पालखेड - बाजीरावांच्या युद्धनीतीचा अजोड नमुना

बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातील पहिली, नोंद घ्यावी अशी प्रचंड मोहीम म्हणजे पालखेडची मोहीम. बाजीरावांचे अस्तित्व आणि त्यांचा पराक्रम साऱ्या हिंदुस्थानाला या मोहिमेमुळे दिसला, विशेषतः निजामसारखा मुरब्बी राजकारणीही या केवळ सत्तावीस वर्षाच्या पेशव्याच्या पराक्रमाने गुंग झाला. पालखेडच्या मोहिमेने शाहू महाराजांच्या गादीचे स्थान केवळ बळकटच केले नाही तर इतर अनेक शत्रूंना बाजीरावांच्या कार्यपद्धतीची दाखल घेणे भाग पाडले. पालखेडस बाजीरावांनी निजामाला अनेकदा रणांगणात आणि राजकारणात मात दिली. काय होती पालखेडची हि मोहीम? पाहूया संक्षिप्त स्वरूपात.. 


१७२५ मध्ये शाहू महाराजांनी प्रतिनिधी आणि पेशव्यांना दक्षिणेत पाठवलेले पाहून कोल्हापूरकरांना आणि निजामाला आयतीच सवड मिळाली. कोल्हापूरकर संभाजी छत्रपतींनी चंद्रसेन जाधवाला लिहीलेल्या पत्रात “आपणाकडे येणे म्हणून निजामाची लिहीणी येतात. पठाणांचे वाढीमूळे श्रीपतराव (प्रतिनिधी) व बाजीराव यांत एकमत नाही. स्वामींकडील अगत्य धरावयाविशी निष्कर्ष तुम्ही निजामास कळवावा. सातारावासियांकडील तह मोडून स्वार्थ साधवा हा अर्थ निजामांनी तुम्हांस सांगून पाठवला, हे गोष्टतुम्ही बरी केली”. यावरून निजामाला पुण्यावर हल्ला करण्यास कोल्हापूरकरांची फूस होती हे उघड दिसते. इस १७२५ ते १७२८ या तीन वर्षात कोल्हापूरकर संभाजी निजामासोबत स्वारीत होते असे एका पत्रावरून दिसते. निजामाने प्रथम ‘मी सरळच वागत आहे, बाजीरावच मुद्दाम कुरापती काढतात. हा तरुण कोकणस्थ ब्राह्मण पेशवा आणि खंडेराव दाभाडे सेनापती तुम्हांस दगा करणार’ अशी समजूत करून दिल्याने शाहूराजांचा गैरसमज झाला खरा, आणि म्हणूनच शाहूराजांनी अंबाजीपंत पुरंदर्‍यांना पत्र लिहून बाजीरावांना समज देण्याविषयी सांगितले- “ पण लागेचच निजाम-कोल्हापूरकर यांच्या संगनमताचा प्रत्यय शाहू महाराजांना येऊ लागला. दि. १३ ऑक्टोबर १६२७ रोजी शाहूराजांनी आपल्या सरदारांना पत्रे पाठवून “किलीजखानाचे (निजामाचे) पिच्छावर येऊन पायबंद देऊन नतीजा पोहोचवून स्वामींचा संतोष करणे” अशी आज्ञा दिली. 

इ.स. १७२७ च्या सुरुवातीला निजाम बीड आणि जूनपासून पुढे धारूरला होता. निजाम मराठ्यांना चकवा देऊ पाहत होता. एकदा तो औरंगाबादेस जात आहे असे वाटत असतानाच अचानक तो बीडला आला आणि सरदार पाठवले ते जुनरच्या रोखाने. निजामाकडे तोफखाना होता तो अर्थातच मराठ्यांकडे नव्हता. गनिमी कावा हे मराठी फौजेचे प्रमुख हत्यार होते. बाजीरावांनी नाशिकपासून सातार्‍या पर्यंतची जबाबदारी चिमाजीअप्पांवर सोपवून आपण उत्तरेकडची बाजू सांभळली. अप्पांच्या दिमतीला शिंदे-होळकर-कदमबांडे असे शूर पराक्रमी सरदार होतेच. राणोजी शिंदे एका पत्रात बाजीरावांना म्हणतात, “ज्याप्रकारची आज्ञा होईल त्याप्रमाणे वर्तू. भिऊन पुढे चालावयास अंतर करणार नाही. परसंग पडलाच तर स्वामींचे पुण्य समर्थ आहे. आमचा सांभाळ ईश्वरच करीत आहे”. ऑगस्ट १७२७च्या आसपास पावसाळ्यात ऐवजखान नाशिकजवळ असताना सिन्नरला तुकोजी पवारांनी चांगलाच समाचार घेतला. 

इ.स १७२७ च्या अखेरीस निजाम पुण्यात शिरला आणि त्याने पुणे प्रांतात जो धुमाकूळ घातला त्याचे वर्णन खुद्द चिमाजीअप्पा करतात ते असे- “तुरुकताजखान, रंभाजी निंबाळकर, नेवासकर थोरात, धीराजी पवार वगैरेंनी येऊन प्रथममुलकात धुंदी माजवली. लोहगडचे पेठेपर्यंत गेले. तेथे लोहोगडकरांनी ठेचून वाटेस लावले. ते माघारे येऊन चिंचवड पुण्यामध्ये राहिले. तो निजाम संभाजीराजीयांसह पुणे प्रांतात अंजनापुरास येऊन राहीला. पुढे तळेगाव शिखरापुरावर जाऊन कौल घेतले. तेथून नारायणगड उदापूरचे रोखे जाऊन राहीला. अवसरी पाबळकर ठाणी टाकून पळाले. खेडचे संरक्षक ठाणे सोडून गेले. नारायणगडावरील शिबंदीने जुन्नरकर बेगास धुडकावून संभाजीराजांचे निशाण घेतले”. यावेळी चिमाजीअप्पा स्वतः पुरंदरगडावर शाहूराजांसह होते. निजामाने पुण्यात रामनगरच्या शिसोदिया राजपुत राण्याच्या मुलीशी कोह्लापूरकर संभाजीराजांचे लग्न लावून दिले. 

पुण्यावरून निजाम निघून त्याने सुपे जिंकले. तेथे रंभाजी निंबाळकर आणि पाटसला नेवासकर थोरातांना ठेवून बारामती जानोजी निंबाळकराला दिले. इतक्यात स्वतह बाजीराव पुण्याच्यारोखानेयेत आहेत अशा बातम्या आल्याने निजाम पेडगावमार्गे अहमदनगरला गेला. यावेळेस बाजीराव खानदेशात होते. ते पुण्याकडे यायच्या आत निसटावे या विचाराने निजामाने आपला तोफखाना नगरलाच मागे सोडला. आणि २२ फेब्रुवारी १७२८ रोजी तो पुण्याहून निघाला औरंगाबादच्या मार्गाने निघाला. बाजीरावांना निजामाच्या इत्यंभूत बातम्या वेळोवेळी मिळत होत्या. गनिमी काव्याने बाजीरावसाहेबांनी निजामाचा मुलुख उध्वस्त करण्याचा सपाटाच लावला. बाजीरावांनी निजामाचे जालना आणि सिंदखेड हे परगणे अक्षरशः जाळून बेचिराख केले. ऐवजखान चालून आल्यावर बाजीरावांनी बर्‍हाणपुरावर जाण्याची हूल उठवून थेट पुर्वेकडे वळून माहूर-वाशिम वगैरे भागात धांदल उडवून दिली. ६ नोव्हेंबर १७२७मध्ये जालन्याजवळ ऐवजखान-बाजीराव लढाई होऊन बाजीराव गुजरातच्या रोखाने गेले. त्यानंतर थेट तापी उतरून बाजीराव जानेवारी १७२८ च्या आरंभी गुजरातेत भडोचला गेले आणि सुरतेवर येत आहे असे दाखवून सरबुलंदखानाला चकवा दिला. १४ फेब्रुवारीला बाजीराव धुळ्याजवळ बेटावद येथे दाखल झाले. 

उत्तरेकडून निजामाला मिळणारी मदत तोडून त्याला पुणे सोडून उत्तरेत येणे भाग पाडण्याचा बाजीरावांचा डाव सफल होत होता. बर्‍हाणपुरावर बाजीराव जाण्याची अफवा निजामाला निजामाला खरी वाटून तो त्यादिशेने लगबगीने निघाला खरा, पण मध्ये अजिंठ्याच्या डोंगररांगेतून अचानक खाली आलेल्या बाजीरावांच्या झंझावाती फौजांनी त्याला अक्षरशः हैराण केले. औरंगाबादेच्या पश्चिमेस जवळपास सात कोसांवर असणार्‍या पालखेड येथे निजामाचा तळ पडला असतानाच २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मराठी फौजांनी पालखखेला येऊन निजामाला चहुकडून वेढा घातला. निजामाचा तोफखाना मागे नगरलाच असल्याने मराठी फौजांना आता त्याची भीती नव्हती. बाजीरावांनी निजामाच्या पाण्याच्या स्रोतावर चौक्या बसवल्या. निजामाचे पाणी तुटले. दुसर्‍या दिवशी निजामाची फौज जागी झाली आणि पाहतात तो काय ? चारही बाजूंनी मराठे हातात नंग्या तलवारी घेऊन हल्ला करण्याच्या बेतात उभे होते. निजामाने आपल्या सैन्याला सज्ज होण्याचा हुकूम सोडला. जे शस्त्र हाती येईल ते घेऊन निजामाची फौज उभी राहिली. ‘अल्ला हो अकबर’ च्या घोषणा देत निजामाची फौज कोंडी फोडण्यासाठी मराठ्यांवर चालून गेली. मराठे हुशार होतेच. त्यआतच एका घोड्यावर स्वतः श्रीमंत बाजीराव पेशवेयुद्धवेश चढवून बसले होते. निजामाने कोंडी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण मराठे त्याला पुन्हा पुन्हा आत ढकलत होते. खानाच्या सैन्याला प्रचंड तहान लागलेली, मराठवाड्याचा मुलुख हा, त्यात उन्हाळ्याचे दिवस आणि अशातही पाणवठा मराठ्यांच्या ताब्यात. त्यामूळे लढण्यापेक्षा जीव गेलेला बरा अशी निजामाच्या सैन्याची अवस्था झाली. बाजीरावांनी निजामाला स्पष्ट अटी कळवल्या की ‘मोंगल दरबारातून चौथाई-सरदेशमउखी आम्हाला मिळाली आहे ती बिनातक्रार मिळणार असेल आणि कोल्हापूरकरांना सातारकरांविरुद्ध भडकवून राजकारणे करणे निजाम सोडणार असेल तरच जिवदान मिळेल”. अखेर ऐवजखानानेही निजामाला समजवल्यने निजाम नाक मुठीत घेऊन शरण आला. एका समकालीन पत्रात म्हटले आहे की “ऐवजखान नसता तर श्रीमंतांनी निजामची विश्रांत केली असती”. यानंतर निजामाने बाजीराअवांच्या अटी मान्य करून लिहून दिल्या. एकूण तहनामा १७ कलमी असून त्यातील महत्वाच्या या अटी अथवा मागण्या अशा- 

1. दक्षिणचे कामकाजाचा बंदोबस्त आमचे हाते घ्यावा. ईश्वर कृपेकरून दौलतखाई व किफाईती केली जाईल. जबाबबशर्त तुमचे हाते घेतला जाईल. 

2. शाहूराजांकडून आनंदराव आपणापाशी आहेत, त्यांसि आम्हांसी नीट नाही, सबब त्यांसी निरोप द्यावा. आम्हांकडून कोणी आपल्यापाशी राहिल. 

3. संभाजीराजे यांस निरोप द्यावा की ते पन्हाळ्यास जात. 

4. प॥ अक्कलकोट, खेड, तळेगाव, इंदापुर, नारायणगाव व पुणे वगैरे ठाणी पहिल्यापासून स्वराज्यात आहेत. हाली आपण जप्त केली ती मोकाळी करावी. 

5. सहा सरसुभे दख्खनच्या सरदेशमुखीची सनद नवी द्यावी. 

6. संभाजीराजे यांस विजापूर सुभ्यापैकी कृष्णा व पंचगंगेकडील प्रांत आम्ही दिल्हा आहे व त्याची सनदही आम्ही करून दिल्ही तेच असावी आपण न द्यावी. 

7. संभाजीराजे यांस सुभे विजापूरपैकी कृष्णा व पंचगंगेच्या पलिकडे प्रांत येथील चौथ सरदेशमुखी आम्ही दिल्ही ते त्यांणी घेत जावी. कृष्णेच्या अलिकडे उपद्रव न करावा. 


दि. ६ मार्च १७२८ रोजी झालेला हा तह मुंगी-शेवगावचा तह म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. © कौस्तुभ कस्तुरे

(सदर लेख 'पेशवाई' या पुस्तकाचा एक भाग असून अंशतः वा पूर्णतः पुनर्प्रकाशित करण्यास बंदी आहे. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल)