रायगडावरील सिंहासनाचं पुढे काय झालं?

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं रायगडावरील सिंहासन रायगडाच्या पाडावानंतर झुल्फिकारखानाने "फोडले" याला काही इतिहासात काही संदर्भ सापडत नाहीत, किमान आज उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक कागदांमध्ये तरी नाही. मराठी कागद याबद्दल काहीही सांगत नाहीतच, पण सिंहासन वितळवले असते वा फोडले असते तर किमान फारसी कागदांमध्ये तरी तशी माहिती असायला हवी होती ती दिसत नाही.फारसी कागदपत्रांमध्ये काय माहिती मिळते ती पुढे पाहुया- 

१) ईश्वरदास नागरच्या फुतुहाते आलमगिरी मध्ये झुल्फिकारखान रायगड आणि प्रतापगड जिंकून संभाजीराजांच्या कबिल्यासह आणि मुलांसह जवाहिराने भरलेल्या दोन मोठ्या पेट्या घेऊन बादशहापुढे गेला असे म्हणतो.

२) खाफिखानाने 'मुंतखबूललुबाब ए महंमदशाही" मध्ये तो स्वतः रायगड किल्ल्याला लागून असलेल्या वाड्यात (बहुदा पाचाडचा असावा) राहण्याचा योग आल्याचे म्हणतो पण त्यानेही याबद्दल काही माहिती दिलेली नाही.

३) तारिख-ए-दिल्कुशा मध्ये भिमसेन सक्सेनासुधा केवळ रायगड घेतल्याचे देतो, पण सिंहासन वगैरे फोडल्याचे अथवा नेल्याचे देत नाही.

४) केवळ एकटा साकी मुस्तैदखान आपल्या "मासिर-ए-आलमगिरी" मध्ये अब्दुर्रहिमखान बयुतात याला औरंगजेबाने रायगडावरील मालमत्ता जप्त करण्यास सांगितले असे सांगतो. यावरून असा अंदाज बांधता येतो की कदाचित सिंहासन जप्त केले गेले असावे. त्याचे पुढे काय झाले, कोणालाही माहित नाही.

५) "रायगडची जिवनकथा" मध्ये शां. वि. आवळसकरांनी 'सिंहासन फोडले' असं म्हटलं आहे पण ते कशाच्या आधारे ते मात्र आवळसकर लिहीत नाहीत.

६) मराठी साधनांत जेधे शकावली, जेधे करीना, पंतप्रतिनिधींची बखर वगैरे सर्व केवळ "सला करून रायगड मोंगलांचे हवाले केला" एवढंच सांगतात पण सिंहासनाविषयी माहिती देत नाहीत.

हे सर्व पाहता झुल्फिकारखानाने सिंहासन फोडले असे पुराव्याअभावी म्हणणे खुप धाडसाचे ठरेल. फारतर औरंगजेबानी ते जप्त केले असे म्हणता येऊ शकते. जे पुढे कायम मोंगली जवाहिरखान्यात राहिले असेल. अर्थात हीसुद्धा एक शक्यता आहे.

नाही म्हणायला एक उल्लेख थोड़ा संशयास्पद वाटतो तो म्हणजे पेशवेकाळात "सिंहासना"समोर दिवाबत्ती होत असे. सिंहासनाच्या खांब तसेच बसण्याच्या जागेवरील कापडास रक्कम खर्ची पडली आहे. आवळस्करांनी पेशवे दफ्तरातील अप्रकाशित कागद रुमाल क्र 81, 91 वगैरेमधून खर्च दिला आहे. यावरून 2 निष्कर्ष निघतात.

1) मूळ सिंहासन औरंगजेबाने जप्त केले असावे आणि 1733 मध्ये बाजीराव पेशव्यांनी रायगड घेतल्यावर पुन्हा पेशवाईत तेथे नविन प्रतीकात्मक सिंहासन बनवले असावे.

2) कदाचित रायगड कायम आपल्याकडेच राहील असे वाटून हे अवजड सिंहासन मोंगलांनी हलवले नसावे आणि पुन्हा पेशव्यांनी जिंकल्यावर या मूळ सिंहासनाचीच पूजा वगैरे होत असावी.


*टीप: शेवटचे दोनही मुद्दे हे माझे वैयक्तिक विचार असून यात कोणताही दावा केलेला नाही. कदाचित अप्रकाशित असलेल्या कागदांमधून नवीन माहिती उजेडात येऊ शकते.


- © कौस्तुभ कस्तुरे