श्रीरायगडाची पेशवेकालीन व्यवस्था

किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची लैकिकार्थाने दुसरी राजधानी ! प्रचंड ताशीव कडे आणि खोल खोल दऱ्या असलेला हा शिवभूपतींचा गड पायथ्याहून पाहता अंगावर धावून येणाऱ्या हत्तीसमान भासतो. शिवछत्रपतींचे संपूर्ण चरित्र प्रथमतः लिहिणाऱ्या, राजमंडळातील सभासद कृष्णाजी अनंत याने रायगडचं अतिशय सार्थ आणि यथार्थ वर्णन केलेलं आहे. सभासद म्हणतो, "राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट ! चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे ! दीड गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासिव येकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी (हा) गड उंच !".
महाराजांना मोऱ्यांकडून जावळी घेतल्यावर पहिल्याच भेटीत हा गड प्रचंड आवडला होता. पुढे मिरझाराजा जयसिंगाच्या स्वारीत मोगली फौजा राजगडाच्या पायथ्यापर्यंत येऊन जाळपोळ करून गेल्याने राजगड 'राजधानी' म्हणून हवा तितका सुरक्षित नव्हता. आणि हीच गोष्ट नेमकी हेरून, राज्याभिषेकाच्या सुमारे दोन वर्षे आधी, म्हणजे इ.स. १६७२ च्या सुमारास महाराज रायगडावर वास्तव्याला गेले. स्वराज्याची राजधानी राजगडावरून रायगडावर हलवली गेली. महाराजांनी रायगडाला राजधानीचं रुपडं बहाल करायला सुरुवात केली. सभासद म्हणतो, "गडी (म्हणजे गडावर) घर, वाडे, माडिया, सदरा, चौसोपे आणि अठरा कारखाने यांस वेगळाले महाल व राणियांस महाल, तैशीच सरकारकूनांस वेगळी घरे व बाजार, पंचहजारीयांस वेगळी घरे व मातबर लोकांस घरे व गजशाळा व अश्वशाळा व उष्टरखाने, पालखीमहाल व वहिलीमहाल (रथशाळा), कोठी (म्हणजे सजावटमहाल), थटीमहाल (गोशाळा अथवा गोठा), चुनेगच्ची चिरेबंदी बांधिले". इ.स. १६७०-७१ मध्ये शिवाजी महाराजांनी मंजूर केलेल्या किल्ल्यांच्या डागडुजीसंबंधी रकमांच्या नोंदींमध्ये रायगडावरील बांधकामांसंबंधी खूप मोठी रक्कम मंजूर केलेली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शंभूराजांच्या अखेरीस रायगडाला एतिकादखान नावाच्या मुघली सरदाराचा वेढा पडला. अशातच शंभूछत्रपती महाराज पकडले गेल्याने गडावर असलेल्या राजपरिवाराच्या सुरक्षिततेस्तव गड मोंगलांना 'देऊन टाकणे' भाग होते. मोंगलांनी गड जिंकून घेतला तर ते गडावर कत्तल उडवत त्यापेक्षा आपणच सल्ला करून, सुरक्षिततेची हमी घेऊन गड सुपूर्द करावा असा महाराणी येसूबाईसाहेबांनी दूरदर्शी विचार केला आणि अखेर दि. ३ नोव्हेंबर १६८९ या दिवशी रायगड मोंगल्यांच्या हवाली करण्यात आला. मराठ्यांची राजधानी जिंकून घेतल्याबद्दल औरंगजेबाने एतिकादखानाला 'झुल्फिकारखान' असा किताब दिला. रायगड मोंगलांकडे गेल्यानंतरही राजाराम महाराजांनी पुन्हा तो घेण्याचा प्रयत्न केला होता हे अनेक कागदांवरून दिसून येतं. ४ जून १६९१ या दिवशी हणमंतराव आणि कृष्णराव घोरपडे या बंधूंना राजाराम महाराजांनी स्वराज्यातील प्रांत हस्तगत करण्याची जी कामगिरी सांगितली आहे त्यात त्यांनी रायगड प्रांत आणि किल्ला हस्तगत झाल्यानंतर ६२५०० होनांचा सरंजाम देण्याचा तह केलेला आहे. दि. १३ मी १६९२ या दिवशी राजाराम महाराजांनी लिहिलेल्या पत्रात ते स्पष्ट रायगड हस्तगत करण्याविषयीची मनोदय सांगतात. रामचंद्रपंत अमात्यांनी मावळे लोकांना याविषयी सांगितलं होतं आणि शिवाय रामचंद्रपंत अमात्यांचे काका, आबाजी सोनदेव यांना रायगड हस्तगत करण्यासाठी पाठवलं होतं. पण बहुदा दुर्दैवाने यावेळी रायगड हस्तगत होऊ शकला नाही. राजाराम महाराजांच्या नंतर शाहू महाराज गादीवर आल्यानंतरही अनेक वर्षे रायगड स्वराज्यात नव्हता. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भटांना पेशवाई दिल्यानंतर त्यांना निरनिरळ्या कामांची जी याद दिलेली होती त्यात सुद्धा "स्वराज्य थोरले कैलासवासी स्वामींचे प्रमाणे रायगड व वरकड गडकोट देखील करून घेणे" असा उल्लेख आहे.४ परंतु बाळाजी विश्वनाथाच्या हयातीतही हे काम पूर्ण होऊ शकले नाही. बाळाजी विश्वनाथांचे पुत्र, थोरले बाजीराव पेशवे आणि फत्तेसिंग भोसले यांनी सोबत रायगड हस्तगत केला. दि. ३ सप्टेंबर १७३३ च्या एका पत्रात नारो शंकर सचिव लिहितात, "रायगडासहवर्तमान कोकण प्रांताचा देशदुर्ग हस्तगत जाहला, तक्ताचा जागा रायगड सुटला". या सगळ्यात प्रतिनिधींनी वास्तवात काही काम न करता सातारा दरबारात मात्र रायगड आपण घेतला अशी भलामण केली. सेखोजी आंग्रे यांनी बाजीराव पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात सारे काही स्पष्ट होते. दि. ७ डिसेंबर १७३३ रोजीच्या पुरंदऱ्यांनी बाजीराव आणि चिमाजीअप्पांनी लिहिलेल्या पत्रात एक गोष्ट समजते ती म्हणजे, शाहू महाराजांकडून प्रतिनिधींनी ४० हजार रुपये घेतले आणि दीड हजारांची शिबंडी रायगडावर ठेवली. शाहू महाराज यामुळे वैतागले आणि म्हणू लागले, की तुम्हाला किल्लाही द्यायचा आणि पैसेही द्यायचे त्याऐवजी किल्ला माझ्याकडेच द्या, मीच राखतो, तुम्ही तैनातीच्या प्रदेशातून वसूल द्या. दि. १ जानेवारी १७३४ रोजी शाहूराजांनी चिमाजीअप्पांनी सैन्यासह स्वतः घाटावर राहून त्यांचे सैन्य रायगडच्या मदतीस पाठवून द्यावे असं सांगितलं. दि. १० जानेवारी १७३४ रोजी रायगडच्या पायथ्याशी मराठ्यांची आणि सिद्दीची हातघाई झाली. खास सिद्दी अंबर अफवानी मारला गेला.

इ.स. १७३३ नंतर शाहू महाराजांनी रायगड आपल्या स्वतःच्या ताब्यात ठेऊन त्यांच्यातर्फे यशवंत महादेव पोतनीसांना रायगडचा कारभार सांगितला. पूर्वी प्रतिनिधींना जो ४० हजारांचा सरंजाम द्यायचा होता तो शाहू महाराजांनी यशवंत महादेव पोतनीसांना दिला. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर पेशव्यांकडे सत्ता हस्तांतरित झाली असली तरी थोरल्या नानासाहेब आणि थोरल्या माधवराव पेशव्यांनीही रायगडचा मामला पोतनीसांकडे पूर्वीप्रमाणेच सुरु ठेवला होता. पण १७७२ च्या अखेरीस मात्र काहीतरी कटकट उद्भवली. यशवंत महादेवाचं मुलगा विठ्ठल यशवंत पोतनीस यांच्याकडून मामल्याचे हिशोब सरकारात दाखल होण्याची चिन्ह दिसेनात. अखेरीस माधवराव पेशव्यांनी रामराजे छत्रपतींकडे रायगडची मागणी केली आणि दि. ३० ऑगस्ट १७७२ रोजी छत्रपतींनी पेशव्यांना रायगड हस्तगत केला.१० पोतनीस सहजासहजी रायगड देणार नाहीत हे माधवरावांना माहित असल्याने त्यांनी आपला सरदार आपाजी हरी याला सैन्यासह रायगडावर पाठवले होते. दि. ८ सप्टेंबर १७७२ रोजी आपाजी हरीने पाचाड घेतलं. पण थोड्याच काळात माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाल्याने आणि पुण्यातही शनिवारवाड्यात राघोबादादाची कारस्थानं सुरु झाल्याने मोहिमेला थोडा वेळ लागत होता. अखेरीस दि. १८ मार्च १७७३ रोजी आपाजी हरीच्या ताब्यात रायगड आला.११ रायगड हस्तगत करण्याकरिता आपाजी हरी याने गडावरील देवतांस नवस केले होते. त्यामुळे गड ताब्यात आल्यावर शनिवारवाड्यात रत्नशाळेतून गडावरील देवतांसाठी दागिने पाठवून देण्यात आले.१२ रायगडाचा किल्लेदार म्हणून हंसाजी खेर तर मामले रायगडावर गणपतराव कृष्ण कोल्हटकर यांना नेमण्यात आले.

पेशव्यांच्या ताब्यात गड आल्यानंतर रायगडावरील सिंहासनाची व्यवस्था एखाद्या देवाप्रमाणे ठेवण्यात आलेली होती. सिंहासनावर १५ फूट लांब आणि साडेबारा फूट रुंद असे किनखापी (Velvet) कापड पांघरण्यात येई. सिंहासनाजवळ रोज संध्याकाळी दिवटी लावण्यात येई. महाराजांच्या या सिंहासनाची रोज पूजा होत असून त्यासाठी खास 'तख्त पुजारी' नेमलेला होता. इ.स. १७९६ च्या महाडच्या कारस्थानाच्यावेळी नाना फडणीस रायगडावर आले असताना त्यांनी सिंहासनाजवळ खास वेगळा असा नगारखाना ठेवला. यासंबंधी आढळणारा उल्लेख असा - "रा. बालाजी जनार्दन फडणीस महाडास आले, तेथून किल्ला पाहावयास आले. ते समई शिवाजी महाराजांचे तख्ताजवल नगारखाना ठेवावयाची परवानगी सांगितली त्यावरून सन सबा तिसैनापासून ठेविला". या नगरखान्याची वार्षिक १३०० रुपये नेमणूक लावून देण्यात आली. गडावर असलेले, आज जगदीश्वर या नावाने ओळखले जाणारे 'वाडेश्वर' मंदिर आणि शिर्काई देवीच्या मंदिराचाही पेशव्यांच्या काळात जीर्णोद्धार करण्यात आला.१३ 

गडावर पेशवेकाळात एकूण पहाऱ्याच्या जागा २४ आणि ५ मेटे होती. आंब्याचा पहारा, काळकाई खिंडीतील पहारा, टकमकीचा पहारा, नांदगिरीचा पहारा, निसणीचा पहारा अशी पहाऱ्याची नावे तर आंब्याचे मेट, चाहूडीचे मेट वगैरे मेटांची नावे आढळतात. गडाला यावेळी एकूण चार दरवाजे अस्तित्वात असून त्यांची नवे चिते दरवाजा, नाणे दरवाजा, महादरवाजा व वाघ दरवाजा अशी आढळत असून रायगडावर कोंडेखळी, बाराटाकी, टोकाची, महाराजांची, हिरकणीची वगैरे अशा एकूण १२ सदरा आहेत. आपल्याला रायगडावर खुद्द शिवाजी महाराजांची अशी एकच सदर असल्याचे माहित असते परंतु या अशा निरनिराळ्या बारा सदरा आहेत. इ.स. १८११ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात शिवाजी महाराजांचा खासा राजवाडा दुरुस्त करण्यात आला. या कामासाठी १००४ रुपये खर्च झाला. गडावर यावेळी सुमारे ५०० सरकारी सेवक हजर असून त्यांचे कुटुंब कबिले शिवाय इतर लोकवस्ती धरून हि संख्या एक आजाराच्या वर जात असणार हे उघड आहे.१४ इ.स. १७८१ मध्ये रायगडाचा वार्षिक खर्च ४० हजार रुपये इतका आलेला असून इ.स. १८१३ मध्ये हा खर्च १७ हजार इतका आलेला आहे. 

एक ब्राम्हण "पूर्वीपासून कैलासवासी श्रीमंत सिवाजी महाराज यांचे तख्ताजवल कीर्तनसेवा करीत आले" म्हणून त्यांना इनाम देण्यात आले आहे. पेशवेकाळात गडावर होणाऱ्या उत्सवांमध्ये श्रावणी पौर्णिमेस शिर्काबाई म्हणजे शिर्काईला तेल, कृष्णजन्माष्टमीचा उत्सव, गणेश चतुर्थीला गणपती पूजन, दीपावलीचा उत्सव, तुळशीचे लग्न, संक्रांत, हुताशनी पौर्णिमेचा अथवा होळीचा उत्सव, वर्षप्रतिपदा अथवा गुढीपाडवा इत्यादी सण साजरे केले जात. महादारवाज्याला पावसाळ्यात तेल आणि मेण लावून साकारले जाई. महादरवाज्यात खड्या पहाऱ्याकरिता दोन बर्कंदाज म्हणजे बंदूकधारी इसम कायम तैनात असत. यावेळी गडावर असलेल्या गंगासागर, तुळजा, पेरूजंगी, भुजंग, रामचंगी, पक्षीं, फतेलश्कर, फतेजंग, सुंदर, रेकम, मुंगसी बार, शिवप्रसाद, गणेशबार, लांडा कसाब, चांदणी, भवानी, नागीण आणि रंजकास अशा एकूण १८ तोफांची नवे पेशवे दफ्तरातील कागदांत सापडतात.१५

पेशव्यांच्या काळात रायगडावर अनेक कैदीही ठेवण्यात आल्याच्या नोंदी आढळतात.१६ इ.स. १७९०-९१ मध्ये सिद्दीकडून जंजिरा घेण्याचा बेत पुन्हा शिजत होता. यावेळी जंजिरेकर सिद्दी होता बाळुमिया. या बाळुमियाचा छोटा भाऊ छोटेमिया, सिद्दी इसुफ आणि त्यांच्यासोबतच्या सात माणसे रायगडावर बंदी म्हणून ठेवण्यात आली होती.१७ नाना फडणीसांनी पूर्वी मॅलेटच्या साहाय्यार्थ नेमून दिलेल्या बहिरो रघुनाथ मेहेंदळे यांनी १७९६ मध्ये बाजीरावांना गादीवर येण्याला विरोध करत धाकट्या चिमाजीअप्पांनी समर्थन दिल्याने बाजीरावांनी पुढे पेशवाई मिळताच बहिरो रघुनाथांना रायगडावर कैदेत टाकलं. पुढे हे बहिरो रघुनाथ रायगडावरच मृत्यू पावले. यांच्यासोबतच चिंतो लिमये, बाळाजी विष्णू आणि जयरामपंत जोशी हि नाना फडणीसांचे तीन खास माणसे रायगडावर कैदेत ठेवण्यात आली.१८

महाडच्या कारस्थानात नाना फडणीस बराच काळ रायगड आणि पाचाडला मुक्कामाला होते. यावेळी रायगडचा राबता मोठ्या प्रमाणावर होता.१९ पण पुढे हे कारस्थान मिटून नाना पुण्याला परत गेले. दि. १३ मार्च १८०० रोजी पुण्याला नाना फडणीसांच्या मृत्यू झाला आणि बाजीराव पेशव्यांना असलेला विरोध जवळजवळ संपला. नानांच्या मर्जीतल्या असलेल्या आणि जुन्याजाणत्या सरदार माधवराव रास्ते यांना दुसऱ्या बाजीरावांनी १० ऑक्टोबर १८०१ रोजी रायगडावर नजरकैदेत ठेवले.२० माधवराव रास्त्यांना बंदिवान बनवण्यात आले तरी त्यांचे महत्व आणि त्यांची इभ्रत लक्षात ठेऊन बाजीरावांनी त्यांची चांगली व्यवस्था रायगडावर लावून दिली. यशवंतराव होळकरांच्या पुण्यावरील स्वारीच्या वेळी दुसऱ्या बाजीरावांनी आपले कुटुंब आणि सवाई माधवरावांच्या पत्नी यशोदाबाई यांना ८ ऑक्टोबर १८०२ रोजी रायगडावर पाठवून दिलं.२१ पुढे बाजीरावांचा आणि चिमाजीअप्पांचा कबिला त्यांच्यासोबत सुवर्णदुर्गाला रावण झाला पण यशोदाबाईंना मात्र रायगडावर नजरकैदेत ठेवण्यात आलं, जेणेकरून पूर्वी नानांनी केलं तसा त्यांचा वापर करून बाजीरावांची पेशवाई कोणी काढून घेऊ नये. यशवंतरावांनी नेमकं हेच करण्याच्या प्रयत्नात रायगड आणि भवतालच्या प्रदेशात धामधूम मांडली.२२ यशवंतराव होळकरांच्या सैन्याचा रायगडाला पडलेला वेढा फार काळ चालू शकला नाही आणि ते सैन्य नाईलाजाने परत गेले. रायगड इतका बेलाग आहे हे पाहून अखेर बाजीरावांनी पुढच्याच वर्षी, २८ जून १८०३ रोजी पेशव्यांची सिंहगडावर असलेली रत्नशाळा रायगडावर हलवली.२३ दि. १४ जानेवारी १८११ रोजी यशोदाबाई रायगडावर मृत्यू पावल्या. दुसऱ्या बाजीरावांनी त्यांना अगदी हालात ठेवले वगैरे गैरसमज आहेत. बाजीरावांकडून यशोदाबाईंच्या देखरेखीची उत्तम व्यवस्था झालेली होती. त्या तुरुंगात नसून केवळ नजरकैदेत होत्या. पुढच्याच महिन्यात यशवंतराव होळकरांनी बाजीरावांना पत्र पाठवून जेजुरीला दर्शनाला यायचा विचार बोलून दाखवला, पण यशवंतरावांची खात्री न पटल्याने बाजीरावांनी सावधगिरी म्हणून सातारकर छत्रपतींना पत्र लिहिले त्यात ते म्हणतात, "पूर्वीसारखे यशवंतराव होळकर पुन्हा चालून आल्यास रायगड हा चांगली मजबूत जागा आहे. तेव्हा महाराजांनी तेथे सुरक्षिततेच्या असावे". रायगडावर सातारकर छत्रपतींचे चुलतबंधू चतुरसिंग भोसले हेसुद्धा साधारण वर्षभर नजरकैदेत होते.

वाराणशीबाईंना रायगडावर पाठवल्याचा मूळ उल्लेख
(शके १७३८ मधील हकीकत)


इ.स. १८१५ नंतर बाजीरावांचे आणि इंग्रजांचे उघडपणे वैर सुरु झाले. बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांना समूळ उखडून काढण्याचे राजकारण आरंभिले, आणि याकरिता त्यांनी सर्वप्रथम सिंहगड, पुरंदरे, त्रिंबकगड आणि रायगड या चार किल्ल्यांवर लढाईची जोरदार तयारी सुरु केली.२४ त्रिंबकजी डेंगळे या सगळ्या कारस्थानाचा सूत्रधार होते. अशात पंढरपूरला गंगाधरशास्त्र्याचा खून झाला आणि त्यात त्रिंबकजींना अडकवून ८ मे १८१७ रोजी इंग्रजांनी बाजीरावांकडून त्रिंबकजींना पकडून द्या अथवा रायगड, सिंहगड, पुरंदर हे किल्ले हवाली करा असं सांगितलं. त्रिंबकजींसारखा माणूस हवाली करणं हे बाजीरावांना परवडणारं नव्हतं. त्यांनी सोडचिठ्ठ्या दिल्या. काही काळाने त्रिंबकजीही इंग्रजांच्या हाती सापडले. तेव्हा माल्कमने बाजीरावांना हे तीनही किल्ले परत केले. दि. १२ जून १८१७ रोजी बाजीरावांची पत्नी वाराणशीबाई यांना शनिवारवाड्यातील देवांसह रायगडावर रवाना करण्यात आले.२५ नोव्हेंबर १८१७ मध्ये शनिवारवाड्यावर इंग्रजांचे निशाण लागले आणि बाजीरावांचे गोलाकार पलायन सुरु झाले. दि. २४ एप्रिल १८१८ रोजी इंग्रजांचा रायगडच्या आसमंतात प्रवेश झाला आणि अखेर निरुपाय होऊन दि. ९ मे १८१८ रोजी वाराणशीबाई तहासाठी राजी झाल्या. दि. १० मी रोजी कॅप्टन प्रॉथर रायगडावर प्रवेशता झाला आणि वाराणशीबाईंनी पुण्याला परत जाण्यासाठी गड सोडला. रायगडावर इंग्रजी निशाण लागले...
संदर्भ :

१. सभासद बखर (मोडीप्रत)
२. मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड ८, लेखांक २२
३. मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड ८, लेखांक ४३
४. मल्हार रामराव विरचित थोरले शाहू महाराज चरित्र 
५. शिवचरित्रसाहित्य खंड ६, लेखांक १२५
६. पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद, खंड ३, लेखांक ४३
७. पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद, खंड ३, लेखांक १३३
८. पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद, खंड ३, लेखांक १३६
९. मल्हार रामराव विरचित थोरले शाहू महाराज चरित्र
१०. रायगडची जीवनकथा, पृ. ११५ 
११. रायगडची जीवनकथा, पृ. १२० 
१२. पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद, खंड ३२, लेखांक २०२
१३. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ३, पृ. १५९
१४. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ३, पृ. १६२
१५. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ३, लेखांक १३३
१६. पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद, खंड ३५, ३६
१७. सवाई माधवराव पेशवे रोजनिशी, भाग १, लेखांक ३७४
१८. ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड १०, लेखांक ४०५९, ४१०३, ४१०४
१९. ऐतिहासिक लेखसंग्रह भाग ९ मधील अनेक पत्रे
२०. ऐतिहासिक लेखसंग्रह भाग १३, लेखांक ६१६६
२१. ऐतिहासिक लेखसंग्रह भाग १४, लेखांक ६४४६, ६४५५
२२. ऐतिहासिक लेखसंग्रह भाग १४, ६५१० नंतरचे लेखांक 
२३. दुसरे बाजीराव पेशवे रोजनिशी, लेखांक २२
२४. पेशवाईच्या अखेरची अखबार
२५. धडफळे यादी

- © कौस्तुभ कस्तुरे
Web: www.kaustubhkasture.in | Email: kasturekaustubhs@gmail.com