वरकड लोक त्रास देतात, आपल्या पेशाचा धाक दाखवून त्यांच्या खोड्या काढतात असं माझ्या कानावर आलं आहे. तेव्हा, तुम्ही या सगळ्यांना ताकीद देऊन यात्रा असू दे किंवा इतर काही महोत्सव, सगळं नीट करा. तुम्ही स्वतः सरकारी कारकुनांना सोबत घेऊन मुसलमान लोकांचा आणि इतरांचाही उपद्रव होणार नाही असं बघा. तिथे समर्थांचं घर आहे त्याचा आणि देवाकरिता आणि समर्थांच्या दर्शनाकरिता जे ब्राम्हण येऊन वस्ती करतात त्यांचाही योग्य प्रकारे परामर्श घेत जा. असं सगळं थोरल्या कैलासवासी स्वामींनी म्हणजे शिवाजी महाराजांनीं दत्ताजीपंत मंत्र्यांना बजावलं होतं त्याप्रमाणे करत जा. श्रींची सिंहासने म्हणजे मठ स्थळोस्थळी आहेत, तिथून अनेक लोक दरवर्षी येऊन महोत्सव होतो, त्याचं संरक्षण करणे" (श्री.सं.का.ले. ३७)

याच प्रकारे संभाजीराजांनी दि. १८ ऑक्टोबर रोजी कृष्णाजी भास्करांना हीच आज्ञा पुन्हा केली आहे (श्री.सं.का.ले. ४१). दि. २७ ऑक्टोबर १६८० रोजी संभाजी महाराजांनी साताऱ्याचा सुभेदार कोनेर रंगनाथ याला आज्ञापत्र पाठवून "किल्ले सज्जनगडावर समर्थ आहेत, त्यांना, त्यांच्या समुदायाला आणि देवाच्या नैवेद्याकरिता सरकारातून लाकडाचे फाटे, गवताचे भारे आणि कोळसे देण्याची" आज्ञा केली (श्री.सं.का.ले. ३९).

समर्थांनी समाधी घेण्याच्या एक महिना आधी, पौष वद्य ९ शके १६०३ म्हणजेच दि. २३ डिसेंबर १६८१ रोजी संभाजीराजांना काही उपदेश केला, काही गोष्टी सांगितल्या. त्याचा सारांश असा -

"श्रीशिवराज कैलासवासी यांचा वंश पुढे खूप वर्षे राज्य करेल. येत्या पाच वर्षांपर्यंत अत्यंत कठीण काळ आहे, अतिशय सावधगिरीने मार्गक्रमण करा. पूर्वी राजश्रीस (शिवाजी महाराजांना) राजधर्म व क्षात्रधर्म व अखंड सावधान (हे पात्र संभाजी महाराजांना) अशी पत्रं पाठवली होती, ती प्रसंगानुसार वाचत जाऊन,त्याचं मनन करून त्याप्रमाणे वर्तणूक करीत जावी. या वचनांचा भर देवावर आहे. नळ संवत्सरात म्हणजे शके १५९८ मध्ये शिवाजी महाराजांनी शिवथरच्या मुक्कामी (समर्थांना) १८ शस्त्रे दिली, त्यावेळी अनेक आशीर्वाद दिले. यापुढेही १२ वर्षांनी उत्कट भाग्य आहे. ज्या वेळी जे घडणार असेल ते घडून येईल. माझ्या (समर्थांच्या) जवळ जे काही होतं ते श्रीस देऊन टाकलं. प्रसंगानुसार चाफळच्या देवालयाचा जीर्णोद्धार घडून येईल हे शिवाजी महाराजांच्या मनात होतं, यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा अथवा चाफळच्या महाद्वारी दीपमाळा लावाव्या. प्रमाद संवत्सरात म्हणजे शके १५९५ मध्ये शिंगणवाडीच्या मठात थोरल्या शिवाजी महाराजांनी श्रीच्या सगळ्या कार्याचा स्वीकार केला, नित्य उत्सव आणि यात्रा-समारंभ पुढे चालवला, आणि आपण मग सज्जनगडावर सुखाने येऊन राहिलो. श्रीच्या नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी आणि पूर्वीप्रमाणे एकशेएकवीस धान्यसंकल्प पुढे सुरु ठेवावा (हि सनद म्हणजेच शिवाजी महाराजांनी पूवी करून दिलेली चाफळच्या नवी सनद). यापूर्वी काही काळ असताना स्वतः राजश्री (संभाजीराजे) सज्जनगडावर येणार होते पण तेवढ्यात उत्तरेकडून राजपुत्र (शाहजादा अकबर) आला, तेव्हा तुम्ही त्याला 'आता कशाकरिता आला' असं म्हणालात, पण असं न करीत त्या लोकांनाही सामावून घ्याल तर एकत्र होऊन तुमचं काम पूर्ण होईल, पण त्यासाठी जलदगतीने हालचाली कराव्या लागतील. असो, प्रतिवर्षी श्रीच्या यात्रेकरिता राजवाड्यातून एक भाला माणूस पाठवून द्यावा, सोबत रथोत्सवाचं सामान पाठवावं. हे सगळं झाल्यानंतर हे सामान पुन्हा राजवाड्यात न्यावं, असा पूर्वीचा नियम होता, त्याप्रमाणे करावं". 

यानंतर महिन्याभराने, मग वद्य अष्टमीला समर्थ दुसऱ्या प्रहरी निद्रा करून उठले आणि बोलले, "देवद्रोही यांचा नाशची आहे ।।१।। समुद्रतीरस्छांचा नाश आहे ।।२।।". यानंतर दुसऱ्या दिवशी दोन प्रहार दिवसाला समर्थांनी सगळ्यांना दरवाजाबाहेर जायला सांगितलं आणि पलंगावरून उतरून पादुकांवर उत्तराभिमुख बसले आणि रामनामाचा जप मोठ्याने केला. यासोबतच समर्थांनी आपला अवतार पूर्ण केला. श्री रामदासस्वामी समाधिस्थ झाले (श्री.सं.का.ले.४३). समर्थांनी माघ वद्य ९ शके १६०३ रोजी समाधी घेतल्यानंतर दि. १३ मार्च १६८२ रोजी जावळीच्या काशी रंगनाथ नावाच्या सुभेदाराला आज्ञापत्र लिहून कळवलं की, "श्री रामदासस्वामी सज्जनगडी होते, त्यांनी पूर्णावतार केला. त्यांनी स्थापन केलेल्या सज्जनगड आणि चाफळ येथील देवालयाच्या मूर्तींसंबंधी पूर्वी ज्या ज्या सनदा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे चालवणे" (श्री.सं.का.ले.४४). याच दिवशी साताऱ्याचा सुभेदार कोनेर रंगनाथ आणि कऱ्हाडचा सुभेदार बयाजी भास्कर यांना पत्र लिहून संभाजीराजांनी आज्ञा केली की, "श्रीसमर्थांनी पूर्णावतार केला, तरी पूर्वीप्रमाणे जे चालत आलं आहे ते तसंच पुढे चालवा. समर्थांनी दिवाकर गोसावी यांच्या स्वाधीन सगळं कारभार केलेला आहे. ते पूर्वी समर्थ चालवत होते तसंच सगळं चालवतील. तरी तुम्ही पूर्वी पूर्वीप्रमाणे यात्रा संरक्षण करून समारंभ सुखरूप होईल असं पाहत जा"(श्री.सं.का.ले.४५ व ४६). संभाजीराजांनी समर्थशिष्य दिवाकर गोसाव्यांनाही पत्र लिहून सांगितलं की, "पूर्वी जसं चालत होतं तसंच यापुढेही चालवलं जाईल, आपण सगळं यथासांग करीत जावे" (श्री.सं.का.ले.४७).

खरंतर समर्थांनी समाधी घेण्यापूर्वीच दिवाकर गोसाव्यांना आपला उत्तराधिकारी नेमलं होतं. इ.स. १६७६ मध्ये शिवथरघळीत मुक्काम असताना समर्थ सगळ्यांसमक्ष म्हणाले होते, "हा (दिवाकर गोसावी) महाबळेश्वरकर आहे. बुद्धीही महाबळ आहे. राजद्वारी कित्येक प्रसंगाशी पाठवावयास योग्य असे प्रस्छान पारपत्ययोग्य याच्या हस्ते श्रीचे संस्छान जोपर्यंत तो कार्यकर्तव्य वंशपरंपरेने घ्यावे". पण दुर्दैवाने समर्थांच्या नंतर त्यांच्याच संप्रदायात तेढ निर्माण झाली. उद्धव गोसाव्यांना दिवाकर गोसाव्यांना मिळालेला हा सन्मान पहावला नाही आणि नवीच कटकट उत्पन्न झाली. याकरिता संभाजी महाराजांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी दि. २ जून १६८२ रोजी सज्जनगडचा किल्लेदार जिजोजी काटकर याला आज्ञापत्र लिहून कळवलं की, "श्री रामदासस्वामी यांनी अवतार पूर्ण केला. त्या अगोदरच त्यांनी आज्ञा केली होती की दिवाकर गोसाव्यांनीं पुढे सगळं सांभाळावं. गडावर सध्या भानजी आणि रामजी गोसावी आहेत. असं असताना उद्धव गोसावी उगाच द्रव्यलोभास्तव भानजी आणि रामजी गोसाव्यांपाशी कटकट करतात आणि त्यांच्या या करणीत तुम्हीही सामील होऊन समर्थांचं द्रव्य, वस्त्रं, पात्रं वगैरे सगळं उभयता गोसाव्यांकडून (बळाने) घेऊन देवविलं. तुम्हाला या नसत्या उठाठेवी करण्याची गरज काय आहे, आणि मुळात उद्धव गोसाव्यांना सुद्धा गरज काय आहे ? तुम्ही जे जे उभयता गोसाव्यांकडून घेऊन उद्धव गोसाव्यांना दिलं असेल ते ते सगळं पुन्हा त्यांना माघारी द्या आणि उद्धव गोसाव्यांना उगाच कटकट करू देऊ नका. समर्थांनी पूर्वीच आज्ञा केली आहे त्याप्रमाणे मुख्य महोत्सव चाफाळी होत जाईल. स्वामींकडे चीजवस्तूंचा जो काही विचार करायचा तो दिवाकर गोसावी करतील आणि आम्हाला (संभाजीराजांना) कळवतील. राजवाड्यात येणं जाणं जे करायचं आहे ते दिवाकर गोसावीच करतील. तुम्हाला या घालमेलीत पडायचं काहीही प्रयोजन नाही. श्री समर्थ रामदासस्वामींच्या समुदायात काडीइतकंही अंतर पडू देऊ नका. श्रींच्या समुदायाने, उद्धव गोसाव्यांनी पूर्वीप्रमाणे चालत असेल तसंच राहावं आणि तुम्ही याकडे कटाक्षाने लक्ष द्या" (श्री.सं.का.ले.४८).

दि. २६ फेब्रुवारी १६८४ रोजी कऱ्हाडच्या वेंकाजी रुद्र सुभेदाराला संभाजीराजांनी पूर्वीसारखाच चाफळच्या महोत्सव व्यवस्थित चालत आहे का नाही ते पाहण्यास आज्ञा केली आहे. याच दिवशी साताऱ्याचा सुभेदार अंबाजी मोरदेव याला चाफळच्या देवस्थानाला असलेलं इनाम पूर्वीप्रमाणे आता दिवाकर गोसाव्यांकडे चालू ठेवण्यास बजावलं आहे (श्री.सं.का.ले.५७ व ५८). संभाजी महाराजांचे अमात्य नारायण रघुनाथ यांनी १९ सप्टेंबर १६८५ रोजीच्या एका पत्रात "श्रींची यात्रा, तेथे कोण्हास जुलूम जजती उचापती करायवास गरज नाही असे राजश्रीसाहेबाचे (संभाजीराजांचे) शासन आहे" असं म्हटलं आहे. यावरून संभाजीराजांचा मनोदय व्यक्त होतो. कसबे चाफळ येथील महोत्सवात वर्षासनाचा ऐवज वेळच्यावेळी पावत नाही हे समजताच संभाजीराजांनी दि. ३ नोव्हेंबर १६८५ रोजी कऱ्हाडच्या रंगो विश्वनाथ सुभेदाराला आज्ञा केली की, "ऐवज वर्षास स्वामीने देवीला आहे, तो ऐवज तुम्ही पावत नाही. श्रीच्या कार्यास खळखळ करता. गावोगावच्या करता करून देता, पण (कामचुकारपणा करून) तुम्ही ऐवज जमा करून देत नाही म्हणून कळलं. श्रींच्या कार्यात हयगय करायला तुम्हाला गरज काय आहे ? जो ऐवज नेमून दिला आहे तो बिनाकसूर पावत करावा यात्रेत काहीही उचापती होता काम नयेत" (श्री.सं.का.ले.६०). मध्यंतरी पुन्हा दिवाकर गोसावी आणि उद्धव गोसावी यांच्यातला वाद शिगेला गेला म्हणून अखेर संभाजी महाराजांनी उद्धव गोसाव्यांना तिथून बाहेरच घालवून दिलं. दि. ३ नोव्हेंबर १६८५ च्याच कवी कलश छंदोगामात्य यांना लिहिलेल्या पत्रात संभाजीराजांनी या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे (श्री.सं.का.ले. ६१)

याशिवायही समर्थ संप्रदायाचा योग्य परामर्श घेण्याविषयी आणि त्यांना कसलाही त्रास होऊ न देण्याविषयी वेळोवेळी अनेक पत्रे स्वतः संभाजी महाराजांनी आणि निळोपंत पेशवे वगैरे प्रभुतींनी पाठवलेली आहेत. बहुत काय लिहिणे ?स्रोत : 

१) समर्थसंप्रदायाची कागदपत्रे खंड १
२) हनुमानस्वामी बखर (ब्रिटिश लायब्ररी प्रत)
३) पेशवे दफ्तरातील सनदा- © कौस्तुभ सतीश कस्तुरे 
kasturekaustubhs@gmail.com | www.kaustubhkasture.in