दक्षिणीयांचे हातून पातशाही निसटली

पुरंदरच्या तहानंतर मुघल आणि मराठे यांच्यात जवळपास चार वर्षे शांतता नांदत होती. पण इ.स. १६६९-७० च्या सुमारास औरंगजेबाच्या मनात धर्मवेडाची लाट पुन्हा उसळली आणि त्याने उत्तरेतील हिंदूंच्या श्रद्धास्थानांना हानी पोहोचवण्यास सुरुवात केली. अनेक मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. हिंदूंकडून अनेक कामे केवळ जबरदस्तीने करवण्यात येऊ लागली. निरनिराळ्या कराच्या बोज्याखाली आधीच निष्प्राण होत असतानाच हिंदूंवर जिझिया कर लादण्यात आला! पण हे सारं औरंगजेब मोठ्या गुर्मीत आणि त्याच वेळेस शांततेत करत असताना उत्तरेतील हिंदू काय करत होते? राजपूत, जाट, बुंदेले आदी सारे जण मुघलांचीच चाकरी करण्यात धन्यता मनात होते! एक केवळ शीख ते काय मुघलांना प्राणपणाने विरोध करत आले होते पण एवढ्या प्रचंड मुघलदलासमोर त्यांचा पाडाव तो काय लागावा?

पुरंदरच्या तहानंतर आता चार वर्षे उलटली होती. खरंतर महाराजांनी हि चार वर्ष स्वराज्याची विस्कळीत झालेली घडी नीट बसवण्यासाठी मुद्दाम शांतता प्रस्थापित ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. इ.स. १६५९ च्या अफजलखान स्वारीनंतर सतत स्वराज्यावर संकटे कोसळत होती. सुलतानी फौजांच्या आक्रमणात खेडीच्या खेडी जळून राख होत होती. पिकांचे नुकसान होत होते, मध्यंतरी सुरत एकदा लुटली पण तो खजिना कितपत पुरावा? सामान्य रयतेला, शेतकऱ्यांना आणि सैनिकांनाही आपलं जीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यास काही काळ जावा लागणार होता, आणि म्हणूनच हि चार वर्ष महाराजांनी मुघलांविरुद्ध काहीही हालचाल केली नाही. पण आता मात्र औरंगजेबाचे अत्याचार वाढतच होते. महाराजांनी औरंगजेबाला समजुतीची आणि काहीशा दटावणीची पत्र पाठवून त्याच्या पूर्वजांची आठवण देऊन राज्य नीट करा, हिंदूंना त्रास देऊ नका वगैरे सांगितलं. पण अर्थात, त्या पाषाणहृदयावर कसला परिणाम होणार? अखेर महाराजांनी दि. ४ फेब्रुवारी १६७० रोजी सिंहगड पुन्हा जिंकून मुघलांविरुद्ध आघाडी उघडली.

यानंतर पुढची आठ वर्ष मुघल आणि मराठे यांच्यातला विस्तव वाढतच गेला. महाराजांनी पुरंदरच्या तहात मुघलांकडे गेलेले २३ किल्ले पुन्हा जिंकून घेतले, मुघल साम्राज्याची सुरत पुन्हा एकदा बदसुरत केली, जालना-सिंदखेड वगैरे प्रदेश जाळून बेचिराख केला, कारंजा लुटलं, राज्याभिषेक करून अधिकृतपणे 'हिंदू राजा' म्हणून सिंहासनारोहण केले आणि त्यात आणखी म्हणजे दक्षिणच्या आदिलशाही आणि कुत्बशाही या दोन पातशाह्यांना एकत्र करून, मुघलांविरुद्ध एक नवी एकजुटीची आघाडी उभारायला सुरुवात केली. या सगळ्यात औरंगजेबाच्या मनस्थितीत काय बदल व्हावा? काहीही नाही! राज्याभिषेकानंतर तीन वर्षातच युवराज संभाजीराजे दिलेरखानाच्या गोटात गेले, पण औरंगजेबाने या गोष्टीचा तरी राजकारणासाठी वापर केला का? स्वराज्याचा भावी छत्रपती आपल्या छावणीत आला आहे हे पाहून त्याचा जीव घेण्याकडे औरंगजेबाचा कल होता. अर्थात, संभाजीराजांना कशी ते समजत नाही, पण हि बातमी समजली (बहुदा महाराजांचे जावई महादजी नाईक निंबाळकरांनी हि बातमी दिली असावी) आणि आपण केलेली चूक लक्षात येऊन संभाजीराजे पुन्हा स्वराज्यात परत आले. इकडे संभाजीराजांना मारण्याची स्वप्न रंगवणाऱ्या औरंगजेबाचा पुन्हा एकदा तिळपापड उडाला. स्वराज्याचा भावी छत्रपती त्याच्या हातून निसटला होता. पूर्वी एकदा हाती आलेला शिवाजी निसटला आणि आता त्याचा मुलगा सुद्धा निसटला. नियतीने दिलेली संधी पुन्हा हिरावून नेली, या गोष्टीने औरंगजेब अजून चवताळला आणि अखेरीस त्याने दक्षिणेत उतरून मराठ्यांना चिरडण्याचा निर्णय घेतला. नुसते मराठेच नाही तर दक्षिणेतील इतर दोन शाह्या देखील बुडवण्याचा औरंग्याच्या मनोदय होता. कितीही झालं तरी कुत्बशाह आणि आदिलशाह हे दक्षिणी मुसलमान होते. शियापंथीय होते, उच्चकुलीन सुन्नी मुसलमानांचा त्यांच्याशी संबंध नव्हता. असं किमान औरंगजेब समजत असे. तो या दोन्ही पातशहांना 'शाह' म्हणताच नसे मुली. यांचा उल्लेख तो आदिलखान वगैरे असाच करत असे. औरंगजेबाने दक्षिणेत उतरण्याची तयारी उत्तरेत चालवली आहे हे शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वीच दक्षिणेत समजले होते आणि महाराजांनी आपल्या पेशव्यांना आणि सेनापतींना सैन्य सज्ज करण्यासाठी आज्ञा केल्या होत्या. पण अर्थातच, काही काळातच महाराज निवर्तले, आणि संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले.

खुद्द औरंगजेब दक्षिणेत उतरण्यापूर्वीपासूनच मुघल आणि आदिलशाह यांच्यात वितुष्ट होते आणि या लढाया कायम सुरूच राहिल्या होत्या. १६५६ च्या सुमारास बिदर-कल्याणीच्या मोहिमेत औरंगजेब हा स्वतः विजापुरी सरदार अफजलखानाच्या तावडीत सापडलेला होता, पण सेनापती खान महंमदकरवी त्याने आपली सुटका करवून घेतली होती. तेव्हापासूनच हे वैर आजतागायत सुरु होतंच. मध्यंतरी मिरझाराजा जयसिंह, दिलेरखान, बहादूरखान कोकलताश वगैरे अनेकांनीं आदिलशाही बुडवण्याचा आणि विजापूर जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण त्यांना काही पूर्णतः यश आले नव्हते. आता आपण प्रचंड सेनासागर घेऊन दक्षिणेत उतरल्याशिवाय हे काम व्हायचे नाही हा औरंगजेबाचा निश्चय झाला होता.

इ.स. १६७९ च्या सप्टेंबर मध्ये दिलेरखानाने विजापूरच्या आसपासचा प्रदेश जिंकायला सुरुवात केलेली होती. विजापूरच्या उत्तरेला साधारण ५० मैलांवर असलेलं मंगळवेढा वगैरे मुघल साम्राज्यात दाखल झालं. पण अशा वेळेस इकडे शिवाजी महाराजांनी विजापूरच्या वजिराला, सिद्दी मसूदला कुमक पाठवली आणि त्यातच इकडे मुघलांचा दक्षिणेचा सुभेदार, खुद्द राजपुत्र मुअज्जम हा दिलेरच्या विरोधात अंतस्थ खटपटी करत असल्याने दिलेरखान वैतागला. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिलेरखान विजापूरच्या ईशान्येला सहा मैलांवर असलेल्या आलियाबाद इथे येऊन पोहोचला. इथून आता विजापूर खूपच जवळ होतं. दिलेरखान रोज किल्ल्यावर मारगिरी करत होता, पण विजापूरचा किल्ला दिलेरच्या मारगिरीला काही दाद देत नव्हता. इकडे मुअज्जमने बापाला दिलेरखानाविरुद्ध काहीतरी समजावलं आणि औरंगजेबाने दिलेरची कानउघडणी करणारं एक पत्रं पाठवलं. दिलेर या सगळ्या प्रकाराने वैतागला आणि अखेर ५६ दिवसांच्या विजापूर घेण्याच्या प्रयत्नानंतर दिलेर माघारी फिरला. इकडे शाहजाद्याकडूनही काहीही होत नाही हे पाहून बादशहाने त्यालाही १६८० च्या मे महिन्यात परत बोलावलं आणि दक्षिणेच्या सुभेदारीवर पुन्हा आपला दूधभाऊ खानजहान बहादूरखान कोकलताश याला नेमलं. विजापूरची राजकन्या शहरबानू बेगम हि औरंगजेबाचा पुत्र आझम याची बेगम होती. तिच्या करवीसुद्धा औरंगजेबाने विजापूरवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण तरीही विजापूर आणि मराठ्यांमधील संबंध त्याला तोडता आले नाहीत. दरम्यान इकडे शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजीराजे दुसरे छत्रपती झाले होते आणि त्यांनीही मुघलांच्या विरोधात पूर्वीप्रमाणेच आघाडी सुरु ठेवली होती. इ.स. १६८२ च्या एप्रिल मध्ये औरंगजेबाने आपला राजपुत्र आझम याला विजापूर जिंकायला पाठवलं पण या शाहजाद्याकडूनही काहीही होऊ न शकल्याने औरंगजेबाने त्यालाही जून महिन्यातच परत बोलावलं. इकडे विजापुरात सिद्दी मसूद सुद्धा या सगळ्या प्रकाराला कंटाळला होता. त्याने वजिरी सोडून दिली आणि तो दूर अदोनीच्या किल्ल्यात जाऊन राहिला. मसूदनंतर अका खुसरो नावाचा एक वजीर झाला पण तोसुद्धा पाच-सहा महिन्यातच मरण पावल्याने अखेरीस विजापूरचा शूर सरदार सय्यद मकदूम उर्फ शर्जाखान हा आता विजापूरचा वजीर झाला.


औरंगजेबाने विजापूरच्या सिकंदर आदिलशहाला एक पत्र पाठवून त्यात अप्रत्यक्षरीत्या धमकावलं की, तुम्ही मुघल साम्राज्याचे मांडलिक आहात, मराठ्यांशी असलेले सगळे संबंध तोडून मुघलांना साहाय्य करा. मुघलांना किमान ५ ते ६ हजार घोडेस्वारांची मदत पाठवून संभाजीच्या विरोधात मुघलांनी उघडलेल्या आघाडीत सामील व्हा, आणि मुख्य म्हणजे शर्जाखानाला तुम्ही वजीर केलं आहे, त्याला विजापुरातून हाकलून द्या. यावर सिकंदर आदिलशहाकडून अतिशय बाणेदार पत्रं औरंगजेबाला गेलं त्यात लिहिलं होतं की, मुघलांनी यापूर्वी विजापूरचा जो मुलुख घेतला असेल आणि जी खंडणी घेतली असेल ती परत करावी, विजापूरच्या प्रदेशातील सैन्य मागे घ्यावं, संभाजीसोबत जे काही असेल ते स्वतःच्या मुलुखातून जाऊन सोडवावं आणि संभाजीने आमची जी काही ठाणी जिंकली आहेत ती सोडवून आम्हाला परत करावीत. या पत्राचा अप्रत्यक्षरीत्या अर्थ असा होत होता की आम्ही तर तुमचे मंडलिक नाहीच, पण उलट तुम्हीच आता आमचे मंडलिक असल्यासारखं वागा. अखेरीस इ.स. १६८५ च्या एप्रिल महिन्यात मोंगली फौजांचा विजापूरला वेढा पडायला सुरुवात झाली.

विजापूरच्या शहराला संरक्षक कोट होता. या कोटाच्या तटाची उंचीच ३० फूट ते ५० फूट इतकी होती. साधारणता रुंदी २० फुटांची होती. या प्रचंड भिंतीला एकूण १० दरवाजे होते आणि जवळपास ९६ बुरुज होते. अशातही, या मुख्य तटबंदीवर दोन बुरुजांच्या मध्ये अशी १० फूट उंचीची अतिरिक्त भिंत बांधण्यात आलेली होती. या भिंतीलाही बंदुकांची मारगिरी करण्याकरिता ठिकठिकाणी जंग्या होत्या. या खंदकाच्या बाहेर ४० ते ५० फूट रुंद असा खंदक होता. औरंगजेबाने आपल्या साऱ्या फौजेला दक्षिणेकडे असलेल्या लांडा कसाब या बुरुजावर लक्ष एकवटण्यास हुकूम सोडला. हा शहराच्या तटबंदीव्यतिरिक्त आत मुख्य बालेकिल्ला असं म्हणून आणखी एक तटबंदी आहे. या ताटाच्या आत खुद्द सुलतान आदिलशहाचा निवास होता. या जागेला किला अर्क म्हणत असत. हा भाग शहराच्या खोलगट भागांपैकी एक असा असल्याने इथे सहज मोरगिरी करता येत असे. 

दि. १ एप्रिल १६८५ रोजी विजापूरवर मुघलांचे हल्ले सुरु झाले. मुघल सरदार रुहुल्लाखान आणि कासीमखान यांनी तटाच्या वायव्य भागावर लक्ष केंद्रित केलं. खानजहान बहादूरखानाने शहराच्या पश्चिमेला असलेल्या तटावर मोर्चे बांधले. दि. १४ जून १६८५ रोजी राजपुत्र आझम फौजेसह येऊन शहराच्या दक्षिणेकडे बेगम हौज या ठिकाणी तळ देऊन राहिला. मुघलांचा विजापूरला वेढा पडला तरीही विजापूरला बाहेरून मदत मिळत होती. दि. १० जून रोजी सिद्दी मसूदकडून फौजेची एक तुकडी येऊन मिळाली. दि. १४ ऑगस्ट रोजी कुत्बशाहाकडून काही फौज आली आणि पुढे १० डिसेंबर १६८५ मध्ये संभाजीराजांनी हंबीररराव मोहित्यांची हाताखाली सैन्य विजापूरच्या मदतीला पाठवले. दि. १ जुलै १६८५ रोजी शर्जाखानाने मुघल फौजेवर किल्ल्य्यातून भयंकर हल्ला चढवला आणि त्यात मुघलांचे अनेक सरदार आणि सैनिक मारले गेले. यावेळी आतून विजापूरचा हल्ला आणि बाहेर भयंकर दुष्काळ यामुळे मुघल सैन्याची उपासमार होऊ लागली. बाहेरचा प्रदेश मुघल फौजांनीच बेचिराख केल्याने त्यांना आसपासच्या प्रदेशातून धान्य मिळत नव्हते. अशातच पाऊस सुरु झाला असल्याने नद्या-ओढे प्रचंड भरून वाहत होते. वर मराठे होतेच लांडगेतोड करायला. धान्य इतके महागले की भीमसेन सक्सेना म्हणतो, रुपयाला १५ शेर इतके धान्य मिळायला लागले. आझमचे सारे सरदार अशा वेळेस वेढा उठवून परत जाण्यास त्याला विनवत होते पण आझम हट्टाला पेटला होता. कोकणात संभाजीराजांकडून मार खाऊन परतलेल्या आपल्या मोठ्या भावाच्या पंगतीत त्याला जाऊन बसायचे नव्हते. आझमचा हा मनोदय ऐकून बादशहाला आनंद झाला आणि त्याने आपल्या मुलाकडे पाच हजार बैलांवर अन्नधान्य आणि शेकडो बैलांवर खजिना लादून ते सगळं शहाजाद्याकडे रवाना केलं. गाझीउद्दीन फिरोजजंग याच्या नेतृत्वाखाली हि रसद आझमकडे येऊन पोहोचली. वाटेत शर्जाखानाने उपद्रव द्यायचा प्रयत्न्न केला पण गाझीउद्दीनाने ते हल्ले परतवून लावले. गाझीउद्दीनाने आणखी महत्वाचे काम केले ते म्हणजे बेरड लोकांची विजापूरला होणारी रसदेचा मदत त्याने उधळून लावली. पण यानंतरही विजापूरच्या वेढ्याचे काम काही नेटाने सुरु राहिले नाही.

या सगळ्या सुमारास बादशाह सोलापुरात छावणी टाकून बसला होता. जून १६८६ मध्ये वेढ्याचा पंधरावा महिना उजाडला तरी विजापूर हातात येत नव्हते हे पाहून बादशहा कावला. तो दि. १४ जून १६८६ रोजी सोलापूरहून विजापूरच्या मार्गाने निघाला आणि ३ जुलैला विजापूरनजीक रुसुलपूरला दाखल झाला. दरम्यान, राजपुत्र शाहआलम उर्फ मुअज्जम हा कुत्बशाही जवळपास जिंकून विजापूरला आल्याने बादशहाने त्याला वायव्य भागात मोर्चा लावायला सांगितलं. शाहअल्मने अंतस्थपणे सल्लामसलतीने गुपचूप किल्ला घेऊन गोवळकोंड्याप्रमाणे विजापूरची आझमऐवजी आपण घेऊन दाखवावे आणि बापाचा विश्वास संपादन करावा अशी खेळी रचली. मुअज्जमचा शाहाकुली नावाचा एक माणूस रोज किल्ल्यात आदिलशहासोबत वाटाघाटी करण्यात जात असे. आझमला हि गोष्ट जेव्हा समजली तेव्हा त्याने 'मुअज्जम हा आदिलशहाला आतून मदत करत असल्याने आपल्याला यश मिळत नाही' असं औरंगजेबाला सांगितलं. औरंगजेबाने हे सगळं ऐकूनि मुअज्जमला चांगलीच तंबी दिली. दुष्काळाचा सामना आता मुघल फौजेसोबतच आतल्या आदिलशाही फौजेलाही करावा लागत होता. दुष्काळामुळे माणसं आणि घोडी मरत होती, आणि यामुळे किल्ल्याबाहेर येऊन मुघली फौजेची लांडगेतोड करून झटपट किल्ल्यात जाण्याचा मार्ग आता हळूहळू बंद होत होता. आदिलशाही वाचवण्याकरिता एके दिवशी विजापुरातून मुसलमानी धर्ममार्तंडांच्या एका शिष्टमंडळाने औरंगजेबाची भेट घेतली आणि त्याला 'तुम्ही मुसलमान असून मुसलमानांविरुद्ध का हत्यार उगारत आहेत, हे धर्माच्या विरुद्ध आहि असं सांगितलं. तेव्हा औरंगजेब म्हणाला की, 'तुम्ही मुसलमान असून काफर संभाजीला मदत करत आहेत त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागत आहे. तुम्ही संभाजीला पकडून द्या म्हणजे मी विजापूरचा वेढा उठवतो'. यावर निरुत्तर होऊन हे शिष्टमंडळ पुन्हा विजापुरात गेलं. 

मुघल फौजा किल्ल्यभावतीचा खंदक बुजवण्याची पूर्ण प्रयत्न करीत होत्या पण जो कोणी खंदकाजवळ जाईल त्याला ताटावरून अचूक टिपले जात असे. दि. ४ सप्टेंबर १६८६ रोजी औरंगजेबाने आपली स्वतःची छावणी अजून २ मैल मागे नेली. यावेळेस किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असली तरीही आतल्या शिबंदीची परिस्थिती अतिशय नाजूक बनली होती. किल्ल्यात आता जेमतेम २ हजार शिबाबंदी राहिली होती. किल्ल्यावरील शिबंदीचा धीर आता सुटला होता. अखेरीस शर्जाखानाने आणि अवदूररौफ नावाच्या एका सरदाराने मुघलांसमोर शरणागतीचा प्रस्ताव मांडला. दि. ९ सप्टेंबर रोजी या दोघांचे चिटणीस गाझीउद्दीन फिरोजजंग याच्या छावणीत आले. बादशहाने आता मात्र मोठ्या उदार मानाने या लोकांची भेट घेतली आणि शरणागतीचा प्रस्तावाला मान्यता दिली. अखेरीस रविवार, दि. १२ सप्टेंबर १६८६ या दिवशी विजापूरचा शेवटचा सुलतान सिकंदर आदिलशाह हा औरंगजेबासमोर शरण आला. आपल्या महालातून बाहेर आल्यावर मुघल छावणीत जाताना विजापुरातील लोक आपल्या सुलतानाचे हे हाल पाहून अश्रू ढाळीत होते. सिकंदर आदिलशहाला औरंगजेबाच्या रुसुलपूर येथील छावणीत घेऊन जाण्यात आले. तिथे औरंगजेबाने त्याचे मोठ्या इतमामात स्वागत केले. बादशहाने आत्तापर्यंत आदिलशहाचा उल्लेख कायम आदिलखान असाच केला होता आणि आत्ता त्याने अधिकृतरीत्या त्याला 'आदिलखान' हि पदवी बहाल केली. सोबत सालिना एक लाख रुपयांचे वेतनही बहाल केले. जे जे विजापुरी अधिकारी शरण आले त्यांना मुघल फौजेत स्थान देण्यात आले. यानंतर औरंगजेब विजापुरात प्रवेशला आणि त्याने शहराची पाहणी करून जमा मशिदीत नमाज अदा केला. सुप्रसिद्ध मलिक-ए-मैदान तोफेवर आपल्या विजापूरवर मिळालेल्या या विजयाचा उल्लेख कोरून ठेवण्याची औरंगजेबाने आज्ञा दिली. अशा प्रकारे शेवटचा आदिलशाह सिकंदर हा मुघलांचा युद्धकैदी बनला आणि विजापूरच्या आदिलशाहीचा अस्त झाला.

विजापूरच्या आदिलशाहीसोबतच दक्षिणेतील दुसरी उरलेली एक मोठी शाही म्हणजे गोवळकोंड्याची कुत्बशाही. अबुल हसन कुत्बशाह हा शिवाजी महाराजांच्या काळापासूनच मराठ्यांना अनुकूल होता. औरंगजेबाने जेव्हा विजापूरवर हल्ले करायला सुरुवात केली तेव्हा कुत्बशहा हा विजापूरच्या मदतीला जाण्यास तयार झाला. औरंगजेबाने वास्तविक कुत्बशहाला आदिलशहा आणि मराठ्यांना मदत करू नकोस असं आधीच दटावलं होतं, पण पूर्वीच्या शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा प्रभाव कुत्बशहावर एवढा झाला होता की त्याने औरंगजेबाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून संभाजीराजे आणि विजापूरला मदत करण्याचं सुरूच ठेवलं. कुतुबशहाने आपल्या हेरांना पाठवलेली पत्रं मुघल हेरांनी वाटेत पकडलं. कुत्बशहाने त्यात लिहिलं होतं, "मुघल बादशाह हा अतिशय मोठा माणूस आहे. आत्तापर्यंतचे त्याचे वर्तन दिलदारपणाचेच आहे. परंतु आता त्याला सिकंदर आदिलशहा हा एक असहाय्य आणि पोरका आहे असे आढळून आल्यानंतर त्याने विजापूरला वेढा दिला आहे आणि तो आदिलशहावर दबाव आणत आहे. त्यामुळे विजापूरचे सैन्य आणि आपल्या असंख्यात सैनिकांसह संभाजी एका बाजूकडून मोंगलांना प्रतिकार करीत आहे. अशा वेळी माझ्या बाजूकडून मी लढाईत भाग घेण्यासाठी खलीलुल्लाखान याच्या हाताखाली चाळीस हजार सैनिकांची रवानगी करणे हे अतिशय जरुरीचे आहे. असे झाल्यानंतर आपल्या शत्रूबरोबर बादशहा कुठे लढाई देतो आणि त्यांचे हल्ले परतवून लावतो हे दिसून येईल". हे पत्र हाती पडल्यानंतर औरंगजेब प्रचंड संतापला आणि त्याने आपला राजपुत्र शाहआलं उर्फ मुअज्जम याला गोवळकोंड्यावर चालून जाण्याची आज्ञा दिली.

जून १६८५ च्या सुमारास शाहजादा मुअज्जम हा गोवळकोंड्याच्या रोखाने निघाला. वाटेत त्याला कुत्बशाही फौजेचा ठिकठिकाणी सामना करावा लागला. जवळपास दोन महिने मुअज्जमला वाटेत सतत अडथळे निर्माण होत होते. एके दिवशी कुत्बशाही फौजेने खुद्द मुअज्जजांच्या छावणीवर हल्ला केला पण मुअज्जमही अचानक संतापला आणि त्याने कुत्बशाही फौजेला हैद्राबादच्या दिशेने मागे रेटले. यावेळेस गोवळकोंड्याचा सेनापती होता मीर महम्मद नावाचा एक कसलेला योद्धा. याला मुअज्जमने गोडी-गुलाबीने आपल्या बाजूने वळवून घेतले, यामुळे कुत्बशाही फौजेचे बळ कमी झाले आणि मुअज्जमने बळ वाढले. कुत्बशहाला हि बातमी जेव्हा समजली तेव्हा तर त्याने चक्क सगळी सामग्री तशीच मागे ठेऊन गोवळकोंड्याच्या किल्ल्याकडे पळ काढला. अर्थातच खालचे हैद्राबाद शहर मुघलांच्या आयते तावडीत सापडले. भीमसेन सक्सेनाने दिलेले वर्णन इतके अनपेक्षित आहे की शहरात एकाच कोलाहल माजला. त्यातीलच काही चोराचिलटांनी बादशाही खजिना आणि शहरातील धनाढ्य व्यापारी यांना लुटले. अनेक हिंदू आणि मुसांना स्त्रिया तसेच मुलांवर अत्याचार करण्यात आले. हे सगळं जेव्हा मुअज्जमला समजलं तेव्हा त्याने आपल्या सैन्याची एक तुकडी हैद्राबाद शहराकडे रवाना केली. पण शेवटी हे मुघल सैनिकच! तेसुद्धा शहरातल्या या दरवडेखोरांसोबत या लुटीमध्ये आणि अत्याचारांमध्ये सामील झाले. शेवटी मुअज्जमने आपला खास विश्वासू खानजहान याला शहराकडे बंदोबस्तासाठी रवाना केलं. दि. ८ ऑक्टोबर १६८५ च्या आसपासच मुघल फौजांनी हैद्राबाद शहरात प्रवेश केला. अबुल हसन कुत्बशहाने शाहजादा मुअज्जम यांच्याकडे तहाची याचना केलेली होती. मुअज्जजमने हा तहाचा प्रस्ताव औरंगजेबाकडे पाठवून दिला, तो कागद दि. १८ ऑक्टोबर रोजी औरंगजेबाकडे पोहोचला. औरंगजेबाने कुत्बशहाला आपल्या अटी कळवल्या, ज्यात - अबुल हसन याने मुघल फौजांच्या मोहिमेपोटी एक करोड वीस लक्ष रुपये द्यावेत शिवाय दरवर्षी वीस लाख रुपये होणं खंडणी म्हणून द्यावी, मादण्णा आणि त्याचा भाऊ आकण्णा या दोघांनाही दरबारातून बडतर्फ करावे इत्यादी अटींचा समावेश होता. कुत्बशहाने या अटी मान्य केल्या. पण तरीही त्याने मादण्णा आणि आकण्णा या दोघांना बडतर्फ करण्यासाठी चालढकल सुरूच ठेवली. वास्तविक या दोघं बंधूंनीच अबुल हसन कुत्बशाहाचे असं स्थिर केले होते, कुत्बशाहीला हे आज दिसणारे वैभव प्राप्त करून दिले होते. पण कुत्बशाहाच्या या वागण्यामुळे मादण्णा पंडितावर जळणाऱ्या कुत्बशाही दरबारातील लोकांनी एक वेगळाच कट रचला. कुत्बशाही फौजेचा एक दुय्यम सेनापती शेख मिनहाज, याशिवाय अब्दुल्ला कुत्बशाहाच्या विधवा बायका बेगम सरूमा आणि जानिसाहिबा या तिघांनी मिळून मादण्णाचा काटा काढायचं ठरवलं. मार्च १६८६ मध्ये मादण्णा आणि आकण्णा हे दोघे अबुल हसन कुत्बशाहाची भेट घेऊन शहरात आपल्या घरी जात असताना वाटेत भर रस्त्यातच त्यांचा खून पाडण्यात आला. त्यांच्यासोबत आकण्णाचा मुलगा रुस्तुमराव होता, तो निसटून घरी जात असताना घराजवळ त्याचा खून करण्यात आला. या दोघांचीही घरे लुटण्यात आली. यानंतर लगेचच किल्ल्यातील हिंदू वस्तीवर हल्ला करण्यात आला आणि विषेशतः मादण्णा आणि आकण्णा ब्राह्मण असल्याने अनेक ब्राह्मणांची कत्तल करण्यात आल्याचं ईश्वरदास नागर आणि भीमसेन सक्सेना सांगतात. कटवाल्यांनी या दोघांचीही मस्तके औरंगजेबाला भेट म्हणून पाठवून दिली. बादशहाने यावरकाहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण त्याने मुअज्जमला विजापूरच्या वेढ्याच्या कामासाठी बोलावून घेतलं.

दि. १२ सप्टेंबर १६८६ रोजी विजापूर पडले आणि लगेच औरंगजेब स्वतः गोवळकोंड्याच्या दिशेने चालून निघाला. दि. २८ जानेवारी १६८७ रोजी तो गोवळकोंड्यापासून २ मैलांवर येऊन पोहोचला. मुअज्जम परत गेल्यावर गोवळकोंडा किल्ल्याच्या खाली हैद्राबाद शहरात अबुल हसन कुत्बशहा राहत होता. खुद्द औरंगजेब आला आहे हे पाहून कुत्बशहा पुन्हा गोवळकोंडा किल्ल्यात जाऊन लपून राहिला. गोवळकोंडा किल्याच्या सभोवती चार मैल लांबीची काळ्या दगडांची अतिशय मजबूत अशी भिंत होती आणि त्यावर आणखी सुरक्षिततेसाठी ५० ते ६० फूट उंचीचे एकूण ८७ बुरुज होते. तटबंदीच्या बाहेर पन्नास फूट रुंदीचा खोल खंदक होता. या एकंदरीतच संपूर्ण तटबंदीला एकूण चार दरवाजे होते. यावेळेस किल्ल्याचा खंदक कोरडा असल्याने त्यात कुत्बशाही सैन्य येऊन बसले, पण औरंगजेबाच्या प्रचंड फौजेसमोर हे सैन्य पाचोळ्यासारखे उडून गेले. औरंगजेबाचा सरदार किलीचखान याने किल्ल्याला मोर्चा लावला असता किल्ल्यावरून जम्बुरियाचा एक गोळा लागून तीन दिवसातच हा किलीचखान मरण पावला. अखेरीस दि. ७ फेब्रुवारी १६८७ रोजी किल्ल्याला पुन्हा मुघल फौजेचा रीतसर वेढा पडला. पूर्वी विजापूरच्या वेळेस शाहआलं मुअज्जमने जे राजकारण करायचा प्रयत्न केला होता तोच प्रयत्न आतासुद्धा त्याने करायचा प्रयत्न केला. कुत्बशाहाचे वकील मुअज्जमकडे सलोख्यासाठी नजराणे घेऊन ये जा करत होते. मुअज्जमही पुढेमागे आपल्याला एकतर दिल्ली घ्यायला कुत्बशाहाची मदत होईल किंवा किमान आत्ता बादशाहासमोर आपण कुत्बशहाला पूर्णपणे नामावल्याचे श्रेय तरी मिळेल या हेतूने हे सारं करत होता. आझमच्या पक्षपाती लोकांनी आणि आझमनेही बादशहाच्या कानाला लागून मुअज्जम काहीतरी वेगळंच राजकारण करत आहे असा गैरमेळ घालून दिला. त्यातच मुअज्जमने आपल्या जाणण्याचे तंबू आपल्या छावणीजवळ उभारण्याची आज्ञा दिल्याने बादशहाचा संशय आणखी बळावला. अखेरीस एके दिवशी गाझीउद्दीन फिरोजजंग याने मुअज्जमची किल्ल्याकडे जाणारी पात्र पकडून बादशाहासमोर ठेवली आणि बादशहा भडकालाच! दि. २१ फेब्रुवारी १६८७ रोजी बादशहाने मुअज्जम आणि त्याच्या चारी मुलांना तंबूत बोलावले आणि शांतपणे कैद केले. मुअज्जमच्या कुटुंबियांना सुद्धा कैद करण्यात आले आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. नंतर तर औरंगजेबाने इतके विचित्र हुकूम सोडले की मुअज्जमने नखे आणि केस कापू नयेत, त्याला शाही जेवण आणि पेये मिळू नयेत इत्यादी. पुढे जवळपास सात वर्षे मुअज्जम बापाच्या कैदेत अशा रीतीने दिवस घालवत होता. 

औरंगजेब हा सुन्नी मुसलमान होता आणि दक्षिणेच्या शाह्या या शिया मुसलमानांच्या होत्या. मुघल खंडन जरी सुन्नी असले तरी मुघल साम्राज्यात अनेक शियापंथीय मुसलमान होते आणि औरंगजेबाचा अंतस्थ हेतू त्यांनाही कळून चुकला होता. बादशहाच्या आधीचा मुख्य काझी शेख उल इस्लाम याने बादशहाला या मुसलमानी शाह्या बुडवणे योग्य नाही असं सांगितलं. पण बादशहाने ते ऐकलं नाही, शेवटी हा काझी मक्केला निघून गेला. यानंतर आलेल्या काझी अब्दुल्ला यानेही बादशहाला हाच सल्ला दिल्याने बादशहाने त्यालाही बडतर्फ करून टाकलं. याशिवाय मोठी झालेली गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांमधला बेबनाव. गाझीउद्दीन फिरोजजंग हा तुर्की मुसलमान होता तर तोफखान्याचा अधिकारी असलेला सफशिकनखान हा इराणी होता. या दोघांना एकमेकांबद्दल मत्सर वाटे. पुढे सफशिकांच्या जागी तीन-चार निरनिराळ्या लोकांची नेमणूक करण्यात आली पण कोणीही काम नीट न केल्याने पुन्हा सफशिकनखानालाच नेमण्यात आलं. पण या जवळपास सहा महिन्यांच्या काळात मोर्चाची आबाळ होत होती. अखेर सफशिकनखानाने मोठी मेहनत घेऊन खंदकापर्यंत चार खणून काढला. हे पाहून फिरोजजंगनेही बाहू सरसावले. तो एके दिवशी रात्री गुपचूप सैनिकांसह खंदकावर चढला पण नेमकं पलीकडे उभं असलेलं एक कुत्रं अचानक बिचकून ओरडायला लागल्याने कुत्बशाही सैन्य जागं झालं आणि गाझीउद्दीनला मागे यावं लागलं. नंतर कुत्बशहाने या कुत्र्याला एक हिऱ्याचा पट्टा आणि सोन्याने सजवलेला अंगरखा बहाल केला आणि सेह-ताबका म्हणजे तीन पदव्यांचा सरदार अशी पदवी बहाल केली. या तीन पदव्या म्हणजे गाझिउद्दिनाच्या खान, बहाद्दूर आणि जंग या पदव्या होत्या. जूनमध्ये पाऊस सुरु झाला. अशातच कुत्बशाही फौजेने निकराचा हल्ला केल्याने मुघल फौजेची अतोनात वाताहत सुरु झाली. तोफांसाठी उभारलेले दमदमे कोसळू लागले. प्रचंड चिखल झाला आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले. अशातच मराठे सुद्धा मागाहून हल्ले करत होतेच. याचाच आणखी फायदा घेऊन कुत्बशाही फौजांनीं बादशाही फौजेवर हल्ला करून तोफा निकामी करून टाकल्या. तंबू उध्वस्त करून टाकले, प्रचंड कापाकापी केली. मुघलांचा तोफखाना प्रमुख धैरतखान, एक जुना सरदार सरबराहखान आणि इतर अशाच बारा सरदारांना कुत्बशाही फौजेने कैद करून ते त्यांना किल्ल्यावर घेऊन गेले. कुत्बशहाने बादशहाला डिवचण्यासाठी हे सरदार मानसन्मान करून पुन्हा बड्सशाहाकडे पाठवून दिले. अखेरीस बादशहाने सुरुंग खोदण्याचा आदेश दिला आणि तीन सुरुंगांमध्ये प्रत्येकी पाचशे मण दारू ठासून भरण्यात आली. दि. १९ जूनला पहिला सुरुंग उडवण्यात आला, पण सुरुंगाच्या स्फोटामुळे उडालेल्या दगडात मोंगलांचेच अकराशे सैनिक एका फटक्यात ठार झाले. किल्याची तटबंदी मात्र अभेद्यच राहिली. याचा फायदा घेत कुत्बशाही फौजेने कापाकापी केली. पुन्हा २० तारखेला दुसरा सुरुंग उडाला पण त्यातही मुघल सेनेचेच नुकसान होऊन कुत्बशाह फौजेनेच फायदा घेतला. फिरोजजंग स्वतः जखमी झाला आणि त्याची अनेक माणसे मृत्युमुखी पडली. औरंगजेबाला हि बातमी समजली तेव्हा तो सैन्याला धीर द्यायला पुढे जाऊ लागला. किल्ल्यावरून येणारे तोफांचे गोळे जवळपास पडूनच फुटत होते. एका गोळ्याने तर खुद्द औरंगजेबाच्या सुरक्षारक्षकांचा हात उडवला. तरी औरंगजेब घाबरला नाही. त्याने सैन्याला धीर देणे सुरूच ठेवले. पण अशातच तुफान मुघल फौजांची अजूनच दाणादाण उडाली. एकीकडे निसर्ग आणि दुसरीकडे कुत्बशाही फौज यांनी मुघलांना सतावून सोडले अखेरीस मागे येत औरंगजेबाने फिरोजजंगच्या छावणीतच मुक्काम केला. २१ तारखेला तिसरा सुरुंग उडवण्याची औरंगजेबाने आज्ञा दिली पण सुरुंग उडालचह नाही. कारण कुत्बशाही फौजेने त्यात पाणी सोडून तो सुरुंग निकामी करून टाकला होता. 


पुढचे जवळपास २ महिने हा वेढा असाच सुरु राहिला होता. पूर्वी विजापूरच्या चाकरीत असलेल्या अब्दुल्ला पन्नी सरदारखान नावाच्या माणसाने नंतर मुघकांची चाकरी पत्करली, आणि त्यानंतर तो कुत्बशाहाच्या पदरी राहिला. याच अब्दुल्लाखानाने विश्वासघात करून दि. २१ सप्टेंबरला किल्याचा मागचा दरवाजा उघडला आणि रुहुल्लाखानाच्या हाताखालचे एक मुघल तुकडी दुपारी तीन वाजता किल्ल्यात प्रवेशली. त्यानंतर मुख्य दरवाजा उघडण्यात आला आणि मुख्य मोठी मुघल फौज किल्ल्यात शिरली. अब्दुल रझाक लारी नावाच्या कुत्बशाहाच्या सरदाराने किल्ल्यात शिरलेल्या सरदारांवर एकाएकी एकट्याने हल्ला चढवला. त्याला ७० ठिकाणी जखमा झाल्या. पूर्वी वेढा सुरु असताना औरंगजेबाने त्याला फितवण्याचा प्रयत्न केला होता, सहा हजारांची मनसब देऊ केली होती. पण या बहाद्दराने औरंगजेबाच्या रुचेल किंमत दिली नव्हती. अखेरीस या अब्दुल रझाकला जिवंत पकञ्यात आले. बादशाह त्याच्या या एकनिष्ठतेवर खुश झाला आणि दया दाखवण्यात आली. यावेल्लेस आता सगळं संपलं म्हणून अबुल हसन कुत्बशहा हा आपल्या सिंहासनव्वर जाऊन बसला. मुघल फौजा आत शिरल्या तेव्हा एखाद्या उदार बादशाहांप्रमाणे कुत्बशहाने त्यांचे स्वागत केले आणि तो त्यांच्या स्वाधीन झाला. पुढे कुतुबशाहाला कैद करून दौलताबादच्या किल्ल्यात बंदी म्हणून ठेवण्यात आलं. बादशहाने त्याला सालिना पन्नास हजार रुपयांचे वेतन देऊ केले. मुघल सैनिकांना कुत्बशहाबद्दल कुतूहल वाटत असताना तो एकदा त्यांना म्हणाला, "माझा जन्म जरी राजघराण्यात झाला असला तरी माझ्या तरुणपणात दारिद्य्राचा अनुभव मी घेतला आहे. ज्या देवाने मला भिकारी बनवले, त्यानेच राज्य दिले आणि त्यानेच पुन्हा भिकारी बनवले. त्या परमेश्वराचेच आपण सारे गुलाम आहोत, आणि तो आपल्या वाट्याप्रमाणे आपल्याला देत असतो". मुघल फौजेला गोवळकोंड्याच्या किल्ल्यात ७ कोटी रुपये रोख आणि सोन्याचांदीची भांडी, हिऱ्याच्या वस्तू होत्या. याशिवाय २ कोटी ८७ लाखांचा वसूल सुद्धा मिळाला. गोवळकोंड्याच्या या मोहिमेत पुढे आलेला नामांकित मोहरा म्हणजे गाझीउद्दीन फिरोजजंग आणि त्याचा मुलगा मीर कमरुद्दीन सिद्दीकी होय. हा मीर कमरुद्दीन सिद्दीकी म्हणजेच पुढे उदयाला आलेला असफजाह, हैद्राबादचा निजाम चिनक्लीचखान, ज्याला बाजीराव पेशव्यांनी अनेकदा मात दिली. 

एकंदरीतच मराठ्यांकडे वळण्यापूर्वी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला या दोन पातशाह्यांशी तोंड देण्यातच सुरुवातीचा बराचसा वेळ खर्च करावा लागला. शिवाजी महाराजांनी "दक्षिणची पातशाही दक्षिणीयांचे हाती राहिली पाहिजे" हे जे सूत्र मांडले होते त्याला खीळ बसला होता. एक मराठे सोडले तर दक्षिणीयांचे हातून पातशाही निसटली होती. संदर्भ:

१) गोवळकोंड्याची कुत्बशाही : वा. सी. बेंद्रे
२) विजापूरची आदिलशाही : वा. सी. बेंद्रे
३) A Short History Of Aurangzib : जदुनाथ सरकार
४) समग्र सेतुमाधवराव पगडी खंड ३
५) राजाशिवछत्रपती : बाबासाहेब पुरंदरे

- © कौस्तुभ कस्तुरे | www.kaustubhkasture.in