श्री समर्थांचा राजधर्म

श्रीसमर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजधर्म आणि क्षात्रधर्म असे दोन उपदेश केले होते. स्वतः समर्थांच्या पौष वद्य नवमी शके १६०३ रोजीच्या संभाजी महाराजांशी बोलनाताच्या यादीत या दोन्हींचा उल्लेख आहे (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे खंड १, लेखांक ४३). हे दोन्ही धर्म नेमके केव्हा सांगितले याबद्दल निश्चित तारीख सांगता येत नाही, कारण या यादीतही "पूर्वी राजश्रींस धर्म सांगितले" असाच उल्लेख आहे. पण या दोन्हीही धर्मांच्या पोथ्या (नकला) आज आपल्याकडे उपलब्ध असून पुण्याच्या आनंदाश्रम संस्थेच्या पोथीशाळेत या पोथ्यांच्या नकला आहेत. हे दोन्हीही धर्म म्हणजे अक्षरशः समर्थांच्या बुद्धीची आणि वाणीची रामगंगा आहे असंच म्हणावं लागेल. दोन्हीही धर्म हे अर्थातच ओवीरूप असून त्यांचा अर्थ सहजगत्या कोणालाही समजेल असा असल्याने वेगळा अर्थ देत नाहीये.


राजधर्म! यात समर्थांनी राजाने कसा कारभार करावा यासंबंधाने अत्यंत संक्षिप्त वर्णन केलं आहे. एकीकडे समर्थ शिवरायांना प्रेमाचा आणि मायेचा सल्लाही देतात, की "धुरेनी म्हणजे स्वतः युद्धाच्या आघाडीवर जाणे हे चांगलं राजकारण नव्हे". का? तर राजा हा स्वामी असतो. क्वचित दुर्दैवाने कुठून बाण आला, तोफगोळा पडला, बंदुकीची गोळी आली तर राजाचा जीव धोक्यात येऊ शकतो. राजा/म्होरक्या पडल्यावर सैन्य बिथरतं (याचा अनुभव आपण अनेकदा घेतलेला आहे इतिहासात). म्हणूनच समर्थ सांगतात, "धुरा चकसुन सोडणे, म्हणजे नीट नजर ठेवावी, आणि आघाडीवर विश्वासातली इतर माणसं नेमावीत. "मोहरा पेटला अभिमाना, मग तो जीवाचे पाहेना" या ओवीत तर आपल्याला सेनापती प्रतापराव गुजरांची आठवण आल्यावाचून राहणार नाही. एकंदरीतच असा आहे हा राजधर्म :    
श्रीरामसमर्थ

नमु मंगळमूर्ती विघ्नहरु ।। सरस्वतीस नमस्कारु ।। सद्गुरू संतकुळेश्वरु ।। दाशरथी ।।१।। 
श्रोतीं मानेल तरी घ्यावें ।। अथवा वाचुन सांडावें ।। प्रपंचा कारणे स्वभावें ।। बोलिलों मी ।।२।।
सावधपणे प्रपंच केला ।। तेणे सुखचि पावला ।। दीर्घ प्रेत्नें मोडला ।। कार्यभाग सादे ।।३।।
आधी मनुष्य वोळखावें ।। योग्य पाहुन काम सांगावें ।। निकामी ते ठेवावें ।। येकेकडे ।।४।।
पाहोन समजोन कार्य करणे ।। तेणे कदापि न ये उणे ।। कार्यकर्तयाच्या गुणें ।। कार्यभाग होतो ।।५।।
कार्यकर्ता प्रेत्नी जाड ।। कांही येक आसला हेकाड ।। तरी समर्थपणे पोटवाड ।। केलें पाहिजे ।।६।।
अमर्याद फितवेखोर ।। याचा करावा विचार ।। शोधिला पाहिजे विचार ।। यथातथ्य ।।७।।
मनुष्य राजी राखणे ।। हेचि भाग्याची लक्षणे ।। कठीणपणे दुरी धरणे ।। कांही येक ।।८।।
समयी मनुष्य कामा येते ।। याकारणे सोसिजे ते ।। न्यायचि सांडिल मग तें ।। सहजचि खोटें ।।९।।
न्याय सिमा उलंघू नये ।। उलंघितां होतो अपाय ।। न्याय नसता उपाय ।। होईल कैचा ।।१०।।
उपाधीस कंटाळला ।। तो भाग्यापासून चेवला ।। समयी धीर सांडिला ।। तोही खोटा ।।११।।
संकटी कंटाळो नये ।। करावे अंत्यंत उपाय ।। तरिं मग पाहतां काय ।। उणे आहे ।।१२।।
बंद बांधावे नेटके ।। जेणे करिता चतुर चुके ।।  ताबे न होतां फिके ।।  कारभार होती ।।१३।।
धुरेने युध्धास जाणे ।। ऐसी नव्हेती राजकारणे ।। धुरा चकसून सोडणे ।। कितेक लोक ।।१४।।
उदंड मुंडे असावी ।। सर्वही येक न करावी ।। वेगळाली कामे घ्यावी ।। सावधपणे ।।१५।।
मोहरा पेटला अभिमाना ।। मग तो जिवाचें पाहेना ।। मोहरे मेळउन माना ।। वरी चपेटे करी ।।१६।।
देखोन व्याघ्राचा चपेट ।। मेंढरें पळती बारावाटा ।। मस्त जाला रेडा मोटा ।। काय करावा ।।१७।।
रायाने करावे राजधर्म ।। क्षेत्री करावे क्षत्रधर्म ।। ब्राह्मणी करावे स्वधर्म ।। नाना प्रकारे ।।१८।।
तुरंग शस्त्र आणि स्वार ।। पाहिलाच पाहावा विचार ।। निवडुन जातां थोर थोर ।। शत्रू पळती ।।१९।।
ऐसा प्रपंचाचा विवेक ।। स्वल्प बोलिलों काही येक ।। ये कामने स्वामी शेवक ।। असतां बरे ।।२०।।
इतिश्री राजधर्म निरोपणं ।। संपूर्णमस्तु ।। श्रीरामचंद्रार्पणमस्तु  छ।।  - कौस्तुभ कस्तुरे | suvarnapaane@gmail.com