समर्थ रामदासस्वामींचा गणपती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती समर्थ रामदासस्वामींनी लिहिली आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच. पण समर्थांनी गणपतीवर ही एकच आरती रचली नसून आणखीही काही रचना समर्थांच्या आपल्याला आढळून येतात. 

समर्थांच्या विश्वासार्ह चरित्रात पाहायचं झालं तर समर्थ शिवथरच्या घळीत, म्हणजेच सुंदरमठी असताना त्यांनी तिथे गणपतीची मूर्ती केली. हे मूर्ती त्यांनी स्वतःच्या हाताने केली ! समर्थांच्या समकालीन असलेल्या, रामदासी सांप्रदायिक शिष्यांपैकी गिरिधरस्वामींनी समर्थांच्या या गणपतीचं वर्णन केलं आहे ते असं- 

समर्थे सुंदरमठी गणपती केला । दोनी पुरुष सिंधुरवर्ण अर्चिला ।
सकळ प्रांतासि मोहछह दाविला । भाद्रपदमाघ पर्यंत ।।

याचाच अर्थ भाद्रपदात गणपती उत्सव सुरु केला. इथपासून ते बहुदा माघ महिन्यातील गणपतीपर्यंत रोज गणेशाची आराधना केली जात असेल. इथे गिरिधरस्वामी म्हणतात की दोन पुरुष उंचीची (म्हणजे साधारणतः दहा फूट) मूर्ती केली, पण हे संभव वाटत नाही. यानंतर गिरिधरस्वामी म्हणतात की समर्थांनी शिवाजी महाराजांकडे अकरा मुठी भिक्षा मागितली आणि महाराजांनी त्यांना केवळ अकरा मुठी धान्य हे राजासाठी कमी वाटेल म्हणून 'हनुमानाची एक मूठ म्हणजे अकरा खंडी धान्य' असं समजून एकशे एकवीस खंडी धान्य पाठवलं. अर्थात, अनेकांनी या एकशे एकवीस खंडी धान्याचा संबंध समर्थांच्या गणपती उत्सवाशी लावला आहे जो चूक आहे. हे एकशे एकवीस खंडी धान्य चाफळच्या रामनवमीच्या उत्सवासाठी होतं. शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या अनेक पत्रांमध्ये या एकशे एकवीस खंडी धान्याचा उल्लेख आहे तो चाफळच्या उत्सवासाठी आहे. मुख्यतः, महाराजांनी चाफळच्या जी अखेरची सनद दि. १५ सप्टेंबर १६७८ रोजी करून दिली त्यातही या एकशे एकवीस खंडी धान्याचा उल्लेख आहे. त्यामुळे, या ओव्या लागोपाठ आल्या असल्या तरी ते धान्य गणपती उत्सवासाठी नाही. 

असो, मुख्य विषय असा की समर्थांचं गणपतिप्रेम. सुंदरमठी समर्थांनी स्थापन केलेला गणपती कसा होता? गणपती अगदी साधाच होता ! पण समर्थांना त्या सध्या मूर्तीतही जे विलोभनीय दर्शन घडलं ते असं होतं- सर्वांगी सुंदर अशा शेंदुराची उटी माखलेला, भली चंदनाची उटी आणि त्यात केशर-कुंकू मिश्रित गंध, डोईवर रत्नजडित मुकुट, पायात नुपूर (गणपती हा उत्तम नर्तक असल्याने) असलेला हा लंबोदर पिवळा पितांबर नेसला आहे. त्याची सोंड सरळ असून किंचित कललेल्या मानेने त्याची नजर सगळ्या विश्वावर आहे. असा हा समर्थांचा गणपती !
गणपतीच्या आरतीशिवायही समर्थांनी अनेकविध गणेशस्तवनं केली आहेत. त्यातील सर्वात प्रदीर्घ असं गणेशस्तवन म्हणजे श्रीमत दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसरा समास होय. दासबोध सहसा सर्वाना उपलब्ध असल्याने श्लोक जसेच्या तसे न देता आपण त्या गणेशस्तवनाचा सोपा अर्थ पाहू. समर्थ म्हणतात,

“हे गणनायका, सर्वसिद्धी फळदायका, सगळं अज्ञान दूर करणाऱ्या बोधरूपा, माझ्या मनात तू सदासर्वकाळ वास्तव्य कर. तुझ्या कृपाकटाक्षाने माझ्यासारख्या पामराकडून हे (दासबोध) वदवून घे. तुझी कृपा झाली असता सगळे भ्रांतीचें पडदे दूर होतात, विश्वभक्षक जो काळ, तोही तुझ्या चरणी लागून तुझा दास होतो. तुझी कृपा झाल्यावर सगळी विघ्नंही चळाचळा कापतात, आणि अगदी नाममात्र वाटू लागतात. आणि म्हणूनच तुझं नाव विघ्नहर आहे, आम्हा सगळ्यांचं तू माहेर आहेस. तुला वंदन केल्यावर सगळं सुरळीत पार पडतं, अगदी कसल्याही अडचणी असल्या, कसलेही अडथळे कार्यात आले तरी ते दूर होतात. ज्याचं रूप आठवतच मनाला आत्यंतिक समाधान लाभतं तो तू आहेस. तुझं रूप सगुण आहे, लाघवी महालावण्य आहे. तू एकदा नृत्य सगळे देवही स्तब्ध होतात. सदासर्वकाळ मदोन्मत्त असलेला तू कायम आनंद-हर्षोल्हासाने, प्रसन्नवदनाने डोलत असतोस. भव्य आणि वितंड असं तुझं रूप आहे. तुझी ही मूर्ती म्हणजे जणू काही भीममूर्तीच आहे. त्या ब्याव्य कपाळावर सिंदूर चर्चिला आहे. तुझ्या मस्तकावर निरनिराळ्या सुवासिक फुलांमधून सुवासिक रस गळतो आहे, ज्यामुळे असंख्य भुंगे तुझ्या मस्तकी घोंघावत आहेत. वक्र झालेली सोंडही सरळ रेषेत आहे, ती सोंड आणि किंचित खाली आलेले तुझे ओठ तुझ्या एकूणच मुखकमलाला शोभून दिसतात. चौदा विद्यांचा अधिपती असलेला तू, लहानसे डोळे हलवत भल्या मोठ्या कर्णथापा फडकावत असतोस तेव्हा अजूनच सुंदर दिसतोस. तुझ्या डोक्यावरच्या रत्नजडित मुकुटामागे दिव्य प्रभा असल्याचं स्पष्ट जाणवतं. त्या कानातली कुंडलं सुद्धा त्या प्रभेमुळे झळाळून उठतात. बळकट असे दात, आणि त्या दातांच्या मुळाशी असलेला रत्नजडित सोन्याचा भाग हा त्या प्रकाशात अजून भर घालतो. तुझ्या कमरेभवताली नागाने विळखा घातला असून त्याभवताली लहान लहान घंटा आहेत ज्या किणकिणत आहेत. चतुर्भुज अशा तुझ्या मूर्तीला हा पितांबर आणि धुधु:त्कार टाकणारा तो सर्प हा तुलाच शोभून दिसतो. मांडी घालून बसलेला तू मस्तक डोलवत टकमक पाहत बसतोस तेव्हा अत्यंत मोहक वाटतोस. निरनिराळ्या जातींच्या फुलांच्या माळा तू गळ्यात परिधान केलेल्या आहेस, ज्या कमरेच्या संपेपर्यंत रुळत आहेत, त्यातच गळ्यात हृदयाजवळ रत्नजडित पदक शोभत आहे. तुझ्या हातात परशु आणि कमल, एक तीक्ष्ण असा अंकुश, आणि एका हातात मोदकाचा गोळा आहे. अतिशय कौशल्याने तू नृत्य करतो आहेस, ओबीतील टाळ-मृदूंग अशी सामग्रीही आहे. एक क्षणाचीही तुला स्थिरता नसून अत्यंत चपळपणे तुझी लावण्यखणी मूर्ती नाचत आहे. नाचताना तुझ्या पायातले पैंजण रुणुझुणु वाजतात, आणि दंडातल्या वाकीचा आवाज होतानाच त्या तालावर तुझी दोन्ही पाऊलं पडतात. तुझ्या या नर्तनामुळेच या सगळ्या देवसभेत शोभा आली असून नेत्रदीपक अशी प्रभा फाकली आहे. असा तू सर्वांगसुंदर, सगळ्या विद्यांची खाण असलेला गणाधिपती, त्याला माझा साष्टांगभावे नमस्कार असो. असं हे सगळं गणपतीचं ध्यान वर्णन करत असताना सगळी भ्रांत निघून जाते. ब्रह्मादिक देवही ज्याचं वर्णन करतात तिथे आपण मानव बापुडे ते काय. असो, सगळ्यांनी गणेशाचं चिंतन करावं. जे मूर्ख अवलक्षणी आहेत, ते आणि असेच सगळे सगळ्या विषयात प्रवीण होतात. असा जो परमसमर्थ गणपती आहे तो सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करतो, आणि हे मी माझ्या स्वतःच्या (हे समर्थ म्हणत आहेत) प्रचितीवरून सांगत आहे. अशी ही गणेशमूर्ती आहे ती मी (समर्थांनी) परमार्थाची इच्छा धरून यथामतीने इथे वर्णन, स्तवन केली आहे”. 

याहून सुंदर गणपतीचं वर्णन कुठे मिळू शकेल? मी स्वतः गणपतीचं एवढं सुंदर वर्णन वाचलं नाहीये. अशाच प्रकारे समर्थांनी त्यांच्या प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला गणेशस्तवन केलं आहे, पण हे दासबोधातील सर्वात विस्तृत आहे. एकूणच, शिवकाळात पाहायचं झालं तर समर्थांनी शिवथरच्या घळीत हा गणेशोत्सव सुरु केला असं स्पष्ट दिसतं. 

१) समर्थ इ.स. १६७६ पर्यंत शिवथरच्या घळीत होते असं दिसतं, कारण दि. ८ ऑगस्ट १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी सज्जनगड आणि महिपतगडच्या किल्लेदारांना जी पत्रं पाठवली आहेत त्यात समर्थ “शिवथरी” राहतात असं म्हटलं आहे (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १५ आणि १६). 

२) शिवाजी महाराज साताऱ्याला आजारी पडले होते तेव्हा समर्थ शिवथरच्या घळीत होते असं स्पष्ट होतं, कारण कल्याण गोसाव्यांनी त्यांच्या एका पत्रात तसं स्पष्ट म्हटलं आहे (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक ५०). नोव्हेंबर १६७५ मध्ये सातारा काबीज झाल्यानंतर महाराज साताऱ्यावर गेले होते आणि तेथेच ते आजारी पडले (१६७५ ची अखेर अथवा १६७६ चा जानेवारी महिना). यावेळी समर्थ सुंदरमठी होते. 

३) याच्या थोडंसं आधीच, सप्टेंबर १६७५ मध्ये शिवाजी महाराजांनी शिवथर प्रांतात ‘रामनगर’ नावाची पेठ वसवण्याकरता अंमलदारांना पत्रं पाठवली होती. (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३). 

४) दि. ३१ मार्च १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी चाफळची पहिली (जुनी सनद, जी पुढे समर्थांनी नाकारली) सनद लिहून दिली होती त्यात महाराज म्हणतात, “आपण श्री सिवतरी असता त्यांचे भेटीस गेलो होतो” (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १७). म्हणजे ३१ मार्च १६७६ च्या आधीही समर्थ शिवथरची घळीत मुक्कामाला होते. 

५) महाराज दक्षिण दिग्विजयाला जात असताना बिरवाडीला मुक्काम पडला असतानाही समर्थ शिवथरच्या घळीत होते (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक २६). 

६) समर्थांनी पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना भेटीदरम्यान जे काही सांगितलं त्यात समर्थ म्हणतात, “नळ संवत्सरी सिवतरी (शिवाजी महाराजांनी) १८ शस्त्रे समर्पिली” (श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक ४३). हा नळ संवत्सर दि. ५ मार्च १६७६ (गुढीपाडवा) ते दि. २३ मार्च १६७७ एवढा होता. या दरम्यान समर्थ शिवथरघळीत होते.

या सगळ्यावरून एक गोष्ट नक्की होते ती म्हणजे समर्थांचा मुक्काम १६७५ ते १६७७ च्या दरम्यान शिवथरघळीत होता. समर्थांनी याच काळात केव्हातरी शिवथरच्या घळीत, म्हणजे सुंदरमठी गणपतीची मूर्ती स्थापन केली आणि गणेशोत्सव सुरु केला (श्रीसमर्थाप्रताप समास आठवा). - © कौस्तुभ कस्तुरे । suvarnapaane@gmail.com